scorecardresearch

Premium

रफ स्केचेस् : प्रोसेस process

गोधडीच्या आतल्या पायापासल्या गुहेत अंधारात शांततेला शोधित ध्यानस्थ साधू बसला आहे.

रफ स्केचेस् : प्रोसेस process

सुभाष अवचट Subhash.awchat @gmail.com

रेखाचित्र : अन्वर हुसेन

canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
abhidnya bhave shared swami samarth experience
नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
donald trump
“डोनाल्ड ट्रम्प यांचा मृत्यू झालाय”, माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलाच्या ट्वीटनंतर खळबळ, नेमकं प्रकरण काय?
What Udaynidhi Stalin Said?
उदयनिधी स्टॅलिन यांचा भाजपाला सवाल, “हाच का तुमचा सनातन धर्म? राष्ट्रपती विधवा आहेत म्हणून..”

प्रदर्शन संपले की बेभरोशी दिवसांना सुरुवात होते. त्यामध्ये एक त्रांगडी शांतता असते. घरात फिरले तर कानाकोपऱ्यात धुळीसारखी ती पसरलेली असते. अंमळ कुठे फेरफटका मारावा म्हटला तर तीच पारोशी शांतता गाडीच्या मागच्या सीटवर बसलेली असते. कोठेही पाहा, कोणालाही भेटा, खिडकीबाहेरच्या झाडापाशी, बारमधल्या रमच्या ग्लासाभोवती ही कुंपण घालून बसलेली असते. झोपेत जागा की जागेपणी झोपेत? थिएटरमध्ये पडद्यावरच्या हलत्या प्रतिमांसमोर- सायंकाळी धूप पेटवून घरभर त्याच्या धुरात बसावे तशी थिएटरमध्ये खुर्चीत हाताची घडी घालून शेजारी बसते. यावेळी मला ही शांतता असभ्य वाटायला लागते. किती घुटमळायचे? तिचे इरिटेशन वाढतच जाते. मग तो दिवस येतो. गोधडीतून मी उठलो की नाही? ही सकाळ आहे की कोठला प्रहर असावा, याचा अंदाज लागत नाही. गोधडीच्या आत, माझ्या शरीराभोवती एकामागे एक फिरणाऱ्या मुक्या मुंग्या वारूळ बांधत आहेत. गोधडीच्या विरलेल्या धाग्यांतून कोठल्या प्रहराचा प्रकाश झिरपतोय? डोक्यावर घेतलेल्या गोधडीचा, हरवलेल्या विदूषकाचा सर्कशीचा फाटका तंबू झालाय. शनीच्या देवळाच्या ओटय़ावर बसलेला गुरव तबला बडवतोय. त्याच्यासारखी बेताल झालेली माझी ही सावत्र झोप! खंडाळ्याचे रेल्वेट्रॅक्स बोगद्यापर्यंत पोहोचलेत. त्या साइड ट्रॅकवर बसून पंचमदा पेटीवर नवीन धून तयार करतोय. गोधडीच्या आतल्या पायापासल्या गुहेत अंधारात शांततेला शोधित ध्यानस्थ साधू बसला आहे. पाचगणीच्या स्कूलचे गेट छोटय़ा हाताने पकडून होस्टेलच्या भीतीनं छोटं लेकरू रडतं आहे. या शांततेचा मुळातला स्वभाव, गुण, वृत्ती, चेहरा ओळखता येणं दुरापास्त होत जातं. गोधडीच्या आतल्या अनोळखी अंधारात पडून राहणं.. मी जागा आहे की झोपेत आहे? माझा श्वास चालू आहे की तो संथ झालाय? ही मेडिटेशनमधली तुरीया अवस्था असावी.

या गोधडीच्या, अंगावर ओढून घेतलेल्या मूक विश्वात मी आठवणींच्या उगाचच वाती वळत पसरलो आहे.. जशी माझी आजी माजघरातल्या गार अंधारात बसून वाती वळत बसायची. वेडसर कबुतर घोगरा आवाज काढत स्वत:भोवतीच फिरत राहते तशा या आठवणी फिरत राहतात. त्यांत सातत्य नाही, किंवा उराशी जपून ठेवाव्यात अशा त्या प्रेमळही नाहीत. उन्हाळ्यात धुळीबरोबर सुकी पाने वाऱ्याबरोबर उडतात तशाच काहीशा या आठवणी! प्रदर्शनात मलाच आवडलेले चित्र विकले जात नाही. किंवा माझी चित्रे विकत घेणाऱ्या माणसांचे चेहरे मला आवडत नाहीत, असेही!

मी कूस बदलतो. लायब्ररीमधली शांतता आवाजाने क्षणभर दचकावी तशी गोधडीत माझीच ऊब थोडीफार इकडे तिकडे झाली आणि परत स्वत:भोवती गुंडाळून निपचित पडली. मोठय़ा ग्रंथाच्या पानामध्ये बुकमार्क ठेवावा तसे हात मी उशीखाली सरकवले. धबधब्यात उभे असताना त्याच्या आवाजात उंचावरून येणाऱ्या मैत्रिणीच्या हाका ऐकू येत नाहीत, तसेच किचनमधून येणाऱ्या घरकामाच्या त्या बाईच्या बेलचे आवाज मला ऐकू येईनासे होतात. उठायचे कशाला? उठून करायचे काय? पावसाळ्यात बाजरीच्या पोत्यावर मांजर सारं अंग पोटाशी घेऊन स्वत:च्याच उबेत पडून राहतं; डोळे बंद असले तरी ते जागंच असतं, अशी काहीशी अवस्था असावी.

अशी अवस्था दर प्रदर्शनानंतर होत आली आहे. लग्न उरकल्यानंतर मंडप जसा रिकामा होतो. खुच्र्या, टेबलं विस्कळीत होतात. हार, फुले, अक्षता निराधार होतात. सजावट मलूल होते. आणि हा खाली मंडप परत नव्या वर-वधूची वाट पाहत ताटकळतो, तशीच ही वेळ असते. अशावेळी चूपचाप गोधडी डोक्यावर घेऊन पडून राहण्याशिवाय गत्यंतर नसते. मेंदूतल्या संवेदनांची घागर पूर्णपणे रिकामी झालेली असते. ब्रेन-ड्रेनच म्हणावा लागेल. आठवणींच्या सुतळ्यांचे तुकडे गोळा करीत दिवस काढणे, त्यांचा गुंडा करण्याचा प्रयत्न करत वेळ काढणे, आपण मठ्ठ आहोत असे स्वत:ला समजावणे, हे आलेच. महामार्गावरच्या ताडपत्रीने झाकलेल्या ढाब्यात मुसळधार पावसात टेबलावर टपकणारे पाण्याचे थेंब पाहत राहण्यासारखे हे सूक्ष्म विचार येत-जात असतात. त्याच थेंबांचा एकमेकांना चिटकून एक ओघळ होतो. तो टेबलावरून खाली ओघळत त्याची धार होऊन जमिनीवरच्या पाण्याच्या डबक्यात ती मिसळून जाते. आरती संपल्यावर मीच धूपपात्र घेऊन स्टुडिओभर धूप फिरवत आहे तेच वातावरण धुरकट,अ‍ॅब्स्ट्रॅक्ट करीत राहतो. या परिस्थितीला उपाय, औषध नाही. त्याचे डायग्नोसिस करता येणे शक्य नाही. हे डिप्रेशनही नव्हे. शेकोटीतली लाकडे का पेटत नाहीत? कितीही फुंका मारल्या तरी ठिणग्या उडतात, पण जाळाची एक साधी रेघ उमटत नाही. कधीतरी तुम्हाला अशा अवस्थेची, विश्रांतीची गरज भासते. सारं रिकामं झालं आहे, सारं निसटून गेलं आहे. परत परत फिरून धडपडत काय पकडून आणून हे सारे भरायचे आहे! आणि कशाला भरायचे? सांभाळायचे? अशा वेळेचे स्वागत करायला हवे. हायबरनेशन हीसुद्धा एक पोषक अवस्था आहे. तीही मनमुराद एन्जॉय करायला हवी. या अवस्थेमध्येही एक सुसूत्रता असावी. दम लागल्यावर शेताच्या बांधावर थोडा वेळ दम घ्यावा आणि पुन्हा पावले टाकावीत. रिकामे वाटणे यात हार किंवा त्रागा नाही. तो एक पॉझ आहे. यामध्ये कोण कोठले मार्ग शोधतात. मी गोधडी पांघरून, अलिप्त होऊन फक्त बघत राहतो. अन्यथा धावून येथेच परतावे लागते. त्यापेक्षा हे बरे!

मागच्या वर्षी माझी ‘परंपरा’ ही सीरिज तयार झाली. त्यात पन्नासएक मोठी पेंटिंग्ज होती. ते काम जवळजवळ दोन-अडीच वर्षे चालले होते. त्यात आपला ऑरेंज, व्हरमिलीयन रेड, स्कारलेट रेड, क्रोम यलो, ब्राऊन, मध्येच डोकावणाऱ्या व्हेरीडियन ग्रीनच्या छटांमधून ज्ञानाच्या शोधात निघालेले माँक्स, तर कधी ज्ञानामुळे मिळालेल्या विलक्षण अनुभवांचे अ‍ॅब्स्ट्रॅक्ट आविष्कार होते. त्या काळात मी क्वचितच अंथरुणावर पडलो असेल. कामाचे एक चैतन्य भोवती असे. त्या चैतन्यात थकवा नसे. एका अनोळखी ऊर्जेने सारा स्टुडिओ, शरीर, मन भारावलेले असे. एकामागोमाग पेंटिंग्जमध्ये तेथेच असलेले, पण न दिसणारे, उमगणारे, शब्दांत वर्णन न करता येणारे व्हिज्युअल्स सापडत जातात. मलाच ते धक्का देतात. ते तुम्ही एक्स्प्लोअर करत जाणे ही सहजता तुमच्यापाशी येत जाते. तीही तुमच्या कलेतल्या बैठकीनुसार. चित्रकला हा व्हिज्युअल्सचा खेळ आहे. मनमोकळा असतो तो. तर्कवितर्काना, उपमा, अलंकारांना येथे थारा नसतो. याची परिभाषा वेगळी असते. ती समजून घेतली की आनंदी यात्रेत तुम्ही सामील होऊ शकता. जडत्वापासून तुमची सुटका होते. अरण्यातल्या शांततेचे गाणे तुम्हाला ऐकू येते. लहान लेकराच्या निष्पाप हसण्याचा, खिदळण्यातला चैतन्याचा आनंद तुम्ही लुटू शकता. सर्व कलांमध्ये हेच तर सौभाग्य दडले आहे. दैनंदिन आयुष्यातले ताण, त्रागा, दडपणाने स्वत:च तयार झालेल्या कोषातून तुम्ही एका क्षणी बाहेर पडता आणि माझ्यातल्या ‘मी’चा शोध घेण्यास मुक्त होतात. त्यासाठी त्यांच्या प्रार्थना ऐकण्याची क्षमता हवी.

प्रदर्शन संपल्यानंतर माझ्या रिकाम्या स्टुडिओत व्हरमिलिअन, स्कारलेट, यलो रंगाचा धुराळा कित्येक दिवस होता. तो बसायला कित्येक महिने जावे लागतात. त्याची सवय अंगभर झालेली असते. घरात चित्रे तर नाहीत; पण त्यांच्या इमेजेस डोळ्यांपुढून सतत सरकत जातात. पुढे त्याच तुम्हाला बेजार करतात. मन द्विधा करतात. त्यांना पुसून टाकणे, विसरून जाणे या क्रियेत महिनोन् महिने सरकतात. घडून गेलेला भूतकाळ आहे, तो विसरण्याचीही धडपड सुरू होते आणि बेभरोशी कंटाळा तुमची नकळत पकड घेतो. मजा म्हणजे मी ती करू देतो. तो प्रोसेसमधला एक उपाय असतो.

प्रत्येक पेंटिंगची एक वेळ असते. खरं पाहता प्रतिभेचीही एक वेळ असते. तिचा बहर असतो. कोठलातरी विचार आणि त्यामुळे तयार होणाऱ्या अस्पष्ट प्रतिमांचा तो प्रभाव असतो. तो कॅनव्हास पेंट करायला सुरुवात करतो. त्यातून अचानक प्रतिमा आकार घेऊ लागतात. ठरवून प्रतिमा पेंट करण्याचा अट्टहास त्यात नसतो. तसा केल्यास प्रतिमा कापराच्या धुरात क्षणात सैरभर होऊन संपतात. प्रतिमा या अ‍ॅब्स्ट्रॅक्ट आणि चंचल असतात. त्या प्रत्यक्षात तुमच्या ब्रशच्या रंगांत सापडत नाहीत. प्रतिमांचा आभास हा ट्रिगर पॉइंट असतो. त्याने सुरुवात करून तो एक्सप्लोर करणे आले. या क्षणांची वाट पाहणे आले. जेव्हा येईल तेव्हा तो एक डिवाइन मोमेंट असतो. तो सांभाळायला रियाझ आणि मनाशी लिरीकल दोस्ती हवी असते.. तेव्हा कुठे मास्टरपीसेस तयार होऊ शकतात. ज्याला आपण मास्टरपीसेस म्हणतो, त्यात खऱ्या किती प्रतिमांचा अंश उतरला आहे याचे प्रामाणिक उत्तर फक्त चित्रकार चांगल्या मूडमध्ये असला तरच देऊ शकतो.

त्यावेळचा बहर ओसरला की सैरभैर व्हायला होते. नवीन बहराच्या शोधात कलाकार निघतात. झाडांचे बहर, त्यांचे कलर ऋतुचक्र ठरवते. त्यात वेळेचे नियम आणि शास्त्र असते. हे नियम कलाकारांनाही असावेत. त्यांना सतत आझादी हवी असते. गेलेल्या बहराची, त्यातल्या प्रतिमांची चाहूलही पुढच्या नवीन चित्रांत त्यांना नाकारायची असते. त्यासाठी ते अनेक प्रयत्न करतात. माझ्या गुरुस्थानी असलेले अनेक चित्रकार कोऱ्या कॅनव्हाससमोर एकटे बसून त्या क्षणाची आराधना करताना मी पाहिले आहेत. काही वेगळे मार्ग निवडतात. कोणी भटकंती, कोणी नशा, कोणी भुरळलेल्या स्त्रियांच्या प्रेमात उगाच पडून येतात. कोणी कलेवर भाषणं ठोकत वेळ काढतात. पण साऱ्यांचा उद्देश एकच असतो, तो म्हणजे त्या अलौकिक क्षणाची वाट पाहणे. माझा मित्र कवी ग्रेस यातून गेलेला मी पाहिला आहे. दोन शब्दांसाठी तो पहाटे थंडीत गोठलेल्या पाण्यात पोहायचा, दातांनी सुपाऱ्या कडाकडा तोडायचा, पंचेचाळीस डिग्री भाजून काढणाऱ्या उन्हात घटाघटा देशी दारूची बाटली खाली करायचा. या सर्व अभद्र क्रियेत तो अलिप्त असायचा. कारण शेवटी त्याला कोणत्यातरी प्रतिमा शब्दांत पकडायच्या असायच्या. शारीरिक वेदना देण्याचा प्रयत्न बुद्धाने स्वत:वर केला. चित्रकार हुसेन म्हणजे अब्बाजान भरदुपारी भायखळा, ग्रँट रोडवरच्या फूटपाथवर अनवाणी चालायचे. माझे मित्र अद्भुत चित्रकार प्रभाकर बरवे यासाठीच डबल डेकरचे तिकीट काढून सारी मुंबई फिरून यायचे. राम गणेश गडकरी देवळाच्या पायरीवर बसून बिडय़ा फुंकायचे. कंटाळलेला मायकेलॅन्जेलो चर्चमधून पळून जायचा आणि पोलीस त्याला पकडून परत आणायचे. तो क्षण, ती आझादी मिळवण्यासाठी जगभरातल्या अनेक कलाकारांची धडपड प्रसिद्ध आहे.

काय व्यक्त करायचं आहे? काय शोधायचं आहे? जे अस्पष्ट, अ‍ॅब्स्ट्रॅक्ट आहे, त्याचा ध्यास त्यांच्या श्वासात आहे. मागचे प्रदर्शन झाले. त्यातही त्या प्रतिमा मला नव्याने सापडल्या होत्या. त्याही बहरलेल्या होत्या. आता ते प्रदर्शन संपल्यानंतर त्यातले काहीही अंश पुढच्या चित्रांत येऊ नयेत, ते रिपिटेशन होऊ नये हा अट्टहास खरा छळ करतो. ज्या चित्रकारांपाशी तो नाही, ते सुखी म्हणावे लागतील. मुळात गेले तर नवनिर्मितीच्या याच रिअ‍ॅक्शन्स आहेत. या प्रोसेसमधली अस्वस्थता चिटकून राहते. त्यामुळे पिकासो म्हातारा झाला खरा; पण त्याचे मन झाले नाही.

गोधडी डोक्यावर घेऊन मी पडून राहिलो. त्यात एक काल्पनिक विश्व तयार झाले. त्यात मी रमलो. खरं सांगायचं तर मी अलिप्त असावा. ‘आहे-नाही’च्या कोडय़ात कधीतरी सामील व्हावं लागतं. काय सांगावं? कदाचित एखादा सूक्ष्म धागा हाताशी येईल.

झाले ही तसेच..

एका प्रहरी मला जाणवले, गोधडीआतल्या गुहेत बसलेल्या साधूचे मंत्रोच्चार सुरू झालेत. भोवतालच्या जंगलात ते हळहळू पसरत निघालेत. त्यांचे प्रतिध्वनी घुमू लागलेत. सारं जंगल श्वास होऊ लागलंय. पानांची सळसळ, वृद्ध झाडांच्या खोडाला लगडलेल्या वेली, जनावरांच्या पावलांची चाहुल, गच्च लगटलेल्या दाट पानांत दडलेल्या पक्ष्याची पहाटेची शिळ. बहुतेक दंव पडायला सुरुवात झाली आहे. ओलसर जंगलाचा, मातीचा ताजा सुगंध माझ्या पारोशा मनापर्यंत पोहचतोय. हे अनुभवी जंगल आहे. पशू, पक्षी, फुलपाखरे, फुलांचे बहर, तरुण खोडकर वेलींना अंगावर खेळवणारे प्रेमळ वृद्ध वृक्ष, आगाऊ वाढलेल्या मुळांवर, वाळवीवर बारीक लक्ष ठेवणारी तरुण पिढी.

माझ्या अंगावर वाढलेल्या वारुळाची माती हळूहळू ढळायला लागली. त्या जंगलात प्रार्थना सुरू झाल्या. अचानक गुहेत बसलेला साधू उठून बाहेर आला आणि जंगलातल्या प्रत्येक झाडाला मायेने स्पर्श करीत फिरू लागला. झाडांच्या आकारात दडलेले त्याचे अनेक शिष्य अंगावरच्या साली फेकून बाहेर आले. एकापाठोपाठ त्या ज्ञानी गुरूच्या पाठोपाठ चालत माझ्यापाशी आले. त्यांच्या मंत्रोच्चारांनी एक मंगल सोहळा जंगलात सुरू झाला.

इतके दिवस बंद पडलेल्या माझ्या कानात एक शब्द वाहत आला- ‘देवराई’!! हो, हीच ती पूर्वजांनी राखलेली गावाबाहेरची देवराई. ‘sacred garden!’

माझ्या भोवताली अधू अंधार जंगलात पाल्यापाचोळ्याबरोबर एकरूप झाला. मी कधी उठलो? मी बाहेरच्या स्टुडिओमध्ये कधी आलो? मी एकामागोमाग पुढचे कित्येक दिवस पेंटिंग्ज करत राहिलो, हे मला ठाऊक नाही. ती संपूर्ण देवराई माझ्या चित्रांत सामील झाली. आणि मी प्रदर्शनाच्या तयारीला लागलो. एकदा मध्येच मी बेडरूममध्ये गेलो. कामवाल्या बाईंनी माझे बेड नीटनेटके केले होते. उशा नीट अभ्रे घालून रचल्या होत्या.

पायथ्याशी माझ्या गोधडीची, त्यात अडकलेल्या ‘प्रोसेस’ची नीट घडी घालून ठेवली होती. सारी मजा असते ही!

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-10-2021 at 01:08 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×