scorecardresearch

अफसाना लिख रही हूँ.. : ‘रुके रुके से कदम..’

या इथेच.. याच फुलापानांत एखाद्या कपारीमध्ये निवांत बसून एकमेकांच्या सहवासात हरवणं.. मला दिसतायत ती दोघं..

लताबाई संपूर्ण गाणं तालाला कुठेही बांधून न घेता गातात.
लताबाई संपूर्ण गाणं तालाला कुठेही बांधून न घेता गातात.

मृदुला दाढे- जोशी – mrudulasjoshi@gmail.com

या इथेच.. याच फुलापानांत एखाद्या कपारीमध्ये निवांत बसून एकमेकांच्या सहवासात हरवणं.. मला दिसतायत ती दोघं.. अगदी याच झाडाशी थबकलो होतो. त्या झाडालाही आपला स्पर्शगंध आठवत असेल का? तेव्हा शहारलं असेल का हे झाडसुद्धा? कुठे गेला ‘तो’ मौसम? कालपरवाच घडलेली घटना वाटतेय ती. पंचवीस वर्षांपूर्वी इथेच- या कपारीत बसलो होतो रेलून एकमेकांना. तिच्या टपोऱ्या डोळ्यांनी मला समजावत होती- काय असते ‘जाडों की नर्म धूप’! ‘बैठे रहे तसव्वुरे जाना किये हुये’ हेच स्वप्न होतं.. एकमेकांबद्दलच्या स्वप्नाळू कल्पना.. प्रत्येक क्षण भारलेला! प्रत्येक क्षणी नव्यानं एकमेकांना सापडत जाणं!

‘औंधे पडे रहे कभी करवट लिये हुए!’

चंदालाच सुचू शकतं हे असं. इथल्या निसर्गाशी एकरूप झालेली चंदा! इथले ऋतू तिच्या डोळ्यांतच बहरतात.. तिनं या सौंदर्याची जाणीव करून दिली. ज्या उन्हात ती हवीहवीशी ऊब असते.. ‘ते’ ऊन!

‘या गरमियों की रात जो पुरवाईयॉं चले..’

उन्हाळ्यातला तो बर्फाच्या डोंगरावरून येणारा सुखद, गार वारा.. त्या बर्फाच्या चादरीवर पहुडून ते निरभ्र आकाशातले तारे न्याहाळणं.. हेच खरं सुख! यातला हा सुरुवातीचा ‘या’ फार महत्त्वाचा; कारण आधीच्या स्वप्नाशी त्याचा धागा आहे. ते शब्द आधीच्या काव्यापासून तुटलेले नाहीत. ‘जाडों की नर्म धूप..’ याच विचारांचा तो पुढचा वेगळा पदर आहे- ‘या’ गरमियों की रात’! ..असं सुंदर जोडलंय हे! दोन्ही तितकंच उत्कट. किंचित विरोधी वाटलं तरी पूरक.. थंडीत ऊन आणि उन्हात गारवा.. हे सुख एकटय़ाचं असूच शकत नाही. कारण यात एकमेकांच्या सोबत असणं- हा त्या दृश्यप्रतिमेचाच भाग आहे.

‘बर्फिली सर्दियो में किसी भी पहाड पर

वादी में गूॅंजती हुई खामोशियॉं सुने!’

चंदाला ऐकू येतात इथल्या शांततेची स्पंदनं. कारण ही शांतता वेगळी आहे. केवळ आवाजाचा अभाव म्हणजे शांतता नसते. स्वत:च्या काळजातली धडधड ऐकू यावी अशी, मनातले तरंग उमटावेत अवकाशावर अशी शांतता. या पर्वतांमध्ये एक अनाहत नाद निरंतर वाहतो आहे. ‘गुॅंजती हुई खामोशियॉं’ म्हणजे काय?

‘तारांवरी पडावा केव्हा चुकून हात

विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा!’

तसं सापडतं ते शांततेतलं गुंजन..

मग डोळे पाणावतात. ते क्षणही त्या आनंदाश्रूंमध्ये चिंब भिजतात. ‘भीगेसे लम्हे’! काही बोलून त्या शांततेचा भंगही करावासा वाटत नाही.. शब्दांत न सामावणारं सुख असतं हे.

हे गाणं म्हणजे एक अशी जमून आलेली मैफल.. बर्फाच्छादित शिखरं.. हवेतला तो धुंद करणारा गारवा.. कुठलीशी अनामिक ओढ! डॉक्टर अमरनाथच्या चेहऱ्यावर एक हरवलेपण आहे, अपार वेदना आहे. कातर मनानं झाडांना स्पर्श करतो तो.. पण सर्रकन् काटा आपल्या अंगावर येतो!

या गाण्यात ‘उलटा दादरा’ वाजलाय असं जाणकार सांगतात. लताबाई संपूर्ण गाणं तालाला कुठेही बांधून न घेता गातात. मध्येच त्या तालाची साथ सुटल्यासारखी वाटते खरी, पण त्या समेवर आल्या की त्याचं अस्तित्व मान्य करावं लागतं. त्या लयीचं देणं बाईंनी देऊन टाकलेलं असतं. ‘बर्फिली सर्दियो में’ ही ओळ त्या अशी गातात, की मागे ताल चालू नाहीच; पण ‘वादी में’ हे शब्द बरोबर समेवर येतात. ‘तारों को देखते रहें..’ या ओळी वरच्या षड्जापासून येतात. तो षड्ज तर प्रकाशमान लागतोच, पण खाली येताना ‘पडे’वरची बारीक हरकत घेऊन, ‘दिल ढूंढता है..’पर्यंत वजन कसं कायम राहतं, हा अनेक अनुत्तरित प्रश्नांपैकी एक प्रश्न. एकदाही ‘लिये हुये’नंतर त्या श्वासाला थांबलेल्या नाहीत. त्याच श्वासात ‘दिल ढूंढता है’ हे शब्द वजनदार कसे येऊ शकतात? जणू भूपेंद्रच्या पुढच्या ओळीची सुरुवातसुद्धा त्या त्याला सुपूर्द करतात आणि ‘लम्हें’ची लड अशी मोहकपणे रिषभापर्यंत खाली ओघळू द्यायचं कसं सुचलं असेल? लतादीदींचा अंतरा सुरू असताना जगात सध्या हा एकच आवाज आहे असं वाटत राहतं. धृवपदातच येणारा भूपेंद्र मात्र घनगंभीर आवाजाने गाण्याला एक भरीवपणा देतो. ‘दिल ढूंढता है’ हा मिर्झा गालिबचा विचार. त्याला पुढे निसर्गाचा सुंदर कॅनव्हास देऊन काय तरल चित्र रेखाटलंय गुलजारसाहेबांनी! ‘तसव्वुरे जाना’ हा फार सुंदर विचार दिलाय त्यांनी. आपल्या प्रिय व्यक्तीच्या विचारात हरवणं.. काय सुख असतं त्यात!

सैरभैर होऊन शोध घेताना समजतं की- ओढणी, स्टेथोस्कोप असं काय काय जपून ठेवणारी चंदा अखेर वेडी झालेली असते आणि केवळ आठ महिन्यांपूर्वीच हे जग सोडून गेलेली असते. तशीच अतृप्त, अपूर्ण, डोळ्यांत प्रतीक्षा, मेंदूत अमरनाथच्या स्मृती तशाच घेऊन.. तारुण्य ते वार्धक्य या प्रवासात कुठलेच ऋतू तिच्या जगात आलेलेच नसतात. तिनं केवळ रखरखाट अनुभवलेला असतो.. शेवटचा मौसम तिनं अमरनाथबरोबरच पाहिलेला असतो. ढसाढसा रडण्याशिवाय अमरनाथला पर्याय उरलेला नसतो.

आता कजलीला शोधणारा अमरनाथ योगायोगानं एका दुकानात थांबतो. रात्रीची वेळ असते. आणि अचानक त्याच्या कानावर गलिच्छ शिव्या आणि एका ‘गिऱ्हाईका’चा केलेला उद्धार कानावर पडतो. पाठोपाठ प्रचंड संतापलेली ती स्त्री दृष्टीला पडते आणि त्याला भयंकर धक्काच बसतो. साक्षात् चंदाचाच चेहरा असतो तो.. पण ती चंदा नसते. ‘केवळ आवाजावरून तिला आपण ओळखू..’ असं म्हणणाऱ्या अमरनाथला कजली अशा भयानक पद्धतीनं ‘दिसते.’ ती भेटली याचा आनंद मानायचा की ती वेश्या आहे याचं दु:ख? मनाचा धडा करून अमरनाथ त्या कोठय़ावर जातो. तिच्याकडे बघताना तो चंदाच्या खुणा तिच्यात शोधतोय. पण एकीकडे त्या मुलीबद्दल वाटणारं अपार वात्सल्य.. पोटातून वाटणारी कळकळसुद्धा तितकीच खरी. आणि याला विचित्र पद्धतीनं छेद देऊन जाणारी कजलीची नजर.. तिच्या लेखी तो केवळ एक ‘गिऱ्हाईक’ आहे. चार घटका मजा करायला आलेला. पण तो ‘धंदे की बात’ करत नाही.. तिला तो ‘बेटी’ म्हणतो.. त्याला ती अक्षरश: हाकलते. अमरनाथ धीर करून तिथे पुन्हा जातो. तिच्या मौसीला पैसे देऊन कजलीला घरी घेऊन येतो. आता झगडा सुरू होतो नात्यांचा, संस्कारांचा. पुरुष हा दुसऱ्या कुठल्या हेतूने स्त्रीकडे बघू शकतो हेच मान्य नसलेली, किंबहुना तसेच अनुभव आजवर घेतलेली कजली.. आणि केल्या महत्पापाचं प्रायश्चित्त म्हणून निदान चंदाच्या मुलीला त्या नरकातून सोडवण्याची धडपड करणारा अमरनाथ! तिला माणसात आणायचे, तिच्या मनावरचे वासनेच्या बाजारातल्या संस्कारांचे थर काढून टाकायचे अमरनाथचे प्रयत्न.. आणि आपल्याला हा मनुष्य इथे पैसे देऊन घेऊन आलाय तर आपण प्रामाणिकपणे त्याच्या पैशाचं मोल दिलं पाहिजे म्हणून अगदी नृत्य येत नसतानासुद्धा नाचून त्याला रिझवण्याचा कजलीचा प्रयत्न.. अशा विचित्र वळणावरचं गाणं..

‘मेरे इश्क में लाखो लचके’ (आशा भोसले)

अत्यंत विसंगत वातावरणात, घरात नोकरचाकर असताना, आठवणाऱ्या सगळ्या स्टेप्स एकाच नाचात कोंबून ‘सेठ’साठी केलेला हा नाच म्हणजे एक नमुना आहे. फडकती मस्त चाल आणि आशाबाईंच्या आवाजातला नखरा जबरदस्त परिणामकारक आहे.

हळूहळू कजलीच्या कपडय़ांत, वागण्या-बोलण्यात फरक पडतो. चेहऱ्यावर बटबटीत मेकअप थापणाऱ्या कजलीच्या मनावरसुद्धा केवळ स्त्री-पुरुष नात्याच्या एकाच रंगाचं लेपन आहे. आणि तोही रंग फक्त वासनेचा! खरं तर तिनं स्वत:मधली स्त्री त्या लेपाखाली दाबून टाकलीय. आता तो लेप निघायला लागतो. ‘वादा’ या गोष्टीवर तिचा विश्वास नसतो. ‘येतो’ म्हणून कधीच न आलेला तो डॉक्टर आणि ती ज्याला ‘येते’ म्हणून सांगून आलेली असते तो कुंदन- यांत कुठेच वचन पाळलं जात नसतं. आपल्या आईला फसवणाऱ्या त्या डॉक्टरचा तर प्रचंड तिरस्कार असतो तिला. कजलीला शिव्या, दारूपासून हलकेच दूर करण्याचा प्रयत्न अमरनाथ करतो. कजलीच्या मनात हे पक्कं आहे, की आपल्या मूळ ठिकाणी आपल्याला जावंच लागणार.. ‘इज्जतदार लोगों में अपनी बडी बेइज्जती होती है..’ किंवा ‘शरीफ लोगों में अपना नंगापन दिखने लगता है..’ ही तिची वाक्यं खूप काही सांगून जातात. तिची कर्मकहाणी ऐकताना अमरनाथचा अनावर होणारा संताप, तिच्याबद्दलच्या भावना.. कजलीला त्याच्यात गुंतायला भाग पडतात. कुठेतरी हा माणूस खूप वेगळा आहे हे तिला आतून जाणवतं. हळूहळू कुंदनची जागा ती नकळत अमरनाथला देते. पण त्याचबरोबर ‘आपल्यासारख्यां’च्या नशिबात संसारसुख वगैरे नसतं, हा एक औट घटकेचा खेळ होता, इथून निघून जावं, नाहीतर ‘न घर का, न घाट का’ अशी आपली स्थिती होईल, हे कजलीला जाणवतं. त्या वैफल्यातून आलेलं हे गाणं..

‘रुके रुके से कदम

रुक के बार बार चले

करार ले के तेरे दर से बेकरार चले..’(लता)

हे एक वेगळंच जग अनुभवलं मी. इथून निघताना मात्र पावलं आता अडखळतायत. खरं म्हणजे असल्या संभावित वातावरणात गुदमरायला होत होतं; पण तरीही निघताना अशी विचित्र अवस्था का झालीय? तुझ्याकडून एक सुकून मिळाला.. एक आधार मिळाला. पण तो मी घट्ट धरून ठेवू शकत नाही. तो मला झेपणार आहे का, ही धास्ती आहे. मी खरंच हे स्वप्न बघू का?

‘सुबह न आयी कई बार नींद से जागे

थी एक रात की ये जिंदगी गुजार चले..’

कित्येक वेळा त्या नरकयातनांनी भरलेल्या काळरात्रींतून प्रकाशाची वाट शोधली.. पण पुन: पुन्हा नियतीनं त्या अंधारातच ढकललं. आणि इथे मला एक दर्जेदार आयुष्य जगायला मिळालं. प्रथमच मला कुणीतरी ‘स्त्री’ समजलं; मादी नाही. भोगलालसेच्या पलीकडच्या जगातली ही रात्र म्हणजे एक वेगळा जन्मच होता. पण आता हेही आयुष्य सोडून निघायची वेळ झालीच की..

‘उठाये फिर थे के एहसान दिल का सीने पर

ले तेरे कदमों में ये कर्ज भी उतार चले..’

मन? काय असतं ते? कुणी कधी विचार केला या मनाचा? अगणित वेळा या मनाच्या चिंधडय़ा उडाल्या शरीर विकताना. म्हणून हा भागच अस्तित्वातून काढून टाकला. हृदय हे फक्त शारीरिक अवयव म्हणून जिवंत आहे. भावना वगैरे लाड त्याला नाहीत. कारण त्या ‘असतात’ हेच विसरून गेले होते.. इथे आल्यावर हे एक नवीनच ओझं वाहायला लागलं मला.. चक्क खोल खोल गाडलेल्या भावना वर उचंबळून यायला लागल्या. खरं तर हे लाड मला परवडणारे नाहीत. कारण पुन्हा त्या संवेदनाशून्य जगात जायचंय. घे, हे तुझं तुला परत. जिथे बुद्धीचंच ऐकतो आम्ही.. जेवढे पैसे- तेवढं हिशेबाने सुख विकतो.. अशा जगात या तुझ्या कर्जाची मला आता गरज भासणार नाही. नकोत ते उपकार भावनांचे या मनावर. इथून जाताना नि:संग होऊन जाईन. येताना जशी होते तशीच बनून जाईन. पण.. हे निघणं मात्र सहज नाही. कुठली तरी अनामिक ओढ मला इथे अजून बांधून ठेवतेय..

कजलीच्या मनातला संघर्ष या शब्दांनी झेललाय. मदनमोहनच्या सर्वोकृष्ट रचनांपैकी एक असलेलं हे गाणं. याची सुरुवातीची व्हायोलिन्ससुद्धा तुकडय़ा-तुकडय़ाच्या फ्रेजमध्ये येतात. आणि ‘रुक के, बार, बार, चले’ या शब्दांची मांडणीसुद्धा तुटक, थबकत केलीय. ‘रुके..’ ही सुरुवात करताना लताबाईंनी त्याला किंचित ‘अ’कार जोडलाय. तो ऐकता आला तर स्वत:ला ‘शाब्बास’ म्हणावं. ‘बार बार’ म्हणताना त्यातला तो हबकून गेलेला.. किंचित थरथरलेला आवाज ऐकून स्वत:ला सावरत पुढचं गाणं ऐकायचं. ‘करार’ शब्दातला ठामपणा गंधारावरचा स्वच्छ तेजस्वी आकार सांगून जातो.. खरं तर हे गाणं म्हणजे दोन गंधारांची करामत आहे. ही चाल ‘सा’ ते ‘ध’ याच स्वरांत फिरते. ‘तेरे दरसे’ या शब्दांवर लागलेला धैवत हा या चालीतला सगळ्यात उंच सूर. मग काय ताकद आहे या चालीची? तर शुद्ध गंधारावर सुरू होणारं धृवपद पुढे ‘चले ऽऽऽ’ हा शब्द सोडताना कोमल गंधाराला असा काही स्पर्श करतं, की त्या गंधारात तो अंधारडोह डहुळल्याचा भास आहे. पुन्हा अंतऱ्यात ‘सुबह न आयी’ ही ओळ शुद्ध रिषभ, शुद्ध गंधार यांच्या सुरक्षित आवरणात असते आणि अचानक ‘थी एक रात की’ या ओळीवर तो कोमल गंधार वास्तवाची जाणीव करून देतो. मदनमोहन हा भावनांचा संगीतकार होता. प्रत्येक भावनेचा तरलतम पदर त्याला संगीतबद्ध करता येत होता. अन्यथा संपूर्ण गाण्यात हा शुद्ध कोमल गंधाराचा खेळ तो खेळला नसता. मदनमोहनच्या गाण्यात काही अवघड फ्रेज असतातच. गळ्याची फिरत, नेमकेपणा यांची सत्त्वपरीक्षा बघणाऱ्या. यात ‘सुबह न आयी’मधल्या ‘आयी’वर आणि ‘फिरते थे’मधल्या ‘फिर’वर ही महाकठीण जागा आहे. ‘आ’वर अशी जागा समजू शकतो; पण ‘फिर’मध्ये ‘र’वर? तीच सफाई? तेच टायमिंग? असे प्रश्न पडण्यातच हे आयुष्य संपेल; पण लता नावाचं कोडं सुटणार नाही. नवनवीन कूटप्रश्न तो आवाज घालतच राहणार. ‘तत्त्वमसि’ एवढंच म्हणू शकतो इथे.

पुन्हा आपल्या मूळ वेशात बसलेल्या कजलीला बघून अमरनाथ संतापतो. कजली कोठय़ावर येते. खरंच, आपल्याला पूर्ण स्त्री बनायचंय, आई व्हायचंय, संसार करायचाय हे सांगताना ती ऊर फुटून रडते. मौसी तिला परत पाठवते. आता मात्र त्या घरात प्रवेश करताना तिची मानसिकता वेगळी आहे. त्याला सर्वस्व वाहण्याची तिची तयारी आहे. पुरुषजातीबद्दलच्या सगळ्या कोमल भावना अमरनाथमध्ये साकार झाल्यात. हलकेच ती त्याच्याजवळ जाते. अमरनाथ संतापून उठतो. ‘इस शरीर के आगे भी कभी देखा है?’ हा त्याचा प्रश्न अवाजवी नसतो. इथे हा संघर्ष टिपेला पोहोचतो. त्याला पित्याच्या भूमिकेतून वाटणारी तिची काळजी विरुद्ध कजलीला पुरुष म्हणून वाटणारी त्याची ओढ यांचा हा झगडा चरमबिंदूवर पोहोचतो. ‘तुझ्या आईला सोडून जाणारा मीच..’ हे अमरनाथ सांगून टाकतो. तिला हा जबरदस्त धक्काच असतो. त्याच धक्क्य़ात ती निघून जाते. सकाळी अमरनाथ जायला निघतो. ती जवळच उभी असते. हातात त्याचा जुना चुरगळलेला फोटो घेऊन. अमरनाथच्या डोळ्यांतून पश्चात्तापाचे कढत अश्रू ओघळत असतात. ‘‘मुझे माफ कर दो कजली! हम दोनों के पास पीछे मूड के देखने के लिये कुछ भी नहीं है,’’ असं म्हणत तिला गाडीत बसवतो. एक नवीन आयुष्य घडणार असतं कजलीसाठी. आधी एक गिऱ्हाईक(?), मग एक आदर देणारा पुरुष.. आणि आता पित्याच्या प्रेमानं जवळ घेणारा अमरनाथ! किती कोनांमधून एकाच व्यक्तीला अनुभवते ती एकाच आयुष्यात! प्रेमाची ही किती रूपं? पुन्हा एक प्रवास सुरू होतो.. परतीचा. जे शोधायला हा प्रवास सुरू झालेला असतो ते मिळत नाही; पण एक हरवलेलं आयुष्य मिळतं. चंदा भेटत नाही; पण मागे ठेवलेली तिची आठवण- तिचंच रूप भेटतं. अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी एक संधी मिळते. एक सुंदर ‘मौसम’ पुन्हा आयुष्यात येतो.

मानवी नात्यांचा, भावनांचा विलक्षण गुंतागुंतीचा हा बहुपेडी गोफ अनुभवण्यासाठी ‘मौसम’ला पर्याय नाही. त्या अभिनयाला, त्या काव्याला, चालींना आणि त्या आवाजांनाही नाही. काही शुभयोग हे एकदाच येतात. कारण ते चमत्कार असतात. वारंवार न घडण्यासाठीच झालेले. एखाद्या हळव्या क्षणी थबकावं. मागे वळून बघावं. ‘ते’ क्षण शोधावेत. आणि त्यांना हलकेच चुंबून पुन्हा त्या मखमली कुपीत ठेवून द्यावेत..

‘दिल ढूंढता है फिर ‘वही’.. फुरसत के रात-दिन! ’ (उत्तरार्ध)

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-10-2020 at 00:02 IST

संबंधित बातम्या