पराग कुलकर्णी

२८ ऑगस्ट १७८९ रोजी फ्रान्सच्या असेंब्लीमध्ये एका विशेष सभेसाठी लोक जमले होते. विषय होता- तत्कालीन राजाला (सोळावा लुई) पूर्णाधिकार देण्याबाबत. प्रस्तावाला विरोध करणारे डाव्या बाजूला बसले होते आणि समर्थन देणारे उजव्या बाजूला. पुढच्या बठकीतही अशीच विभागणी कायम राहिली. वृत्तपत्रांनी वार्ताकन करताना ‘डावे-उजवे’ असा शब्दप्रयोग करण्यास सुरुवात केली. राजेशाही समर्थक उजवे आणि सामान्यजणांचा कैवार घेणारे डावे. हीच संकल्पना पुढे डावी-उजवी विचारसरणी म्हणून लोकमान्य झाली. अर्थात काळ आणि परिस्थितीनुसार त्यात बरेच बदल झाले. तरीही डाव्या-उजव्या विचारसरणीतला फरक ढोबळमानाने या मुद्दय़ांच्या आधारे सांगता येईल.

१. व्यक्तिस्वातंत्र्य :

उजव्यांचं महत्त्वाचं मूल्य म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्य (Individualism). म्हणजे प्रत्येकाला स्वत:चा, स्वत:च्या स्वार्थाचा विचार करण्याचा अधिकार आहे आणि त्यात समाजाने, सरकारने ढवळाढवळ करू नये, अशी ही विचारसरणी. या मूल्यावर उजव्यांची बरीचशी आर्थिक, सामाजिक धोरणं आधारलेली आहेत. याउलट डाव्यांना संपूर्ण समाज महत्त्वाचा वाटतो. समाजातल्या तळागाळातील लोकांचा विचार करणे आणि त्यांचा स्तर उंचावण्यास मदत करणे, हे डाव्यांचे मुख्य काम.

वरवर पाहता डाव्यांची ही भूमिका मानवतावादी वाटते खरी; पण आयन रँड यांच्या ‘फाउंटनहेड’ या कादंबरीत व्यक्तिस्वातंत्र्याचं उत्तम समर्थन केलेलं आहे.. जे मुळातूनच (एकदा तरी) वाचलं पाहिजे.

२. सामाजिक, राजकीय विचारसरणी :

उजवे परंपरावादी, तर डावे पुरोगामी विचारांची कास धरणारे. नव्या जगातले नवे प्रश्न (तापमानवाढ, प्रदूषण) किंवा जुने प्रश्नही (वर्ण-जातिव्यवस्था, स्त्रीमुक्ती, समलैंगिकांचे अधिकार) डाव्यांनी उचलून धरले. तर धर्म आणि संस्कृतीच्या संवर्धनाचे प्रश्न उजव्यांनी महत्त्वाचे मानले.

३. आर्थिक स्वातंत्र्य :

उजवे आर्थिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करतात. कमी कर, मुक्त व्यापार, खाजगी उद्योग, स्पर्धा याद्वारे विकास होतो यावर त्यांची श्रद्धा; तर डाव्यांना संपत्तीचा समाजातल्या सगळ्यांनाच लाभ मिळावा म्हणून श्रीमंतांवर जादा कर, समाजाषी संबंधित बाबींत सरकारी हस्तक्षेप, नियंत्रित व्यापार या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात.

काळानुसार डावे-उजवे यांमध्ये अनेक प्रकार आले. अत्यंत डावे (extreme Left), डावे, मध्यम डावे, मध्यम (Centrist/ Moderate), मध्यम उजवे, उजवे, अत्यंत उजवे (extreme right). साम्यवाद, समाजवाद, भांडवलशाही, राष्ट्रवाद, फॅसिझम या संकल्पनाही विचारसरणी किती डावीकडे, किती उजवीकडे यावरून आल्या. विचारसरणींतले फरक आणि साम्य अधोरेखित करण्यासाठी गरजेनुसार आणखी काही मुद्देही वेळोवेळी विचारात घेण्यात आले. जसे की लोकशाही आणि हुकूमशाही. साम्यवाद आणि फॅसिझम डाव्या-उजव्या पट्टीवर एकमेकांच्या विरोधात असले तरी हुकूमशाहीत त्यांच्यात साम्य जाणवते.

‘वयाच्या विशीत जर तुम्ही डावे नसाल तर तुम्हाला हृदय नाही आणि वयाच्या तिशीत जर तुम्ही उजवे नसाल तर तुम्हाला डोकं नाही असे समजावे..’ असं गमतीत म्हटलं जातं. आज जगात बऱ्याच देशांत उजव्या विचारसरणीला लोकमान्यता मिळते आहे. तेव्हा डाव्या-उजव्यांतले ‘डावे-उजवे’ समजून घेणे निश्चितच प्रासंगिक ठरेल.

parag2211@gmail.com