सेनापतीजवळील उपलब्ध साधनांचा क्रियाशील उपयोग म्हणजे युद्धनीती. युद्धनीती निश्चित झाली की, तिचा प्रत्यक्ष लढाईच्या हालचालींमध्ये उपयोग करताना योजलेल्या युक्त्या-प्रयुक्त्यांना युद्धातील डावपेच म्हटले जाते. प्रत्यक्ष लढण्याची प्रक्रिया शारीरिक असते. पण त्याचे नियोजन आणि संचलन ही संपूर्ण मानसिक अभिव्यक्ती. कोणत्याही युद्धात जय-पराजयाची निश्चिती होते ती, सेनापतींनी आखलेल्या या युद्धनीतीवर. शत्रूची तयारी जोखून त्या अनुषंगाने मुत्सद्देगिरीने श्रेष्ठ युद्धनीती आखणारा सेनापती युद्धातील विजयावर शिक्कामोर्तब करत असतो. ही बाब भारताचे आठवे लष्करप्रमुख सॅम माणेकशा यांनी १९७१ मधील बांगलादेशच्या युद्धात निर्णायक विजय मिळवून सप्रमाण सिद्ध करून दाखविली. या युद्धात भारतीय लष्कराचे नेतृत्व करणाऱ्या माणेकशा यांच्या कामगिरीचा गौरव ‘फिल्ड मार्शल’ हा किताब देऊन करण्यात आला. स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय लष्कराचे ते पहिले फिल्ड मार्शल. पाकिस्तानी लष्कराला १८ दिवसांत शरण आणणाऱ्या या सेनानीच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेकविध पैलू ‘फिल्ड मार्शल सॅम माणेकशा’ या पुस्तकातून उलगडले आहेत.
भारतीय लष्कराचा मानबिंदू ठरलेले माणेकशा यांची रोमहर्षक लष्करी कामगिरी अतिशय जवळून अनुभवणाऱ्या, त्यांच्यासोबत काम करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याने शब्दबद्ध केली असल्याने पडद्याआड राहिलेले अनेक मुद्दे ज्ञात होतात. त्यांचे गांभीर्य लक्षात येते. भगवान दातार यांनी केलेला मूळ पुस्तकाचा मराठी अनुवाद सहजसोपा झाला आहे. लष्करप्रमुख वा नौदलप्रमुख ही सर्वोच्च पदे अलीकडच्या काळात विविध कारणांनी वाद-विवादाच्या भोवऱ्यात सापडत असल्याचे दिसते. या पाश्र्वभूमीवर, चार दशकांच्या सेवेत पाच युद्धात सहभागी झालेले माणेकशा वादापासून दूर राहिले, हे विशेषत्वाने अधोरेखित होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भारतीय लष्कराने बांगलादेशच्या युद्धाआधी त्वरित लष्करी कारवाई करावी, अशी अपेक्षा होती. पण, स्थिती अनुकूल होईपर्यंत कुठलीही कारवाई करण्यास माणेकशा यांनी ठामपणे नकार दिला. आपल्या कामात माणेकशा यांनी कधीही राजकारण्यांना हस्तक्षेप करू दिला नाही आणि स्वत:ही कधी राजकारणात हस्तक्षेप केला नाही. या युद्धातील त्यांची कामगिरी आपल्या कधी तरी वाचनात आलेली असते. त्याबद्दल आपण काही अंशी ऐकून असतो. परंतु, माणेकशा यांचे कर्तृत्व त्यापेक्षा किती तरी विशाल आहे, हे त्यांचा जीवनपट समजावून घेतल्यावर लक्षात येते.
पाच युद्धांत सहभागी झालेले माणेकशा शौर्य, मुत्सद्देगिरी, नेतृत्व यांचा संगम होते. स्वातंत्र्यपूर्व काळात लष्करी कारकिर्दीला सुरुवात करणारे माणेकशा ‘जंटलमन कॅडेट’ म्हणून उत्तीर्ण झाले. खरे तर अपघाताने ते लष्करी सेवेत दाखल झाले. फाळणीपूर्वीच्या भारतीय लष्करात फ्रंटियर पोस्ट रेजिमेंटमध्ये त्यांची नियुक्ती झाली. दुसऱ्या महायुद्धात ते सहभागी झाले. जपानी सैन्याशी उडालेल्या चकमकीत ते गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी असताना स्वभावातील मिस्किलपणा कायम राखणारे, रेजिमेंटमध्ये येणाऱ्या सैनिकाचे सामान स्वत: घेऊन येणारे, खासगी कामासाठी सरकारी गाडी न वापरणारे माणेकशा यांनी निवृत्तीनंतर सरकारने देऊ केलेले पदही स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला. युद्धभूमीवर रमणाऱ्या या माणसाला बागकाम व संगीताची तितकीच आवड. लष्करातील अनेक महत्त्वपूर्ण पदे भूषविताना त्यांनी फाळणीच्या वेळी प्रत्यक्ष वाटाघाटी व फाळणीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीत सहभाग घेतला. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय लष्कराच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. पाकिस्तानबरोबरच्या युद्धबंदी रेषा निश्चित करण्याच्या चर्चा असो वा पंजाबमधील अंतर्गत परिस्थिती हाताळणे, ईशान्य भारतात घुसखोरांना पायबंद घालणे अशा मोहिमा असोत.. प्रत्येक जबाबदारी त्यांनी लीलया पेलली.
लष्करप्रमुख असताना नवीन अभ्यासक्रमांची मुहूर्तमेढ, विशिष्ट पदावरील अधिकाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयोमर्यादेचे निश्चितीकरण, लढाऊ शस्त्रदल आणि सहाय्यक दल यांच्यातील वेतनाची तफावत रद्द करून सर्व सैनिकांना पगाराच्या दृष्टीने समान वेतनावर आणणे, लष्कराच्या दीर्घकालीन योजना पूर्ण करण्यासाठी संरक्षण आराखडा पंचवार्षिक योजनेशी जोडणे, असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन भारतीय लष्कराला सर्वदृष्टय़ा सशक्त बनविण्याची प्रक्रिया त्यांनी गतिमान केली. आपल्या नेतृत्व गुणांनी भारतीय लष्कराच्या कामगिरीला जागतिक पातळीवर वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या लष्करप्रमुखाची ओळख करून देणारे हे पुस्तक आहे.
‘फिल्ड मार्शल सॅम माणेकशा’- मेजर जनरल शुभी सूद, अनुवाद- भगवान दातार, रोहन प्रकाशन, पुणे, पृष्ठे – २१२, मूल्य- २५० रुपये.               

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व दखल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sam manekshaw
First published on: 23-03-2014 at 01:05 IST