राम खांडेकर ram.k.khandekar@gmail.com
नरसिंह रावांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या आर्थिक सुधारणा म्हणजे ‘बोलाची कढी आणि बोलाचाच भात’ अशा नव्हत्या. या सुधारणा आर्थिक, सामाजिक आणि तात्त्विक भूमिकेतून दूरगामी परिणाम घडवणाऱ्या होत्या. नरसिंह रावांचा काही सिद्धांतांवर विश्वास होता. जसे- केवळ पडझड रोखण्यासाठीच बाजारावर सरकारी नियंत्रण असावे. तसेच सरकारच्या क्षमतेत वाढ करणे गरजेचे होते. अनावश्यक वस्तूंची आयात बंद करून परकीय चलनाचा उपयोग फक्त गरजेच्या वस्तूंसाठीच करण्याचे धोरण त्यांनी अमलात आणले. स्थानिक उद्योगांना किंचितही धक्का लागेल असे कोणतेही पाऊल उचलले जाऊ नये, याची काळजी त्यांनी घेतली. नरसिंह राव आणि डॉ. मनमोहन सिंग यांनी केलेल्या कष्टाचे परिणाम अवघ्या २८ महिन्यांतच देशासमोर आले. या २८ महिन्यांच्या कालावधीत नरसिंह रावांनी एकदाही आधीच्या सरकारच्या ‘कर्तृत्वा’चा उल्लेख करून जबाबदारी झटकली नाही.
पहिली दोन वर्षे तर समस्यांची मालिकाच होती. वरील महत्त्वाच्या प्रश्नांबरोबरच पंजाब, जम्मू-काश्मीरमध्ये फोफावत चाललेला दहशतवाद, बाबरी मशिदीचा प्रश्न, कृष्णा-कावेरी पाणीवाटप तंटा, गढवालमधील धरणाला पर्यावरणवाद्यांचा विरोध.. असे अनेक प्रश्न होते. काही प्रश्नांवर सतत चार-चार, पाच-पाच दिवस बैठकी चालत. याचा परिणाम इतर भेटीगाठींवर होत असे. नरसिंह राव पंतप्रधान झाल्यापासून संसद सदस्यांना भेटीसाठी वेळ देण्यात येऊ लागला होता. त्याआधी ही मंडळी बहुधा पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री वा खासगी सचिवांना भेटत असत. त्यापुढे त्यांची मजल नव्हती. परंतु या लोकांना देशासमोरील प्रश्नांचे गांभीर्य माहीत नसल्यामुळे ‘पंतप्रधान आपणास भेटीसाठी वेळच देत नाहीत’ अशी कुरकुर ते करू लागले होते. विशेषत: तरुण आणि प्रथमच निवडून आलेले खासदार!
एकदा काही कारणाने भेट रद्द झाली, तर त्या व्यक्तीला पुन्हा लवकर वेळ मिळण्याची शक्यता कमीच. संसदेच्या अधिवेशन काळात मात्र पंतप्रधान दोन-तीन दिवस संसद भवनातील आपल्या कार्यालयात बसून खासदारांना भेटत असत. पंतप्रधानांच्या वेळेची किंमत नसल्यामुळे हे खासदार भेटीत नरसिंह रावांचा बराच वेळ घेत. बहुतेकांचे काम एकच असे- दुसऱ्या खासदाराविरुद्ध वा मतदारसंघातील एखाद्या महत्त्वाच्या कार्यकर्त्यांबद्दल तक्रार! नवे सरकार सत्तेवर आले, की राज्यपाल बदलण्याची परंपरा होती. राज्यपाल बदलण्याची शक्यता गृहीत धरून या पदासाठी इच्छुक असलेली अनेक वृद्ध मंडळी भेटायला येत. मुख्य म्हणजे, तुम्ही जर एखाद्याला भेटीसाठी बोलावले तर तो आधी घडय़ाळ दाखवतो व नंतर डोळे!
पंतप्रधानांचा सर्वात जास्त वेळ जातो तो लग्न समारंभांत. पाच मिनिटांसाठी का होईना, पंतप्रधानांनी येणे हे आमंत्रकांचे भांडवल असे. अशा कार्यक्रमांत प्रत्येक वेळी किमान अर्धा तास तरी जात असे. पंतप्रधानांना बोलावल्यामुळे समारंभाला येणाऱ्यांना किती त्रास होतो, याची ही मंडळी पर्वाच करीत नसत.
पंतप्रधानांना निमंत्रण देताना सत्ताधारी वा सुशिक्षित मंडळी तारतम्य का ठेवत नाहीत, हे मात्र मला कधीच कळले नाही. एकदा राज्यसभेच्या उपसभापतींनी दिल्लीतील काही राजदूत व प्रमुख पत्रकारांना रात्री आठ वाजता जेवण्यासाठी बोलावले होते. नऊपर्यंत ‘पेयपान’ कार्यक्रम संपेल असे गृहीत धरून त्यांनी पंतप्रधानांना नऊ वाजता येण्यास सुचवले. त्याप्रमाणे पंतप्रधान गेले. परंतु रात्रीचे साडेदहा वाजले, तरी पेयपान कार्यक्रम संपण्याची चिन्हे दिसेनात. त्यामुळे जेवण्याचीही व्यवस्था होऊ शकत नव्हती. शेवटी उपसभापतींनी पंतप्रधानांना सुचवले की, ‘‘आपण थांबला नाहीत तरी चालेल. हा कार्यक्रम केव्हा संपेल, काही सांगता येत नाही.’’ नरसिंह राव ताबडतोब उठून निघालेसुद्धा! ते गाडीत बसताना उपसभापती मानभावीपणे म्हणाल्या, ‘‘थोडंफार खाल्ले असते, तर बरे झाले असते.’’ हा मानभावीपणा आणि मुख्य म्हणजे वेळ वाया गेल्यामुळे नरसिंह राव भयंकर चिडले होते.
१९९५ साली माझ्या मुलाचा विवाह नागपूरला झाला होता. परंतु मी ‘मुलाच्या लग्नासाठी मला आठ दिवस सुट्टी हवी’ एवढेच पंतप्रधानांना सांगितले. पत्रिका मात्र दिली नाही. कारण मला खात्री होती, की पत्रिका दिल्यावर मी कितीही येऊ नका म्हटले असते तरी नरसिंह राव आल्याशिवाय राहिले नसते. यामुळे महत्त्वाचे काम नसतानाही पंतप्रधानांचा वेळ वाया गेला असता. शिवाय माझ्याबद्दल जिव्हाळा असलेले काही स्थानिक नेते वगळले, तर राज्यातील कोणत्याही मंत्र्यांना वा सरकारी अधिकाऱ्यांना समारंभास बोलावले नव्हते. विशेष म्हणजे, एका गृहस्थांनी गाडय़ांची गर्दी झाल्यास गाडी कुठे पार्क करायची, याची सूचना आपल्या चालकाला केली होती. परंतु समारंभस्थळी आल्यावर एकही गाडी उभी नसल्याचे पाहून ते आश्चर्यचकीत झाले होते! नागपुरातील एका मराठी वृत्तपत्राच्या संपादकांनी तर हा साधा विवाह समारंभ पाहून परतल्यावर आपल्या छायाचित्रकार व बातमीदाराला पाठवून दुसऱ्या दिवशीच्या अंकात ठळक बातमी दिली होती. दिल्लीत ‘रिसेप्शन’ झाले; तेही पंचतारांकित हॉटेलमध्ये नव्हे, तर एका सर्वसाधारण क्लबमध्ये. तेव्हाही पंतप्रधानांना बोलावले नव्हते. पंतप्रधानांना मी बोलावले नाही हे विशेष सुरक्षा दलातील मंडळींना शेवटपर्यंत खरे वाटले नव्हते. असो!
देशापुढील गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधानांना जास्तीत जास्त वेळ मिळावा म्हणून मी व माझे वरिष्ठ सहकारी खासगी सचिव रामू दामोदरन फक्त महत्त्वाची कागदपत्रे व फाइल्सच नरसिंह रावांकडे पाठवत असू. भेटणाऱ्यांची यादी तयार करणे, दिल्लीतील व दिल्लीबाहेरचे कार्यक्रम घेणे, विमानातील सोबत्यांची नावे निश्चित करणे ही कामे तोवर पंतप्रधानांकडे मंजुरीसाठी जात असत. मात्र, आता ही सर्व कामे मी करू लागलो. खासगी सचिव सरकारी कामे व फाइल्स बघायचे. एकदा पूर्वीच्या पंतप्रधानांचे प्रधान सचिव नरसिंह रावांना भेटण्यास आले होते. तेव्हा त्यांनी माझ्याकडे कामाच्या पद्धतीबाबत विचारणा केली. आमच्या कामाची पद्धत सांगितल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटले होते.
संपूर्ण जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे कोणत्याही गोष्टीत कुठेही स्वार्थ राहणार नाही, याची मी काळजी घेत असे. परंतु पुढे पुढे काही खासदार ‘खांडेकर आम्हाला विमानात बरोबर घेत नाहीत’ अशी तक्रार पंतप्रधानांकडे करू लागले. ते साहजिकच होते. कारण विमानातून पंतप्रधानांसोबत जाणे हा काहींना मिरवण्यासाठी मोठा मान असे. पंतप्रधानांच्या विमानात अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी आठ जागा होत्या. यापैकी एक जागा ज्या राज्यात जाणार त्या राज्याशी संबंधित काँग्रेसच्या सरचिटणीसांसाठी, दोन जागा खासगी सचिवांसाठी, एक सुरक्षा अधिकारी व एक डॉक्टरांसाठी असे. मग उरल्या फक्त तीन जागा. त्यामुळे केवळ संबंधित खासदार वा व्यक्तीला नेणे शक्य असे. तक्रार ऐकल्यानंतर कधीतरी हसत पंतप्रधान मला म्हणत, ‘‘खांडेकर, तुमच्याबद्दलच्या तक्रारी फार येत आहेत!’’
पंतप्रधानांनी एखादी गोष्ट सांगितली आणि खासगी सचिवांनी नकार दिला असे धाडस आपल्या देशातच काय, जगाच्या पाठीवर कुठे आढळेल का? परंतु मला बरेचदा असे करावे लागले होते. एकदा परदेश दौऱ्याच्या वेळी पंतप्रधानांच्या कुटुंबात त्यांच्या जावयाचे नाव आढळून आले. मी ते दोनदा कापले; परंतु तिसऱ्या वेळी मात्र दुपारी नरसिंह राव जेवण करत असताना मला फोन आला. ते अतिशय रागावून म्हणाले, ‘‘मला सुखाने राहू द्यायचे आहे की नाही? मी जावयाचे नाव टाकण्यास सांगतो आणि तुम्ही कमी करता..’’ मी सांगितले, ‘‘मुली आणि त्यांच्या मुलांपर्यंत ठीक आहे.. पण ही प्रथा टीका होण्यासारखी आहे.’’ ते म्हणाले, ‘‘मला कळत नाही का? पण मी जेवायला बसलो, की मुलगी माझ्या डोक्यावर येऊन बसते!’’ शेवटी जावयाचे नाव समाविष्ट करावे लागले. या ठिकाणी एका गोष्टीचे कौतुक करावे लागेल, की नरसिंह रावांच्या एकाही मुलाने वा सुनेने त्यांच्यासोबत येण्याविषयी कधी आग्रह धरला नाही.
१९९३ साली किल्लारी-लातूरला भूकंप झाला. भूकंपाच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी बंगल्यावर मंत्रिमंडळाची बैठक होती. बैठक संपल्यावर काही वरिष्ठ मंत्र्यांनी ‘‘पंतप्रधानांनी उद्या लातूरला जाणे गरजेचे आहे’’ असा आग्रह केला. नरसिंह रावांनी मला बोलावून ‘‘उद्या आपल्याला लातूरला जावे लागेल, तर तसा कार्यक्रम तयार करा’’ असे सांगितले. दोन मिनिटे मी स्तब्ध राहिलो आणि म्हणालो, ‘‘उद्या आपण जाणे योग्य नाही.’’ मंत्र्यांना आतापर्यंत ‘होयबा’ प्रकार माहीत होता. खासगी सचिव पंतप्रधानांना स्पष्टपणे नाही म्हणतो हे पाहून सर्व जण माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागले. पंतप्रधान म्हणाले, ‘‘तुम्हाला काय अडचण आहे?’’ मी म्हटले, ‘‘अडचण मला नाही, तिथे प्रशासनाला येण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी माझे आज बोलणे झाले. जिवंत माणसे सापडण्याची शक्यता आहे म्हणून ढिगारे उपसण्याचे काम अतिशय हळुवार सुरू आहे. प्रेतांच्या दुर्गंधीमुळे त्यांचे अंत्यविधी जवळपास करण्यात येत आहेत. तुम्ही उद्या येणार हे कळताच सुरक्षा यंत्रणा जागी होऊन तेथील सर्व जागा सील होईल. त्यामुळे काम एकदम बंद होईल. सर्व प्रशासन काम सोडून तुमच्या तयारीला लागेल. ढिगाऱ्याखालील जिवंत माणसे मृत्युमुखी पडतील.’’ नरसिंह रावांना हे पटले. म्हणाले, ‘‘केव्हा जाणे योग्य होईल, हे ठरवा.’’ बैठक संपल्यावर अनेक मंत्र्यांनी माझ्या कक्षात येऊन माझे कौतुक केले.
अशाच प्रकारची एक घटना हरयाणात घडली होती. लाख-दीड लाख लोकसंख्या असलेल्या गावातील एका शाळेत स्नेहसंमेलन चालू असताना अचानक मंडपाला आग लागली. प्लास्टिक व कापड वापरून तयार केलेला मंडप जळून भस्म होण्यास काही मिनिटांचा अवधी पुरेसा होता. दुर्दैव असे की, बाहेर पडण्यास एकच दार होते. मंडपात बसलेले सात-आठशे विद्यार्थी घाबरून एकदम बाहेर पडण्याची धडपड करीत असताना चेंगराचेंगरी झाली आणि फारच कमी विद्यार्थी बाहेर पडू शकले. त्यामुळे दीड-दोनशे विद्यार्थी जळून काळे पडले होते, तर दोन-अडीचशे जणांच्या शरीराचा बराच भाग भाजून जखमा झाल्या होत्या. त्यांच्यावर ताबडतोब औषधोपचार सुरू झाले. या घटनेचा वृत्तांत वाचताना व ऐकताना खरोखरच यातना होत होत्या. दुसऱ्या दिवशी हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांनी याबाबतची सर्व माहिती टेलिफोन करून पंतप्रधानांना दिली आणि या गावाला ताबडतोब भेट देऊन लोकांचे सांत्वन करण्यासाठी येण्यास सुचवले.
मग काय, पंतप्रधानांनासुद्धा राहवले नाही. दुसऱ्या दिवशी त्या गावाला भेट देण्यासाठी मला कार्यक्रम आखण्याविषयी सुचवण्यात आले. दुपारी जेवण्यासाठी नरसिंह राव आले तेव्हा मी त्यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘‘मी कबूल केले आहे.’’ मी थोडा चिडून म्हणालो, ‘‘उद्या आपल्याला जाणे योग्य व शक्य नाही.’’ ते म्हणाले, ‘‘का?’’ मी म्हणालो, ‘‘सांत्वन कोणाचे करणार आहात? प्रेतांचे? चारशे-साडेचारशे मुलांचे पालक मुलांचा अचानक झालेला मृत्यू वा मुलांना झालेल्या जखमा पाहून अजून सावरलेले नाहीत. शिवाय जी मुले मृत्युमुखी पडली, त्यापैकी अनेकांची ओळख न पटल्यामुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झालेले नाहीत. मग तुम्ही कोणाकोणाला भेटणार वा तुम्हाला भेटावयास कोण येणार?’’ त्यांना माझे म्हणणे पटले असावे. ते फक्त ‘‘ठीक आहे’’ म्हणाले आणि ‘‘मुख्यमंत्र्यांशी बोलून केव्हा जायचे, हे ठरवा.’’ असे त्यांनी सांगितले.
दोन-तीन दिवसांनंतर बरेच पालक सावरले होते. त्यानंतर नरसिंह राव तिथे जाऊन अनेक पालकांना भेटले आणि शासनातर्फे मदतीचे आश्वासन दिले. खरी गरज होती- भाजलेल्या मुलांवर प्लास्टिक सर्जरी करण्याची. नरसिंह रावांनी याची जबाबदारी घेऊन चेन्नई येथे शस्त्रक्रिया (संपूर्ण खर्च भारत सरकारतर्फे) करण्याची व्यवस्था केली. याबाबत मी नंतर दोनदा तेथील खासदार व मुख्यमंत्र्यांना आठवण करून दिली. परंतु त्यांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे मुलांवर शेवटपर्यंत शस्त्रक्रिया होऊ शकली नाही. असे आपले लोकप्रतिनिधी आणि प्रशासन. असो!
परंतु एकदा नरसिंह रावांचा अट्टहास व माझा नकार याची जुगलबंदी झाली होती. नेहमीप्रमाणे रात्री एकच्या सुमारास मला नरसिंह रावांचा फोन आला. दिल्लीसह उत्तर भारतातील एका प्रमुख हिंदी वर्तमानपत्राच्या संपादकांकडे मुलाच्या जावळ व नामकरण कार्यक्रमाचे निमंत्रण त्यांनी स्वीकारले असल्याचे त्यांनी मला सांगितले. दुसऱ्या दिवशी मी कार्यालयात गेल्यानंतर त्या संपादकांशी संपर्क साधून कार्यक्रमाची वेळ व स्थळ याबाबत चौकशी केली. कार्यक्रमाची तिथी व स्थळ ऐकून मला धक्काच बसला. कारण कार्यक्रम होता दिल्लीतील कुतुबमिनारजवळील छतरपूर मंदिरात आणि तिथी होती नवरात्रीतील अष्टमीची. दिल्लीत देवीची तीन प्रमुख देवळे आहेत. त्यातील छतरपूर हे एक होते. नवरात्रीत पहिले दोन-तीन दिवस सोडले, तर या तिन्ही देवळांत सकाळी चार वाजेपासून रांगा लागतात. बायका सहा-आठ महिन्यांच्या मुलांनासुद्धा घेऊन रांगेत तासन् तास उभ्या असतात. अष्टमीचा दिवस तर विचारूच नका. देवळातच नव्हे, तर घरोघरी अष्टमी साजरी होते.
पंतप्रधानांनी अष्टमीच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत तिथे जाऊ नये असे माझे स्पष्ट मत होते. कारण तास-दीड तास सुरक्षेच्या दृष्टीने मंदिरातील प्रवेश बंद करावा लागणार होता. त्यानंतर गर्दीला नियंत्रित करणे जोखमीचे होते. सुरक्षा पथकांचासुद्धा नकार आला होता. मी नरसिंह रावांना स्पष्ट शब्दांत हा कार्यक्रम घेणे योग्य नसल्याचे सांगून परिस्थितीची कल्पना दिली. पुढे चार-पाच दिवस ते ‘‘कसेही करा, आपण या कार्यक्रमाला जाऊ’’ असे म्हणत होते आणि मी तितक्याच स्पष्टपणे नकार देत होतो. शेवटी सप्तमीच्या दिवशी मी जेवण्यासाठी घरी गेलो हे पाहून नरसिंह रावांनी माझ्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या खासगी सचिवांना बोलावून- ‘‘कसेही करा, पण मला या कार्यक्रमाला जायचे आहे. कार्यक्रमाची आखणी करा.’’ अशा सूचना दिल्या. महत्त्वाचे म्हणजे, ‘‘खांडेकरांना कळू देऊ नका. नाही तर ते रद्द केल्याशिवाय राहणार नाहीत!’’ असेही त्यांनी सांगितले. दुपारी मी कार्यालयात गेल्यानंतर खासगी सचिवांनी साहेबांचा निरोप सांगितला. अर्थात, आमच्या दोघांमध्ये मोकळेपणाने बोलणे असे. दुसऱ्या दिवशी- म्हणजे कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी विशेष सुरक्षा दलाच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आटोपून पंतप्रधान शेवटी या कार्यक्रमाला गेले. मी मात्र सकाळी कार्यालयात गेलो नसल्यामुळे नरसिंह राव व इतर समजायचे ते समजले होते!
खासगी सचिव हे मंत्र्यांनी काही सांगितले, की नंदीबैलासारखे मान डोलावणारे ‘होयबा’ का असतात, हा एक अभ्यासाचा विषय आहे. मात्र, सौजन्यशील नरसिंह रावांना आपण ओळखले नाही ही खेदाची गोष्ट आहे.