लोकेश शेवडे
पन्नास वर्षांपूर्वी याच आठवड्यात चित्रगृहांत जोरदार आदळून नंतरच्या दशकांसाठी पुरून उरेल इतकी जोरदार उसळी मारणारा ‘शोले’ हा भारतीय सिनेइतिहासातील विक्रमवीरांचा सरताज. हजार वेळा शोले पाहणारी माणसेदेखील भरपूर मिळतील, इतका त्याचा चित्रपटप्रेमींवर पगडा. तिकीटबारीवर पस्तीस कोटींहून अधिक कमाई करून व्हिडीओ कॅसेट, सीडी, डीव्हीडी ते ओटीटी युगापर्यंतच्या बदललेल्या दर्शकपिढीला अजूनही तो नवाच वाटतो. विडंबनमीम्सएआयगिमिक्स होऊनदेखील ‘शोले’ पाहण्यातील आनंद न बदलणारा. १९७५ ते १९८० सलग पाच वर्षे ‘मिनर्व्हा’ थिएटरात या चित्रपटाने ठाण मांडले. याच चित्रगृहात पहिल्यांदा ‘शोले’ पाहिल्याचा आठवण लेख. पन्नास वर्षांत बदललेल्या सामाजिक ‘नजरां’च्या नोंदींसह…
भारतीय संविधानातील तरतुदीनुसार, मी ‘प्रौढत्व’ मिळवलं, त्या वेळी भारतभर प्रचंड गाजावाजा होत होता. हा गाजावाजा माझ्या प्रौढत्वाविषयी नसून, मी ‘प्रौढत्व’ मिळवण्याच्या वेळी रिलीज होणाऱ्या ‘शोले’ नामक हिंदी चित्रपटाविषयी होता. मोठा पडदा, मोठा कॅमेरामन, मोठा संगीतकार, मोठे स्टार-स्टारका, मोठे लेखक, मोठा दिग्दर्शक आणि अर्थातच या साऱ्यांसाठी मोठ्ठा खर्च करणारा मोठ्ठा निर्माता, अशा सगळ्या मोठ्ठ्या मोठ्ठ्या बाबींमुळे रिलीज होण्यापूर्वीच भारतभर या चित्रपटाचा प्रचंड गाजावाजा सुरू होता. साहजिकच माझ्या कॉलेजमधल्या मित्रांपैकी ५/६ सिनेमाप्रेमींच्या ग्रुपला हा चित्रपट पाहण्याची तीव्र इच्छा होती.
सिनेमा ‘अ’ दर्जाचा, म्हणजे ‘फक्त प्रौढांसाठी’ असणार अशी तेव्हा चर्चा असली तरी हा चित्रपट पाहायला मिळेल का? हा प्रश्न माझ्यासाठी आणि ग्रुपपैकी काही जणांसाठी सुटला होता. तथापि सर्व थिएटर्समधले सर्व शोज ‘अॅडव्हान्स बुकिंग’मधेच ‘फुल्ल’ झाल्याची बातमी पसरल्यामुळे, आपल्याला तिकिटं मिळतील का, हा मोठा व्यापक प्रश्न सर्व सिनेमा रसिकांसमोर पडला होता. पण पुढच्या दोन-चार दिवसांतच ‘चित्रपट फालतू आहे’अशी कुजबुज सुरू झाली आणि आठवडाभरात चित्रपट आपटल्याच्या बातम्या आल्या, त्यामुळे हा प्रश्नदेखील सुटला! एकंदरीत, पुढच्या आठवड्यात ‘शोले’ची तिकिटं मिळायला लागल्यामुळे आमच्या तेव्हाच्या आयुष्यातला सर्वात मोठा प्रश्न सुटला!
चित्रपट ‘अ’ असला तरी पंचाईत नको, म्हणून मी आणि माझे सिनेमाप्रेमी मित्र आपापली ‘आय काड्स’ – पावसाळा असल्यामुळे, भिजायला नकोत म्हणून प्लास्टिक मध्ये गुंडाळून- खिशात ठेवून मिनर्व्हामध्ये ‘शोले’ पाहायला गेलो. जाहिराती संपून ‘केंद्रीय फिल्म सेन्सर बोर्ड’ अशी स्लाइड पडद्यावर आली तेव्हा आम्ही फक्त वरच्या कोपऱ्यात ‘यू’ एवढंच पाहिलं आणि प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून आणलेल्या आयकार्डची गरजच नव्हती हे लक्षात येऊन सगळेच हिरमुसले. तेवढ्यात पडद्यावर आगगाडी स्टेशनावर थांबताना दिसली आणि काही क्षणांतच दोन घोडेस्वार मार्गक्रमण करतानाच्या पार्श्वभूमीवर म्युझिकसह टायटल्स दिसू लागली. मग ७० एमएम पडदा, ‘स्टिरिओफोनिक साउंड’, चित्रीकरण (कॅमेरा) वगैरे बाबींचा अन्योन्य प्रभावीपणा माझ्या मित्रवर्गाला जाणवू लागला आणि त्यांच्या उद्गारांमुळे-चित्कारांमुळे मलाही जाणवू लागला. त्यातली हिंसा अत्यंत भडक आणि गाणी कर्कश वाटत असली, तरी चित्रपटाच्या तांत्रिक (टेक्निकल) श्रेष्ठत्वानं मीदेखील वारंवार अचंबित होत होतो. स्क्रीनप्ले, संवाद आणि पार्श्वसंगीतदेखील मला भारावून टाकणारं होतं. पण सगळे मित्र एकाग्रतेनं डोळे फाडफाडून, आ वासून चित्रपट पाहत होते. मी काही फारसा प्रभावित झालो नसल्यामुळे अधूनमधून आजूबाजूच्या प्रेक्षकांकडेही पाहत होतो. त्यांची स्थितीही माझ्या मित्रांपेक्षा वेगळी नव्हती. मध्यंतरात थिएटरच्या कॅफेटेरियामध्ये आलो तेव्हा सगळे सुन्न झालेले दिसत होते. ठाकूरच्या (संजीवकुमार) नातवाच्या (मा. अलंकार) हत्येच्या आणि ठाकूरच्या हात गमावण्याच्या धक्क्यातून कोणी सावरले नव्हते. काही टगे मात्र अगदी बिनधास्त वावरत होते. ते एकमेकांना ‘आओ र’ असं बोलवत होते, किंवा ‘अरे ओ सांभा’ अशी हाक मारत होते. पहिली दोन-चार मिनिटं त्यांच्या या प्रकारात फारसे कोणी सामील झाले नाहीत. पण नंतर हळूहळू सगळे सावरले. मग माझे मित्र आणि बाकीचे प्रेक्षक त्यांच्या त्यांच्या ग्रुपमध्ये असेच वेगवेगळे संवाद टाकत फिरायला लागले. पॉपकॉर्न खाताना एकमेकांना ‘अब गोली खा’ असं सांगायला लागले, चहा मागताना ‘ये चाय मुझे दे दे ठाकूर’ म्हणायला लागले. एकदोघेजण गब्बरच्या एंट्रीच्या वेळचं पार्श्वसंगीत तोंडानं हुबेहूब गुणगुणत होते. मध्यंतराच्या त्या दहा मिनिटांत केवळ कॅफेटेरियात नव्हे तर मुतारीमध्येदेखील अशा संवादांचा कल्लोळ झाला होता. मध्यंतरानंतरचा भाग पाहताना माझे मित्र आणि अन्य प्रेक्षक त्या चित्रपटाशी पूर्ण एकरूप झाल्यासारखे दिसायला लागले. अहमदला (मा. सचिन) मारून त्याचं प्रेत घोड्यावरून रामगढला पाठवलं जातं; तेव्हा त्याचे आंधळे वडील इमाम (एके हंगल) तिथे येऊन ‘इतना सन्नाटा क्यूँ है भाई?’ विचारतात तेव्हा आणि पुढे ‘जानते हो, दुनियाका सबसे बडा बोझ क्या है? बाप के कंधेपर बेटे का जनाजा!’ असं म्हणतात, तेव्हा माझ्या ग्रुपमधल्या काही मित्रांसकट अनेक प्रेक्षक डोळे पुसत होते. बायका तर हमसून हमसून रडत होत्या. शेवटचा अर्धा तास – म्हणजे बसंती (हेमामालिनी) आणि वीरू (धर्मेंद्र) यांना पकडल्यापासून जयच्या (अमिताभ) दहनापर्यंत प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन बसले होते.
थिएटरच्या बाहेर आल्यावर घरी परतण्याच्या वाटेवर, ‘घोडदौड भन्नाट आहे’, ‘हेलनचा डान्स मस्त आहे’, ‘अमिताभचं काम ग्रेट आहे;’, ‘अमजद जबरी आहे’, ‘एके हंगलचा सीन फार ‘टचिंग’ आहे’ वगैरे सुट्या सुट्या त्रोटक बाबींवर सगळे बोलायला लागले. म्हणून ‘सिनेमा एकंदरीत कसा वाटला?’ हा सामाईक प्रश्न मी विचारला. या प्रश्नावर सगळे मित्र मौनात असल्यासारखे गप्प बसले. सबब, कोणीतरी बोलावं यास्तव मी पुन्हा विचारलं, ैसगळे गप्प आहेत, याचा अर्थ आपण बोलावं इतक्या लायकीचा हा चित्रपट तुम्हाला वाटत नाही, असं समजावं का?’- त्यावरही कोणी काही प्रतिक्रिया दिली नाही, म्हणून मी जरा खोचून विचारलं, ‘‘अजूनही कोणाचं उत्तर नाही म्हणजे, माझ्या म्हणण्याला मूक संमती आहे असं मानावं का?’’ – यावर एक जण खवळून म्हणाला, ‘‘आम्हाला का प्रश्न विचारतोयेस? तू सांग की तुला कसा वाटला ते.’’ शेवटी त्यांना बोलतं करून चर्चा पुढे नेण्यासाठी मी म्हणालो, ‘‘गाभा अगदीच सामान्य वाटला, पण कलाकारांची वैयक्तिक कामगिरी उत्तम आहे, टेक्निकल बाबी तर फारच उत्कृष्ट. एकंदरीत, दो आनेकी मुर्गी, चौदा आनेका मसाला. नाही का?’’ – आता तरी यावर त्यातलं कोणी ना कोणी उत्तर देईल असं वाटलं होतं, पण त्याऐवजी काही क्षणानंतर उलटा एक शब्दाचा प्रश्नच आला, ‘‘म्हणजे?’’ त्या प्रश्नावर खुलासा देणं भाग होतं म्हणून मी थोडाफार खुलासा दिला आणि त्यांचं मत त्यांनी सांगावं म्हणून मित्रांना आग्रह करत राहिलो. अखेर घराजवळ पोहोचलो तेव्हा ‘‘‘शोले’ आवडला, पण का आवडला ते सांगता येत नाही,’’ – एवढंच त्यांनी सांगितलं. तेदेखील कसंबसं, एखाद्यानं बळजबरी कबुलीजबाब द्यावा तसं. त्यांनी असा कबुलीजबाब देण्यापूर्वी आणि देताना सारा वेळ सिनेमाबाबत त्यांचं मत मांडण्याऐवजी ते फक्त माझ्यावर आक्षेप घेत होते. आक्षेप असा की, आम्हा सहा जणांपैकी त्या पाचजणांना, जर तो सिनेमा आवडलाय, तर त्याची चिकित्सा करण्याचं किंवा वेगळं काही बोलण्याचं कारणच नाही. त्यांचं मुख्य म्हणणं असं की, मी मुद्दाम खुसपटं काढून ‘टेक्निकल’ मुद्दे मांडून स्वत:ला इतरांपेक्षा वेगळा-शहाणा सिद्ध करू पाहतोय. थोडक्यात, माझ्या बाजूनं कोणी नाही म्हणजेच माझं मत चुकीचं आहे. आम्ही पाहिला तेव्हा ‘पडीक’ ठरलेल्या ‘शोले’नं पुढच्या दोनएक आठवड्यात मात्र तुफान गर्दी खेचायला सुरुवात केली. दरम्यान ‘शोले’च्या ‘डायलॉग्स’ची रेकॉर्ड प्रकाशित होऊन जागोजागच्या गणेशोत्सवात वाजू लागली. ही रेकॉर्ड लागली की लोक तिथे थांबून ते डायलॉग्स ऐकू लागले आणि ते तोंडपाठ करून स्वत:देखील रेकॉर्डच्या साथीला म्हणू लागले. पुढे शोले सतत सर्वत्र हाऊसफुल व्हायला लागला आणि पुढची अनेक वर्षं नवनवे विक्रम करत राहिला. या काळात शोलेबद्दल कुठेही काही चांगलं लिहून आलं, किंवा हाऊसफुल असण्याबद्दल-गर्दीच्या विक्रमाबद्दल बातमी आली की माझे हे मित्र मला त्यावरून खिजवत, उपहास करत. ‘शोले’तले वेगवेगळे डायलॉग्स किंवा प्रसंग उद्धृत करून मला डिवचत. एखाद्या गेटटुगेदरला मी आलो की ‘‘आओ र’’ म्हणत, मी गप्प असलो की ‘‘इतना सन्नाटा क्यूँ है भाई’’ म्हणत. शोलेची लोकप्रियता – शोले बहुसंख्य लोकांना आवडणं, हाच त्याच्या उत्कृष्टतेचा पुरावा असल्याचं त्यांचं मत होतं – नव्हे दावा होता. मी काही ‘शोले फालतू आहे’ असं म्हणत नव्हतो, पण माझं मत बाकीच्यांसारखं नव्हतं. मी चिकित्सा करू पाहत होतो हेच त्यांना आक्षेपार्ह वाटत होतं…
हल्ली जुन्या शालेय मित्र आणि कॉलेज मित्रांचा व्हॉट्सअॅप ग्रुप करून त्यात गुड मॉर्निंग, हॅप्पी बर्थडे, धार्मिक आणि राजकीय पोस्ट्सचा कचरा टाकण्याची फॅशन आहे. त्यात जो जितका कचरा टाकतो तितका तो प्रखर राष्ट्रभक्त मानला जातो. हा कचरा कमी पडतो म्हणून की काय, पण ‘रीयुनियन’ नामक सामूहिकरीत्या उकिरडा फुंकण्याचीदेखील टूम निघाली आहे. कधीतरी मला अशा एक-दोन ग्रुप्समध्ये ‘अॅड’ केलं गेलं. अर्थात, माझे हे ‘शोले’वाले मित्रही त्यात होते. ते ‘सिनेमाप्रेमी’ असल्यामुळे विविध सिनेमांमधल्या चुका काढून त्या ते पोस्ट करत असतात. ते ‘सिनेमाप्रेमी’असल्यामुळे सिनेमामधल्या केवळ वरवरच्या चुका काढून थांबत नाहीत, तर सिनेमाच्या कथानकात, त्यातल्या प्रसंगांत, संवादांत दडलेल्या आशयातले ‘दोष’देखील उजागर करून व्हॉट्सअॅप ग्रुपच्या सदस्यांचं ‘प्रबोधन’ करतात. त्यांचं सिनेमाबद्दलचं ज्ञान इतकं सखोल आहे की केवळ प्रत्येक निर्माता, दिग्दर्शक, कलाकारच नव्हे तर प्रत्येक वितरकाचा धर्म, जात, लैंगिक पसंती, आहार पसंती, रंग पसंती या प्रत्येक खासगी बाबीची त्यांना इत्थंभूत माहिती असते. त्या तपशिलावरून एखाद्या सिनेमाच्या कथानकात, प्रसंगांत, संवादांत किंवा त्यात वापरलेल्या कपड्यांच्या रंगात कोणता कुटिल ‘आशय’ दडला आहे, तो ते हुडकून काढतात. मग ते ‘सिनेमाप्रेमी’ असल्यामुळे त्या सिनेमावर बहिष्कार टाकायची पोस्ट फेसबुकवर टाकतात आणि अमुक निर्माता किंवा तमुक लेखक किंवा ढमुक कलाकार यांच्या खासगी बाबींचा तपशील मांडून ‘बायकॉट चमुक’ असं आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोस्ट करतात. की मग बाकीचे सदस्य त्या पोस्टवर अंगठे देतात. नुकतंच आमच्या या कॉलेजच्या व्हॉट्सअॅप ग्रुपनं ‘रीयुनियन’ आयोजित केलं होतं. रीयुनियनच्या आदल्या आठवड्यात शोलेवाल्यांपैकीच एकानं ‘शोले’मधल्या इमामच्या मुलाच्या (अहमद) जनाज्याच्या प्रसंगावर आक्षेप घेऊन तो कापून टाकण्याबद्दल मजकूर पोस्ट केला होता. तो वाचून आणि अन्यथादेखील माझी तिथं जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. पण ते मला घ्यायला घरी आल्यामुळे मला जावं लागलं. रीयुनियनच्या ठिकाणी सगळे एकमेकांना भेटल्यावर चित्कार काढत ‘जुने दिवस कित्ती छान होते ना रे’ – असं म्हणत होते. मग आपापली मुलं परदेशी स्थायिक झाल्याबद्दल मिरवत स्वत: राष्ट्रभक्त असल्याचं सांगत होते. मी त्या चित्कारांना आणि मिरवण्याला कंटाळून हॉलच्या बाहेर येऊन एका बाजूला शांत जागी बसलो. नेमका तो शोलेवाला पोस्टकर्तादेखील काही कारणास्तव हॉलच्या बाहेर आला होता. मला पाहून माझ्या पाठीवर थाप मारत म्हणाला, ‘‘इतना सन्नाटा क्यूँ है भाई.’’ मी त्याच्याकडे रोखून पाहत विचारलं, ‘‘तुला आठवतं का, तू या सीनला डोळे पुसत होतास?’’ त्यानं हसत मान डोलावली. मग विचारलं, ‘‘तो सीन फार टचिंग आहे असं त्या दिवशी तूच म्हणाला होतास ना?’’ तो पुन्हा ‘‘हो’’ म्हणाला. मी पुन्हा विचारलं, ‘‘तोच सीन आता तुला नकोसा झाला?’’ – तो चपापला आणि ‘‘आलोच’’ असं सांगून हॉलमध्ये निघून गेला.
आम्ही त्या दिवशी एकत्र शोले पाहणारे सगळे, तेव्हा नुकतेच प्रौढ झालो होतो – आता ६८ वर्षांचे. भारतीय संविधानानुसार भारतात प्रत्येक प्रौढास मताचा हक्क प्राप्त होतो. मत टिकेल किंवा बदलेल, मताचा हक्क मात्र अखेरपर्यंत टिकतो. ५० वर्षांत माझ्या शोलेवाल्या मित्रांची मतं आता पूर्ण बदलली… तो बदल शोलेपुरता राहिलेला नाही…
करी वेस्टर्नचा शिक्का…
वेस्टर्न सिनेमांचा पाया हा अमेरिकी ‘पल्प मॅगझीन’वर आधारलेला. यांतून आलेली लांबच लांब वाळवंटात घडणारी, बंदुकधारी काऊबॉय नायकखलनायकांची अतिरंजित हिंसेने व्यापलेली कथानके हॉलीवूड चित्रपटांनी उचलत भरपूर लोकप्रिय केली. पुढे इटालियन दिग्दर्शकांनी १९६० च्या दशकामध्ये स्पॅगेटी वेस्टर्न हा उपप्रकार आणला. भारताच्या अर्ध्या उत्तरेकडील राज्यांत १९७०च्या काळात लगदा साहित्य गाजत होते. विक्रांत, जगत या नावाच्या कादंबऱ्यांतील देमार हाणामारी आणि त्यांचे जगव्यापी कारनामे हिंदीपट्ट्यांत जोमानेे वाचले जात होते. मराठीत गुरुनाथ नाईक, शरदचंद्र वाळिंबे यांचे काही नायक या वेस्टर्नपटांतील क्लिंट ईस्टवूडच्या सिनेमांतून अवतरल्यासारखे चंबळच्या खोऱ्यापासून उदयपूरमध्ये वावरत होते. ‘काऊबॉय हॅट’ घातलेल्या या नायकांची बंदुकीवर हुकमत होती. या ‘पल्प फिक्शन’मधील कथानकासारखेच तंतोतंत वातावरण पहिल्यांदाच भारतीय सिनेमात आणलेला, विविध वेस्टर्न आणि स्पॅगेटी वेस्टर्न चित्रपटांचे प्रभाव असलेला भारतीय शोले पुढे इतर जगात ‘करी वेस्टर्न’ म्हणून ओळखला गेला.
अज्ञात विजेता…
शोले सिनेमाचा दबदबा इतका की त्याच्या संवादाच्या रेकॉर्ड्स (तबकड्या) त्या वर्षाच्या सार्वजनिक महोत्सवांत वाजविणे अनिवार्य बनलेे. अमिताभ हा आबालवृद्धांचा लाडका बनण्यास हे वर्ष कारणीभूत ठरले. कारण ‘शोले’सह ‘दीवार’मधूनदेखील त्याची पार्श्वसंगीतात ‘बिशूम… बिशूम’ आवाजासह वाजणारी हाणामारी जनसामान्यांच्या आवडीची बाब झाली. शोलेबाबतच्या दरएक पिढीच्या आठवणी वेगवेगळ्या बनल्या. तब्बल १० फिल्मफेअरसाठी या चित्रपटाला नामांकन मिळाले. पण सलीमजावेद यांच्या पटकथेसह अमजद खान यांची खलनायक अदाकारी त्यात नापास ठरली. आर. डी. बर्मन यांच्या संगीतालादेखील पुरस्काराने हुकवले. चित्रपटाला केवळ एकच फिल्मफेअर पुरस्कार मिळाला, तो माधव शिंदे यांना संकलनासाठी. शंभराहून अधिक चित्रपटांचे आणि बुनियादसारख्या टीव्ही मालिकांचे संकलन करणारे माधव शिंदे हे पुढल्या सर्व दशकांत अपरिचित राहिले. त्यांचे कुटुंबही हलाखीतच जगले.
आकड्यांच्या भाषेत…
३५ कोटी… तिकीटबारीवर वीस वर्षे सलग गाजून केलेली कमाई
४.०६ तास…. चित्रपटाचा मूळ कालावधी
संकलनानंतर ३ तास २४ मिनिटे
lokeshshevade@gmail.com