ऋषिकेश वाकडकर

विक्रम ऊर्फ विक्रमादित्य : वेताळा, मी तुला माझ्याबरोबर घेऊन जायला आलोय.
वेताळ : हा हा हा… अरे वेड्या विक्रमा, पाऊस सुरू झाल्यापासून स्मार्ट सिटी तुडुंब भरून वाहत असताना, खड्ड्यांची स्थिती राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक नगरात, प्रत्येक चौकात समसमान वाटपासारखी असताना; अन् त्यामुळे जिकडे-तिकडे ट्रॅफिक जॅम झाला असताना भर रात्री पायी चालत येऊन माझी झोपमोड करतोस.
विक्रम : उगाच फुका गप्पा नकोत, चल मुकाट्याने आता!
वेताळ : (जांभई देत) हा विक्रम काही मला सोडत नाही बुवा. हट्टाला पेटला आहेस. तरीही चल सावकाश आणि रस्त्यात पडलेले खड्डे नीट बघ हो. बुजवण्याच्या प्रयत्नातून तयार झालेले नवखड्डेही बघ. नाहीतर जीव जायचा बाबा माझा. गणपतीनेदेखील याच रस्त्यांवरून आगमन केले आहे. स्वत:चा फायदा-तोटा या विक्रमाला कळत नसला तरी माझ्या जिवाची मला तर काळजी आहे.

(विक्रम वेताळाच्या विनोदावर तिरकस बघत मौनातच स्मितहास्य करत चालू लागतो.)

वेताळ : रस्ता लांबचा आणि आता तुही हट्टाला पेटलाच आहेस तर तुला एक गोष्ट सांगतो विक्रमा. आटपाट नगर होते. सगळीकडे कुशल मंगल होते. आटपाट नगराची कीर्ती नगरजन गात होते. २४ तासांपैकी २५ तास काम करणारा, डोळे उघडे ठेवून उभ्याउभ्याच झोप काढणारा चौकीदार राजा होता. प्रचंड मोठा त्याचा गाजावाजा होता. ‘न खाऊंगा न खाने दूंगा’ असा त्याचा नारा होता. जमाना २१व्या शतकाचा. इन्स्टा आणि gen AI चा होता. राज्याच्या बाजूला फोडलेले पक्ष होते आणि अडाणी असून जिवापाड जपणारे मित्र होते. खिशात रुपये लक्ष लक्ष कोटी होते. ट्रोलसेनेचे शिपाई पहारा देत दक्ष होते. उंची चायनीज ड्रोन वापरून विकासकामावर राजाचे लक्ष होते.

विक्रमाचे स्वगत : आयला, नक्की काय चालविले आहे या वेताळाने. आज चुकीच्या वेळी तर आपण याची झोप मोडली नाही ना. याच्या लांबलचक गोष्टीच्या नादात घरी जायला उशीर झाला तर बायको रागावेल. मुद्द्याचे लवकर बोल बाबा.

वेताळ : तर एकदा सगळी कामे आटोपून, वेशभूषा आणि केशभूषा करून लखलखणाऱ्या कॅमेऱ्यासमोर राजाने ध्यानाचे फक्कड फोटोसेशन केले. आता झोपायला जाणार तेवढ्यात मोबाइलवर रिपोर्ताज आले, खड्डेभरले हायवे आले, टोल नाक्यावरच्या रांगा आणि भरलेल्या भक्कम थैल्याही दिसल्या. राजाचा जीव कळवळला.

आपल्या आवडत्या पाळीव मोरावर मायेने हात फिरवत राजाने पटकन सचिवास बोलाविले. सोनेरी नक्षीदार पेन मागविले. अव्वल दर्जाचा कागद सामोरा झाला. जोपर्यंत रस्त्यावर खड्डे आहेत तोपर्यंत ‘टोल माफ’ असे लिहून झाले. आता फक्त आदेशावर सहीच करायची बाकी होती.

बातमीनेच सगळीकडे पुन्हा कसा आनंदीआनंद होणार होता, जो तो राज्याचे गुणगान गाणार होता. उंदराला मांजर खपवावी तर ती या राजानेच असाच विचार सचिवाच्या मनी आला.
विक्रमा तर प्रश्न ऐक, असे अचानक काय झाले आणि राजाचा बेत स्थगित झाला. सामान्य माणूस परत खड्ड्यातच राहिला, खिसेकापूंना स्वत:हून फास्टॅग लावून डिजिटली पैसे देत राहिला. आणि विक्रमा आपला मुद्रांक शुल्क भरून रजिस्टर केलेला करार पक्का लक्षात आहे ना तुझ्या… या प्रश्नाचे माहीत असूनही खरे उत्तर न दिल्यास तुझ्या डोक्याची शंभर शकले होतील…

कदाचित कान उघडून लक्ष देऊन नीट ऐक वेताळा, संसदेचे छत का गळले, उद्घाटन केलेला प्रगती मैदान मार्ग का तुंबला, स्मार्ट सिटी कागदावरच का राहिली आणि खड्ड्यांनी लोक त्राही माम झाले असताना ‘टोल माफ’ अध्यादेशावर सही करायचे का राहून गेले या सगळ्या प्रश्नांचे उत्तर एकच, आपले राजे अध्यादेशावर सही करणारच होते, पण काय करणार कुठल्याशा भुताने हात धरून अडविले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

hrushikeshw@gmail.com