सिनेसंगीताच्या जादुई नगरीतील फेरफटका
जुनी हिंदी गाणी ही केवळ त्या चित्रपटापुरती उरत नाहीत, तर रसिकांच्या ओठांवर दीर्घकाळ रेंगाळणारी ही गाणी त्यांच्या भावनिक विश्वाचा एक भाग बनतात. सिनेसंगीतावर बेतलेल्या ‘दिल की कलम से’ या पुस्तकात १९३८ ते १९८१ दरम्यानच्या ८९ गाण्यांच्या प्रवासाचा वेध घेण्यात आला आहे. यात प्रत्येक गाण्याचा प्रवास, त्या गाण्याशी निगडित आठवणी, गाण्याची गुणवैशिष्टय़े कथन करताना आपोआपच त्या गाण्याची याद लेखकाने जागवली आहे. स्मरणरंजनापलीकडे पोचत चित्तवृत्ती प्रफुल्लित करणाऱ्या अशा आवडत्या गाण्यांवर लेखकाने लिहिले आहे. गाण्यासंबंधीचे स्फूट, शक्य तिथे छायाचित्र आणि गाण्यांच्या ओळी व संबंधित माहिती अशा स्वरूपात प्रत्येक लेखाची मांडणी करण्यात आली आहे. हे पुस्तक वाचताना सिनेसंगीतातील जादुई काळात वाचक नक्कीच फेरफटका मारून येतो.
दिल की कलम से – अरविंद वैद्य, जनशक्ती वाचक चळवळ, पृष्ठे- २३२, मूल्य – २५० रुपये.
औषधसाक्षरतेसाठी..
जनमानसातील औषध साक्षरता वाढावी, यासाठी ‘लोकसत्ता’मध्ये लेखिकेने लिहिलेल्या लेखांचे संकलन ‘औषधभान’ या पुस्तकाच्या रूपाने करण्यात आले आहे. औषधांचा योग्य वापर व्हावा, औषधांबद्दलची जागरूकता वाढावी आणि औषधे जबाबदारीने घेतले जावे अशी अनेक उद्दिष्टे बाळगून हे पुस्तक लिहिले आहे. यात प्रिस्क्रिप्शन वाचणे, वेदनाशामक औषधे घेणे, औषधांची मुदत लक्षात घेणे, मानसिक आजार आणि औषधे, औषधे घेताना.., टॅब्लेट्सच्या दुनियेत.., पिल्सचा वापर-गैरवापर अशा विविध बाबींवर स्वतंत्र प्रकरणे बेतली आहेत. त्याचसोबत औषधांसंदर्भातील काही उपयुक्त वेबसाइट्स, पत्ते आणि फॉर्मस्ही पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत. औषध रक्षक ठरावे की भक्षक, हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.
औषधभान – प्रा. मंजिरी घरत, मेनका प्रकाशन, पृष्ठे – १२६, मूल्य – १५० रु.
मनात रेंगाळणारा कालपुरुष
मनात उतरलेला, रेंगाळणारा समुद्र जेव्हा कवीच्या मनात उभा ठाकतो, त्यावेळेस त्याच्या मनात विचारांची जी आवर्तने तयार होतात, त्याचे शब्दरूप म्हणजे उत्तम कांबळे यांची हा कवितासंग्रह. मनाला येणारी भरती-ओहोटी या कवितांमधून दिसते. समुद्राविषयीचे विविध संदर्भ या कवितांमधून भेटतात. त्याच्या प्रत्येक कवितेत समुद्र हा सामायिक असतो. म्हणूनच कालपुरुषासारखा तो कवीला भासतो. निसर्ग, माणूस, जगणे, भावभावना, नाती या साऱ्याला समुद्राच्या असण्या-भासण्याची जोड कवीने दिली आहे.
किनाऱ्यावरचा कालपुरुष, उत्तम कांबळे, लोकवाङ्मय गृह, पृष्ठे – ११५, मूल्य – २०० रुपये.