‘लागू बंधू हिरे-मोती’ या पेढीला खानदानी प्रतिष्ठा लाभली ती श्रीकांत लागू यांच्यामुळे! परंतु ही काही त्यांची खरी आणि एकमेव ओळख नव्हे. ते एक अवलिये, रसिक होते. ज्यात त्यांना रस नाही अशी एकही गोष्ट नसेल. भटकंती, खगोलीय घटनांबद्दलचं कुतूहल, फोटोग्राफी, लेखन, मैत्री, रक्तदान, पोहणे, ड्रायव्हिंग..  एक ना अनेक. या सगळ्यांत आपल्या मित्रमंडळींनाही सामील करून घेण्यात त्यांना उत्साह वाटे. त्यांच्या अकस्मात जाण्यानं त्यांच्या सुहृदांच्या हृदयात उठलेली कळ व्यक्त करणारा लेख..
श्री कांत लागू (आप्तस्वकीयांत आणि मित्रमंडळींत ‘दाजी’ म्हणून ओळखला जाणारा!) हा सत्तावन्न पैलू असणारा हिरा होता. सत्तावन्न पैलू असणारा हिरा हा सर्वोत्तम मानला जातो. एवढे पैलू असलेल्या हिऱ्यात त्याचे सारे अंगभूत सौंदर्य झळाळून उठते. अशा हिऱ्याला ‘ब्रिलियंट’ असे म्हणतात. आमचा दाजी होताच तसा.
त्याला केव्हा काय सुचेल आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी तो किती धडपड करेल याला मर्यादाच नसायची. १९८९-९० मध्ये जर्मनीतील एका मित्राकडे ‘इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्री’ या संस्थेने दिलेले एक सुंदर, आकर्षक मानपत्र त्याने पाहिले होते. त्यात त्या मित्राचे नाव नभांगणातील अगणित ताऱ्यांपकी एका ताऱ्याला दिले होते. कवी कुसुमाग्रज हे दाजीचे एक आदरस्थान होते. २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिन. त्या दिवशी त्यांना असा तारा भेट द्यावा असा विचार त्याने केला. तात्यांच्या जन्मतारखेवरून त्यांची जन्मरास शोधून काढली. अमेरिकेतील आपल्या एका मित्राला ती रास कळवली आणि इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्रीकडे त्या राशीतील एखाद्या ताऱ्याला कुसुमाग्रजांचे नाव देण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली. त्याप्रमाणे ते काम झाले आणि संस्थेकडून मानपत्र आले. त्याचबरोबर तो तारा नेमका कुठे आहे, हे दर्शविणारा एक नकाशाही आला. त्या ताऱ्याच्या बारशाची कृतज्ञतापूर्वक पोच म्हणून तात्यांनी ‘ताराभेट’ ही कविता स्वहस्ताक्षरात लिहून दाजीला पाठवली. ही कविता म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्वात अमूल्य भेट होती, असे खुद्द दाजीनेच लिहिले आहे. ती कविता अशी :
                 ताराभेट
देवघरातील फूल उचलुनी कुणास द्यावे कुणी
तशी नभातील ज्योत आणली तू माझ्या अंगणी
      धरतीवरच्या सरत्या काली दिला दिलासा तुवा
      कसे जाणले, डाकबंगला तिकडेही मज हवा
सरेल लेखन, सरेल नाटक, सरेल कवितारती
फेसामधले महाल अमुचे, त्यांचे असणे किती
      प्रलयंकार वा स्फोट अणूचे होता अवघी धरा
      फुटुनी तुटुनी तिचा तरंगत राहील व्योमी चुरा
तरीही झळकत असेल तारा त्यावर शब्दावली
मौक्तिकमंडन मित्राने ही भेट कवीला दिली
      वाचायला, बघावयाला नसेल कोणी जरी
      कांतकृपेने सदैव वसतील कुसुमाग्रज अंबरी
 .. तोच मी              
दाजी म्हणजे उत्साहाचा धबधबा आणि चतन्याचे कारंजे. हा उत्साह आणि चतन्य तो दुसऱ्यांमध्ये परावर्तित करत असे. आनंद वाटणे ही त्याची प्रवृत्ती होती. कुठे काही चांगले वाचले, पाहिले तर ते आपल्या मित्रमंडळींना अनुभवता यावे यासाठी त्याची कोण धडपड चाले! ‘घाशीराम कोतवाल’ हे त्याचं अत्यंत आवडतं नाटक. त्यामुळे त्या नाटकाचे प्रयोग जेव्हा केव्हा मुंबईत लागत तेव्हा तो काही तिकिटांची घाऊक खरेदी करत असे. ज्या कोणी ते नाटक बघितले नसेल त्यांना- मग ते मित्र असोत, ओळखीचे असोत, दुकानात येणारे ग्राहक असोत- तो त्यांना तिकिटे देऊन नाटक बघायचा आग्रह करत असे.
मित्रांना हरप्रकारे मदत करणाऱ्या दाजीचे किस्से अफलातून आहेत. मी ११ वष्रे दिल्लीत होतो. मला एकदा घर बदलायचे होते. तेव्हा या पठ्ठय़ाने काय करावे? आम्हाला सामान हलवण्यास व लावण्यास उपयोगी पडावी म्हणून त्याने घडीची एक शिडी गिर्यारोहणासाठी हिमालयात जाणाऱ्या संघासोबत पाठवली होती.
दाजी जातिवंत भटक्या होता. कैलास ते मानससरोवर, अंटाíक्टकाला भेट, तसेच खग्रास सूर्यग्रहणे पाहण्यासाठी झाम्बियापासून ते चीनपर्यंत त्याने प्रवास केला होता. सागर त्याला साथ घाली आणि आकाश हात फैलावून त्याला आव्हान देई. गिरीशिखरे त्याला मोहून टाकीत. त्याचा एक अनोखा प्रवास म्हणजे जर्मन प्राध्यापक कनाबे यांच्याबरोबर त्याने ‘मरकॅटर’ या छोटय़ा बोटीतून केलेली मुंबई ते दमण अशी सागरी सफर!
त्याने अधूनमधून लिखाणही केले. बरीचशी पुस्तके अनुवादितही केली. एडमंड हिलरी यांच्या ‘व्ह्य़ू फ्रॉम समीट’ या आत्मचरित्राचा ‘शिखरावरून’ या शीर्षकाचा त्याने केलेला अनुवाद गाजला होता.
असं म्हणतात की, एस्किमो लोकांच्या भाषेत बर्फाला ६३ वेगवेगळे शब्द आहेत. पण दाजीने त्यात आणखीन भर टाकली असावी. त्याला अर्थवाही शब्द वापरण्याची कला अवगत होती. त्याने ‘कोसळकडे’ (लॅण्डस्लाइड), ‘हिमकोसळा’ (अ‍ॅव्हेलांच), ‘हिमचटई’ (ग्लेशियर), ‘हिमअंधारी’ (व्हाइट आऊट्स) , हिमकणांना ‘बर्फुले’ असे नावीन्यपूर्ण शब्द वापरले.
दाजीला खेळाचाही अतोनात नाद होता. नुसताच क्रिकेटचा नाही, तर खोखो-कबड्डीपासून फुटबॉल- टेनिसपर्यंत सर्वच खेळांत त्याला रस होता. फुटबॉल- टेनिसचे आंतरराष्ट्रीय सामने गजर लावून मध्यरात्री उठून बघणारा क्रीडाप्रेमी तोच! टेनिसच्या वेडापायी तो विम्बल्डनला गेला आणि ‘विम्बल्डनच्या तृणांगणावर’ हे पुस्तकही त्याने लिहिले.
पशाचा तोरा नाही, श्रीमंतीचा बडेजाव नाही. सोनसाखळ्या आणि बोटात अंगठय़ा न घालणारा हा जवाहिऱ्या एक अवलियाच होता. ‘लागू बंधू हिरे-मोती’ या पेढीला खानदानी प्रतिष्ठा लाभली ती दाजीमुळेच! गिऱ्हाईकांत तो अत्यंत लोकप्रिय होता. तसेच मोठी खरेदी करणाऱ्या गिऱ्हाईकाला पुस्तक भेट देण्याची अनोखी परंपरा त्याने सुरू केली. मग ते पुस्तक स्वत:चे असो किंवा अन्य कोणाचे. दाजी निगर्वी आणि नि:स्वार्थी होता. त्याची राहणी अत्यंत साधी होती. खादीचा झब्बा-लेंगा हा त्याचा दैनंदिन पोशाख होता, तर सुट्टीच्या दिवशी हाफ पँट आणि टी-शर्ट अशा वेषात तो वावरत असे. सतत काहीतरी नवे करून पाहण्याची त्याच्याकडे ऊर्मी होती. नव्या मुंबईसाठी खाडीवरील पूल बांधला जात असताना त्याने एका कडेला िशपल्यांचा ढीग पाहिला. त्यातील काही तो घरी घेऊन आला आणि त्यातून त्याने स्पायरल लॅम्पशेड्स बनवल्या आणि आपल्या मित्रांना वाटल्या. एकदा पाचगणीहून येताना वाटेतील रेशीम केंद्रात जाऊन तेथील रिकामे झालेले कोश तो घेऊन आला आणि त्यापासून त्याने दिवाळीत लावण्यासाठी सुरेख दिव्यांची माळ बनवली.
त्याच्या मनात अनेक गोष्टींबद्दल कुतूहल असे. आपण राहतो त्या मुंबईतील मिठी नदीचा उगम कुठे होतो किंवा तिचा प्रवाह कुठे जातो, याबद्दल आपल्याला माहिती नाही असं लक्षात आल्यावर एके दिवशी मिठीचा शोध घेत तो वणवण फिरला. तिची भरपूर छायाचित्रे त्याने काढली. त्याने इतकी उदंड फोटोग्राफी केली आहे, की त्यात प्राणीजीवन, पानेफुले, डोंगरदऱ्या, सूर्योदय आणि सूर्यास्त, समुद्रकिनारे, उसळणाऱ्या लाटा, फेसाळणारे पाणी, घाटातील धबधबे, इंद्रधनुष्ये असे कितीतरी विषय आहेत. या फोटोग्राफीची हौस एवढय़ावरच थांबत नसे. तर ते मोठे करणे, त्याच्या प्रती काढून लोकांना वाटणे, मोठय़ा प्रवासातील छायाचित्रांच्या स्लाइड्स बनवणे, फोटोंकरिता सुंदर कॅप्शन्स लिहिणे, त्यासाठी संदर्भ शोधणे,  स्लाइड शो लोकांना जाऊन दाखवणे- असे अनेक उद्योग त्याने पदरमोड करून केले आहेत.
पोहणे आणि ड्रायिव्हग हे त्याचे अत्यंत आवडते छंद. त्याला स्वाती आणि जुई या दोन मुली. त्या अठरा वर्षांच्या होताच त्यांना त्याने ड्रायिव्हग शिकवलं आणि त्यांची स्वत: चाचणी घेतली ती बोरघाटातून जाणाऱ्या मुंबई-पुणे रस्त्यावर! आम्हा सर्व मित्रमंडळींच्या मुलांना त्यानेच पोहायला शिकवले असेल. आपल्या वाढदिवशी रक्तदान करायला त्याने सुरुवात केली आणि त्यानंतर त्याने दर तीन महिन्यांनी रक्तदान करण्याचा परिपाठ कधी सोडला नाही. त्याने किमान नव्वद वेळा तरी रक्तदान केले होते. शतक गाठायची त्याला इच्छा होती, पण वयामुळे ते त्याला शक्य झाले नाही. याचे त्याला कायम शल्य वाटत राहिले.
त्याच्या पंचाहत्तरीला त्याच्या धाकटय़ा मुलीने- म्हणजे जुईने ‘उत्साही स्थितप्रज्ञ’ असे आपल्या वडिलांचे मार्मिक वर्णन केले होते, तर थोरल्या मुलीने- म्हणजे स्वातीने ‘बडे दिलवाला’ असे म्हटले होते. आमच्या घरात आम्ही दोघे आणि आमच्या दोन मुली. पण आम्हा प्रत्येक सदस्याशी त्याचे नाते मात्र पूर्णपणे स्वतंत्र होते. वेगवेगळ्या स्तरांतील आणि वेगवेगळ्या वयोगटातील लोकांशी त्याची असलेली मत्री अद्भुतच म्हणावी लागेल. गेली साडेचार वष्रे मी अंथरुणाला खिळून आहे. तेव्हा दर सोमवारी न चुकता मला भेटायला येण्याचा नेम त्याने कधी मोडला नाही. माझ्या या प्रदीर्घ आजारपणात त्याने मला जी अनमोल मदत केली आहे त्याला तोड नाही. आता दाजीविनाचे सोमवार कसे काढायचे, हे मोठेच प्रश्नचिन्ह आहे. माझ्या प्राणतत्त्वाचा अंश कमी झाल्याचे मला जाणवत आहे. मन उदास आहे. खिन्नतेचे मळभ आहे. मनात विचार येतो- दाजी खरंच दूर गेलाय कुठे? पण जेव्हा मी स्वत:तच डोकावून पाहतो तेव्हा दाजी तिथेच वसला आहे आणि तो निरंतर तिथेच राहणार आहे, या  विचाराने दु:खालाही दिलाशाची किनार लाभते. जगात अनेक लोक यशस्वी होतात, मानमरातब मिळवतात, रग्गड पैसा मिळवतात, पण दाजीसारखे ‘गुडविल’ वरती घेऊन जाणारे विरळाच!