एक नवं क्यालेंडर
अन् त्याची बारा पानं
एवढं काय असतं त्यात
की त्याचं गावं गाणं?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तेच दिवस त्याच रात्री
तेच दहा ते पाच!
त्याच त्या प्रश्नांचा
तोच तो नाच!
हॅप्पी नवं साल म्हणून
का त्याचं होतं सोनं?
एवढं काय असतं त्यात
की त्याचं गावं गाणं?

शुभेच्छांच्या वर्षांवानं
भिजला मोबाइल
त्यानं का आयुष्याचं
फेसबुक हिरवं होईल?
कशासाठी लुटता मग ती
एसेमेसची वाणं?
एवढं काय असतं त्यात
की त्याचं गावं गाणं?
 
बाहेर बघा धुकं किती
केवढी पडलीय थंडी!
कुठून येईल ऊब इथं
आपली फाटकी बंडी  
अच्छे दिन कसले लेको?
..पोकळ आश्वासनं!
एवढं काय असतं त्यात
की त्याचं गावं गाणं?

वाचा वाचा पेपर आजचा
पाहा काय छापलंय
जग कसं स्वत:च
स्वत:वर कोपलंय!
अशा वेळी कसं सुचतं
फिदीफिदी हसणं?
एवढं काय असतं त्यात
की त्याचं गावं गाणं?
 
कडू कारलं बनून कोणी
रडत असेल असं
नक्की समजा मित्रों त्याचं
पित्त उठलंय खासं
किंवा त्याचा उठला असेल
दुखरा मूळव्याध
किंवा रात्री बायकोशी
झाला असेल वाद
त्याशिवाय का कोणी असं
गातं रडगाणं?
त्याशिवाय का कोणी म्हणतं
कशास गावं गाणं?

नवं वर्ष म्हणजे अखेर
असतं तरी काय?
नवं वर्ष येताना
आणतं तरी काय?
शुभेच्छांच्या शब्दांचा
असतो काय अर्थ?
वगळल्या भावना तर
सारंच असतं व्यर्थ!
एकदा हे समजलं की
सोपं होतं कळणं
एकदा हे समजलं की
माणूस गातो गाणं!

स्वप्नं आणि आकांक्षांचे
होतात जुने पंख
आयुष्याला होतच असतो
निराशेचा डंख
तेव्हा असं पुन्हा पुन्हा
गावं लागतं गाणं
आपलंच आपल्याला
हे असतं समजावणं
की –
एक नवं क्यालेंडर
अन् त्याची बारा पानं
भाग्यवान विजेत्याला
गावेल त्यात सोनं..     
    

मराठीतील सर्व 'ध' चा 'मा' बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Song
First published on: 04-01-2015 at 05:16 IST