प्राचीन संस्कृत साहित्यातील कर्णिकार मराठीत ‘बहावा’ म्हणून ओळखला जात असला तरी आज त्याची इंग्रजीतील ‘लॅबर्नम’ आणि िहदीतील ‘अमलताश’ ही नावे आपल्या जास्त परिचयाची आहेत. मुंबईत गावदेवी येथील एका रस्त्याला ‘लॅबर्नम रोड’ नाव दिले गेले आहे. कवयित्री इंदिरा संत यांचे लेखक सुपुत्र प्रकाश संत यांनी आपल्या कऱ्हाडातील बंगल्याला ‘अमलताश’ हे नाव दिले आहे. तसेच त्यांच्या पत्नी सुधा संत तथा डॉ. सुप्रिया दीक्षित यांनी लिहिलेले ‘अमलताश’ हे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.
वसंत ऋतूत उगवत्या सूर्याचे बदलते रंग घेऊन फुलणारी फुले पाहिली की या ‘कुसुमाकार’ ऋतूच्या पुष्पवैभवाने मन रंगून जाते. उगवताना लाल दिसणारे सूर्यिबब नंतर केशरी होते. सूर्य आणखी वर आल्यानंतर त्याच्या सोनपिवळ्या रंगाने सारे आभाळ भरून जाते. फुलांमध्ये शाल्मलीने (सावरीने) घेतला आहे सूर्याचा लाल रंग, तर लाल रंगाकडे झुकणारा केशरी रंग घेतला आहे पळसफुलांनी.. आणि तेजस्वी पिवळा रंग घेऊन फुलतो बहावा! म्हणजेच संस्कृत साहित्यातील कर्णिकार! आपल्या सोनेरी पिवळ्या फुलांनी कर्णिकार जणू सूर्याच्या तेजाची उधळण करतो. दावाग्नी (flame of the forest) मानल्या गेलेल्या पळसाच्या दाहक अग्निफुलांपेक्षा बहाव्याची मोहक सुवर्णफुले मनाला अधिक आकर्षति करतात. या फुलांना ‘बहावा’ या रूक्ष नावापेक्षा ‘कर्णिकार’ हे काव्यात्म नावच अधिक खुलून दिसते.
वसंतातल्या हिरव्या वनराजीत फुललेला पिवळा कर्णिकार पाहून जणू उन्हच घनीभूत झाल्यासारखे वाटते आणि पाचूच्या हिरव्या माहेरी ‘ऊन हळदीचे आले..’ या कवी मंगेश पाडगावकरांच्या काव्यपंक्तीची आठवण होते. कालिदासाच्या ‘रघुवंशम्’ या महाकाव्यात विजयादशमीला सोने म्हणून देण्यात येणाऱ्या आपटय़ाच्या पानांविषयीची कथा आहे. रघूराजाच्या स्वारीला घाबरून कुबेराने आपटय़ाच्या वृक्षावर सुवर्णमुद्रांचा वर्षांव केला. कर्णिकार वृक्षावर तर निसर्गानेच जणू सुवर्णमुद्रांचा वर्षांव केला आहे. जर सुवर्णाचा मृदु मुलायम स्पर्श अनुभवायचा असेल तर कर्णिकाराच्या फुलांना स्पर्श करावा! एरवी आपले अस्तित्व जाणवू न देणारा कर्णिकार वसंतात मात्र सोनपिवळ्या फुलांनी भरून जातो. ऋतुराज वसंताने आपल्या प्रियेला- वसंतलक्ष्मीला दिलेला सुवर्णालंकार म्हणजे कर्णिकार!
पानोपानी फुललेला हा कर्णिकार प्राचीन संस्कृत साहित्यात तरुणींच्या कानोकानीही खुलला आहे. कर्णाला शोभा देत असल्यामुळे याला ‘कर्णिकार’ हे नाव पडले असावे. आपल्या सोनपिवळ्या फुलांमुळे वसंत ऋतूत कर्णिकार अगदी सुवर्णालंकारांनी विभूषित राजाप्रमाणे दिसू लागतो. म्हणूनच याला ‘राजवृक्ष’ही म्हटले जाते.
कर्णिकाराला येणारी फुले ही गुच्छरूपाने नसून लांबच लांब मंजिऱ्यांच्या स्वरूपात असतात. मंजिऱ्यांच्या वरच्या बाजूला नाजूक हिरवा देठ असलेली पिवळी फुले असून, तळाकडे गोल बोराएवढय़ा कळ्या असतात. त्यामुळे द्राक्षांप्रमाणेच या फुलांचे घोस वाटतात. सोनेरी फुलांच्या या रचनेमुळे कर्णिकाराला इंग्रजीत ‘golden rain आणि ‘golden shower’ ही नावे मिळाली आहेत. कर्णिकाराच्या फुलांना पाच दलांचा हिरवा बाह्य़कोश असून वेगवेगळ्या आकाराच्या पिवळ्या पाच पाकळ्या, दहा पिवळे पुंकेसर आणि मध्यभागी असणारा लांब स्त्रीकेसर अशी रचना असते. कर्णिकाराला येणाऱ्या शेंगा नळीप्रमाणे पोकळ असल्यामुळे त्याला ‘कॅशिया फिस्टुला’ हे नाव लाभले. त्यात असणारा तपकिरी, चिकट, गोडसर गर वानरांच्या आवडीचा असल्याने कर्णिकाराला ‘बंदर लाठी’ही म्हणतात. कर्णिकार जसा कविप्रिय आहे तसाच कपिप्रियही आहे. (नाहीतरी प्राकृत भाषेत कवि आणि कपि यांना ‘कइ’ हा एकच शब्द आहे.)  गोड गरामुळे याला ‘पुिडग पाइप ट्री’ असेही म्हटले जाते.
संस्कृतमध्ये कर्णिकाराला अनेक नावे असून ती या वृक्षाचे औषधी गुणधर्म सांगणारी आहेत. ‘सुश्रुतसंहिता’, ‘भावप्रकाशनिघण्टु’, ‘धन्वन्तरीनिघण्टु’ यांसारख्या ग्रंथांमधून त्याची पुढील नावे आढळतात : आरग्वध (रोगांचा वध करणारा), आरेवत (शरीरातील मलाचे निस्सारण करणारा), व्याधिघात (व्याधींचा नाश करणारा), शम्पाक (कल्याणकारी फळ देणारा- म्हणजे व्याधींचे शमन करणारा), आरोग्यम् (आरोग्यकारी), आरोग्यशिम्बी (आरोग्यकारी शेंग असणारा). कर्णिकाराच्या रंगरूपाची वैशिष्टय़े सांगणारी पुढील नावे आढळतात : सुवर्णक (सोन्याच्या रंगाचा, सुंदर रंगाचा), स्वर्णाङ्ग (सुवर्णकाय), स्वर्णभूषण (सोन्याच्या अलंकाराप्रमाणे फुले असणारा), स्वर्णद्रु (सुवर्णवृक्ष), कृतमाल (पुष्पमंजिरीच्या माला धारण करणारा), दीर्घफल (लांबलचक फळ म्हणजे शेंगा असणारा), चतुरङ्गुल (पानांच्या जोडय़ांमध्ये चार बोटांचे अंतर असणारा).
निसर्ग आणि मानव यांच्यातील तादात्म्याचे चित्रण करणाऱ्या संस्कृत साहित्यात वृक्षांनाही गर्भवती स्त्रियांप्रमाणे ‘दोहद’ म्हणजे डोहाळे लागतात असा कविसंकेत आहे. एका श्लोकात अशा प्रियंगु, बकुल, अशोक यांसारख्या दहा वृक्षांचा निर्देश केलेला आहे. या रसिक वृक्षांचे दोहद सुंदर स्त्रियांकडून विविध प्रकारे पुरविले गेल्यानंतरच त्यांना फुले येतात. अशा वृक्षांमध्ये शेवटी आहे तो कर्णिकार! त्याच्याविषयी म्हटले आहे-
‘विकसति च पुरोनर्तनात्कर्णिकार:।’ नृत्याने फुलणारा कर्णिकार खरोखरच कलासक्त असला पाहिजे! कारण नृत्य म्हटले की त्याला गीत आणि वाद्य्ो यांची साथ आलीच. नृत्याने फुलणाऱ्या कर्णिकाराच्या पुष्पमंजिऱ्याही वायुलहरींमुळे जणू नृत्य करीत असतात.
असा हा कर्णिकार अभिजात संस्कृत साहित्यात प्रथम फुलला आहे तो आदिकवी वाल्मीकींच्या रामायणात! त्यातील अरण्यकांड आणि किष्किन्धाकाण्डामध्ये कर्णिकार आला आहे. अरण्यकांडामध्ये श्रीरामाच्या अरण्यवासाचे, राक्षसवधाचे, सीता-अपहरणाचे आणि श्रीरामाच्या विलापाचे वर्णन आले आहे. त्यात श्रीरामाच्या पंचवटीतील आश्रमात तसेच मतंग मुनींच्या आश्रमात कर्णिकार वृक्ष असल्याचा उल्लेख आहे. कर्णिकारांचा निर्देश पुढील श्लोकांमध्ये पाहावयास मिळतो.
तस्मिन्नेव तत: काले वैदेही शुभलोचना॥
(अरण्यकाण्ड सर्ग ४२, श्लोक क्र. ३०, दुसरी ओळ)
कुसुमापचये व्यग्रा पादपानत्यवर्तत।
कर्णिकारानशोकांश्च चूतांश्च मदिरेक्षणा॥
(अरण्यकाण्ड सर्ग ४२, श्लोक क्र. ३१)
अर्थ : ज्यावेळी कांचनमृगाच्या रूपात मारीच आश्रमात आला, त्यावेळी फुले वेचण्यात व्यग्र असलेली मदिरेक्षणा (मदिरेप्रमाणे मादक नेत्रांची), शुभलोचना वैदेही कर्णिकार, अशोक आणि आम्रवृक्ष यांना पार करीत (कांचनमृगरूपी मारीचाजवळ) पोहोचली.
पुढे रावण सीतेचे अपहरण करीत असता याच फुललेल्या कर्णिकार वृक्षांना सीता म्हणते-
आमन्त्रये जनस्थाने कर्णिकारांश्च पुष्पितान्।
क्षिप्रं रामाय शंसध्व सीतां हरति रावण:॥
(अरण्यकाण्ड सर्ग ४९, श्लोक क्र. ३०)
अर्थ : मी जनस्थानात फुललेल्या कर्णिकारांजवळ प्रार्थना करते की त्यांनी, सीतेला रावण पळवून नेत आहे, हा निरोप श्रीरामांना लवकरात लवकर सांगावा.
सीताविरहाने व्याकुळ झालेला रामही याच कर्णिकार वृक्षांना सीतेविषयी विचारतो. तो म्हणतो-
अहो त्वं कर्णिकाराद्य पुष्पित: शोभसे भृशम्।
कर्णिकारप्रियां साध्वीं शंस दृष्टा यदि प्रिया॥
(अरण्यकाण्ड सर्ग ६०, श्लोक क्र. २०)
अर्थ : हे कर्णिकारा! फुललेला तू आज अतिशय (भृशम्) शोभून दिसत आहेस. तू मला सांग, जिला कर्णिकार प्रिय आहे अशा माझ्या पतिव्रता प्रियेला तू पाहिले आहेस का?
कर्णिकाराविषयीचे ‘अरण्यकाण्डा’तील हे श्लोक पाहिल्यावर असे वाटते की, सोन्यात हीन मिसळावे त्याप्रमाणे या सुवर्ण कर्णिकारात राम-सीतेचे दु:ख मिसळले आहे.
अरण्यकाण्डानंतर येणाऱ्या किष्किन्धाकांडात कर्णिकार पुन्हा तेजाने झळाळताना दिसतो. किष्किन्धाकांडात सीतेचा शोध घेत राम-लक्ष्मण पंपा सरोवराच्या काठी आल्याचे वर्णन आहे. या सरोवराभोवती असणाऱ्या पर्वतांवर फुललेल्या कर्णिकारांचे वर्णन करताना वाल्मीकींच्या प्रतिभेलाही फुलोरा आला आहे. कर्णिकार वृक्ष पाहून राम लक्ष्मणाला म्हणतो-
सुपुष्पितांस्तु पश्यतान् कर्णिकारान् समन्तत:।
हाटकप्रतिसंछन्नान् नरान् पीताम्बरान्निव॥
(किष्किन्धाकाण्ड सर्ग १, श्लोक क्र. २१)
अर्थ : हे लक्ष्मणा! सगळीकडे सुंदर फुलांनी बहरलेले, सोन्याची आभूषणे घातलेल्या आणि पीतांबर नेसलेल्या पुरुषांप्रमाणे दिसणारे हे कर्णिकार वृक्ष पाहा!
राजवैभवात वाढलेल्या रामालाच इतकी वैभवसंपन्न उपमा सुचू शकेल. आणखी एका श्लोकात राम लक्ष्मणाला म्हणतो-
सौमित्रे पश्य पम्पाया दक्षिणे गिरिसानुषु।
पुष्पितां कर्णिकारस्य यिष्ट परमशोभिनाम्॥
(किष्किन्धाकाण्ड सर्ग १, श्लोक क्र. ७३)
अर्थ : हे सुमित्रानंदना! पंपा सरोवराच्या दक्षिण भागाकडे असलेल्या पर्वतशिखरांवर फुललेली ही अतिशय शोभिवंत दिसणारी कर्णिकार वृक्षाची फांदी पाहा! विरहव्याकूळ असूनही, चत्रानिल (चत्रातील वायू) दु:ख देत असूनही कर्णिकाराच्या रमणीय रूपाविषयी राम निरासक्त राहू शकला नाही.
रामायणातील अखेरच्या उत्तरकांडात कैलास पर्वताजवळील वन-उद्यानांच्या वर्णनात कदंब, बकुल, अशोक यांसारख्या वृक्षांबरोबरच कर्णिकारवनैर्दीप्तै: – कर्णिकार वृक्षांमुळे देदीप्यमान झालेली वने (उत्तरकांड सर्ग २६, श्लोक क्र. ४) असा फुललेल्या कर्णिकार वृक्षांचा यथार्थ उल्लेख आलेला आहे.
रामायणातील कर्णिकाराप्रमाणे महाभारतातील कर्णिकाराला मात्र खास असा संदर्भ नाही. फक्त वनपर्व, द्रोणपर्व आणि शल्यपर्व यांमध्ये त्याचा निर्देश आहे. रामायण आणि महाभारत या आर्ष म्हणजे वाल्मीकी आणि व्यास ऋषींनी रचलेल्या महाकाव्यांनंतर आपण येतो विदग्ध महाकाव्यांच्या काळात!
इसवी सनाच्या पहिल्या शतकात- म्हणजे कविकुलगुरू कालिदासाच्याही आधी होऊन गेलेल्या आणि बौद्ध सम्राट कनिष्क याच्या राजदरबारी असलेल्या अश्वघोष या महाकवीने भगवान बुद्धाशी संबंधित ‘बुद्धचरितम्’ आणि ‘सौन्दरनन्दम्’ ही दोन विदग्ध महाकाव्ये रचली. त्यांपकी बुद्धचरिताच्या ‘अभिनिष्क्रमण’ (संन्यासासाठी बाहेर पडणे) नामक सर्गात सर्वार्थसिद्धाच्या म्हणजेच गौतम बुद्धाच्या मनात राजवाडय़ातील अस्ताव्यस्त अवस्थेत निद्रिस्त झालेल्या स्त्रियांना पाहून स्त्रीसौंदर्याविषयी उद्वेग निर्माण झाल्याचे वर्णन आहे. त्यामध्ये एका श्लोकात सुवर्णालंकारांनी विभूषित आणि पिवळे वस्त्र परिधान केलेल्या निद्रिस्त स्त्रियांना हत्तीने तोडलेल्या कर्णिकार शाखांची उपमा दिली आहे. कवी म्हणतो-
नवहाटकभूषणास्तथान्या वसनं पीतमुत्तमं वसान:।
अवशा घननिद्रया निपेतुर्गजभग्ना इव कर्णिकारशाखा:॥
(बुद्धचरितम् सर्ग ५, श्लोक क्र. ५१)
अर्थ : सोन्याच्या नव्या अलंकारांनी विभूषित तसेच उत्तम पिवळे वस्त्र परिधान केलेल्या, गाढ निद्रेच्या आधीन झालेल्या स्त्रिया हत्तीने तोडलेल्या कर्णिकाराच्या फांद्यांप्रमाणे पडल्या होत्या. या श्लोकात वाल्मीकींनी रामायणात कर्णिकार वृक्षांना दिलेल्या सुवर्णालंकार घातलेल्या पीतांबरधारी पुरुषांच्या उपमेचा प्रभाव दिसून येतो. स्त्रियांना कर्णिकार शाखांची उपमा देऊन अश्वघोषाने येथे उपमेय आणि उपमान यांची फक्तअदलाबदल केली आहे.
कालिदासाचे तर कर्णिकारावर अगदी अंत:करणापासून प्रेम आहे. तसे पाहिले तर गंध, रूप आणि स्पर्श या फुलांच्या ठळक वैशिष्टय़ांपकी गंध मात्र कर्णिकाराच्या वाटय़ाला आलेला नाही. सु-वर्ण असणाऱ्या कर्णिकाराचे खरोखरीच सुवर्णाशी साम्य आहे. सोन्याला तरी कुठे सुगंध आहे? कर्णिकाराला गंध नाही याची खंत कालिदासालाही वाटते. परंतु हा कवी निसर्गातील उणिवांचेही समर्थन करतो. कारण त्याची वृत्ती छिद्रान्वेषी नसून गुणग्राही आहे. कर्णिकाराच्या निर्गन्धतेचे समर्थन करताना ‘कुमारसम्भवम्’ या महाकाव्यात कालिदास म्हणतो-
वर्णप्रकष्रे सति कर्णिकारं दुनोति निर्गन्धतया स्म चेत:।
प्रायेण सामग्ऱ्यविधौ गुणानां पराङ्मुखी विश्वसृज: प्रवृत्ति:॥
(कुमारसम्भवम् सर्ग ३, श्लोक क्र. २८)
अर्थ : वसंत ऋतूत फुललेला कर्णिकार रंगाचा उत्कर्ष असूनही मनाला दुख देत होता. बहुधा गुणांच्या समग्रतेविषयी ब्रह्मदेवाची (विश्वसृज:) प्रवृत्ती पराङ्मुखी असते. (सर्व गुण तो एकत्र आणीत नाही.)
असे असूनही ‘कुमारसंभवा’तील कैलासावर ध्यानमग्न असणाऱ्या शिवाची सेवा करणाऱ्या निसर्गकन्या पार्वतीने मात्र आपल्या सौंदर्यप्रसाधनासाठी कर्णिकाराचा वापर केलेला आहे. सोन्याचे तेज हरण करणाऱ्या कर्णिकाराची फुले (आकृष्टहेमद्युति कर्णिकारम्- कुमारसम्भवम् सर्ग ३, श्लोक क्र. ५३) तिने आपल्या काळ्याभोर केसांमध्ये माळली आहेत. शिवाला वाकून प्रणाम करताना ही फुले खाली पडतात. हे चित्रदर्शी वर्णन आपल्याला पुढील श्लोकात पाहावयास मिळते-
उमापि नीलालकमध्यशोभि विस्रंसयन्ती नवकर्णिकारम्॥
चकार कर्णच्युतपल्लवेन मूध्र्ना प्रणामं वृषभध्वजाय॥
(कुमारसम्भवम् सर्ग ३, श्लोक क्र. ६२)
अर्थ : पार्वतीने जेव्हा शिवाला (वृषभध्वजाय) प्रणाम करण्यासाठी आपले मस्तक झुकविले, तेव्हा तिच्या काळ्याभोर केसांमध्ये माळलेली कर्णिकार पुष्पे आणि कानावरील पल्लव गळून पडले.
पार्वतीने शिवाच्या सेवेसाठी जाताना आपल्या साजशृंगारासाठी कर्णिकार पुष्पांची निवड करण्याचे खास कारण आहे. शिवाला ही फुले प्रिय आहेत. म्हणूनच तो ‘कर्णिकारप्रिय:’ या नावानेही ओळखला जातो.
कालिदासाच्या ‘रघुवंशम्’ या महाकाव्यातही वसंत ऋतूत स्त्रियांनी कर्णिकार पुष्पे केसांत माळल्याचा काव्यात्म उल्लेख आला आहे. विशेष म्हणजे या फुलांचा नामनिर्देश न करता त्याच्या अग्नी आणि सुवर्ण यांच्याप्रमाणे असणाऱ्या तेजस्वी वर्णाने कालिदासाने ही फुले सूचित केली आहेत. तो म्हणतो-
हुतहुताशनदीप्ति वनश्रिय: प्रतिनिधि: कनकाभरणस्य यत्।
युवतय: कुसुमं दधुराहितं तदलके दलकेसरपेशलम्॥
(रघुवंशम् सर्ग ९, श्लोक क्र. ४०)
अर्थ : वसंत ऋतूत तरुणींनी नाजूक पाकळ्या आणि केसर असणारे, आहुती दिलेल्या अग्नीप्रमाणे तेजस्वी आणि वनश्रीच्या सुवर्णालंकाराचे प्रतिनिधी असणारे (प्रियकराकडून) केसांत गुंफले गेलेले फूल धारण केले. कामदेवाचा सखा असणाऱ्या वसंत ऋतूतील तरुण-तरुणींचा प्रणयही येथे कर्णिकाराच्या नाजूक फुलाप्रमाणेच फुलला आहे.
कालिदासाच्या ‘ऋतुसंहारम्’ या लघुकाव्यातील वसंत ऋतूच्या वर्णनात स्त्रिया कर्णिकाराचा त्याच्या नावाप्रमाणेच कर्णालंकार म्हणून उपयोग करताना दिसून येतात. ‘कर्णेषु योग्यं नवकर्णिकारम्।’ (ऋतुसंहारम् सर्ग ६, श्लोक क्र. ५) ऋतुसंहारातील ‘कुसुममास’ म्हणजे वसंत ऋतू फुललेल्या कर्णिकारांमुळे रमणीय झाला आहे. ‘कर्णिकारैश्च रम्य:।’ (ऋतुसंहारम् सर्ग ६, श्लोक क्र. २७)  विरहीजनांना मात्र कर्णिकार मोहक असूनही दाहक भासतो. ‘किं कर्णिकारकुसुमर्न कृतं नु दग्धम्।’ (ऋतुसंहारम् सर्ग ६, श्लोक २०)
कालिदासाच्या ‘विक्रमोर्वशीयम्’ या नाटकातील कर्णिकार त्याच्या वर्णनातील वेगळेपणामुळे उठून दिसतो. आपल्या विक्रमाने उर्वशीला प्राप्त करून घेणाऱ्या पुरुरवा राजाची कथा असलेल्या या नाटकात वसंत ऋतूतील उष्म्यापासून आपले रक्षण करू इच्छिणाऱ्या मयूर, भ्रमर, कारंडव (पाणकोंबडा) आणि शुक यांचे सुंदर वर्णन आले आहे. एरवी कमळाचा आश्रय घेणारा भ्रमर वसंत ऋतूत कमळ फुलत नसल्याने कर्णिकाराचा आश्रय घेतो, अशी आगळी कल्पना कालिदासाने केली आहे. तो म्हणतो-
निíभद्योपरि कर्णिकारमुकुलान्यालीयते षट्पद:।
(विक्रमोर्वशीयम् अंक २, श्लोक क्र. २२)
अर्थ : कर्णिकाराच्या कलिकेचा भेद करून षट्पद म्हणजे भ्रमर तिच्यात लपून बसतो.
कर्णिकारासारख्या सुवर्णगृहात निवास करणारा भ्रमर भाग्यवानच म्हटला पाहिजे! ‘विक्रमोर्वशीयम्’ नाटकाच्या तिसऱ्या अंकात पुरुरवा राजाचे वर्णन करताना कालिदास म्हणतो-
परिजनवनिता कराíपताभि:
परिवृत एष विभाति दीपिकाभि:।
गिरिरिव गतिमानपक्षलोपात्
अनुतटपुष्पितकर्णिकारयष्टि:॥
(विक्रमोर्वशीयम् अंक ३, श्लोक क्र. ३)
अर्थ : हातात दीपिका घेतलेल्या दासींनी वेढलेला पुरुरवा राजा- ज्याच्या तटांवरील कर्णिकारांच्या शाखा फुललेल्या आहेत, अशा पंख न छाटलेल्या पर्वताप्रमाणे गतिमान भासत आहे.
कालिदासानंतर होऊन गेलेल्या भारवी, माघ, पंडित श्रीहर्ष या कवींनी मात्र आपल्या काव्यांतील वसंतवर्णनात कर्णिकाराला त्याच्या निर्गन्धतेमुळे स्थान दिलेले दिसत नाही.
संस्कृत कवी बाणभट्टाचे मात्र कालिदासाप्रमाणेच कर्णिकाराच्या तेजस्वी पिवळ्या रंगावर प्रेम आहे. कर्णिकाराच्या ‘गौर’ वर्णाचा त्याने उपमेसाठी उपयोग केला आहे. ‘गौर’ या संस्कृत शब्दाचा ‘शुभ्र’ हा अर्थ परिचित असला तरी त्याचा ‘तेजस्वी पिवळा’ असा दुसराही अर्थ आहे. ऋग्वेद, रामायण, रघुवंश यांमध्ये ‘गौर’ हा शब्द ‘पिवळा’ या अर्थाने आला आहे. बाणाने ‘पिवळा’ याअर्थी असणाऱ्या या ‘गौर’ वर्णाला ‘कर्णिकारगौर’ म्हटले आहे. बाणाच्या ‘हर्षचरितम्’ या ‘आख्यायिका’ नामक ग्रंथात वर्णिलेला- बाणाला श्रीहर्षांच्या द्वारपालाकडे घेऊन जाणारा वेत्रधारी (वेताची काठी हातात घेतलेला) पुरुष ‘कर्णिकारगौर’ आहे. तसेच श्रीहर्षांभोवती असलेले सेवकही ‘कर्णिकारगौर’ असल्याने त्यांना सुवर्णाच्या स्तंभांची उपमा दिली आहे. हर्षचरिताच्या आठव्या उच्छवासातील वनराजीवर्णनात कर्णिकारांना कळ्या आल्याचा उल्लेख आहे. (कुङ्मलित कर्णिकार:)
 भागवत पुराणात कर्णिकाराचा ‘हिरण्मयभुजैरिव’ म्हणजे ‘सोन्याच्या बाहूंप्रमाणे’ असा उल्लेख आला आहे. संस्कृत साहित्यातच नव्हे, तर संस्कृत शास्त्रग्रंथांमध्येही कर्णिकाराला स्थान मिळाले आहे. याज्ञवल्क्यस्मृतीवरील ‘मिताक्षरा’ या टीकेमध्ये मत्स्यपुराणाचा दाखला देऊन ‘पीतमाल्याम्बरधारी’ म्हणजे पिवळ्या माळा आणि वस्त्रे धारण केलेल्या सिंहस्थ (सिंह राशीतील) बुध ग्रहाला ‘कर्णिकारसमद्युति:’ म्हटले आहे. (याज्ञवल्क्यस्मृति १.२९७ मिताक्षरा टीका). वराहमिहिराच्या ‘बृहत्संहिता’ या ग्रंथातील ‘रत्नपरीक्षा’ अध्यायात रत्नांच्या देवतांचे जे विवेचन केले आहे, त्यामध्ये कर्णिकार पुष्पाप्रमाणे म्हणजेच पीतवर्ण असणाऱ्या रत्नाची देवता ‘हौतभुज’ म्हणजे अग्नी असल्याचे म्हटले आहे. (कर्णिकारपुष्पनिभं..हौतभुजम्) (बृहत्संहिता रत्नपरीक्षाध्याय: श्लोक क्र. ९). अठराव्या शतकात होऊन गेलेल्या पंडित जगन्नाथ मिश्रा यांच्या ‘रसकल्पद्रुम’ या ग्रंथात कर्णिकार वेगळ्याच संदर्भात आला आहे. या ग्रंथात ‘मेघरञ्जी’ (मेघरञ्जनी) रागाचे सुंदर समूर्तीकरण (Iconification) केले आहे. स्त्रीरूपातील मेघरञ्जीचे वर्णन करताना कवी म्हणतो-
श्रुतौ दधाना नवकर्णिकारमारामगा केशरपुञ्जकाञ्ची। अध्यापयन्ती स्वकरस्थशारीं श्रीरामरामेति च मेघरञ्जी॥ (रसकल्पद्रुम ६.५.९७९)
अर्थ : जिने कानांवर ताजी कर्णिकार पुष्पे धारण केली आहेत, बकुलमालेची मेखला परिधान केली आहे आणि उद्यानात स्वत:च्या हातातील सारिकेला ‘श्रीराम राम’ बोलावयास शिकवते ती मेघरञ्जी!
रागाने समूर्त होऊन कर्णिकार पुष्प धारण करण्याची कल्पनाच किती काव्यमय आहे!  
कर्णिकार मराठीत ‘बहावा’ म्हणून ओळखला जातो. त्याची इंग्रजीतील ‘लॅबर्नम’ आणि िहदीतील ‘अमलताश’ ही नावे जास्त परिचयाची आहेत. मुंबईत गावदेवी येथील एका रस्त्याला ‘लॅबर्नम रोड’ नाव आहे. कवयित्री इंदिरा संत यांचे लेखक सुपुत्र प्रकाश संत यांनी आपल्या कऱ्हाडातल्या बंगल्याला ‘अमलताश’ हे नाव दिले आहे. त्यांच्या पत्नी सुधा संत तथा डॉ. सुप्रिया दीक्षित यांनी ‘अमलताश’ हे आत्मकथनपर पुस्तकही लिहिले आहे.
रामायण काळापासून फुलणारा कर्णिकार आजही फुलत आहे. त्याच्या सुवर्णझळाळीने आपले मन आजही तेजाळते आणि कवी सुरेश भट यांच्या गीतातील मेंदीच्या पानावर झुलणारे हे मन कर्णिकाराच्या झुलत्या फुलांवरही झुलत राहते.        

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spring brings yellow flowers
First published on: 18-05-2014 at 01:14 IST