एकेकटेपणे काय काय शिरावर घेणं हा विकासभाऊंचा स्वभाव. ते प्रकाशपेक्षा मोठे. बाबांना पाहायला नाही मिळालं, पण ज्यांनी त्यांना पाहिलं होतं ते विकासभाऊंकडे पाहून बाबांची आठवण होते म्हणतात. म्हणजे बाबाही असे फटकळ असणार… असा अर्थ. त्यामुळे ते प्रकाशभाऊंइतके लोकप्रिय नाहीत. भाषणं वगैरे द्यायला आवडत नाही त्यांना. त्यामुळे तसे ते कमी लोकप्रिय आहेत. सिनेमा वगैरे नाही बनला त्यांच्यावर. त्यांचं मोठेपण आहे ते समाजसेवेला संपत्ती निर्मितीची जोड देण्यात…

आनंदवन’चं माहात्म्य महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ले, जागृत देवस्थानं किंवा अन्य अशा काही महत्त्वाच्या ‘टिक-मार्की’ स्थळात व्हायच्या आधीपासून आमटे कुटुंबीयांविषयी वाचत होतो. पुलंनी तिथं केलेलं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन, बाबा आमटे यांचं पसरू लागलेलं वलय असं बरंच काही वाचनात असायचं. पुस्तकं, कविता वाचायचंही वेड होतं. त्यात मामानं एकदा बाबांचं ‘ज्वाला आणि फुले’ भेट दिलं. आमटे आणखीनच आवडू लागले. तरुण वयात समाजसेवा या विषयांबाबत एक रोमँटिसिझम तयार होतो. विशेषत: नक्की काय करायचं याचं उत्तर हाती नसेल तर समाजसेवा असं काही मनात येत असतं. बाबा आणि एकंदर आमटे परिवार यांच्याविषयी असं वाटू लागलं होतं.

आणि अशा भारलेल्या वातावरणात गोविंदरावांचा (तळवलकर) ‘बाबा महाराज’ वाचनात आला. प्रत्यक्ष पत्रकारितेत मला तेव्हा यायला अजून वेळ होता. पण तिकडे जायचा रस्ता दिसू लागला होता. हा रस्ता आपला, हे कळलेलं होतं. गोविंदरावांचं लिखाण हे अंतिम आकर्षण आणि तसं लिहिता येणं हे ध्येय बनून गेलं तो हा काळ. त्यामुळे ‘बाबा महाराज’ या लेखानंही झपाटून गेल्यासारखं झालं. एखाद्या व्यक्तीचं मूल्यमापन करताना त्या व्यक्तीमुळे आलेलं भारलेपण कसं दूर ठेवायचं हे त्यातनं कळलं. बाबा आमटे यांनी त्यावेळी ‘भारत जोडो’ यात्रा वगैरे काढली होती. काही काळ नर्मदा तीरावर जाऊन राहिले होते ते त्या आंदोलनाचा भाग म्हणून. ‘बाबा महाराज’ हा लेख बाबांच्या या राजकीय-सदृश कार्यावर होता. वास्तविक पुलं-गोविंदराव अगदी उत्तम मैत्र. पुलं तर आजच्या शब्दात सांगायचं तर आनंदवनाचे ब्रँड अँबॅसिडर. पण बाबा आमटेंचं रूपांतर एखाद्या ‘बाबा’मध्ये होऊ लागल्याचा धोका दाखवून देताना गोविंदरावांना या मैत्रीनं अडवलं नाही.

पण त्यामुळे झालं असं की, बाबा आणि आमटे परिवाराविषयी अधिकच कुतूहल निर्माण व्हायला लागलं. समजून घ्यायला हवं या परिवाराला याची जाणीव तीव्र होऊ लागली. पत्रकारितेत आल्यावर आनंदवन, त्यांचे विविध उपक्रम यांविषयी काही ना काही संपर्क यायचा. वाचनात यायचं. पण आमटे परिवारातल्या कोणाशी कधी तोपर्यंत ओळख झाली नव्हती. आणि गंमत अशी की, ती जेव्हा झाली तेव्हा ती इतकी घट्ट, खोलवर झाली की तोपर्यंत ती नव्हती असं तेव्हा आणि त्यानंतर कधी वाटलंच नाही. तो घट्टपणा आजही आहे आणि ती खोली आज आता आणखीनच वाढलेली आहे. मध्यंतरीच्या काळात खोल गेलेली मुळं उचकटून जाणार की काय असं वाटत होतं खरं. पण तसं काही झालं नाही. त्याचं सारं श्रेय विकासभाऊंचं. इतक्या आठवणी आहेत… आनंदवनातल्या, सोमनाथमधल्या आणि भामरागडच्याही!

एकदा आम्ही… म्हणजे मी आणि पत्नी… राहायला गेलो होतो सोमनाथला. दुपार झाली होती पोचेपर्यंत. विकासभाऊ वाटच बघत होते. अंगात ते पांढरं डगलं आणि अर्धी विजार. गेल्या गेल्या त्यांनी कह्यात घेतलं. सगळा परिसर दाखवला… तिथल्या त्या विशिष्ट आकारांच्या घराघरांत गेलो… तिथं कुष्ठरोगीय दाम्पत्यांचे संसार पाहिले. कोणाकोणाच्या घरी चहा/पाणी झालं. अंधार लवकर पडतो त्या परिसरात. शहरी आयुष्यात बाह्य अंधारच नसतो. त्यामुळे दिवसाचा प्रहर कोणता आणि आपण करतो काय याचा कसला संबंधही नसतो. त्यामुळे वेळ सहज निघून जातो शहरांत. पण सोमनाथसारख्या ठिकाणी करायचं काय… हा प्रश्न. सातच्या सुमारास रात्रीचं जेवण. नंतर काय हा मुद्दा होताच. विकासभाऊंना ती अस्वस्थता लक्षात आली असावी. जेवण झालं. म्हणाले, ‘‘चल… हिंडून येऊ.’’ बायको खोलीतच थांबली.

त्या गार अंधारात विकासभाऊंच्या साथीनं जंगलाचा गंध घेत केलेली पायपीट अजूनही आठवते. या अशा वातावरणात एखाद्या वाघोबाच्या रात्रीच्या जेवणाची सोय आपल्यामुळे तर होणार नाही ना… ही भीती होतीच. पण माझा अनुभव असा की, निसर्गाच्या विराटतेचं दर्शन जेव्हा जेव्हा आपण अशा मुक्तपणे घेतो; तेव्हा तेव्हा वैयक्तिक भीतीची क्षुद्र जाणीव सहज मागे पडते. ती सफर इतकी आवडली की विकासभाऊंच्या… ‘‘जायचं नं उद्या पहाटे?’’ या प्रश्नाला आपसूक होकार मिळाला. प्रकाश आणि विकास यांची ही सवय. दोघेही जेव्हा केव्हा एकत्र असतात तेव्हा हे असे जोडीनं वेळी-अवेळी अशा शहरवासीयांना अघोरी वाटेल अशी पायपीट सर्रास करतात. त्या वेळी प्रकाश आमटे नव्हते. त्याऐवजी विकासभाऊंनी मला घेतलं. बरं वाटलं. अर्थात नाहीतर ते एकटे गेलेच असते.

हे असं एकेकटेपणाने काय काय शिरावर घेणं हा विकासभाऊंचा स्वभाव. ते प्रकाशपेक्षा मोठे. बाबांना पाहायला नाही मिळालं. पण ज्यांनी त्यांना पाहिलं होतं ते विकासभाऊंकडे पाहून बाबांची आठवण होते म्हणतात. म्हणजे बाबाही असे फटकळ असणार… असा अर्थ. त्यामुळे ते प्रकाशभाऊंइतके लोकप्रिय नाहीत. एकतर प्रकाशभाऊंची कोणताही पुरस्कार स्वीकारण्याइतकी सहनशीलता विकासभाऊंकडे नाही. भाषणं वगैरे द्यायला आवडत नाही त्यांना. त्यामुळे तसे ते कमी लोकप्रिय आहेत. सिनेमा वगैरे नाही बनला त्यांच्यावर. त्यांचं मोठेपण आहे ते समाजसेवेला संपत्ती निर्मितीची जोड देण्यात. समाजसेवाही स्वत:च्या पायावर उभी राहायला हवी, हे त्यांचं मत या क्षेत्राबाबतचा भाबडेपणा पुसून टाकणारं आहे. त्यामुळे आनंदवनात ते काय काय प्रयोग करत असतात. वाया गेलेल्या किंवा वापरून झालेल्या एक्सरे फिल्मच्या गठ्ठ्यांचा बंधारा बनव, आनंदवनातल्या कुष्ठरोग्यांचा ऑर्केस्ट्रा बसवून त्याचे प्रयोग कर राज्यभर… असं बरंच काही सुरू असतं त्यांचं. समाजसेवा या शब्दाविषयी आपल्याकडे एक भंपक पावित्र्याचं वलय तयार झालंय. विकासभाऊ स्वत:च त्याचा भेद करतात हे छान. आणि मुख्य म्हणजे या सगळ्यांकडे आपण काही समाजाला मिळालेलं वरदान आहोत… असा त्यांचा दृष्टिकोन अजिबात नसतो. सर्व काही अगदी क्लिनिकली सुरू असतं त्यांचं. भावनांची डबकी जिकडे तिकडे भरलेल्या समाजात हे असं विकासभाऊंचं वागणं खूप गरजेचं वाटतं.

एकदा एक भयंकर प्रसंग अनुभवला. आनंदवनात. भल्या सकाळी एक माणूस, वयस्कर असा हमसून हमसून असा रडत होता आणि विकासभाऊ त्याचं जमेल तितक्या मऊपणानं सांत्वन करत होते. साठे आडनाव होतं त्या गृहस्थाचं बहुधा. हे साठे त्यांच्या मुला-सुनेसमवेत आले होते आनंदवन पाहायला. दोन दिवस राहिले. हिंडले फिरले. आणि तिसऱ्या दिवशी भल्या पहाटे या साठ्यांचा मुलगा आणि सून यांना मागे सोडून असेच निघून गेले. त्यांना न सांगता. का? तर या साठ्यांना कुष्ठरोगाची लागण झाल्याचा संशय होता. साठे कोलमडून पडले होते. साहजिकच आहे तसं होणं. आपला पोटचा मुलगा, म्हातारपणाची काठी वगैरे असलेला असाच वडिलांना मागे सोडून पुढे निघून गेला होता. तो प्रसंग आता आठवला तरी कालवाकालव होते. पण विकासभाऊ शांत होते. त्यांना त्याचं काही वाटलं नसावं. असंही असेल की असे सारखे प्रसंग अनुभवून त्यातला हळवेपणा मरून गेला असावा. काहीही असेल. विकासभाऊंनी इतक्या प्रेमानं हाताळलं साठ्यांना की जणू ते त्यांचेच वडील असावेत असं वाटावं. काही दिवस त्यांचं दु:ख कमी होईपर्यंत सकाळ-संध्याकाळ त्यांची वास्तपुस्त जातीनं करायचे ते. साठे अकाऊंटंट किंवा तत्सम काही होते. विकासभाऊंनी त्यांना अलगदपणे आनंदवनाच्या हिशेब कार्यात सामावून घेतलं. नंतर काही दिवस मीही चौकशी करत होतो विकासभाऊंकडे साठे कसे आहेत वगैरे.

त्यावेळी आनंदवनात एका बंगलीच्या पहिल्या मजल्यावर मुक्काम होता. आनंदवन असो, सोमनाथ वा भामरागड… सगळ्या ठिकाणी दिवस फारच लवकर संपतो. आनंदवन तसं आखीव-रेखीव आहे. संध्याकाळी अंधार पडल्यानंतरही फेरफटका मारता येतो. बाहेर जायची सोय आहे. तरीही लवकर आटपतं सगळं. जागही लवकर येते. एकदा अशीच भल्या पहाटे जाग आली. बाहेर आलो. फटफटलंही नव्हतं त्यावेळी. एक वृद्ध महिला हातात एक दिवा घेऊन तुळशीवृंदावनापाशी तो ठेवायला निघालेली. दृश्य अगदी हळदणकरांच्या ‘ग्लो ऑफ होप’ पेंटिंगची आठवण करून देईल इतकं डिट्टो. फरक असलाच तर इतका की त्या पेंटिंगमध्ये तरुणी होती. इथे एक वृद्ध महिला. चेहऱ्यावर कमालीचे अष्टसात्त्विक भाव. आयुष्याच्या या वळणावर येतो तसा शांतपणा. मला ते दृश्य अजूनही तसंच्या तसं आठवतंय. वातावरणातलं ते धुकं. ओलसर गारवा. आपल्याच श्वासाची कटकट वाटावी इतका त्याचा आवाज. आणि समोर आपल्या प्रेमळ आजीची आठवण करून देईल अशी कृश, गोरीपान, पांढऱ्या साडीतली ही महिला. मी ते पाहात राहिलो. थोड्या वेळानं लक्षात आलं… या तर साधनाताई. बाबांच्या अर्धांगिनी. आम्हा दोघांनाही माहीत नव्हतं त्याही इथे आहेत ते. नंतर मग विकासभाऊंना विचारलं म्हटलं, ‘‘जाऊ का भेटायला?’’ त्यांचा आमचा काही परिचय नव्हता. ते ऐकल्यावर विकासभाऊ मग आम्हा दोघांना घेऊन गेले. ओळख करून दिली. साधनाताई शांत. विकासभाऊंचा धबधबा सुरू होता. थोड्या वेळानं निघालो… साधनाताईंना म्हटलं, ‘‘संध्याकाळी येतो गप्पा मारायला, चालेल ना!’’ हो म्हणाल्या. त्या दिवशी संध्याकाळी बाहेर न जाता त्यांच्याच कुटीत गेलो. तिथे पोहोचलो तर सकाळचंच दृश्य. साधनाताई हातात दिवा घेऊन तुळशीवृंदावनाकडे निघालेल्या. पहाटे होत्या तशाच शांत. परतल्या. मग त्यांच्या पायाशी बसून त्यांच्याच संसाराची कहाणी ऐकत बसलो. जमदग्नी बाबांबरोबरचा संसार. तो सुरू व्हायच्या आधी त्या काही बाबांसारख्याच्या भणंगपणाला परिचित नव्हत्या. आनंदवनाच्या जंगलात राहणं. आई होणं. दोन्ही मुलांना त्या वातावरणात मोठं करणं. जंगली श्वापदं, सापाविंचवांची सोबत, वेडावाकडा पाऊस… कसं आणि काय काय सहन केलं असेल या कल्पनेनंच काटा येत राहिला.

नंतर नंतर विकासभाऊंच्या स्नेहाळपणाची सवय लागत गेली. कौस्तुभ आणि शीतल हे जणू पुतणे-भाचे वाटावेत इतके जवळचे झाले. दोघेही कधी मुंबईला आले की घरी यायचे. शीतल बडबडी. बोलायला लागली की तिला थांबवणं अवघड. एकदा ‘लोकसत्ता’च्या ‘सर्व कार्येषु…’ उपक्रमात ‘आनंदवन’चा समावेश होता. तर आठ दिवसांनी शीतलनं फोटो पाठवला. देणगीच्या चेक्सचा हा भलाथोरला ढीग आणि विकासभाऊ आणि ती त्याचं सॉर्टिंग करतायत. थोड्या दिवसांनी विकासभाऊंचं पत्रही आलं भलंथोरलं. लक्षात आलं, ते लिहितातही बोलल्यासारखं. जणू स्वगतच. अक्षर सुवाच्य आणि लफ्फेदार सही. हा स्नेह उत्तरोत्तर वाढतच गेला. विकासभाऊंचा दबदबा इतका असतो की त्यामानानं भारतीताई मागे राहत गेल्या. मुंबईत आले की आम्ही भेटायचो. नागपूरला माझं जाणं झालं तरी भेट व्हायची. कौस्तुभ आणि शीतल हे तर घरचे आणि ‘लोकसत्ता’चेही झाले. स्नेहवर्तुळात यथावकाश कौस्तुभची बायको पल्लवी, शीतलचा नवरा यांचाही सहज समावेश झाला.

विकासभाऊंनी ‘लोकसत्ता’त छान स्तंभही चालवला. ते दिसतात, वरकरणी वाटतात कोरडे. पण कोणत्याही विषयांवरनं अन्य कोणत्याही विषयात जाण्याची त्यांची क्षमता वादातीत आहे. उदाहरणार्थ, ‘बाइशे श्राबण’ हा मुद्दा. ‘आनंदवनात’ अनामिक कळ्यांचं स्मारक आहे. ते का… याचं विकासभाऊंनी दिलेलं स्पष्टीकरण : ‘वंगीय शका’प्रमाणे तेराशे अठ्ठेचाळीस सालच्या श्रावणातील २२ तारखेला (७ ऑगस्ट १९४१ रोजी) गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या अलौकिक जीवनाचा अस्त झाला. ‘बाइशे श्राबण’पासून बंगालात ठिकठिकाणी ‘रवींद्र सप्ताह’ साजरा होतो. त्यातली सर्वात मन:स्पर्शी गोष्ट म्हणजे ‘वृक्षारोपण’! धरित्रीशी आईचे नाते मानणाऱ्या गुरुदेवांची मातीतून वर येणारी झाडे, वेली, गवताची पाती ही भावंडंच. वृक्षवेलींची आबाळ त्यांच्या कविमनाला माणसांच्या आबाळाएवढेच दु:ख देऊन जायची. निसर्गाच्या या डोळस भक्ताची पुण्यतिथी साजरी करताना ती केवळ त्याने ‘शांतिनिकेतन’मध्ये निर्माण केलेल्या सौंदर्यसृष्टीच्या स्मरणानं न करता तिथे प्रत्यक्ष कृतीची जोड दिली जावी, या जाणिवेतून ‘बाइशे श्राबण’ या दिवशी वृक्षारोपण होतं! तर, ‘जीवनातील प्रत्येक कृतीला सुंदरतेने नटवावे…’ या गुरुदेवांच्या भूमिकेतून प्रेरणा घेऊन कोवळ्या रोपट्याला समारंभपूर्वक शुभेच्छा देण्याचा असा हा ‘बालतरूच्या पालखी’चा सोहळा. तो आनंदवनात साजरा होतो. ही कल्पना ऐकूनच गदिमांनी आजारी असतानाही उत्स्फूर्तपणे ‘कोवळ्या रोपट्या आज तू पाहुणा’ हे सुंदर स्वागतगीत लागलीच रचून पाठवलं! गाण्याला चाल बसवली पुलंनी, तर गायलं माधुरी पुरंदरे यांनी! विकासभाऊंकडे असा बराच काय काय ऐवज असतो.

त्यांचा प्रवाह मध्यंतरी जरा दुर्दैवाने खंडित झाला. एका भयंकर पेचात मी पडलो. आनंदवनासंदर्भात काही टीकात्मक वृत्तांत छापायचे की नाहीत हा तो पेच. तराजूच्या एका तागडीत समस्त आमटे परिवार, त्यांचा स्नेह आणि दुसऱ्या तागडीत व्यावसायिक कर्तव्य. वृत्तांत छापला तर वादग्रस्त होणार याची खात्री होती. एव्हाना ‘आनंदवना’चं रूपांतर आधुनिक तीर्थस्थळांत झालेलं होतं. त्यामुळे या तीर्थस्थळीचे यात्रिक आपल्यावर खूप चिडणार याचाही अंदाज होता. काय करावं हे कळेना? निर्णयाचा तराजू बराच काळ तसाच स्तब्ध.

पण गोविंदरावांचा ‘बाबा महाराज’ आठवला आणि व्यावसायिक कर्तव्य निर्णायक ठरलं. ‘लोकसत्ता’नं तो वृत्तांत दिला. मनातून वाईट वाटत होतं. पण इलाज नसतो कधी कधी. अपेक्षेप्रमाणे वादळ उठलं. या असल्या वादळांचा माझ्यावर ढिम्म परिणाम होत नाही. अण्णा हजारेंवर टीका केली होती तेव्हा जितका ट्रोल झालो नसेन तितकं ट्रोलिंग या बातम्यांमुळे झालं असेल. पण समाजमाध्यमांत मी (सुदैवाने) कुठेच नसल्यानं ही चिखलफेक माझ्यापर्यंत येतच नाही कधी. सहकारी सांगतात कधीकधी. तेवढंच. पण यात खरी दुर्दैवी घटना म्हणजे नंतर शीतलचा मृत्यू. तो जास्त वेदनादायी होता. काही महाभागांनी तर थेट मला आणि अर्थातच ‘लोकसत्ता’ला तिच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवलं.

पण या प्रकरणात राहून राहून वाईट वाटत गेलं ते विकासभाऊ-भारतीताई, कौस्तुभ यांचं. विकासभाऊंची शीतल फारच लाडकी होती. म्हणजे अनेकदा शांत, विचारी कौस्तुभपेक्षा त्यांनी शीतलची बाजू उचलून धरली असेल. त्यामुळे तिचा मृत्यू हा त्या उभयतांसाठी किती हृदयद्रावक असेल याची कल्पनाही करता येत नव्हती. त्या काळात सगळ्यांनाच कमालीचा त्रास झाला. प्रकाशभाऊंशी कधीमधी बोलणं व्हायचं. पण अगदीच जुजबी. त्यांची दोन्ही मुलं अनिकेत, दिगंत हेही जवळचे. हा काळ सरता सरेना. सगळेच अस्वस्थ.

ही अस्वस्थतेची कोंडी अखेर फोडली ती विकासभाऊंनीच. कौस्तुभ भेटला, पल्लवी भेटली. कौस्तुभकडे विकासभाऊंनी एक पत्र दिलं होतं माझ्यासाठी. ते वाचताना सगळेच काही क्षण हळवे झालो. लक्षात येतं काळ हे बऱ्याच जखमांवरचं मलम असतं.

आता सगळं छान आहे. गुरुदेवांच्या ‘बाइशे श्राबण’प्रमाणे आनंदवनातला स्नेहाळ ‘विकास’ वसंत पुन्हा बहरतोय.