मीजसजसा जाणता आणि मोठा होत गेलो, तसतशी मला तिच्यातली सुप्त वेडीबागडी आणि भाबडी छोटी मुलगी प्रकर्षांनं दिसत-भासत राहिली. तिच्या निरागस मनोभावांची आणि त्यातल्या सुख-दु:खाची कहाणी सांगायची म्हटलं तर एक वेधक लघुकादंबरी आकार घेईल. ते जेव्हा व्हायचं तेव्हा होईल, पण आज तिच्या माझ्यावरच्या एका अनमोल ऋणाची छोटीशी गोष्ट सांगावी, असा मानस आहे. आपल्या सर्वात अधिक जवळच्या व्यक्तींसंदर्भात आपण फार बेफिकीर आणि अन्यायकारक वागत असतो. हे आपण हेतूपुरस्सर करतो किंवा त्यामागे त्या व्यक्तीविषयी आपण कृतघ्न असतो, असं मुळीच नाही. कदाचित त्या व्यक्तींचं आपल्या सर्वाधिक जवळ असणं हेच यामागचं मूळ कारण असू शकतं, हे योग्य नाही, हेही कळत असतं; पण तरीही कळतं, पण वळत नाही या चिरंतन वास्तव्याचीच प्रचीती पुन:पुन्हा येत राहते. तर अशा या अन्यायाला बळी पडणाऱ्या आपल्या जिवलग व्यक्तींमध्ये सर्वात जवळची व्यक्ती म्हणजे आपली आई.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी मातृमुखी (आणि म्हणून सदासुखी) आहे, असं मी ऐकून होतो. पण गेल्या काही वर्षांतली माझी छायाचित्रं पाहताना या म्हणण्यात नक्की तथ्य आहे, असं मलाही वाटू लागलं आहे. विशेषत: पापण्यांवर ओथंबू पाहणारी मऊ कातडी असलेले आणि त्यामुळे चिनीमकाव वाटणारे डोळे आणि टोकाशी फुगीर असलेल्या नाकाच्या अग्रावरची प्रशस्त टेबललँड या खुणा ही खास आईची रूपवैशिष्टय़ं माझं मातृमुखीपण सिद्ध करायला पुरेशी आहेत. मात्र, हे साम्य बाहय़ांगापुरतंच म्हणावं लागेल. आईचं विलक्षण सहृदय अंत:करण पुरतेपणी आलंय ते दादाकडे. गंमत म्हणजे वडिलांची रेखीव रूपमुद्रा त्यानं घेतली आहे आणि त्यांच्यामधली आतली परखड विश्लेषणात्मक वृत्ती माझ्यात पुरेपूर उतरलेली दिसते. आई-वडिलांच्या रूपगुणांचा खराखुरा सुवर्णमध्य मानावा असा समन्वय उतरला आहे, तो आमच्या हेमाताईमध्ये. ही एकूण वाटणी मला नेहमीच फार रसमय वाटते. आमच्या आईबद्दल आजवर वेळोवेळी निमित्तानिमित्तानं आमच्या कुटुंबापुरतं खूप बोलणं होत आलं आहे. पण तरीही तिच्याबद्दल समग्रपणे असा विचार करण्याची निदान माझी तरी ही पहिलीच वेळ म्हणावी लागेल. नाही म्हणायला सहा-सात वर्षांपूर्वी एका मुलाखतीनिमित्तानं मी आईविषयी त्यामानानं बराच सविस्तर असा प्रथमच बोललो होतो. त्यानंतर अगदी नुकतंच प्रमोदिनी वडके-कवळेंनी माझ्या आईसंबंधी काही विचारताना, यापूर्वी कुणीही न विचारलेला प्रश्न विचारला होता. तुमच्या कलावंत म्हणून झालेल्या घडणीत तुमच्या आईचा काय सहभाग आहे? क्षणभर या प्रश्नानं मी बऱ्यापैकी गोंधळलो होतो. कारण तोपर्यंत मी हा विचारच कधी केला नव्हता. त्यामुळे असं काही नेमकं सांगता येण्याजोगं नाही बुवा, असं उत्तर द्यायच्या मी बेतात होतो. तेवढय़ात माझ्या मस्तकात लख्ख प्रकाश पडला आणि मी म्हणालो, माझं सांगीतिक व्यक्तित्व आणि मुख्य म्हणजे माझं गाणं जोपासलं जाण्याचं श्रेय सर्वार्थानं केवळ आईलाच द्यायला हवं. काय मौज आहे पहा. आई जिवंत असताना तर नाहीच, पण ती गेल्यावरदेखील तब्बल पंधरा वर्षांनी हा साक्षात्कार माझ्या मुखावाटे प्रकट झाला होता. मी आरंभी मांडलेल्या वस्तुस्थितीच्या कबुलीची ही एक प्रचीतीच ठरू शकेल. आमच्या कीर्तनकार वडिलांचं सर्वागसुंदर कलावंतपण आणि त्यांचे आम्हा तिघाही भावंडांवर झालेले संस्कार ही इतकी प्रभावी आणि सर्वमान्य गोष्ट होती, की त्यापलीकडे त्या वारशाचा काही अंश आईमधूनही आपल्याकडे आला असेल ही शक्यताही मनानं त्यापूर्वी कधीही अनुभवली नव्हती आणि म्हणून स्वीकारलीही नव्हती आणि तरीही त्या क्षणी एका क्षणात ते उत्तर स्वत:लाही नकळत माझ्या ओठावाटे बाहेर पडलं. कारण ते निखालस सत्य होतं, नव्हे आहेच.

More Stories onकवी
मराठीतील सर्व कविता - सखी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story of one girl
First published on: 31-03-2013 at 12:08 IST