भावगीतांच्या आजवरच्या प्रवासात अनेक रत्नं, माणके, हिरे, मोती शोधक नजरेला सापडतात. हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी गाणी करूनही काम म्हणून ठोस आहेत, त्यात सांगीतिक समतोल दिसतो आणि भावगीत पुढे नेण्याचा विचारही जाणवतो, अशी असंख्य नावे भावगीतांच्या दुनियेत गीतकार, संगीतकार व गायकांच्या रूपात आपल्याला भेटतात. ध्वनिमुद्रिका संग्राहकांचे काम याकामी उपयोगी ठरते. श्रवणभक्ती करताना रेकॉर्डवर ‘पिन’ ठेवली आणि दोन वेगळी नावे मनात प्रकाशमान झाली. एक म्हणजे गायक-संगीतकार व्ही. डी. अंभईकर आणि दुसरे गायिका विमल वाकडे-जोशी. या जोडीची दोन सुप्रसिद्ध गाणी.. ‘अबोल झाली सतार’ व दुसरे ‘बोलावितो नंदलाल..’ ‘अबोल झाली सतार’ हे गीत ग. दि. माडगूळकरांचे, तर ‘बोलावितो नंदलाल’ हे शशिकला आळंदकर यांचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विनायक देवराव अंभईकर यांचा जन्म विदर्भात बुलढाणा जिल्ह्यतील मेहेकर या गावी पैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या मंदिरातल्या घरात झाला. १९१२ सालचा तो गुढी पाडवा होता. अंभईकरांच्या लहानपणापासून पुढची ९० वर्षे त्यांचे सांगीतिक योगदान थक्क करणारे आहे. त्यांनी असंख्य भावगीते संगीतबद्ध केली, शास्त्रीय गायनाच्या मैफली केल्या, तसेच ‘वंदे मातरम्’ या गीताला त्यांनी  निरनिराळ्या चाली दिल्या. त्यातली मिश्र खंबावती रागातील चाल सवरेत्कृष्ट ठरली. गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांच्या स्वरात ही ध्वनिमुद्रिका निघाली. या गीतासाठी अंभईकरांनी घेतलेला ध्यास पाहता त्याकाळी त्यांना ‘वंदे मातरम् अंभईकर’ असे नावही पडले होते.

सुरेल गायिका विमल वाकडे यांनी गायलेले ‘अबोल झाली सतार’ हे त्यांचे भावगीत विशेष गाजले.

‘अबोल झाली सतार

नकळत माझ्या चरणाघाते तुटे ताणली तार।

यौवनातल्या मादक नजरा

आता कोठल्या कसल्या तारा

कुठे गाणे? आता गीते कंठातच विरणार

झाली अबोल सतार, अबोल झाली सतार।’

संस्कारित गाणे असलेले संगीतकार आणि शास्त्रीय गायनाचा भक्कम पाया असलेली गायिका यामुळे या भावगीताने वेगळीच उंची गाठली. गीताच्या मुखडय़ामध्येच छोटय़ा तानांची बरसात आहे. ‘तार’ हा शब्दसुद्धा ‘तान’ घेऊनच येतो. तारसप्तकात सुरू झालेला अंतरा व आलाप- तानांची पेरणी या गीताची रंगत वाढवते. गीत संपताना एका शब्दाची जागा बदलून ‘झाली अबोल सतार’ व त्यानंतरची द्रुत लय उत्तम परिणाम साधते. हे यश संगीतकाराचे, गायिकेचे व गीतकार गदिमांचे आहे. सोपी व अर्थपूर्ण शब्दरचना, उत्तम आशय यामुळे हे काव्य उत्तम दर्जाचे झाले आहे. दुसरे गीत याच संगीतकार-गायिका जोडीचे आहे..

‘बोलावितो नंदलाल, राधिके,

बोलावितो नंदलाल।

उपवनी जमल्या गोपगोपिका

नाही दिसली तुझी राधिका

बावरला का तुझा सावळा

मनमोहन गोपाल राधिके

बोलावितो नंदलाल राधिके

बोलावितो नंदलाल।’

आरंभी  बासरीचा पीस व त्यानंतर ‘बोलावितो’ या शब्दातील आर्जव या गाण्यातील भाव पुढे नेतो. अंतरा पूर्ण होताना बोल-ताना, बोल-आलाप या ढंगाचे गायन आहे. गायिकेने स्वररचनेला उत्तम न्याय दिला आहे.

गायक-संगीतकार अंभईकरांचे आणखी एक भावगीत लोकप्रिय झाले. ग. दि. माडगूळकरांचे शब्द होते..

‘पत्र देऊनी एक कबुतर, पाठविले मी तुला

शिकार समजून तूच तयाला, बाण कसा मारीला।

पत्र मिळाले, तुटले अंतर

तुझे नि माझे जुळले अंतर

होय, परि ते कुठे कबुतर?

तुझ्या प्रीतिचा योग तयाने

येथवरीं घडविला, बाण कसा मारीला।’

स्वातंत्र्यलढय़ातील सहभागापासून ते शास्त्रीय व भावसंगीतापर्यंत इतका अंभईकरांच्या कार्याचा आवाका होता. ‘वंदे मातरम्’ हे गीत त्यांनी सर्वप्रथम १९२६ साली महात्मा गांधींना ऐकवलं.. तेही अंभईकरांचं शालेय जीवन सुरू असताना. महात्मा गांधींनी त्यांना जवळ घेतलं, शाल गुंडाळली आणि त्यांना भरभरून आशीर्वाद दिले. अंभईकरांच्या आयुष्यातील एकेक घटना विलक्षण आहेत.

मातोश्रीकडून आलेली गाण्याची आवड, वयाच्या १७ व्या वर्षी मिळालेली ‘संगीत सुधाकर’ ही पदवी, वयाच्या १९ व्या वर्षी रेडिओवरील पहिला कार्यक्रम, १९३३ साली मुंबईच्या संगीत परिषदेतला कार्यक्रम, १९३४ साली कोलंबिया कंपनीने काढलेली अंभईकरांची पहिली ग्रामोफोन रेकॉर्ड, गायनासाठी मिळालेले डॉ. राजेंद्रप्रसाद यांचे प्रशंसापत्र, जे. कृष्णमूर्ती यांनी अंभईकरांना दिलेली ‘राष्ट्रीय गायक’ ही पदवी, जागतिक कीर्तीच्या कलावंतांचे त्यांनी केलेले ध्वनिमुद्रण, मुंबई आकाशवाणीवरचे म्युझिक प्रोडय़ुसर-कम्पोझर हे पद, बालगंधर्वाचे केलेले ध्वनिमुद्रण, १९६१ ते १९८२ या २० वर्षांतला अंभईकरांचा विजनवास, विद्याधर गोखले यांच्या पुढाकारामुळे प्रकाशित झालेले आत्मकथन.. ही त्यांची वाटचाल कळल्यावर आपण थक्कच होतो. ‘गो बॅक सायमन’ या चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. ‘कलावंत आणि सामाजिक बांधिलकीची उत्कट जाणीव असलेले देशसेवक..’ असे कविवर्य कुसुमाग्रजांनी त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले होते.

गायिका विमल काकडे यांनी संगीत अलंकारच्या वर्गात असताना त्या काळात ‘खजांची’ चित्रपटगीत स्पर्धेत भाग घेतला व त्यात दुसरा क्रमांक मिळवला. आवर्जून सांगावी अशी गोष्ट म्हणजे त्यांना उत्तम गुरू लाभले. विनायकराव पटवर्धन, डी. व्ही. पलुस्कर, एन. आर. मारुलकर, केशवराव भोळे, जगन्नाथबुवा पुरोहित अशा पट्टीच्या संगीतज्ञांकडे त्यांनी गायनाचे शिक्षण घेतले. ग्वाल्हेर, जयपूर, आग्रा, किराणा या सर्व घराण्यांचे गाणे त्या शिकल्या. ‘अबोल झाली सतार’ या तुफान लोकप्रिय झालेल्या भावगीतामुळे विमल वाकडे हे नाव घरोघरी पोहोचले. त्यांच्या आत्मकथनपर पुस्तकाचे नावही ‘अबोल झाली सतार’ हेच आहे. गायिका विमल वाकडे लिहितात.. ‘‘अबोल झाली सतार’ ही व्ही. डी. अंभईकरांची उत्तम चाल आहे. हसतमुख, शेलाटा बांधा असलेले अंभईकर हे उत्साहमूर्ती होते. पुणे आकाशवाणीवर हे सुप्रसिद्ध गीत बऱ्याच वेळा ऐकवीत असत. एका नॅशनल प्रोग्रॅममध्ये हे गीत सादर करून मला मान्यवरांची दाद मिळाली. माझी इतर भावगीतेसुद्धा लोकप्रिय झाली. ‘घरोघरी ज्योती उजळल्या’, ‘दोघांची दुनिया’, ‘थांब जरासा मनरमणा’, ‘ओळख ती पहिली..’ ही ती भावगीते. पुण्यातील हिराबागेतील भव्य कार्यक्रमात ‘जोगकंस’ गायले तरीही रसिकांनी ‘अबोल झाली..’ या गीताची मागणी केलीच. ‘कारस्थान’, ‘कुबेर’, ‘मेरी अमानत’ या चित्रपटांसाठी मी गायले; पण ते वातावरण मला मानवले नाही. माझ्या मैफलीतल्या गाण्याला पं. रविशंकर, बालगंधर्व, ज्योत्स्ना भोळे यांची दाद मिळाली. आचार्य अत्रे, ना. सी. फडके, विद्याधर पुंडलिक माझ्या गायन कार्यक्रमाला आवर्जून येत असत.’

गायक-संगीतकार विनायक देवराव अंभईकर यांच्या भावगीतांमध्ये ग. के. दातार, माडगूळकर, स. अ. शुक्ल, म. कृ. पारधी या कवींची गीते विशेष गाजली. ‘वनांत फुलल्या इवल्या कलिका’, ‘कशी संपली रात कळेना’, ‘लावियले नंदादीपा’, ‘ही तिरंदाजीची कला’, ‘अंतरी उमळून येती’, ‘माझ्या छकुलीचे डोळे’, ‘कवि कोकिळ प्रेमातुर’, ‘रामचंद्र मनमोहन’, ‘अंगणी खेळतात बाळे’ ही सर्व भावगीते रसिकांना आवडली. माणिक वर्मा, मालती पांडे, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, सुधा मल्होत्रा, कृष्णा कल्ले, निर्मला गोगटे, उत्तरा केळकर, शोभा जोशी या गायिकांनी अंभईकरांकडे भावगीते गायली.

वि. दे. अंभईकरांचे पुत्र गिरीश अंभईकर यांनी अत्यंत प्रेमाने बाबांच्या आठवणी सांगितल्या. गिरीश हे गुरुवर्य पंढरीनाथ नागेशकरांकडे तबलावादन शिकले. गायिका विमल वाकडे यांच्या कन्या ईशा गाडगीळ  व जावई धनंजय गाडगीळ यांनी ठाण्यातील त्यांच्या घरी पंधरा ते वीस वर्षे.. अगदी गेल्या वर्षीपर्यंत आईची मनापासून सेवा केली.

एखादा पुराणपुरुष आपण पाहतो आहोत असे व्ही. डीं.चे  व्यक्तिमत्त्व होते, असे ज्येष्ठ मंडळी सांगतात. अंभईकर सांगत.. ‘आजचे गाणे यांत्रिक युगात बंदिस्त झाले आहे. वेळेचं बंधन आल्यामुळे संगीताची ‘राईस प्लेट’ झाली आहे. थोडं इकडचं..थोडं तिकडचं!  लहानपणी बाहेर गायला परवानगी नसे. त्यामुळे अंभईकर घरातल्या भिंतीकडे तोंड करून गात असत. असे म्हणता येईल- आपल्या गायनामुळे अंभईकरांनी केवळ श्रोत्यांचेच नाही, तर घरातल्या भिंतीचेसुद्धा ‘कान’ तयार केले.

विनायक जोशी vinayakpjoshi@yahoo.com

मराठीतील सर्व स्वरभावयात्रा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: G d madgulkar marathi songs marathi article marathi bhavgeet
First published on: 30-04-2017 at 02:06 IST