आठवणी म्हणजे मन रमवण्याची जागा. आठवणींना ओघ असतो. अनेक घटना, प्रसंगांचं ते बहरलेलं झाड असतं. कधी या झाडावरचं फूल खुडायला मिळतं, तर कधी पायतळीचा पाचोळा दिसतो. काटे टोचल्याविना फूल मिळण्यात मजा नाही. सुख आणि दु:ख हे आठवणींच्या ताळेबंदातले अपरिहार्य घटक आहेत. ढग दाटून यावेत तशा आठवणी दाटून येतात. काही गोष्टी  लवकरात लवकर विसर पडावा अशा असतात. तर काही आठवणींवर पुढचं आयुष्य सुखात जातं. कधी दु:खात सुख, तर कधी सुखाला दु:खाची किनार असते. कधी कधी आठवणींच्या दालनात ‘स्वप्न’ या मनाच्या आवडत्या खेळालाही स्थान असते. तशात हे स्वप्न जर पहाटेचे असेल तर त्याची आठवण अधिक काळ मनात रेंगाळत राहते. ‘आठवणींवर जगतोय..’ असे म्हणणारे जसे भेटतात, तसेच ‘नको त्या आठवणी..’ असे म्हणणारेही आपल्याला भेटतात. एखादे भावगीत ऐकताना आपल्या मनात त्याच्याशी संबंधित आठवणींनी ‘लेहरा’ धरलेला असतो. रेकॉर्डवरील गाणे थांबले तरी शब्द आणि सूर मनात रेंगाळत राहतात. त्या गीतातील भावना ही आपल्या मनातलीच आहे असे ऐकणाऱ्याला वाटत राहते. या गीतामधील नायक वा नायिका आपणच आहोत असे वाटते. आणि मग मन अलगद आठवणींच्या त्या रम्य प्रदेशात जाते. कधी ‘गुंतता हृदय हे..’, तर कधी ‘धुक्यात हरवली वाट..’ असा चकवाचकवीचा खेळ सुरू होतो. शब्द, सूर, लयीमुळे हा खेळ रंगत जातो. अतिशय लोकप्रिय अशा एका भावगीतामुळे हे सारे विचार मनात आले. गायिका सुमती टिकेकर, गीतकार योगेश्वर अभ्यंकर आणि संगीतकार एम. जी. गोखले या त्रयीचे हे गीत.. ‘आठवणी दाटतात..’

गायिका सुमती टिकेकर यांनी ध्वनिमुद्रिकेसाठी मोजकीच भावगीते गायली. त्यांतल्या या गीताने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. आद्य भावगीतगायक जी. एन. जोशी यांना त्यांचा आवाज खूप आवडला. म्हणूनच सुमती टिकेकर या गायिकेच्या आवाजात हे गीत श्रोत्यांसमोर आले. शब्द, सूर, चाल या तिन्हीने श्रोत्यांची मने जिंकली. पुढे काही वर्षांनी म्युझिक कंपनीने हे गीत ‘बेस्ट ऑफ मिलेनियम’मध्ये घेतले आणि पुन्हा श्रोत्यांसाठी उपलब्ध केले.

‘आठवणी दाटतात,

धुके जसे पसरावे

जे घडले ते सगळे

सांग कसे विसरावे।

विसरावे नाव गाव

आणि तुझे हावभाव

नेक भाव नजरेतील

हृदयाला उमजावे।

रात्र अशी अंधारी

उरलेली संसारी

सोबतीस पहाटेस

विरहाचे स्वप्न हवे।

स्वप्नातील जादू अशी

मज गमते अविनाशी

प्रेम तुझे सत्य गमे

त्यास कसे विसरावे।’

‘चंद्रकंस’ रागातील स्वर या गीतामध्ये प्रामुख्याने आढळतात. या गाण्यात नायक वा नायिका आपल्याशी गाण्यातून संवाद करते आहे. वाद्यमेळासह हा संवाद सुरेल झाला आहे. छोटे म्युझिक पीसेस आणि वाद्यमेळात बासरीचा उत्तमरीत्या केलेला वापर आढळून येतो. प्रत्येक अंतऱ्यातील तिसरी ओळ वरच्या सप्तकापर्यंत जाते.

आठवणी म्हणजे पसरलेले धुके ही कल्पनाच भन्नाट आहे. त्या धुक्यामध्ये आपण प्रवेश करतो. कारण आठवणींमध्ये रमण्याचा आपला स्वभाव असतो. त्यातून आपण स्वत:ला बाहेर येऊ देत नाही. या गाण्यातले शब्द साधे, सोपे आहेत; पण ते आपल्या मनातले आहेत. म्हणूनच हे गीत आपल्याला जवळचे आहे. या गाण्यातला गायिका सुमती टिकेकर यांचा सुरेल व धारदार आवाज चित्तवेधक ठरतो. गीतकार योगेश्वर अभ्यंकर यांच्या शब्दांतील मोहक कल्पना लक्षवेधी आहेत. संगीतकार एम. जी. गोखले यांनी शब्दांतील भावना ओळखली आणि सर्वाना गाता येईल अशी या गीताची चाल त्यांनी तयार केली.

बाळासाहेब टिकेकर (सध्या वय वर्षे ८९) आणि कन्या गायिका उषा देशपांडे यांनी सुमती टिकेकर यांच्या आठवणी मनमोकळेपणाने सांगितल्या. उषा देशपांडे यांनी पंचवीस वर्षे पं. फिरोज दस्तूर यांच्याकडे किराणा घराणा गायकीचे शिक्षण घेतले. सुमतीबाईंच्या आठवणी बाळासाहेबांच्या संगीत योगदानासह आपसूक येतात. त्यांच्या सहजीवनातले एकत्रितपणे केलेले कलाविष्कार महत्त्वाचे ठरतात.

मुंबईत गावदेवी परिसरात गोकुळदास देवजी वाडी येथे संगीतकार एम. जी. गोखले राहत होते. गायक- संगीतकार जी. एन. जोशी यांना सुमती टिकेकर यांचा आवाज आवडला. म्युझिक कंपनीसाठी त्यांच्या आवाजात भावगीते गाऊन घ्यायची असे त्यांनी ठरवले होते. त्यावेळी जी. एन. जोशी कंपनीत अधिकारी पदावर होते. गोखले मास्तरांकडे शोभा गुर्टू, निर्मला गोगटे या गायनशिक्षणासाठी येत असत. गोखले मास्तरांनी अनेक चाली केल्या. पैकी ‘आठवणी दाटतात’ आणि ‘श्रीरामाचे दर्शन घडले’ ही त्यांची दोन गीते अफाट लोकप्रिय झाली. कृष्णराव चोणकर आणि बाळासाहेब टिकेकर यांनी सुमतीबाईंना बालगंधर्वाची गायकी शिकवली. १९६९ साली अखिल महाराष्ट्र बालगंधर्व नाटय़गीत स्पर्धेत गायिका सुमती टिकेकर या प्रथम पारितोषिकाच्या मानकरी ठरल्या. या स्पर्धेत हार्मोनियम साथ बाळासाहेबांनी, तर तबलासाथ अण्णासाहेब थत्ते यांनी केली होती. विल्सन कॉलेजमधल्या काळात सुमतीबाई भावगीते गात असत. त्या काळातील त्यांचे वास्तव्य गिरगावात खत्रे चाळीत होते. सुमतीबाईंचे मूळ गाव कोकणातील आरवली. आरवलीच्या लघाटेंची ही कन्या. कोकणातून बहुसंख्य मंडळी मुंबईत आली ती प्रथम गिरगावात स्थिरावली. श्रीधर भालचंद्र कंपनी आणि हिंद विजय स्टोअर्स ही त्यांच्या वडिलांची दुकाने होती. या परिसरातच बाळासाहेब टिकेकरांशी संगीताच्या माध्यमातून त्यांची भेट झाली आणि १९५५ साली दोघे विवाहबद्ध झाले. विवाहानंतर बाळासाहेबांकडून गाणे शिकणे झाले. त्याचबरोबर सुमतीबाईंनी गावदेवीच्या गोखले संगीत विद्यालयात एन. के. दातारांकडे शास्त्रीय गायनाचे धडेही घेतले आणि त्या संगीत विशारद झाल्या. १९६४-६५ या काळात गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांच्या शिष्या कमल तांबे या दादर येथे राहत असत. त्यांच्याकडे जाऊन सुमतीबाईंनी जयपूर गायकीचे शिक्षण घेतले.

बाळासाहेब टिकेकर लहान असल्यापासूनच कीर्तनकार बुवांकडे तबलासाथ करीत असत. त्याकाळी त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी कराची येथून सात रुपयांत तबला खरेदी करून आणला होता. मुलाचा संगीत या विषयाकडे असलेला कल पाहून त्यांनी घरात व्हायोलिन, पेटी, सतार, दिलरुबा अशी सर्व वाद्ये आणली. बाळासाहेबांना वयाच्या नवव्या वर्षी सातारा येथील क्रांतिसिंह नानासाहेब पाटील यांच्याकडून पार्कर पेन बक्षीस मिळाले. या अशा संगीतातील व्यक्तीशीच सुमतीबाईंचा विवाह झाला. त्यानंतर दोघांनी एकत्र अनेक मंचीय संगीत कार्यक्रम सादर केले. सुमतीबाईंना त्याकाळी गणेशोत्सवात नऊ ते दहा कार्यक्रम असायचे. संपूर्ण महाराष्ट्र आणि बडोदा, इंदूर, अहमदाबाद येथेही त्यांनी मैफली सादर केल्या. तत्कालिन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या घरची त्यांची गायन मैफल विशेष गाजली. स्वरराज छोटा गंधर्व यांनी त्यांच्या गावाकडील प्रयोगात सुमतीबाईंना सुभद्रेची भूमिका करण्याचे आमंत्रण दिले. ‘धाडिला राम तिने का वनी’ या नाटकाच्या गोवा दौऱ्यातील नऊ प्रयोगांत सुमतीबाईंनी ही भूमिका केली. या भूमिकेसाठी सुमतीबाईंना ‘रसरंग’ अ‍ॅवार्ड मिळाले.

‘संगीत भर्तृहरीयम’ या संस्कृत नाटकात सुमतीबाई व बाळासाहेब हे नटी-सूत्रधार होते. या नाटकातील आठही पदांच्या चाली बाळासाहेबांनी केल्या होत्या. या नाटकातील एक वेगळे असे पद विशेष गाजले..

‘सिद्धा शाखा लवण मरिच स्नेहयुक्ता प्रभुता

तेवा पूपा मधुमधुरिता शश्कुलिनाम्च राशी:’

संस्कृतपंडित, गणितज्ञ व तबलावादक एस. बी. ऊर्फ दादा वेलणकर यांनी लिहिलेल्या ‘मेघदूतोत्तरम्’ या नाटकात टिकेकर दाम्पत्याने यक्ष व यक्षपत्नी या भूमिका केल्या. विनायकराव सरस्वतेलिखित ‘संगीत वरदान’ या नाटकातील दोन पदे सुमतीबाईंच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाली. ‘अनामिक नाद उठे गगनी’ आणि ‘विमल सुर सरी’ ही ती दोन पदे. ही पदे गदिमांनी लिहिली आणि गायक वसंतराव देशपांडे यांनी स्वरबद्ध केली. सुमतीबाईंनी या नाटकात वसंतरावांसह भूमिकाही केली.

संगीतकार एम. जी. गोखले, गीतकार योगेश्वर अभ्यंकर आणि गायिका सुमती टिकेकर या त्रयीचे आणखीही एक भावगीत कमालीचे लोकप्रिय झाले..

‘श्रीरामाचे दर्शन घडले,

पाषाणातुनी शब्द उमटले।

अपराधाची जाणीव नसता,

घडले काही दीनानाथा

गुन्हेगार मी, गौतम वदता,

अपराधाने लज्जित झाले।

अपराधाचे शासन म्हणूनी,

भूवरी पडले शिळा होऊनी

आज संपली करुण कहाणी,

पदस्पर्शाने पावन झाले।

पतिताना तू करिसी पावन,

जन वदती तुज पतितपावन

सरले माझे देवा मीपण,

तुझ्या कृपेने जीवन तरले।’

रामकथेतील अहिल्येची कहाणी या गीतामध्ये उतरली आहे. हे गीत संगीतकाराने ‘बसंत’ या रागात बांधले आहे, हे सांगताना बाळासाहेब टिकेकरांनी या रागातील ‘नाबिके दरबार, सब मिल गाओ बसंत की मुबारक’ ही पारंपरिक बंदिश गाऊन दाखवली. सुमतीबाईंच्या गायनाबद्दल कन्या उषाताई व पती बाळासाहेब प्रेमाने भरभरून बोलले. टिकेकरांचं घर हे कलावंतांचं घर आहे. सुपुत्र उदय टिकेकर अभिनेते आहेत आणि स्नुषा आरती अंकलीकर-टिकेकर या विख्यात गायिका आहेत.

भावगीताच्या निमित्ताने ‘आठवणी दाटतात’ हे खरेच आहे.

विनायक जोशी vinayakpjoshi@yahoo.com