१९४५ च्या आधी साहिर यांनी ‘ताजमहल’ ही कविता लिहिली. एक अभूतपूर्व रचना म्हणून ती उर्दूशिवाय इतर भाषांमधील रसिकांमध्येही लोकप्रिय आहे. मला वेगळाच प्रश्न पडतो. पुढे अनेक वर्षांनी ‘ताजमहल’ नावाचा सिनेमा निघाला. ‘पाँव छू लेने तो दो फुलों की’, ‘चांदी का बदन सोने की नजर’, ‘जो वादा किया वो निभाना पडेगा’ अशी या ‘ताजमहल’साठी सगळी गाणी लिहिताना साहिरना आपली कविता आठवली असेल का? की लेखन वेगळे आणि व्यवहार वेगळा अशी त्यांची भूमिका होती? पेच मोठा आहे; पण वाटले तर सोपाही करता येतो.
एखाद्या कवितेचं स्थान एकूण क्षेत्रामध्ये वेगळं आणि वैशिष्टय़पूर्ण असतं. काही कविता सौंदर्यमूल्य घेऊन डौलाने उभ्या असतात. काही कवितांना देशाच्या स्वातंत्र्यलढय़ामध्ये प्रेरणादायी भूमिका साकार केल्याबद्दल मानाचे, श्रद्धेच्या पातळीवरील स्थान मिळते. एखादी कविता महामानवाच्या लेखणीतून जिवंत झाल्यामुळे तिला ऐतिहासिक असे वलय लाभते. एखादी कविता कवितेच्या प्रवाहालाच वेगळे वळण लावणारी म्हणून तिला मैलाचा दगड असे म्हटले जाते. अशा कविता काळावर मात करून ठाम उभ्या असतात आणि म्हणून कोणत्याही कालखंडामध्ये त्या समकालीन असतात. काही कविता पारंपरिक विचारव्यूहाला छेदतात, तर काही कविता रीतिभातींचा पुनर्विचार करायला भाग पाडतात.
काही कवितांमधल्या ओळी पुन:पुन्हा आपल्याला विविध पठडीतील वक्त्यांच्या तोंडून आणि गंभीरपणे एखाद्या मुद्दय़ाची मांडणी करणाऱ्या विचारवंताच्या लेखात उद्धृत केलेल्या आढळतात. वैज्ञानिक, जागतिक पातळीवरचे नेते, समाजशास्त्रज्ञ, वक्ते, लोकसभेत अर्थसंकल्प सादर करणारे मंत्री, अध्यात्मावर बोलणारे प्रवचनकार, प्रेमपत्रे लिहिणाऱ्या तरुण आणि वृद्ध व्यक्ती या सर्वाना कवितेचे इतके आणि एवढे आकर्षण का वाटावे? याचे कारण कवितेच्या अल्पाक्षर रमणीयतेमध्ये, तिच्या सूत्रसदृश रचनाबंधामध्ये आणि सौंदर्यपूर्ण अर्थवलये विस्तारणाऱ्या लवचीक आणि प्रसरणशील केंद्रबिंदूमध्ये आहे.
विश्वाचा आकार केवढा
ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा
या केशवसुतांच्या साध्या ओळी. ओळीअखेरचे यमक सोडले तर त्यात आणखी एखादा काव्यघटक सापडत नाही. पण या ओळी अनेक प्रसंगी उपयोगी पडतात. टोमणा म्हणून एखाद्याच्या टाळक्यात हाणता येतात, संकुचित वा मर्यादित कुवत असलेल्या मानसिक ठेवणीचे वर्णन करण्यासाठीही वापरता येतात.
कुसुमाग्रजांची ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ ही कविता तर कोणाही ध्येयासक्त स्त्री-पुरुषांसाठी प्रेरणास्रोतच आहे. बालकवींची ‘औदुंबर’ तर मोनालिसाच्या स्मितासारखी वर्षांनुवर्षांपासून रसिकांना आणि अभ्यासकांना गूढ खुणा करीत आहे आणि ‘श्रावणमासी हर्ष मानसी,  हिरवे हिरवे गार गालिचे’ या ओळी तर महाराष्ट्राचे वाळवंट झाले तरी ताज्या टवटवीत राहतील. प्रत्यक्षात नसेल तर इथे कवितेत अनुभवा. हे कवितेचे सामथ्र्य. आणि नारायण सुर्वे यांची ‘तेव्हा एक कर,’ ही बायकोला उद्देशून लिहिलेली कविता. असं पूर्वी का कोण्या कवीला (आणि नवऱ्याला) सुचलं नाही. आणि पसायदान. ज्ञानेश्वरीचे १८ (किंवा अठरावा) अध्याय कोणी वाचो न वाचो, पण ‘पसायदान’ हे समग्र मानवी संस्कृतीला मांगल्य आणि कल्याण या दोन हातांनी कुरवाळताना दिसते. पसायदानात विश्वकल्याणाची हाक होती, तर मर्ढेकरांच्या पसायदानसदृश कवितेमध्ये मानवी व्यक्तित्वातील दोषांच्या निवारणासाठी साद घातली आहे.
भंगु दे काठिन्य माझे
आम्ल जाऊ दे मनीचे
येऊ दे वाणीत माझ्या
सूर तुझ्या आवडीचे
मुंग्या, उंदीर, शहामृग यांच्यासोबत काव्यसंसार केलेले मर्ढेकर जेव्हा हासडल्या तुज शिव्या तरीही, तुझ्याच पायी आलो लोळत, असे म्हणतात तेव्हा थेट संतांच्या सुरात सूर मिळवीत आहेत, असे जाणवते.
अशी कवितेची रूपे अनुभवताना ‘ताजमहाल’ या लोभस सौंदर्यशिल्पाविषयी कडवट भाव व्यक्त करणारी साहिर लुधियानवी यांची कविता वाचली तेव्हा आधी धक्का, मग विचारचक्र असा अनुभव आला. ती कविता अशी-
ताज तेरे लिए एक मज़्ाहरे- उल्फत ही सही
तुम को इस वादी-ए-रंगीं से अकीदत ही सही
मेरी महबूब कहीं और मिला कर मुझ से
(हा ताजमहाल तुला प्रेमाचे प्रतीक वाटत असेल, या रमणीय परिसराविषयी तुझ्या मनात श्रद्धाभावही असेल, तरी सखे तू इथे नाही दुसरीकडे कुठे भेटत जा मला)
बज्मेशाही में गरिबों का गुजर क्या मानी?
सब्त जिस राह पे हो सतवते-शाही के निशां
उस पे उल्फत भरी रुहों का सफर क्या मानी?
(सम्राटाच्या मैफलीत गरिबांच्या असण्याला अर्थच काय? ज्या रस्त्यांवर सम्राटांच्या वैभवाची ठळक पदचिन्हे आहेत, त्या रस्त्यांवरून प्रेमी जीवांच्या वाटचालीला अर्थच काय?
मेरी महबूब पैसे- पर्स- ए- तशहीरे- वफा
तूने सतवत के निशानों को तो देखा होता
मुर्दा शाहों के मकाबिर से बहलने वाली
अपने तारीक मकानों को तो देखा होता
(सखे, ही वास्तू म्हणजे स्वत:च्या प्रेमाची जाहिरात आहे. ज्यामागे आहे वैभवाचे उन्मत्त प्रदर्शन, ते तर तू जाणायला हवे. मृत बादशहांच्या थडग्यांना पाहून विस्मित होतेस, तू आपल्या अंधारलेल्या घरांकडेही पाहायला हवेस)
अनगिनत लोगों ने दुनिया में मोहब्बत की है
कौन कहता है की सादिक न थे जज़्बे उनके
लेकिन उनके लिए तशहीर का सामान नही
क्योंकी वो लोग भी अपनी ही तरह मुफलिस थे
(सखे, हजारो लोकांनी प्रेम केलंय या जगात, त्यांचे प्रेमभाव काय प्रामाणिक नव्हते? पण त्यांच्याजवळ नव्हती जाहिरातीची साधने, कारण तेसुद्धा तुझ्या-माझ्यासारखे गरीब, निर्धन होते.)
ये इमारतो मकाबिर, ये फसिले, ये हिसार
मुतलकुल्हुक शहनशाहों की अज़्ामत के सुतूं
दामने-दहर पे उस रंग की गुलकारी है
जिसमें शामिल है तिरे और मिरे अजदाद का खूं
(हे महाल न् स्मृतिस्थळे ही तटबंदी, हे किल्ले म्हणजे बेमुर्वते बादशहाचे मोठेपणाचे स्तंभ आहेत. इथे विश्वाच्या चादरीवर रंगीत कलाकुसर दिसते, तिच्यात तुझ्यामाझ्या पूर्वजांचे रक्त वापरलेले आहे)
मेरी मेहबूब! उन्हे भी तो मोहब्बत होगी
जिनकी सन्नाई ने बख़्शी है इसे शक्ले- जमील
उनके प्यारों के मक़ाबिर रहे बेनामो- नमूद
आज तक उन पे जलाई न किसी ने कन्दील
(सखे, ज्यांच्या कारागिरीने प्रदान केले या वास्तूला सुंदर रूपडे, तेसुद्धा कुणावर तरी प्रेम करत असतीलच ना? पण त्यांच्या प्रेमिकांच्या थडग्यांवर ना नाव ना त्यांची कुठे नोंद, ना कुणी लावलाय त्यावर कधी दिवा)
ये चमनज़ार ये जमना का किनारा, ये महल
ये मुनस्करा दरो दीवार, ये मेहराब, ये ताक
इस शहनशाह ने दौलत का सहारा लेकर
हम गरीबों की मोहब्बत का उडमया है मज़ाक
मेरी महबूब, कही और मिला कर मुझ से!
(हे रेखीव उद्यान, हा यमुनातट, हा महाल, नक्षीकाम केलेली दारे, भिंती, हा घुमट, हा कट्टा एका सम्राटाने संपत्तीच्या बळावर आपल्यासारख्या गरीब लोकांच्या प्रेमाची केली आहे थट्टा! माझ्या मते, इथे नाही, दुसरीकडे कुठे तरी भेटत जाऊया आपण!)
झिणझिण्या. धक्का. पण मग समजून घेण्याशिवाय गत्यंतर नाही अशी जाणीव. वास्तू एकच. पाहणारे वेगळे. त्यांची पाश्र्वभूमी वेगळी. म्हणून प्रतिक्रियाही वेगळी. हा वैयक्तिक अनुभवामधून निर्माण झालेला कडवटपणा आहे का? तसे दिसत नाही. या कवितेत आम्ही आहेत आणि ते आहेत, पण अनेक सामाजिक-राजकीय जाणिवेच्या कविता लिहिणाऱ्या कवींच्या रचनांमध्ये ‘ते विरुद्ध आम्ही’ असे उथळ द्वंद्व असते आणि काळ्या आणि पांढऱ्या रंगात दोन बाजू ढोबळपणे रंगविलेल्या असतात. तसे इथे दिसत नाही, तर सत्ता, संपत्ती याचा संबंध, ऐतिहासिक सत्य आणि तथ्यांच्या आधारे सूचित केलेला दिसतो आणि प्रेमकविता असे वाटणाऱ्या या कवितेला आर्थिक शोषण आणि संपत्तीचे प्रदर्शन या दोन जळजळीत किनारा लाभलेल्या दिसतात.
विचार आणि दृष्टिकोन यामुळे कवितेचा गाभा बदलतो का? तरीही कविता गद्यप्राय आणि विचारांनी कुरघोडी केलेली होऊ नये यासाठी कवीला कोणती पथ्ये पाळावी लागतात? जमीनदार बापाने साहिर आणि त्यांच्या आईवर केलेला अन्याय साहिर यांनी आयुष्यभर एखाद्या ठसठसत्या जखमेसारखा जपला आणि ही खुन्नस या स्तरातील लोकांविरुद्ध  पाजळली. व्यक्तिमत्त्वात अहं आणि कडवटपणा आला. आपण कमी नाही हे जाणवून देण्यासाठीच जणू सिनेमासाठी, संगीतकारापेक्षा एक रुपया जास्त असा मोबदला ते गीतकार म्हणून घ्यायचे.
१९४५ च्या आधी त्यांनी ‘ताजमहल’ ही कविता लिहिली. तिची अनेक भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत आणि एक अभूतपूर्व रचना म्हणून ती उर्दूशिवायही इतर भाषांमधील रसिकांमध्ये लोकप्रिय आहे. मला वेगळाच प्रश्न पडतो. पुढे अनेक वर्षांनी ‘ताजमहल’ नावाचा सिनेमा निघाला. रोशन यांचे मधुर संगीत होते. प्रदीपकुमार हा मठ्ठ- ठोकळा शहाजहान होता आणि बीना राय नावाची जाडजूड बाई मुमताज म्हणून आम्ही सहन केली, पण गाणी अप्रतिम. ‘पाँव छू लेने तो दो फुलों की’, ‘चांदी का बदन सोने की नजर’, ‘जो वादा किया वो निभाना पडेगा’ अशी सर्वच या ‘ताजमहल’साठी गाणी लिहिताना साहिरसाहेबांना आपली कविता आठवली असेल का? की लेखन वेगळे आणि व्यवहार वेगळा अशी भूमिका त्यांनी ठरवली होती? पेच मोठा आहे, पण वाटले तर सोपाही करता येतो. सशाचेही समर्थन करता येते आणि कासवाचीही बाजू मांडता येते. युक्तिवादाचे कौशल्य तेवढे पाहिजे. असो.
आज साहिर नाहीत. वाद-प्रवाद, शंका-कुशंका त्यांच्याबरोबर गेल्या. कविता मागे आहे. खुणावणारी, अस्वस्थ करणारी. उर्दूच्या अंगभूत सामर्थ्यांसह ठामपणे. विचार येतो की नामदेव ढसाळ यांनी त्या वेळची मुंबईतली उंच बिल्डिंग पाहून ‘उषाकिरणच्या पायथ्याशी महारोग्यासारख्या सांडलेल्या झोपडय़ा’ असे लिहिले होते. आज झोपडपट्टीमध्ये जन्मलेला आणि लहानाचा मोठा झालेल्या आणि ती झोपडपट्टी बुलडोझरने सपाट केलेली पाहणाऱ्या कवीने समोरच्या अँटिलिया या गगनचुंबी इमारतीकडे पाहून कविता लिहिली तर तिचे स्वरूप कसे असेल?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व ऱ्हस्व आणि दीर्घ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taj mahal
First published on: 25-08-2013 at 01:01 IST