|| कौस्तुभ केळकर- नगरवाला

 

Satara, One person drowned, Shivsagar Reservoir,
सातारा : शिवसागर जलाशयात बोटसह एक जण बुडाला
Hardik pandya stepBrother Vaibhav Pandya Arrested for Duping Cricketers
हार्दिक व क्रुणाल पंड्याला सावत्र भावानंच लावला ४.३ कोटींना चुना; मुंबई पोलिसांकडून अटक
drowned
साताऱ्यातील शिवसागर जलाशयात बुडून दोन मुलींचा मृत्यू
Bagada procession of Bhairavanatha village deity of Bavadhan was carried out with great enthusiasm
सातारा: ‘काशीनाथाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात बावधनच्या भैरवनाथाच्या बगाड मिरवणूक

जिगरी मतर सदाभौ यांस,

दादासाहेब गांवकरचा दंडवत..

राम राम सदाभौ. कसा हाईसा?

तुमी ‘ठंडा ठंडा कूल कूल’ न्हाई ह्ये समजून ऱ्हायलंय गडय़ा. तुम्ची हालत हिंदी शिनेमावाल्या ‘परवाने’ टाइप झालीया म्हना की! जलने का मजा ल्येनेवाले. जरा वाईच थंड व्हा. तसं बगाया ग्येलं, तर वाई-महाबळेश्वरबी कुटं थंड ऱ्हायलंय आजकाल? तुम्च्या ममईच्या भासत बोलू का.. चिल सदाभौ चिल!

तुमी म्हन्तासा त्ये येकदम खरं हाय. ह्ये शीझनच हाये ‘टूरटूर’ करन्याचा. समदं पब्लिक जग फिरून ऱ्हायलंय. ईमानानं, आगीनगाडीतून, यष्टीतून, न्हाईतर सौताच्या गाडीतून. साळंला सुट्टी. पोरं मोकाट. तुम्च्या शिटीतली गडीमान्सं वर्सभर राबत्यात. बायामान्संबी रोजच्या रूटीनला, ट्रॅफिकला, न्हाईतर हापीस्ला कटाळत्यात. समद्यास्नी च्येंज हवा आस्तू. या टायमाला समद्या टूर कम्पन्या, हाटलवालं, बुकिंगवालं तुमच्या मोबीलमदी शिरत्यात. मिन्टा मिन्टाला परातभर डिश्काऊंटी श्कीमा तुम्च्या टकुऱ्यावर आदळत्यात. तुमी कटाळून कंच्याबी श्कीमला हा म्हन्लं, की तुम्च्या सुट्टीचं घोडं गंगेत न्हायलं येकदाचं!

केसानं गळा कापायचं काम हाये हे. मंजी येकदा तुम्चं डेश्टीनेशन फायनल झालं की शापिंग शुरू. नव्या चाकंवाल्या बॅगा घेयाच्या. तुमी हिल स्टेशनला जानार आसाल, तर हिथं शमरमंदी स्वेटरचं शापिंग. कोश्टल टूरसाटी नवी कापडं. अर्ध्या चड्डय़ा आन् फुलाच्या प्रिन्टवालं सदरं. गळ्यामंदी क्यामेऱ्याचं मंगळसूत्र हवंच. डोळ्यावर गागल हवा. लग्नाच्या बस्त्यावानी टूरिंगचा बस्ता बांधावा लागतूया सदाभौ. नोटान्ची बंडलं आधीच संपत्यात.

आखिरमंदी तुम्ची टूर सुरू होत्ये. तुमी कुटंबी जावा, समदीकडं फुल शीजन आस्तू. आफ शीजन नस्तूच आताशा. समदीकडं झुम्मड. येडय़ावानी पब्लिक. कुटंबी निवांतपना न्हाई. पार्किंगला जागा न्हाई. हाटलमंदी जेवनासाटी येटिंग. लई गर्दी म्हून शर्विसच्या बोंबा. जिवाची नुस्ती घालमेल. आठ धा दिसांचा प्रोग्रॅम आस्तू. सतराशे साठ स्पाट बगायचं असत्यात. मंग नुस्ती धावाधाव. नुस्तं भोज्याला शिवायाचं. पब्लिक सुट्टी यन्जॉय कराया टूरला जातं. तिथंबी रामप्रारी लौकीर उटा आन् पळा. शेल्फीमोड ोच खरा इरंगुळा. श्येवटी कुनासाटी ह्ये पशाचा धूर करतू आपून? सौतासाटी? सदाभौ, तुम्ची गलतफैमी होवून ऱ्हायलीय. ही समदी टूरटूर आपून दुसऱ्यांसाटी करतू. तिथल्ल्या हाट स्पाटला शेल्फी घेयाचा. तुम्च्या शेल्फीतला ताजमहल फिकट आला तरीबी चालतंया, तुम्चा फोटू क्लीअर आला पायजेल. घडीघडीला तुम्चं स्टेटश बदलाया हवं. पब्लिकनं तुम्च्या फोटूकडं बगून जळकं सुस्कारं सोडलं, की तुम्चं पसं वसूल! तुमी ज्या डेश्टीन्येशनला जाऊन ऱ्हायलंय तिथल्या हिश्ट्रीबद्दल, कल्चरबद्दल तुमास्नी कायबी इन्टरेश्ट नस्तू. आवं, लोकं हैद्राबादचं सालारजंग धा मिन्टात फिरून येत्यात. आतमंदी लई बोर होतंया म्हन्त्यात. पर म्येन ग्येटभाईर धाधा शेल्फी घेत्यात. कुटंबी जावा, फोकस तुम्च्यावर आला की ढीगानं लाइका मिळत्यात थोबाडपुस्तकावर. तुम्च्या टूरचा शक्सेशरेट वाढतू.

फारेन टूरचा थाट आजूनच भारी आस्तूया. इमानाभाईर, इमानाच्या आत, नायतर क्रूझबोटीवर फोटू पायज्येल. तुम्च्या थोबाडपुस्तकावर मुंग्यांच्या लाइनीवर उडनारं नागमोडी इमान दिसाया हवं. आयफेल टावर न्हाईतर त्यो स्टाच्यू आफ लिबर्टी तुमी हातात घेवून मिरवायचं. मेणाच्या पुतळाबाईसंगट फोटू काढायचं. फारेन टूरचा टीआरपी डबल आस्तूया. पब्लिक लई जळतंय तुम्च्यावर. फुल टू पसा वसूल. ‘आजकाल कुनीबी जातंय फारीन्ला’ याच्याकडं फकस्त कानाडोळा करायाचा. जाऊ दे जोरात!

सदाभौ, शिटीवाल्यांची देशी न्हाईतर इदेशी, कंचीबी टूर आमास्नी न्हाई परवडत. आवं हिथं बाकी शून्य. पशाचं गणित सुटंना. टूरसाटी हातचा कुटनं घेयाचा? आमी आपलं घरातून वावरात आन् वावरातून घरला वापस जातू. हीच आम्ची टूरटूर.

आमास्नी आठवतंय.. कुलकर्नी मास्तर आमास्नी येकडाव नगरला घेऊन गेल्ते. तीच आम्ची जिंदगीतली पयली ट्रीप. आमी चौथीत होतु. स्कालरशिपची परीक्षा हुती तिकडं नगरला. मास्तरान्चा थोरला ल्योक नगरला मामलेदार कचेरीत कामाला हुता. मास्तर आन् आमी साताठ पोरं. मास्तरांच्या ल्योकाकडंच ऱ्हायलो होतु.

तिथल्या माऊलीनं मनापासून सोगत क्येलं आम्चं. दोन दिस खाऊपिऊ घात्लं. परीक्षेला जातान्ना हातावर दहीसाकर ठय़ेवली. लई झ्याक वाटलं होतं तवा. आक्षी आम्च्या आईसायेब आठीवल्या. परीक्षेचं भ्या येकदम पळून ग्येलं. नगरला जायाच्या दोन दिस अगूदर मास्तरान्नी आम्चा एक्श्ट्रा क्लाश घेत्ला व्हता. नगरचा किल्ला, चांदबीबीची लडाई, तिथल्या स्वातंत्र्यसनिकांच्या कोठडय़ा, सलाबतखानचा महाल, फराहबाग, बागरोजा.. नगरची सम्दी हिश्ट्री डिटेलमंदी सांगितल्येली. स्कालरशिपची परीक्षा तशी ब्येशच झाली. दुसऱ्या दिशी मास्तरान्नी समदं नगर दाखीवलं. आजून लक्ष्यात हाये समदं. किल्ल्याच्या ग्राऊंडमंदी बसून दशम्या खाल्ल्या व्हत्या. साळंचाच पांढरा सदरा आन् खाकी चड्डी, हीच आम्ची ट्रीपची पेशल कापडं. हातात योक उलीशी पिशवी. बस येवढीच तयारी हुती आम्ची ट्रीपसाटी. मास्तरांचा ल्योक आन् सूनबाई. छोटीशीच जागा हुती त्येंची. पर आम्ची आडचन् न्हाई झाली कुनाला. आमी तिथं गेल्यावर मनापासून आनंद झाला हुता तेन्ला.

‘माझ्या गावची पोरं’ म्हून कायबी कमी पडू दिलं न्हाई तेन्नी. सदाभौ, आजबी मनाच्या सांदीकोपऱ्यात त्या आटवनी जिवंत हाईत. ती ट्रीप आटवली, की आमी येकदम शेंटी होतू बगा. आम्चं मास्तर लई ईरसाल. गावाकडं परत गेल्यावर ‘ऐतिहासिक नगर’ या टापीकवर निबंद लिवाया लावला आमास्नी. तवापास्नं होमवर्कची आदत हाय बगा. कंच्याबी गावाला जायाचं झालं, की पहिल्यांदा तिथं काय काय बगन्यासारीक हाये, याची डिटेलमंदी मायती काढतु आमी. तुम्च्या ममईचीबी सम्दी हिश्ट्री-जाग्राफी हाये आमच्याकडं. तुमी बोलीवलं की आमी आलूच बिगीबिगी. जिवाचं व्हेकेशन कराया! सदाभौ, आमी येतुया म्हणूनशान टेन्शनमंदी येवून ऱ्हायलंय की काय तुमी?

सदाभौ, जगामंदी जगातली सगळ्यात भारी ट्रीप कंची सांगू? आवं मऱ्हाटी शाहित्यातलं आम्चं लाडकं दैवत- गदिमांनी लिवलं हाये तेच्यावर. जगातलं समद्यात भारी ट्रॅव्हल डेश्टीन्येशन. येक नंबर जिवाचं व्हेकेशन फकस्त इथंच होतंया. वळका बरं? सांगतू. मामाचा गाव.. ‘पळती झाडे पाहू या, मामाच्या गावाला जाऊ या.’

परीक्षेचा निक्काल लागला, की आम्चा थोरला मामा आमच्या घरी येयाचा. मी, माजी भन, माझी चुलत भावंडं, मामासाटी समद्येच सक्की भाचरं. आम्च्या काकीला सगा भाऊ नव्हता. आईसायबांचं भाव तिचंबी भावच. आई, काकी, मामा आन् आमी बच्चेकंपनी पहिल्यांदा बेलवंडीला जायचू. नंतर आगीनगाडीतून राहुरीला. ठेसनवर धाकला मामा आन् मामाकडचा गडी बलगाडी घेवून हाजीर आसायचा. तिकडं आजी, आजूबा वाटंकडं डोळं लावून बसल्येलं. मामाकडची खिल्लारी बलजोडी. कवतिकानं मामा कासरा माज्या हाती देनार. बुंगाट. घोडय़ावानी सर्जाराजा पळायचं. आमाला बगितलं, की आजी भाकरतुकडा घेऊन उंबऱ्यापासी. पायान्वर दूधपानी. भाकरतुकडा वोवाळून टाकतान्ना आजीच्या डोळ्यामंदी गंगाजमुना.

‘‘पार शेवग्यावानी वाळलीया माजी पोर.’’ सदाभौ, आजीचा दरवर्सी ह्येच डायलाग आसायचा. आमी पोरं ऐकून फिदीफीदी हासायचू. आजी येकदम कावायची, ‘‘गप ऱ्हावा रे मेल्यांनो. तुम्ची ल्येक माहेरपनाला येईल तवा समजंल तुमास्नी.’’

येकडाव घरात शिरलं, की खाली डोकं आन् वर पाय. नुस्ती धमाल. मामाचं भलं मोटं घर. मस जागा. घरामंदी आन् मनामंदीबी. धपांडीईष्टाप, हुतूतू, आटय़ापाटय़ा, सूरपारंब्या.. दिस पुरायचा न्हाई. रानातल्या गाभुळलेल्या चिचा, बोरं, आंब्ये. मामाच्या रानातून हिरव्या पान्याचा केनाल जायाचा. मामाबरूबर तिथं पोवायला जायचं. या डुंबा डुंबा! चिंचच्या झाडावरून पान्यात मारलेला मुटका. त्येच्या रानातला ऊस बलगाडीत भरायचा. त्येच्याबरूबर कारखान्यात जायाचं.

तिथं मूठ मूठ भरून दिल्येली गरम गरम साकर. मामीबी लई जीव लावायची. तिच्या हातचं वांग्याचं भरीत योक नंबर. चुलीवरची गरमागरम भाकर, झुनका आन् तिक्कट ठय़ेचा. सदाभौ, ज्येला जीव लावनारी मामी न्हाईतर काकी गावंल त्यो खरा नशीबवान. मामा, काका आपलाच आस्तू. मामी, काकीनं आपलं म्हनलं, की सुखाचा डायबेटीश होतू गडय़ा!

सदाभौ, तुम्च्याकडं टाइम मशीन आसंल तर आमास्नी पुन्ना त्या जमान्यात घेऊन जावा. तुमीबी चला आम्च्यासंगट. त्येच खरं जिवाभावाचं व्हेकेशन. मामाच्या घरी जायाचं म्हून आमी जेवडं खूश व्हायाचो, त्यापेक्सा डबल खूश आम्चं आयसायेब आसायचं. वर्सातून येकचदा आयसायेब मोरी जायचं. सदाभौ, मोरपनाची एहमीयत तुमा-आमाला नाय समजनार कंदी. येकदम आजी आटवली बगा. फ्युचरमंदी मोरी येनारी ल्येक दिसून ऱ्हायलीया. डोळे वल्ले झाले बगा.

ऱ्हायलं. आमी काय म्हन्तू सदाभौ, आजून व्हेकेशन बाकी हाये. वैनीसायबांना सांगा, हा दादासायेब तेंचा थोरला भाऊच हाये जनू. या आम्च्या गावाला. माहेरपनाला. भाचरान्संगट धमाल करूयात. आम्च्या भाचरान्नाबी सांगा, तुम्ची मामीबी जीव लावनारी हाये. मोबील, लापटाप तिकडं ममईला माळ्यावर टाकून द्या. गावाकडं आम्ची माती, आम्ची मान्सं हाईत.

आर तिच्या, वैनीसायेब आम्ची भन, मंजी तुमी आम्चं जावईबापू झालं की! तवा गाडी काडा आन् गुमान गावाकडची वाट धरा. येक रिक्वेश्ट हाये. गाडीमंदी  फकस्त येकच गानं ऐकू यायाला हवं.. ‘पळती झाडे पाहू या, मामाच्या गावाला जाऊ या..’

तुम्च्या वाटंकडं डोळं लावून बसलोय आमी. या बिगीबिगी!

तुम्चं जिवाभावाचं दोस्त,

दादासाहेब गांवकर.

 

kaukenagarwala@gmail.com