|| अंजली चिपलकट्टी

‘Survival of the fittest’  या डार्विनच्या उत्क्रांतीबद्दलच्या विधानाचा ‘जो बलवान तो जगण्याच्या स्पर्धेत टिकणार’ असा सपशेल चुकीचा अर्थ अनेक जण लावतात. ‘Fit’ या शब्दाचा जीवशास्त्रीय अर्थ ‘जो जास्तीत जास्त प्रजनन करण्यात यशस्वी ठरतो तो’ असा आहे. जगात अंदाजे एक कोटी ज्ञात आणि १०० अब्जांपेक्षा जास्त अज्ञात जीवजाती आहेत. जगण्याच्या एवढ्या विविध पद्धतींपैकी बऱ्याच आजवर लोप पावल्यात, थोड्याच तगून राहिल्यात. म्हणजेच ज्यांचे गुण त्या जीवाला प्रजननासाठी अनुकूल ठरले ते टिकले. आपल्यासारखाच दुसरा जीव तयार करण्याची अंत:प्रेरणा हा या सर्व जीवजातींमध्ये समान धागा (व्याख्येनुसारच!). पण अशा अंत:प्रेरणेमागेही काही प्रेरणा असू शकते का, असा विचित्र प्रश्न काही संशोधकांनी विचारला. आणि त्याचं विज्ञानानं शोधलेलं उत्तरही अचंबित करणारं आहे. कोणताही जीव त्याच्या पुढच्या पिढीला काय देतो? तर त्याचे ‘गुण’! अगदी आदिम पातळीवर हे गुण कशाने ठरतात? तर त्या सजीवात असलेल्या DNA किंवा जनुकांमुळे. (माणसात गुणधर्म फक्त जनुकांमुळे ठरत नाहीत. इथे आपला मुद्दा फक्त प्रजननापुरता सीमित आहे.) म्हणजे एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित होतात ती जनुकं किंवा गुणधर्म! याचा अर्थ प्रजननाच्या प्रेरणेमागची मूळ प्रेरणा कदाचित जनुकांना पुढच्या पिढीकडे सोपवणं अशी असावी. कारण काळाच्या पटलावर प्रत्यक्षात तो जीव नाही, तर जनुकीय रचना अमर राहताना दिसतात! काय गंमत आहे पाहा- आपणा सर्वांना असं वाटतं की, इथे मी ‘माझी’ गोष्ट जगतोय; पण जनुकं जणू तुमच्याकडून किंवा आडून स्वत:चंच घोडं पुढे पळवताहेत! जी जनुकं/ गुण/ वर्तन एखाद्या जीवाला त्या, त्या पर्यावरणात प्रजननासाठी अनुकूल ठरतात, ती टिकतात, त्या जनुकीय रचना पुढे ढकलल्या जातात… इतका सोपा नियम! अशा अनुकूल जीवांची आणि त्या गुणांची पुढे जाण्यासाठी ‘निवड’ झाली असं म्हणता येईल. कोणी केली ही निवड? कोणीच नाही! अगदीच म्हणायचं झालं तर ‘तटस्थ’ अशा निसर्गानं… त्यावेळच्या पर्यावरणानं. जनुकांच्या जास्तीत जास्त ‘प्रती’ पुढच्या पिढीत पोहोचवायच्या तर स्वत:साठी प्रजननाच्या जास्तीत जास्त संधी मिळवणं (individual selection) हे जीवांचं वर्तन दिसायला हवं. याचे बक्कळ पुरावे मिळतात. याला आपण ‘स्वार्थ’ऐवजी ‘स्वहित’ साधणं असं म्हणू.

Devendra Fadnavis, Ajit Pawar & Eknath Shinde Astrology
शिंदे, पवार, फडणवीसांना ‘या’ अंकाचा धागा ठेवतो जोडून; २०२४ मध्ये मात्र येईल ‘हा’ अडथळा, ज्योतिषी काय सांगतात?
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Real Lifestyle
रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?

पण प्राणी स्वत:बरोबर ‘नातलगांची’ निवड (kin selection) व्हावी म्हणूनही धडपडतात असं दिसतं. ते कसं काय? ‘स्वत:ची जनुकं पुढच्या पिढीत जावीत ही मूलभूत प्रेरणा असते’ हे गृहितक गाभ्याशी ठेवलं तर याचं उत्तर अवघड नाही. आई-बापाकडून अपत्याला ५०-५०% जनुकं मिळतात. त्यामुळे सर्व जीवांची त्याच्या जवळच्या नातलगांबरोबर (भावंडं, अपत्य यांच्याबरोबर) कमीत कमी ५०% जनुकं सामायिक असतात. समजा, एखाद्या वयस्क जोडप्याच्या विस्तारित कुटुंबात त्यांची मुले, मुलांचे जोडीदार आणि नातवंडे असे सदस्य आहेत. यातल्या कोणत्याही दोन सदस्यांची (जोडपी सोडून) एकमेकांशी सामायिक जनुकं किती? ५० ते २५%! याचा अर्थ दुसऱ्या/ तिसऱ्या पिढीतल्या कोणाही व्यक्तीने इतर सर्वांसाठी पुनरुत्पादनाच्या संधी मिळवून देऊन स्वत: प्रजनन न करता ‘कुर्बानी’ द्यायचं ठरवलं तरी त्या व्यक्तीची बरीच जनुकं अप्रत्यक्षपणे सहज पुढच्या पिढीत जातील. मग जनुकांच्या भाषेत त्याला ‘कुर्बानी’ न म्हणता ‘स्वहित’च म्हणावं लागेल! (इतर प्राण्यांचं असं असेल बुवा; पण माणसांचं मात्र आपल्या नातलगांवर ‘खरंखुरं’ प्रेम असतं असं तुम्हाला वाटू शकतं. तर फार त्रास करून घेऊ नका. निसर्गाच्या ‘तटस्थ’पणे याकडे पाहिलं तर काय दिसतं याची ही एक झलक.)

स्वत:ची आणि नातलगांची निवड व्हावी म्हणून झटणाऱ्या जीवांचं या परिघाबाहेरच्या सजातीय जीवांबरोबर कसं वर्तन असतं? अगदी बॅक्टेरियापासून ते मोठ्या प्राण्यांपर्यंत बहुतांश प्राणी सैलसर का असेना, पण एकत्र/ कळपात राहतात.

कळपात सर्व नातलग नसतानाही इतर सजातीयांबरोबर राहण्याची प्रेरणा कशी काय तयार झाली असेल? स्वहिताच्या नादात ते सजातीयांशी स्पर्धा करतात की कसं? स्वहिताच्या आड कोणी येऊ नये म्हणून ते चतुरपणा जरूर करतात; पण स्पर्धेपेक्षा जास्त सहकार्य करताना दिसतात. वव्र्हेट जातीची माकडं भक्षक प्राणी दिसला तर इतरांना विशिष्ट आवाज करून धोक्याचा इशारा देतात. त्यामुळे काही वेळा त्यांचा स्वत:चा जीव धोक्यात येतो, पण इशाऱ्यांमुळे कळपातले इतर सजातीय वाचतात. व्हॅम्पायर वटवाघळं एकमेकांच्या पिल्लांना अन्न (चक्क इतर प्राण्यांचं शोषलेलं रक्त!) भरवतात. मासे, पक्षी घोळक्याने अन्न शोधतात. अशी असंख्य उदाहरणं निसर्गात दिसतात. ज्याअर्थी सहकार्य करण्याचा ‘गुण/ वर्तनाची’ निवड उत्क्रांतीच्या प्रक्रियेत झाली याचा अर्थ त्याचा थेट उपयोग स्वत:च्या निवडीसाठी- प्रजननासाठी झाला हे नक्की! पण ज्यांच्याशी सहकार्य करायचं त्यांनीच गैरफायदा घेतला तर? तसं नाही ते! स्वहित आणि परहित एकत्र येतं तेव्हाच सहकार्य जन्म घेतं. अर्थात यासाठी काही देवघेवीचे, वाटाघाटीचे नियम अगदी आपण ‘निर्बुद्ध’ समजतो अशा जीवांमध्येही दिसतात. काय आहेत हे नियम?

हे समजून घेण्यासाठी आपण एक काल्पनिक खेळ खेळू. ‘डॉन’ सिनेमातला अमिताभचा ब्रीफकेस अदलाबदलीचा सीन आठवतोय का? तसाच काहीसा. समजा, तुम्हाला एका ब्रीफकेसमध्ये हिरे देऊन त्या बदल्यात पैसेवाली ब्रीफकेस घ्यायचीय. यात फसवणुकीचा धोका आहेच. यात तीन शक्यता आहेत- १. साधा-सरळ व्यवहार- यात हिऱ्याची ब्रीफकेस दिली आणि पैशांची घेतली तर दोघांचाही फायदा होईल. २. हिऱ्याची ब्रीफकेस रिकामी दिली आणि पैशांची घेतली तर दुप्पट फायदा होणार! असाच विचार ‘दुसरी पार्टी’ पैशांची ब्रीफकेस रिकामी देऊनही करू शकते. ३. दोघांनीही ब्रीफकेस रिकाम्या ठेवल्या तर मग काय व्यवहारच होणार नाही; पण वेळ, श्रम, जोखीम सगळंच वाया. त्यामुळे तो काही पर्याय नाही, कारण कोणाबरोबर तरी व्यवहार करावाच लागणार.

पहिल्या शक्यतेत दोघांनी सहकार्य केलं तर जेवढा फायदा होतो त्याच्या दुप्पट फायदा दुसऱ्या शक्यतेत जो फसवणूक करेल त्याचा होतो. शिवाय, समोरच्या ‘पार्टी’कडून फसवणूक होण्याचा धोकाही टळतो. समोरच्या पार्टीविषयी विश्वास नसेल किंवा जास्त फायद्याचा लोभ मनात असेल तर फसवणूक करणं हाच पर्याय तर्काला धरून आहे! हो, पण खेळाची एकच फेरी असेल तरच- म्हणजे तुम्हाला हिंदी सिनेमातल्या ‘रॉबर्ट’सारखं निरवानिरव करून हिरे घेऊन परदेशात विमानानं पळून जायचं असेल तर! पण खेळाच्या एकापेक्षा जास्त फेऱ्या खेळाव्या लागल्या तर? म्हणजे गरजेपोटी पुढेही समोरच्या पार्टीबरोबर व्यवहार चालू ठेवायचे असतील तर प्रत्येक वेळी निर्णय घेताना सहकार्य-की-फसवणूक या दुविधेला सामोरं जावं लागेल. त्यापेक्षा समजा, आपण ठरवलं की, सहकार्य करून तर पाहू; समोरच्याने सहकार्य केलं तर चांगलंच; पण फसवलं तर आपणही फसवू. थोडक्यात, ‘जशास तसं!’ एकाची चाल काय आहे यावरून दुसऱ्याचा प्रतिसाद ठरेल- सहकार्याचं उत्तर सहकार्यानं आणि फसवणुकीचं उत्तर फसवणुकीनं. फसवणूक केली तर अद्दल घडलीच पाहिजे; पण चुकून कधी गैरसमजामुळे एखादी कृती फसवणुकीची नसतानाही तशी वाटू शकते. त्यामुळे फसवणुकीचे उत्तर फसवणुकीनंच द्यायच्या नादात सहकार्याची साखळी तुटू शकते. म्हणून मग एखादी अशी फसवणूक ‘गलती से मिस्टेक’ समजून माफ करून सहकार्याचीच खेळी केली तर खेळ/ व्यवहार पुढे चालू राहू शकतो.

रॉबर्ट अ‍ॅक्सलरॉड या राज्यशास्त्राच्या वैज्ञानिकाने ‘प्रिझनर्स डिलेमा’- ‘कैद्यांची दुविधा’ या अशाच एका खेळाबाबत अनोखा प्रयोग केला. त्याने गुन्हेगारांपासून सामान्य माणसं ते नोबेलविजेत्या वैज्ञानिकांना या दुविधेच्या खेळात टिकून राहण्यासाठी ते कोणते डावपेच खेळतील अशी उत्तरं लिहून मागितली. मग त्यानं कॉम्प्युटरच्या मदतीनं जणू दोन खेळाडू एकमेकांशी खेळ खेळताहेत असं ‘सिम्युलेशन’ करून प्रत्येक डावपेच इतर प्रत्येक डावपेचाविरुद्ध लढवला. खेळाच्या असंख्य फेऱ्या खेळायला लावून कोणते डावपेच सर्वात यशस्वी ठरतात हे शोधलं. सहकार्य करणारे आणि फसवणारे या दोघांनाही, ते जेव्हा जिंकतील तेव्हा, बक्षीस म्हणून त्यांची ‘संख्या’ वाढवली (प्रजनन हेच यश!) आणि हरतील तेव्हा संख्या कमी केली. असं करत शेवटी कोण जास्त तगून राहतात हे पाहिलं. त्याला असं लक्षात आलं की, फसवणूक झाली तरीही भाबडेपणाने सहकार्य करणारे आणि निगरगट्टपणे सतत फसवणूकच करणारे दोन्ही तगून राहत नाहीत. पण सुरुवात सहकार्यापासून करून पहिली फसवणूक माफ, पण दुसऱ्या फसवणुकीला उत्तर मात्र फसवणुकीनंच असा दोन्हींचा मिलाफ असलेली एक स्ट्रॅटेजी स्वहितासाठी (प्रजननासाठी!) सर्वात फायदेशीर ठरते. वर आपण चर्चा केली ना, एक चूक माफ करून सहकार्य करायचं, पण दुसऱ्या फसवणुकीला मात्र अद्दल घडवायची, हीच ती ‘क्षमाशील + जशास तसं’ स्ट्रॅटेजी.

तर या सगळ्याचा मानवी वर्तनाशी काय संबंध? या मुद्द्यावर आपण येतोच आहोत. वर जी मांडणी केलीये त्याला गणितात ‘गेम थिअरी’ म्हणतात. सजीवांमध्ये ‘समूह’जाणीव व सहकार्याच्या वृत्तीची उत्क्रांती कशी झाली असावी याची बरीच उत्तरं चक्क या गणितातील थिअरीत सापडतात! माणसाचं वर्तन ठरवणाऱ्या अनेक वृत्ती उत्क्रांतीच्या काळात घडल्या गेल्यात. त्यातल्या सहकार्य-वृत्तीची पाळंमुळं आदिमानवपूर्व प्राणिअवस्थेइतकी जुनी आहेत. स्वहित आणि परहित यांची मोट बांधून तयार झालेली सहकार्याची वृत्ती ज्यांच्यात विकास पावली ते ‘समूहा’नं राहायचं शिकले म्हणून टिकले. प्राणी एकमेकांशी ‘स्वहित’, ‘नातलग-हित’ आणि ‘जशास तसं’ या नियमांप्रमाणे वर्तन करताना दिसतात. विशेषत: मानवेतर प्राणी एकमेकांशी ‘जशास तसं’ या स्ट्रॅटेजीनुसार वागतात. हे पटणारं नसलं तरी याला बळकटी देणारे असंख्य पुरावे प्राणी-वैज्ञानिकांना मिळाले आहेत. ते पुढील लेखात पाहू. लक्षात घ्यायची गोष्ट अशी की, ‘जशास तसं’ ही सहकार्याची स्ट्रॅटेजी आहे; सूडबुद्धी नव्हे!

anjalichip@gmail.com