|| अंजली चिपलकट्टी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘Survival of the fittest’  या डार्विनच्या उत्क्रांतीबद्दलच्या विधानाचा ‘जो बलवान तो जगण्याच्या स्पर्धेत टिकणार’ असा सपशेल चुकीचा अर्थ अनेक जण लावतात. ‘Fit’ या शब्दाचा जीवशास्त्रीय अर्थ ‘जो जास्तीत जास्त प्रजनन करण्यात यशस्वी ठरतो तो’ असा आहे. जगात अंदाजे एक कोटी ज्ञात आणि १०० अब्जांपेक्षा जास्त अज्ञात जीवजाती आहेत. जगण्याच्या एवढ्या विविध पद्धतींपैकी बऱ्याच आजवर लोप पावल्यात, थोड्याच तगून राहिल्यात. म्हणजेच ज्यांचे गुण त्या जीवाला प्रजननासाठी अनुकूल ठरले ते टिकले. आपल्यासारखाच दुसरा जीव तयार करण्याची अंत:प्रेरणा हा या सर्व जीवजातींमध्ये समान धागा (व्याख्येनुसारच!). पण अशा अंत:प्रेरणेमागेही काही प्रेरणा असू शकते का, असा विचित्र प्रश्न काही संशोधकांनी विचारला. आणि त्याचं विज्ञानानं शोधलेलं उत्तरही अचंबित करणारं आहे. कोणताही जीव त्याच्या पुढच्या पिढीला काय देतो? तर त्याचे ‘गुण’! अगदी आदिम पातळीवर हे गुण कशाने ठरतात? तर त्या सजीवात असलेल्या DNA किंवा जनुकांमुळे. (माणसात गुणधर्म फक्त जनुकांमुळे ठरत नाहीत. इथे आपला मुद्दा फक्त प्रजननापुरता सीमित आहे.) म्हणजे एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित होतात ती जनुकं किंवा गुणधर्म! याचा अर्थ प्रजननाच्या प्रेरणेमागची मूळ प्रेरणा कदाचित जनुकांना पुढच्या पिढीकडे सोपवणं अशी असावी. कारण काळाच्या पटलावर प्रत्यक्षात तो जीव नाही, तर जनुकीय रचना अमर राहताना दिसतात! काय गंमत आहे पाहा- आपणा सर्वांना असं वाटतं की, इथे मी ‘माझी’ गोष्ट जगतोय; पण जनुकं जणू तुमच्याकडून किंवा आडून स्वत:चंच घोडं पुढे पळवताहेत! जी जनुकं/ गुण/ वर्तन एखाद्या जीवाला त्या, त्या पर्यावरणात प्रजननासाठी अनुकूल ठरतात, ती टिकतात, त्या जनुकीय रचना पुढे ढकलल्या जातात… इतका सोपा नियम! अशा अनुकूल जीवांची आणि त्या गुणांची पुढे जाण्यासाठी ‘निवड’ झाली असं म्हणता येईल. कोणी केली ही निवड? कोणीच नाही! अगदीच म्हणायचं झालं तर ‘तटस्थ’ अशा निसर्गानं… त्यावेळच्या पर्यावरणानं. जनुकांच्या जास्तीत जास्त ‘प्रती’ पुढच्या पिढीत पोहोचवायच्या तर स्वत:साठी प्रजननाच्या जास्तीत जास्त संधी मिळवणं (individual selection) हे जीवांचं वर्तन दिसायला हवं. याचे बक्कळ पुरावे मिळतात. याला आपण ‘स्वार्थ’ऐवजी ‘स्वहित’ साधणं असं म्हणू.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thang vartnacha survival of the fittest dna individual selection akp
First published on: 16-05-2021 at 00:04 IST