‘तिमिरभेद’ ही अरुण चव्हाण यांची ३९९ पृष्ठांची कादंबरी सुरुवातीला कंटाळवाणी वाटू लागते, पण नंतर ती जी पकड घेते ती शेवटपर्यंत सुटू देत नाही. मराठीमध्ये ऐतिहासिक कादंबऱ्या अनेक आहेत. परंतु इतिहासाला कल्पितामध्ये गोवून त्याचे फिक्शन करण्याचे तंत्र ‘बखर..’कार त्र्यं. वि. सरदेशमुखांना लाभले होते. या तंत्राचा अत्यंत समर्पक वापर चव्हाण यांनी या कादंबरीमध्ये केला आहे.
ही कादंबरी कृष्णपूर या संस्थानाच्या विक्रमराजेंची कथा सांगते. हे विक्रमराजे म्हणजे कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज आहेत, हे लक्षात येते. पण म्हणून ही कादंबरी वाचताना आपण शाहू महाराजांचे चरित्र वाचत आहोत असे वाटत नाही आणि चव्हाणांना त्यांचे चरित्रही सांगायचे नाही. त्यामुळे स्वतंत्र कादंबरी म्हणूनच या लेखनाकडे पाहावे लागते.
कृष्णपूर, औंध आणि कुरुंदवाड या तीन संस्थानांची आणि त्यातील समाजोपयोगी लोकशाही धोरणांची चर्चा कादंबरीच्या पहिल्या भागात आली आहे. कथेचा निवेदक प्रकाश हा विक्रमराजेंच्या विश्वासू सहकाऱ्याचा मुलगा आहे. तो विक्रमराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊन आय.पी.एस. अधिकारी होतो आणि त्याच्या नजरेतून तो विक्रमराजेंची कथा सांगतो. विक्रमराजेंच्या वेदोक्त-पुराणोक्त प्रकरणापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंतची कहाणी या कादंबरीत येत असली तरी त्या कहाणीपेक्षा विसाव्या शतकाचा सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक इतिहास ही कादंबरी अधोरेखित करताना दिसते.
कादंबरीचा पहिला भाग विक्रमराजेंची जडणघडण, कार्यप्रणाली आणि स्वातंत्र्याचे आंदोलन या घटनांनी भरलेला आहे. स्वातंत्र्याचे आंदोलन- त्यातील म. गांधी, सुभाषबाबू, पंडित नेहरू, नाना पाटील, सत्यशोधक चळवळ, सशस्त्र सैनिकांचा उठाव या घटनांचा अन्वय या भागामध्ये आहे. विशेषत: सैनिकांनी जे ‘तलवार’ आंदोलन केले त्या आंदोलनाकडे म. गांधी आणि राष्ट्रीय काँग्रेसने कसे अक्षम्य दुर्लक्ष केले याची प्रभावी मांडणी ही कादंबरी करते. सरदार पटेल, असफअली यांनी आंदोलनाची हेटाळणी केली. अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्याच्या काँॅग्रेसी अट्टहासाने मोठीच जीवितहानी मुंबईमध्ये झाली- ज्याची इतिहासात नीट नोंद केली गेली नाही. खरे तर हा ‘वंचितांचा इतिहास’ आहे. पण त्याची चव्हाणांनी कादंबरीच्या रूपाने फार सूत्रबद्ध मांडणी केली आहे. कुणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं न करता त्या काळातल्या अंधाऱ्या बाजू फिक्शनच्या रूपांत मांडण्यात कादंबरीकार यशस्वी होताना दिसतो.
दुसऱ्या भागात नायक प्रकाशची वाटचाल, त्याची कारकीर्द असली तरी आशयाच्या केंद्रस्थानी कृष्णपूर आणि त्याचा विकास व तत्कालीन राजकारण आहे. विक्रमराजेंची जडणघडण नोंदवताना स्वातंत्र्यानंतर जी वैचारिक दिवाळखोरी दिसू लागली त्याचा आलेख ही कादंबरी नोंदवते. काँग्रेस सत्तेत मश्गुल झाली. ब्रिटिशांचेच धोरण त्यांनी पुढे चालू ठेवले, तर मार्क्‍सवादी लोक रशिया आणि लेनिन व वर्गलढय़ातच अडकून पडले. आपल्या विचाराला जवळ जाणारा पक्ष म्हणू संस्थान विलीन झाल्यानंतर विक्रमराजेंनी साम्यवादी पक्षाला जवळ केले. पण त्यांचीही दुराग्रही तत्त्वप्रणाली कशी अडचणीची ठरू शकते याचा सतत प्रत्यय महाराजांना येत गेला. असाच तत्त्वाचा कीस पाडून त्याचे भारतीय वास्तवाशी संबंध न जोडल्यामुळे दिनकर आणि तृष्णा या कार्डहोल्डर सदस्यांना लग्नानंतर मित्रांनी भेट दिलेले घर पक्षाला अर्पण करण्यासाठी दडपण
आणले जाते. कामगारांचा विजय आणि कामगारांचीच सत्ता या निकषावर अडून बसलेला आणि उच्चवर्गीयांचा ताबा राहिलेला हा पक्ष भविष्यात मोडीत निघणार याची सगळी सूत्रे १९५०-७० च्या दशकात त्या प्रश्नप्रणालीत कशी दिसत होती याचे विवेचन फार रोचक आहे.
विक्रमराजेंनी धरण आणि महामार्ग (रत्नागिरी बंदराला जोडणारा) या मोठय़ा योजना लोकसहभागातून आणि नोकरशाहीला बाजूला ठेवून एक- तृतीयांश खर्चात, मनुष्यबळाचाच अधिक वापर करून पूर्ण केल्या आणि लोकशाही अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला. तीन- चतुर्थाश शासनाचा खर्च वाचवला आणि हाच महाराजांचा गुन्हा ठरला. या गुन्ह्यासाठी त्यांना अटक व्हावी, खटला चालावा म्हणून दस्तुरखुद्द केंद्र सरकार, पंडित नेहरू आणि राज्य सरकारने आटोकाट प्रयत्न केले. पण तो खटला रोखण्यासाठी जी आंदोलने सामान्य लोकांनी महाराष्ट्रभर उभारली ती कादंबरीतच वाचण्यासारखी आहेत. शेवटी महाराजांना निदरेष ठरवण्यात आले.
केंद्राची आणि राज्याची बरीच नामुष्की या प्रकरणात झाली. विक्रमराजेंच्या रूपाने कादंबरीकार व्यक्ती, जात, धर्म, वर्ग, अर्थकारण, शोषण, लोकसहभाग अशा सगळ्यांचा एकत्रित विचार करून भारतीय क्रांती घडवता येईल हे स्वप्न पाहतो. सुदैवाने महाराजांना ते स्वप्न साकार करता आले. संस्थानाच्या विलीनीकरणानंतरही लोकशाही अधिक बळकट करणाऱ्या विक्रमराजेंना सर्वच पक्षांनी आणि प्रस्थापित सरकारने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना अपयश आले. एका अर्थाने एका सबंध शतकाचा राजकीय आणि सांस्कृतिक वेध घेताना अनेक घटनांच्या काळोखाचा भेद कादंबरीकार करतो.
कृष्णपूर, औंध संस्थानांचा आणि त्या राजांचा तपशील नोंदवताना चव्हाण त्यांचे गौरवीकरण न करता मानवीयतेचा शोध घेतात. म्हणून विक्रमराजेंची व्यक्तिरेखा भव्य न होता ती आपल्याशी संवादी होते. हेच कसब कादंबरीतील इतर ऐतिहासिक व्यक्तिरेखांबाबत जाणवत राहते.
या कादंबरीतील काही व्यक्तिरेखा काल्पनिक आणि काही वास्तवातल्या आहेत. त्यामुळे कल्पित आणि इतिहास यांची योग्य सांगड ही कादंबरी घालते. भूप्रदेश, तेथील चालीरीती, त्यांचे उल्लेख वाचकांना सहजपणे कळू शकतात, पण म्हणून ते वास्तव तसेच आहे का, या प्रश्नात वाचक अडकून पडत नाही. एक मोठा कालपट ही कादंबरी कवेत घेत असल्याने वास्तव इतिहासाला बाजूला सारून विसाव्या शतकाचे सम्यक दर्शन (जागतिक स्तरासह) ही कादंबरी घडवते. इतिहास असूनही त्या इतिहासापासून स्वत:ला तटस्थ ठेवण्याचे काम कादंबरीकाराला नीटपणे जमले आहे.
हा सगळा इतिहास नोंदवताना कादंबरीकार म्हणून जाणवणारी तटस्थता येथे जागोजागी प्रत्ययाला येते. जगातली तिसरी शक्ती म्हणून भारताच्या उदयाकडे पाहणाऱ्या विक्रमराजेंची ही कथा विसाव्या शतकाच्या भारताची कथा होते. म्हणून ती महत्त्वाची ठरते. तरीही चव्हाण संपूर्ण तपशिलाचे फिक्शन करताना वैचारिकतेकडेच आणि वास्तव तपशिलाकडेच अधिक झुकत असल्यामुळे एक वाङ्मयीन दस्तावेज म्हणून ही कादंबरी ‘फिक्शन’ची उंची गाठू शकली नाही. परंतु ‘फिक्शन’च्या शक्यता मात्र तिने रुंदावण्याचे काम चांगल्या प्रकारे केले आहे.
‘तिमिरभेद’ – अरुण चव्हाण, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, पृष्ठे – ३९९, मूल्य – ४०० रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Timirbhed by aruna chavan
First published on: 28-12-2014 at 01:13 IST