scorecardresearch

झाम्बेझीवर झुलणारी झुंबरं

मुंबईहून विमान उशिरा सुटल्याने नैरोबीला पोचायला उशीर झाला होता. तसेच धावतपळत कसेबसे लुसाकाला जाणाऱ्या विमानात जाऊन बसलो. लुसाका येण्यापूर्वी सर्वाना डावीकडे बघण्याची सूचना करण्यात आली. आफ्रिकेतल्या सर्वात उंच असलेल्या किलिमांजारो पर्वताचे विहंगम दर्शन बाहेर होत होते.

मुंबईहून विमान उशिरा सुटल्याने नैरोबीला पोचायला उशीर झाला होता. तसेच धावतपळत कसेबसे लुसाकाला जाणाऱ्या विमानात जाऊन बसलो. लुसाका येण्यापूर्वी सर्वाना डावीकडे बघण्याची सूचना करण्यात आली. आफ्रिकेतल्या सर्वात उंच असलेल्या किलिमांजारो पर्वताचे विहंगम दर्शन बाहेर होत होते. गडद निळसर हिरव्या पर्वतमाथ्यावरचे पांढरेशुभ्र बर्फ सूर्यकिरणांमुळे चमचमत होते.
लुसाका ही झाम्बियाची राजधानी. येथून लिव्हिंग्स्टनला जगप्रसिद्ध ‘व्हिक्टोरिया फॉल्स’ पाहायला जायचे होते. ६०० कि.मी.चा सहा तासांचा बसप्रवास होता. बसच्या खिडकीतून बाहेरचे रमणीय दृश्य दिसत होते. स्वच्छ, सुंदर रस्त्यापलीकडे हिरव्या गवतांची कुरणे होती. गहू, ऊस, मका, टोमॅटो, बटाटे यांची शेते दिसत होती. त्यात अधूनमधून अकेशिया वृक्षांनी हिरवी छत्री धरली होती. हिरव्यागार, उंच चिंचेसारखी पाने असलेल्या फ्लेमबॉयंट वृक्षांवर गडद केशरी रंगाच्या फुलांचे घोस लटकत होते. आम्रवृक्षांवर लालसर मोहोर फुलला होता.
थोडय़ाच वेळात अमावस्येचा गडद काळोख दाटला. काळ्याभोर आकाशाच्या भव्य घुमटावर तेजस्वी चांदण्यांची झुंबरं लखलखू लागली. आमच्या सोबतच्या बाबा गोडबोले यांनी दक्षिण गोलार्धातील त्या ताऱ्यांची ओळख करून दिली.
आम्ही जूनच्या मध्यावर प्रवासाला निघालो होतो. पण तिथल्या व आपल्या ऋतुमानात सहा महिन्यांचे अंतर आहे. तिथे खूप थंडी होती. लिव्हिंग्स्टनला हॉलिडे लॉजवर जेवताना टेबलांच्या दोन्ही बाजूंना उंच जाळीच्या शेगडय़ा ठेवल्या होत्या. दगडी कोळशातून लालसर अग्निफुले फुलत होती. त्यामुळे थंडी थोडी सुसह्य़ होत होती.
दुसऱ्या दिवशी आवरून रेल्वे म्युझियमपर्यंत पायी फिरून आलो. ब्रिटिशकालीन इंजिने त्यांच्या माहितीसह तिथे ठेवली होती. मग बसने व्हिक्टोरिया धबधब्याजवळील रेल्वेपुलावर गेलो. झाम्बेझी नदीवरील या पुलाला शंभराहून अधिक वर्षे झाली आहेत. हा रेल्वेपूल ब्रिटनमध्ये बनवून नंतर बोटीने इथे आणून जोडण्यात आला आहे. या रेल्वेपुलाला दोन्ही बाजूंनी जोडलेले रस्ते आहेत. पुलाच्या एका बाजूला झाम्बिया व दुसऱ्या बाजूला झिम्बाब्वे हे देश आहेत. या देशांच्या सीमेवरून वाहणाऱ्या झाम्बेझी नदीवर हा विशालकाय धबधबा आहे. पुलाच्या मध्यावर उभं राहून पाहिलं तर उंचावरून कोसळणारा धबधबा आणि खोल दरीतून वर येणारे पांढरे धुक्याचे ढग यांनी समोरची दरी भरून गेली होती. त्या ढगांचा पांढरा पडदा थोडा विरळ झाला की अनंत धारांनी आवेगाने कोसळणारे पांढरेशुभ्र पाणी दिसे. इतक्या दूरही धबधब्याचे तुषार अंगावर येत होते.
दोन डोंगरकडय़ांच्या मधून पुलाखालून वाहणारी झाम्बेझी नदी उसळत, फेसाळत मधेच भोवऱ्यासारखी गरगरत होती. समोरच्या बाजूला बंगी जम्पिंगचा चित्तथरारक खेळ सुरू होता. कमरेला दोरी बांधून साहसी तरुण-तरुणी ३०० फूट खोल उडय़ा मारत होत्या. झाम्बेझीने आपल्या प्रवाहात इंद्रधनुष्याचा झोपाळा टांगला होता. इंद्रधनूच्या झोक्यावर साहसी तरुणाई मजेत झोके घेत होती.
दुपारी म्युझियम पाहायला गेलो. जगातील सर्वात प्राचीन मनुष्यवस्तीच्या खुणा आफ्रिकेत सापडतात. एक लक्ष वर्षांपूर्वीपासून इथे मनुष्यवस्ती असल्याचे पुरावे या म्युझियममध्ये ठेवले आहेत. अश्मयुगातील घरे, त्याकाळच्या मनुष्याच्या कवटय़ा, दात, हाडे आहेत. आदिमानवाने दगडावर कोरलेली चित्रे, मण्यांचे दागिने, शिकारीची हत्यारे, लाकडी भांडी, गवताने साकारलेल्या झोपडय़ा, गवती टोपल्या, अनेक तऱ्हेचे प्राणी, पक्षी, झाडांचे नमुने व माहिती दिलेली आहे. बाओबाओ नावाचा एक वैशिष्टय़पूर्ण वृक्ष आहे. त्याला ‘भाकरीचे झाड’ही म्हणतात. या झाडाची फळे खाऊन आदिमानवाचा उदरनिर्वाह होत असे. पिवळसर बुंधे असलेले हे बाओबाओ म्हणजे हत्ती व जिराफांचे आवडते खाणे आहे.
नंतर हेलिकॉप्टर राइडसाठी जायचे होते. एका वेळी तीनजणांना घेऊन हेलिकॉप्टर झेप घेते. झाम्बेझीच्या प्रवाहाभोवतीचा दलदलीचा प्रदेश, तसेच त्यातील पाणघोडे, हत्ती, गेंडे यांचे जवळून दर्शन झाले. आफ्रिकेतल्या गेंडय़ांच्या नाकावर दोन शिंगे असतात.  दरीतून वाहणाऱ्या झाम्बेझीच्या दोन्ही कडांवर इंद्रधनुष्याचे पंख पसरले होते. हेलिकॉप्टरबरोबर ते इंद्रधनुष्य पुढे पुढे धावत होते. हेलिकॉप्टरच्या पट्टीवर उतरलो तर समोर ५० फुटांवरून १०-१२ थोराड हत्ती-हत्तीणी व त्यांच्या पिल्लांचा डौलदार कळप गजगतीने एका सरळ रेषेत निघून गेला.
झाम्बिया म्हणजे पूर्वीचा उत्तर ऱ्होडेशिया. या छोटय़ा देशाभोवती अंगोला, कांगो, टांझानिया, मालावी, मोझ्ॉम्बिक, झिम्बाब्वे (पूर्वीचा दक्षिण ऱ्होडेशिया), बोटस्वाना आणि नामिबिया अशी छोटी छोटी राष्ट्रे आहेत. मे ते ऑगस्टपर्यंत इथले हवामान अत्यंत प्रसन्न असते. सुपीक जमीन, घनदाट जंगले, विस्तीर्ण सरोवरे, नद्या, जंगली जनावरांचे कळप, सुंदर पक्षी यांची देणगी या देशाला लाभली आहे. नद्यांवर धरणे बांधून इथे वीजनिर्मिती केली जाते. तांब्याच्या खाणी, झिंक, कोबाल्ट, दगडी कोळसा, युरेनियम, मौल्यवान रत्ने, हिरे, तसेच उत्तम प्रतीचा ग्रॅनाइट व संगमरवरी दगडही इथे सापडतो. इथे गायी व मेंढय़ांचे मोठमोठे कळप आढळतात. तंबाखू, चहा, कॉफी, कापूस, ऊस यांचे विपुल उत्पादन होते. सफरचंद, केळी, अननस, संत्र्यांचे उत्पन्न होते. १९६४ साली ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळवल्यापासून २७ वर्षे राष्ट्राध्यक्ष असलेल्या केनेथ कोंडा यांनी या राष्ट्राला प्रगतीपथावर नेले. स्कॉटिश संशोधक डॉ. डेव्हिड लिव्हिंग्स्टन यांना १८५५ मध्ये या महाकाय धबधब्याचा शोध लागला. त्यांनी धबधब्याला आपल्या देशाच्या राणी व्हिक्टोरियाचे नाव दिले. ५,६०० फूट रुंद आणि ३५४ फूट खोल असलेला हा धबधबा जगातील सात नैसर्गिक आश्चर्यापैकी एक मानला जातो. युनेस्कोने त्याला ‘वर्ल्ड हेरिटेज’चा दर्जा दिला आहे.
आम्हाला व्हिक्टोरिया धबधब्याचे खूप जवळून दर्शन घ्यायचे होते. धबधब्याच्या पुढय़ातील डोंगरातून रस्ता तयार केला आहे. रस्ता उंच-सखल, सतत पडणाऱ्या पाण्यामुळे बुळबुळीत झालेला. आधारासाठी बांधलेले लाकडी कठडय़ाचे खांबही शेवाळाने भरलेले. मधेच दोन डोंगर जोडणारा, लोखंडी खांबांवर उभारलेला छोटा पूल. गाइडबरोबर या रस्त्यावरून चालताना धबधब्याचे रौद्रभीषण दर्शन होत होते. अंगावर रेनकोट असूनही तुषारांमुळे सचैल स्नान घडले. शेकडो वर्षे अविरत कोसळणाऱ्या धबधब्यामुळे त्या भागात अनेक खोल घळी (गॉर्जेस) तयार झाल्या आहेत. धबधब्याचा नजरेत न मावणारा विस्तार, उंचावरून खोल दरीत कोसळतानाचा तो आदिम मंत्रघोष, सर्वत्र उसळणारे धुक्यासारखे पांढरे ढग.. सारेच स्तिमित करणारे. एकाच वेळी त्यावर चार-चार इंद्रधनुष्यांची झुंबरं झुलत होती. ती झुंबरं वाऱ्याबरोबर सरकत डोंगरकडांच्या झुडपांवर चढत होती. हा नयनमनोहर खेळ कितीही वेळ पाहिला तरी अपुराच वाटत होता. ते अनाघ्रात, रौद्र-भीषण सौंदर्य कान, मन, डोळे व्यापून उरत होतं. स्थानिक भाषेत या धबधब्याला ‘गडगडणारा धूर’ असं म्हणतात, ते अगदी सार्थ वाटलं.
मार्गदर्शकाने नंतर झाम्बेझी नदीचा प्रवाह जिथून खाली कोसळतो त्या ठिकाणी नेले. तिथल्या खडकांवर निवांत बसून पाण्याचा खळखळाट ऐकला. झाम्बेझीचे तीर्थ घेतले.
संध्याकाळी झाम्बेझी नदीतून क्रूझची दोन तासांची सफर होती. तिथे जाताना आवारामध्ये एकजण लाकडी वाद्य वाजवत होता. मरिम्बा (टं१्रेुं) हे त्या वाद्याचे नाव. पेटीसारख्या आकारातल्या लाकडी पट्टय़ांवर दोन छोटय़ा काठय़ांनी तो हे सुरेल वाद्य वाजवीत होता. पट्टय़ांच्या खालच्या बाजूला सुकलेल्या भोपळ्याचे लहान-मोठे तुंबे लावले होते. इथे झाम्बेझीचे पात्र संथ आणि विशाल होते. नदीत लहान-मोठी बेटं होती. नदीतले बुळबुळीत, चिकट अंगाचे पाणघोडे (हिप्पो) खडकांसारखे वाटत होते. श्वास घेण्यासाठी त्यांनी पाण्याबाहेर तोंड काढून जबडा वासला की त्यांचे अक्राळविक्राळ दर्शन घडे. एका बेटावर थोराड हत्ती भलेमोठे झाड उपटण्याच्या प्रयत्नांत होते. त्यांचे कान राक्षसिणीच्या सुपाएवढे होते. दुसऱ्या एका बेटावर अंगभर चॉकलेटी चौकोन असलेल्या लांब लांब मानेच्या जिराफांचे दर्शन घडले. काळे, लांब मानेचे (स्नेक नेक) बगळे, लांब चोचीचे करकोचे, चिमण्यांच्या रंगाचे मोठे पक्षी, थव्याने झाडांवर बसलेले पांढरेशुभ्र बगळे, गरूड, घारी या साऱ्यांनी आम्हाला दर्शन दिले. निसर्गाने किती विविध प्रकारची अद्भुत निर्मिती केलेली आहे, नाही?
सूर्य हळूहळू केशरी होऊ लागला होता. सूर्यास्त टिपण्यासाठी साऱ्यांचे कॅमेरे सज्ज झाले. दाट शांतता सर्वत्र पसरली. आणि एका क्षणी झाम्बेझीच्या विशाल पात्रात सूर्य विरघळून गेला. केशरी झुंबरं लाटांवर तरंगत राहिली.
साधारण नव्वदच्या दशकापर्यंत आफ्रिकेला ‘काळे खंड’ म्हटले जाई. आजही या खंडाचा काही भाग गूढ, अज्ञात आहे. सोनेरी, हिरवे गवत, फुलांचा केशरी, लाल, पांढरा, जांभळा, गुलाबी रंग, प्राणी आणि पक्ष्यांचे अनंत रंग, धबधब्याच्या धवलशुभ्र रंगावर झुलणारी इंद्रधनुष्ये, अगदी मनापासून हसून आपले स्वागत करताना तिथल्या देशबांधवांचे मोत्यासारखे चमकणारे दात.. सगळी रंगमयी दुनिया. हे अनुभवताना नाटय़छटाकार दिवाकरांची एक नाटय़छटा आठवली. ती भूमी जणू म्हणत होती- ‘काळी आहे का म्हणावं मी? कशी छान, ताजी, रसरशीत, अगणित रंगांची उधळण करणारी सौंदर्यवती आहे मी!’

मराठीतील सर्व लेख ( Lekha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Trip to zimbabwe and victoria fall