scorecardresearch

शेजीचा नवरा घडीभर देखला, निदाणीचा जीव एकला

दक्षिण वाशीम जिल्ह्य़ातील वऱ्हाडी बोलीचं रूप आगळंच आहे. तिची काही रूपं : * केळी केळी येदना, घाव तिथं वावधना * तोंड पाह्य़लं गवरीवाणी, कुखू लेते मव्हरीवाणी

शेजीचा नवरा घडीभर देखला, निदाणीचा जीव एकला

दक्षिण वाशीम जिल्ह्य़ातील वऱ्हाडी बोलीचं रूप आगळंच आहे. तिची काही रूपं :
*    केळी केळी येदना, घाव तिथं वावधना
*    तोंड पाह्य़लं गवरीवाणी, कुखू लेते मव्हरीवाणी
*    नवझणं मुऱ्हाळी डांगरी चोळी
*    खेळवण लडती कोल्डे डोळे, ऐका चलवादीचे चाळे
*    आवस पुनव पाळते, व्हळीच्या गवऱ्या जाळते
*    भुतामव्हरं मुताचा दिवा
*    शेजीचा नवरा घडीभर देखला, निदाणीचा जीव एकला
*    झाकापाका केला, काका कुठीसा गेला?
मी संग्रहित केलेल्या १३२३ म्हणींपैकी या वरच्या आठ प्रातिनिधिक स्वरूपातल्या म्हणी घेऊन दक्षिण वाशीम जिल्ह्य़ातील मराठवाडय़ाच्या सीमेलगतच्या भागात बोलल्या जाणाऱ्या वऱ्हाडी बोलीचं एकूण स्वरूप मांडण्याचा हा प्रयत्न.. वाशीम जिल्हा वऱ्हाड प्रांतातला- अमरावती महसूल विभागातला अगदी दक्षिणेकडचा जिल्हा. त्याच्या दक्षिणेला हिंगोली जिल्हा, पश्चिमेला बुलडाणा जिल्हा, उत्तरेला अकोला, तर पूर्वेला यवतमाळ-अमरावती हे जिल्हे. या जिल्ह्य़ात सहा तालुके. वाशीम तालुका हा दक्षिणेकडे. रिसोड दक्षिण आणि पश्चिमेकडचा तालुका. मालेगाव हा पश्चिम-उत्तरेकडचा. मंगरूळ उत्तर-पूर्वेला. कारंजा-मानोरा हे दोन्ही पूर्व दिशेचे तालुके. यातल्या वाशीम व रिसोड या तालुक्यांतली वऱ्हाडी बोली (जरी हे तालुके वऱ्हाडातले असले तरी!) ही पूर्णत: वऱ्हाडी नाही. बोली दर बारा कोसांवर बदलते, हे लक्षात घेतल्यास निखळ वऱ्हाडी बोलीच्याही अनेक छटा आढळून येतात. मालेगाव तालुक्याला लागून असणाऱ्या अकोला जिल्ह्य़ातील वऱ्हाडी बोलीचे नमुने पाहू या. (१) मांडय़ाले गेलो तं कंडय़ाले जाते- दाब्याले गेलो तं फाटय़ाले जाते. (२) इकडे झाळे, तिकडे झाळे (येथे ‘ड’चा ‘ळ’ झाला.)- इकडे फडे, तिकडे फडे (येथे ‘ळ’चा ‘ड’ झाला.) या बोलीचा बराचसा प्रभाव मालेगाव तालुक्यावर असणे स्वाभाविक आहे. मंगरुळ पीर-कारंजा-मानोरा हे तालुके अकोला, अमरावती, यवतमाळ जिल्ह्य़ांशी संलग्न. त्यामुळे त्या तालुक्यात गूय, पोयी (‘ळ’चा ‘य’), मले-तुले, करून राहिलो-पाहून राहिलो अशी शब्दरूपे येताना दिसतात. (अपवाद मानोरा तालुक्याचा. हा तालुका आदिवासीबहुल असल्याने तेथे त्यांच्या स्वतंत्र बोलीचा प्रभाव अधिक आहे.)
या लेखात वाशीम जिल्ह्य़ातील वाशीम तालुका आणि लगतच्या रिसोड तालुक्यातील बोलीचा विचार केला आहे. या दोन तालुक्यांतील बोली ना धड वऱ्हाडी, ना धड मराठवाडी अशी आहे. ती संमिश्र स्वरूपाची आहे. याचे कारण या दोन तालुक्यांतील लोकांचा बेटीव्यवहार. या बेटीव्यवहाराची प्रादेशिकता व्यापक आहे. मराठवाडय़ातला िहगोली-परभणी जिल्हा, बुलडाणा जिल्हा आणि वाशीम जिल्ह्य़ातील इतर तालुक्यांसह अकोला-अमरावती-यवतमाळ जिल्हा. त्यातही अधिक प्रमाणाचा विचार केला तर हिंगोली जिल्हा आणि वाशीम जिल्ह्य़ातील उर्वरित तालुके यांत हे परंपरेनं चालत आलेलं आहे. त्यामुळे गंमत अशी होते की, एका घरात सासू मराठवाडय़ाची, तर तिच्या तीन सुनांपैकी दोन किंवा एक मराठवाडय़ातली, तर उरलेल्या वऱ्हाडातल्या-म्हणजे वाशीम जिल्ह्य़ातील उर्वरित तालुक्यांतल्या. ही बाब उलटसुलट कशीही. या वेगवेगळ्या भूप्रदेशांतून येणाऱ्या लेकीबाळी आपापल्या माहेरमातीचं बोलीरूप लेणं आपल्यासोबत आणतात. आणि त्या- त्या बोलीरूपांचा वापर मरेपर्यंत करत राहतात. गेल्या ४५ वर्षांपासून माझी पत्नी अजूनही आमच्या घराच्या पायऱ्या ‘रेंघते’ (मूळ शब्द ‘वेंधणे-चढणे’) आहे. आणि घरातले इतर (आम्ही) मात्र आमच्या घराच्या पायऱ्या ‘येंधतो’! त्यामुळे झाले काय, की मी ‘हाल्या हाल्या दुधू दे’ ही कादंबरी वऱ्हाडीत लिहिलेली असली तरी ती मराठवाडय़ातील वाचकांनाही आपल्याच बोलीत आहे असे वाटते.
हीच गंमत लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या म्हणींतून स्पष्ट होते. या म्हणींत ‘मले-तुले’ स्वरूपाची एकही म्हण नाही. याचं कारण ‘मले-तुले’ ही शब्दरूपं बाळबोध स्वरूपाची असतात. मात्र, केवळ ‘मले-तुले’ म्हणणं म्हणजे संपूर्ण वऱ्हाडी बोली नव्हे. माझ्या घरी मराठवाडय़ातून आलेली माझी पत्नी, एक सून यांचा अपवाद वगळता इतर सर्वजण ‘मले-तुले’ म्हणतात. ‘ळ’चा ‘य’ किंवा ‘ड’ होत नाही. ‘ड’चा ‘ड’च राहतो. (लडती, कोल्डे, डोळे, घडीभर, इत्यादी) ‘व’साठी कुठे कुठे ‘य’ (वेदना- येदना) वापरलेला दिसतो.
कवी डॉ. विठ्ठल वाघ यांना २५ वर्षांपूर्वी माझ्या शाळेतील मुलामुलींमार्फत त्यांच्या आया-आज्यांकडून संकलन करून १३२३ म्हणी दिल्या होत्या. त्या म्हणींचा समावेश त्यांनी त्यांच्या ‘वऱ्हाडी म्हणी’ या ग्रंथात केला आहे. त्यातल्या काही म्हणी या ग्रंथात संपादित स्वरूपात आढळतात. उदा. मूळ म्हण- लय झाला आयदी, गुळाचा गणपती. समाविष्ट म्हण- लय झाली आयती, गुयाचा गणपती. त्यांनी ‘गुळाचा’ ऐवजी ‘गुयाचा’ असं बोलीरूप वापरलंय. आणि तसं ते प्रत्यक्षात वापरलं जात असेलच यात वाद नाही. कारण म्हणींना विशिष्ट प्रादेशिक मर्यादा घालता येत नाहीत. एकच म्हण विविध बोलींत त्यांच्या त्यांच्या लहेज्यांसह वापरली जाऊ शकते.
वरील आठ म्हणींत आलेल्या इतर शब्दांच्या बोलीरूपांबद्दल पाहू जाता पुढील शब्दरूपे लक्ष वेधून घेतात. येदना-वेदना, गवरी-गोवरी, कुखू-कुंकू, मोहरी-मव्हरी, लेते-लावते, पाह्य़लं-पाहिलं, वाणी-एवढं, तिथं-तेथे, नवझणं-नऊजण, कोल्डे-कोरडे, लडती-रडते, आवस-अमावस्या, पुनव-पौर्णिमा, व्हळी-होळी, मव्हरं-समोर, मुत-मुत्र, शेजी-शेजारीण, घडीभर-क्षणभर, देखला-पाहिला, निदाणीचा-अखेरीस, एकला-एकटा, झाकापाका-आवराआवर, कुठीसा-कोठे.
‘व्हय गं कोठं जाती?’ हे मराठवाडी बोलीतील एक वाक्य. या वाक्यात ‘व्हय’ या शब्दात ‘हो’चा ‘व्ह’ झालाय. मी वर दिलेल्या म्हणीतील एका म्हणीत ‘व्हळी-होळी’ असं आलेलं आहे. डॉ. विठ्ठल वाघ यांच्या ‘पारंपरिक वऱ्हाडी म्हणी’ या ग्रंथात ‘हो’च्या ज्या म्हणी दिल्यात तेथे ‘हो’चा ‘व्ह’ झालेला दिसत नाही. डॉ. वाघ यांनी या म्हणी वऱ्हाडातल्या पाचही जिल्ह्य़ांतून मोठय़ा कष्टानं मिळवल्या आहेत. त्यामुळे त्यांनी दिलेल्या वऱ्हाडी म्हणींची रूपं प्रमाण मानावयास हरकत नाही. आमच्या बोलीत ‘व्हता-होता’ असंही शब्दरूप येतं. अर्थात ‘व्ह’ हे शब्दरूप मराठवाडी बोलीचंच शब्दरूप आहे हे मान्य करण्यास हरकत नाही. वरील वाक्यात आणखी एक क्रियापदरूप आहे. ते म्हणजे ‘जाती’! मराठवाडी बोलीत ‘जाती, येती, बसती, उठती’ अशी स्त्रीलिंगी ईकारान्त क्रियापदरूपे  वापरली जातात. ही बाब सुरुवातीला दिलेल्या म्हणींपैकी चौथ्या म्हणीत दिसून येते.. लडती-रडते. येथे ‘ते’चा ‘ती’ झाला.
‘भुतामव्हर’ हा शब्द- त्यातील ‘मव्हर’ हा शब्दयोगी अव्यय. ‘मव्हर- पुढे’ या अर्थी येणारा हा शब्द क्वचितच वऱ्हाडी म्हणींत पाहायला मिळतो. कारण हा अव्यय मराठवाडी बोलीतला आहे. मात्र, ‘कुठीसा’ हे शब्दरूप वऱ्हाडी आहे. ‘कुठं-कुठी-कुठीया’ असं ते वेगवेगळ्या ठिकाणी वापरलं जाते. मी संकलित केलेल्या १३२३ म्हणींपैकी कित्येक म्हणींत वऱ्हाडी शब्दांबरोबरच मराठवाडी शब्दही विराजमान झालेले आढळून येतात. वरील म्हणींतील येदना, गवरी, कुखू, मव्हरी, पाह्य़लं, वाणी, तिथं, नवझणं, कोल्डे, आवस, पुनव, मुत, शेजी, झाकापाका इ. शब्द मराठवाडी बोलीतही वापरतात. म्हणी या बोलीचं बऱ्याच अंशी मूळ रूप प्रकट करतात. त्यांच्यावर परकी भाषेचं आक्रमण फारच कमी प्रमाणात झालेलं दिसतं. वरील म्हणींपैकी ‘देखला’ हे ‘देखा’ या हिंदी शब्दाचं भ्रष्ट रूप.
दक्षिण वाशीम जिल्ह्यातील नेमक्या वाशीम-रिसोड या तालुक्यातील बोली ना धड वऱ्हाडी, ना धड मराठवाडी. आमच्याकडच्या घराघरांत नांदणाऱ्या वऱ्हाडी आणि मराठवाडी बायकांचं घरात कमी- अधिक प्रमाण जे काही असेल- तशी तशी त्या- त्या घराची बोली आढळून येते.
वऱ्हाडी बायकाबहुल घरात ‘मले बसू दे न रे?’ असं म्हटलं जातं. तर मराठवाडी बायकाबहुल घरात ‘मला बसू दे की रे?’ असं बोललं जातं. ही शेजार-पाजारच्या घराघरांतून आढळून येणारी आगळीवेगळी गंमत माझ्यासारख्या ग्रामीण कथा-कादंबरीकाराला समृद्ध बोलीवैभव प्राप्त करून देते.

मराठीतील सर्व मायबोली बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-10-2013 at 01:01 IST

संबंधित बातम्या