ज्येष्ठ कवी शंकर वैद्य यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या अभ्यासू वृत्तीच्या, कवितेवरच्या प्रेमाच्या आणि मृदू स्वभावाच्या स्नेहाद्र्र आठवणींना कवयित्री नीरजा यांनी दिलेला उजाळा..
‘आ ईजवळ आहे जगण्यासारखं काही तरी; म्हणून देवा माझं आयुष्य तिला दे!’ असं म्हणणारे वैद्यसर तिलाही आपलं आयुष्य देऊ शकले नाहीत आणि सरोजिनीबाईंनाही. या दोघींच्या जाण्यानं ते कोसळून गेले होते आतून. ‘दिवस उगवला आहे म्हणून कसेतरी बळेबळे ढकलीत जगणं’ आलं होतं त्यांच्या वाटय़ाला. पण वैद्यसरांनी तेही जगणं स्वत:साठी सुसह्य़ केलं. आणि हे बळ त्यांना मिळालं ते त्यांच्यातल्या कवीकडून, कवितेवर भरभरून प्रेम करणाऱ्या माणसाकडून.
कविता जगणाऱ्या या मनस्वी माणसाची आणि माझी भेट झाली ती अरुण म्हात्रे यांच्या मुलुंडच्या घरी. मी नुकतीच लिहू लागले होते. वैद्यसर येणार म्हणून बाबांना म्हणजे
म. सु. पाटलांनाही गप्पा मारायला बोलावलं होतं. त्यांच्याबरोबर मीही गेले. तिथं आज नावारूपाला आलेले अनेक जण होते. आज सगळीच नावं आठवत नाहीत, पण अशोक नायगावकर, अशोक बागवे, रवींद्र लाखे वगरे मंडळी तिथं होती. खूप छान गप्पा रंगल्या होत्या. छंदोबद्ध कविता आणि मुक्तछंदातील कविता यावर वाद रंगात आला होता. सर छंदोबद्ध कवितेविषयी आत्मीयतेनं आणि हिरिरीनं बोलत होते. ती आठवण आजही
मनात आहे.
सरांनी कवितेवर मनापासून प्रेम केलं आणि ती लिहिणाऱ्या कवींवरही. केवळ स्वत:च्या कवितेवर बोलणारे खूप असतात, पण सर सगळ्यांच्या कवितेवर भरभरून बोलायचे. वैद्यसर जुन्या कवींबरोबर जेवढे रमले, तेवढेच नव्या कवींमध्येही रमले. सरांनी नव्यानं लिहिणाऱ्या कवींना नेहमीच प्रोत्साहन दिलं. त्यांच्या कविता ऐकल्या, वाचल्या, त्यावर चर्चा केल्या. त्यातले कच्चे दुवे सांगतानाच त्यांच्या शब्दांतल्या सामर्थ्यांचीही जाणीव करून दिली. माझीही कविता ते आस्थेनं वाचायचे. भेटले की आवर्जून वाचल्याचं सांगायचे. मला आठवतं, माझा दुसरा संग्रह ‘वेणा’ निळकंठ प्रकाशन काढणार होतं. त्यासाठी कोणाची प्रस्तावना घ्यायची याचा आम्ही विचार करत होतो. नेमक्या त्याच दिवसांत आम्ही एका लग्नसमारंभासाठी गेलो होतो. वैद्य सर तिथं आलेले होते. माझ्या आईनं मला थेट त्यांनाच विचारायला सांगितलं. माझी त्यांच्याशी ओळख होती थोडीफार, पण त्या ओळखीवर थेट असं विचारण्याचं धाडस नव्हतं. बाबाही होते तिथं. पण ते असलं काही विचारणार नाहीत हे आईला माहीत होतं. आई सरोजिनीबाईंची एम.ए.ची विद्याíथनी. ती थेट सरांकडे गेली आणि ‘माझ्या लेकीच्या संग्रहाला प्रस्तावना लिहाल का?’ म्हणून विचारलं. मी नकार ऐकण्याची तयारी ठेवली होती, पण सर सहज ‘हो’ म्हणाले आणि मला कविता घेऊन यायला सांगितलं.
कवितांचं बाड घेऊन मी सरांच्या माटुंग्याच्या घरी गेले. त्यांनी खूप छान स्वागत केलं. एवढा मोठा माणूस आपल्याशी कसा वागेल याचं भय मनात होतं, पण त्यांच्या ऋजू स्वभावानं मला तेव्हाच जिंकलं. त्या वेळी त्यांच्या आईचीही त्यांनी भेट घालून दिली. मला आठवतं, मी जेव्हा त्यांनी लिहिलेली प्रस्तावना आणायला गेले होते, तेव्हा त्यांनी मला त्यांनी काढलेल्या नोटस् दाखवल्या. एक नवी लिहिणारी मुलगी आहे. तिच्या संग्रहासाठी काही उत्तेजनार्थ थातुरमातुर त्यांना देता आलं असतं. पण त्यांनी खरोखरच खूप अभ्यास केला होता. प्रेम हा सरांच्या जगण्याचा गाभा होता. त्यातली कोवळीक, असोशी त्यांना आकर्षति करत असायची. कदाचित म्हणूनच माझ्या या संग्रहात त्यांनी अशा कवितांचाही शोध घेतला. जगण्यातली असोशी शोधणाऱ्या या कवीचा िपड पूर्णपणे वेगळा असूनही त्यांनी माझ्या स्त्रीजाणिवेच्या कवितांमधील वेदनाही शोधली होती.
त्यानंतरही सर भेटत राहिले अनेक कार्यक्रमांतून आणि त्यांच्या कवितेतून. त्यांनी अध्यक्षपद भूषवलेल्या आणि सूत्रसंचालन केलेल्या अनेक कविसंमेलनांत मला भाग घेता आला. कविसंमेलनाचं सूत्रसंचालन म्हणजे विनोद किंवा करमणूक असं मानणाऱ्या आजच्या माहोलात सरांचं सूत्रसंचालन हे त्यांच्या वेगळेपणामुळे उठून दिसायचं. अनेक कवितांचे संदर्भ देत, कवितेवर मिश्किल भाष्य करत ते श्रोत्यांना भारावून टाकत. ज्ञानदेव, तुकाराम, केशवसुत मर्ढेकरांपासून आजच्या अनेक कवींच्या कविता त्यांना
पाठ असत.
कविसंमेलनात वाचलेली कविता आवडली की ते लगेच आवर्जून सांगत. मध्ये एका दिवाळी अंकात माझी स्त्री-पुरुषातील शारीर संबंधांवर भाष्य करणारी कविता आली होती. त्यानंतर जेव्हा सर भेटले तेव्हा हळूच माझ्याजवळ येऊन म्हणाले, ‘वाचली बरं का तुझी कविता. कविता छानच आहे, पण जरा बोल्ड आहे.’
सरोजिनीबाई गेल्यावर मी त्यांना पत्र लिहिलं होतं. त्या पत्राला त्यांनी थोडय़ाच दिवसांत उत्तरही पाठवलं होतं. आणि अशा वेळी आलेलं माझं पत्र किती महत्त्वाचं होतं, हे सांगतानाच बाई गेल्यानं नेमकं काय गमावलं आहे हेही लिहिलं होतं.
फार एकटे झाले होते सर या दिवसांत. आपला एकटेपणा घालवण्यासाठी ते कामं घेत होते. कार्यक्रमांत सहभागी होत होते. दादरच्या आसपासच्या भागात कुठंही साहित्यिक कार्यक्रम असेल तर तिथं ऐकायला म्हणून आवर्जून जात होते. दुसऱ्याचंही ऐकायला जाणारे लेखक तसे कमी असतात, पण सर मात्र याला अपवाद होते.
गेल्या वर्षी मी आणि सर एका पुरस्कार समितीवर एकत्र काम केलं. सगळी पुस्तकं सरांच्या घरी आणून टाकली होती. मला ते म्हणाले, ‘मी आधी वाचून घेतो. दोन गठ्ठे करतो आणि मग तू ये.’ मी जेव्हा त्यांच्या घरी गेले, तेव्हा एक न आवडलेल्या कवितांचा गठ्ठा आणि दुसरा बऱ्या वाटलेल्या कवितांचा गठ्ठा त्यांनी माझ्या पुढे ठेवला. आणि ‘तू पाहा आता सगळी पुस्तकं’ म्हणून मी पुस्तकं वाचेपर्यंत ते चहा ठेवायला गेले. त्या काळात त्यांच्या हालचाली तशा मंद झालेल्या होत्या. मी म्हटलं, ‘सर, मी चहा करते, मला फक्त डबे दाखवा.’ तर म्हणाले, ‘ नको. मीच करतो. तू काम कर, ते महत्त्वाचं आहे. मी चांगला चहा करतो. तू बाईंच्या हातचा चहा प्यायला आहेस, माझ्या हातचा नाही. तो कधी पिणार?’ सरांनी चहा केला. मग एका ट्रेमध्ये खाऊची बशी, चहाचा कप आणि वाटीत त्यांच्या मुलानं आणलेली चॉकलेटस् ठेवून माझ्यासमोर आले. चहाचा कपही धुवायचा नाही अशी ताकीद दिली होती त्यांनी मला. पण मला काही ते जमलं नाही. मी त्यांच्या स्वयंपाकघरात गेलेच. अगदी नेटकं ठेवलं होतं त्यांनी ते. सगळं घरच व्यवस्थित ठेवलं होतं. मग फक्त कवितेवर चर्चा.
त्यांना नमस्कार करून घरातून बाहेर पडले तर त्यांनी नेहमीप्रमाणे हात हातात घेतला. ‘पुन्हा ये’ असं म्हणाले. त्यांच्या हाताचा तो आश्वासक, जिव्हाळ्यानं भरलेला ओला स्पर्श घेऊन मी घरी आले. त्याआधी आणि त्यानंतरही तो स्पर्श भेटत होता आणि भेटत राहिलाही. आता मात्र त्यांच्या त्या कविता, कवितांमागच्या कथा आणि शेकडो कवितांनी भरून राहिलेलं मन भेटणार नाही. सरांच्या कवितेवरच्या प्रेमाला सलाम!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran marathi poet shankar vaidya
First published on: 28-09-2014 at 01:13 IST