डॉ. आशुतोष जावडेकर

मी काही रोजच्या रोज दैनंदिनी लिहीत नाही; पण कधी काही विशेष घडलं तर टिपण अवश्य लिहितो. जन्मभर पत्रकारिता केल्याने ते मोजक्या शब्दांतच लिहून होतं! आज तसं खास वाटतंय म्हणून हे लिहितोय..

संध्याकाळी सोसायटीच्या बागेत पाय मोकळे करायला गेलेलो, तर तेजस आणि त्याचा नवा कंपू दिसला. त्याची ती कोण नवी माही नावाची मत्रीण आहे.. ती तुमचे काय ते सेल्फी फोटो काढत होती. परवाच मी घरी हिला म्हटलेलं, ‘‘सध्या तेजस नव्या मत्रिणीचं नाव सारखं घेतो नाही?’’ आमची ही म्हणाली, ‘‘चाळिशीचं चळ लागतंच तुम्हा पुरुषांना! मी काय आत्ता बघतेय? पण तेजस नाही हो तसा!’’ आमचा मुलगा आणि नातू अमेरिकेत असल्याने ही तेजस आणि त्याच्या मुलावर जीव लावून दुधाची तहान ताकावर भागवत असते. त्यामुळे तिने अशी कड घेतली यात काही आश्चर्य नव्हतं.

पण आत्ता तेजस ज्या नजरेनं माही सेल्फी घेताना तिच्याकडे बघत होता, ती नजर मला तरी प्रेमाची,आकर्षणाचीच वाटली. तितक्यात त्या अरिनचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि तो म्हणाला, ‘‘हाय रेळेअंकल!’’ हा विशीचा पोरटा एक दोन वेळेलाच भेटलाय, पण त्याची बेधडक मतं मात्र तेजसकरवी माझ्या कानावर नित्य पडत असतात. तेजसनं उत्साहात मान फिरवत ‘काका’ अशी हाक घातली आणि उठून माझ्याकडे आला, ‘‘या काका सेल्फीत. आम्ही सेल्फी घेतोय.’’

आता, हे सेल्फी प्रकरण खरं मला आवडत नाही. एक तर कुठे बघायचं, हेच कळत नाही. शिवाय सगळे जास्तच चिकटून उभे राहतात. कॅमेऱ्यासमोर फोटो काढताना कसा एक रुबाब असतो! इथे घाईगडबड वाटते. शिवाय एक सेल्फी काढून या पोरांचं भागत नाही. महिन्यापूर्वी रिटायर झालो तेव्हा निरोपाच्या दिवशी तर ऑफिसमधल्या दिवटय़ांनी सेल्फी-उच्छाद आणला. तरी सेल्फीच्या नादात किती लोक जीव गमावतात, याची किंवा व्हिडीओ गेमच्या नादात आत्महत्या करतानाही सेल्फी काढणाऱ्या त्या तरुण पोराची स्टोरीही आम्हीच मुख्य पानावर मधे लावली होती. पण तेजसनं ज्या प्रेमानं मला हाक मारलेली ते बघता, हे मी सगळं मनातच ठेवलं आणि त्या सेल्फी-सोहळ्यात सामील झालो!

अरिनच्या हातातून स्वत:चा फोन काढून घेत तेजसनं हात अस्सा लांबच्या लांब उंचावला आणि म्हणाला, ‘‘कम ऑन! सगळे जवळ या, इकडे बघा.’’ आणि मग आमच्या चौघांचा तो सेल्फी पार पडला. मी निघणारच होतो, पण तेजसनंच थांबवलं. मग काही गप्पा झाल्या. शेवटी मनात डाचत असलेला प्रश्न मी विचारलाच- ‘‘काय रे, तुमच्या पिढीला सेल्फीचा कंटाळा येत नाही का?’’ माही पटकन् म्हणाली, ‘‘काका, आम्ही मुली जास्त स्मार्ट असतो. आम्ही सेल्फीऐवजी सोबत असलेल्या मित्रांना आमचे मस्त फोटो काढायला लावतो!’’ अरिन हसत म्हणाला, ‘‘काका, यू वोन्ट बिलिव्ह, या माहीने परवा आम्ही दोघे टेकडीवर गेलेलो तेव्हा माझ्याकडून अख्खं फोटोसेशन करून घेतलं.  हिचे निदान शंभर फोटो मी काढले!’’ ‘‘प्लीज, आवरा! जेमतेम तीस फोटो काढले आहेस अरिन तू माझे आणि त्यातलेही फायनली पंधराच अपलोड करण्याजोगे निघाले! बिसाइड्स, मी फेसबुकवर तुला फोटो क्रेडिट दिल्यावर तुला काही भारी मुलींच्या रिक्वेस्टी आल्यात, हेही सांग काकांना!’’ आम्ही सगळे हसलो.

तेजस म्हणाला, ‘‘तुमच्या मूळ मुद्दय़ाकडे येतो काका. मला सेल्फी काही फार आवडत नाहीत. पण ऑफिसमुळे सवय झाली. आधी तर मला यायचेच नाहीत सेल्फी काढता. हातच हलायचा, कधी डोक्यावरचे केस कापले जायचे फोटोत; काही विचारू नका! आत्ताही अरिन जसा सहज सेल्फी घेतो तितक्या सहज मला जमत नाहीच.’’

मग मला एकदम जाणवलं, की मी या तिघांना एकाच तरुण पिढीत मोजतो; पण त्यांच्यातही असे फरक आहेत. अरिनला मग मी विचारलं, ‘‘तुला का बरं सेल्फी आवडतात?’’ माही मध्ये घुसत म्हणाली, ‘‘आधी मी सांगते. मला स्वत:ला बघायला आवडतं- विशेषत: मी छान सजते तेव्हा! लेट्स अ‍ॅडमिट इट गाइज्. आपल्याला सगळ्यांना आवडतं हे.’’ अरिन म्हणाला, ‘‘लाइक, तू छान दिसतेस माही; पण छान न दिसणाऱ्या लोकांनाही सेल्फीत छान आपण दिसतोय असं वाटत असतं. काय काय सेल्फी इन्स्टावर पडत असतात!’’ तेजस म्हणाला, ‘‘काका, बेसिकली असंय ना, की सेल्फी काढताना कुणाला ‘आमचा फोटो काढता का?’ अशी विनंती करावी लागत नाही. आपण बरं, आपला सेल्फी बरा!’’ ‘‘तेजसदा..’’ अरिन उत्तेजित होत म्हणाला, ‘‘पण हे झालं एकटय़ाच्या सेल्फीचं रे! दोघांचे सेल्फी ही वेगळी गोष्ट आहे. आणि ग्रुपचे सेल्फी तर विचारायलाच नकोत!’’

मी ऐकत होतो. मला एकदम आठवलं म्हणून मी भर घालत म्हणालो, ‘‘अरे, आणि मी ऐकलेलं की, आजकाल अनेक सेलेब्रिटी सेल्फी काढू देत नाहीत.’’ माही म्हणाली, ‘‘सेल्फीच्या नावाखाली हिरोईनच्या अंगाला हात लावणं, खेटून उभं राहणं हेच जास्त चालतं म्हणून असणार..’’ अरिन मध्येच उद्गारला, ‘‘हे तर आमच्या कॉलेजातही चालतं. पण आम्ही मुलगे नाही, तर मुलीच आमच्यासोबत सेल्फी काढायला जवळजवळ येतात.’’ तेजस एकदम हसला आणि म्हणाला, ‘‘बरंय, आम्ही कॉलेजात असताना मुळात सेलफोनच नव्हते. हे असं सारखं जवळ येणार म्हणजे अवघडच झालं असतं!’’ अरिन डोळा मारत म्हणाला, ‘‘काय अवघड झालं असतं रे? चांगला डीओ वापरलेला असला म्हणजे झालं!’’ आणि मग तिघे हसले.

माझ्यासमवेत असताना त्यांनी असं मोकळं बोलावं याचा मला आनंद झाला. घरात आम्ही आजकाल दोघेच असतो आणि असं हसणं पटकन् ऐकू येत नाही. तितक्यात माही म्हणाली, ‘‘काका, माझा गीतेश शिंदे नावाचा कवी मित्र आहे. त्याची कविता मी फॉरवर्ड करते. तुम्हाला पटेल.’’ आणि मग तिने ती कविता वाचून दाखवली- ‘‘सेल्फीच्या भाराने माणुसकीचं झालंय सव्‍‌र्हर डाऊन, झालो सेल्फिश मेलेल्या भावनांना श्रद्धांजली वाहून..’’

तेजसनं पसंतीची मान हलवली आणि म्हणाला, ‘‘अरिन, तुझ्या पिढीला हे जास्त लागू आहे.’’ अरिन पटकन बोलला, ‘‘चक्! म्हणजे मान्य आहे काहीसं, पण तरी हे एकेरी चित्र आहे! एक तर सगळेच सेल्फी काढतात सध्या, म्हणजे सगळ्या वयाचे लोक. दुसरं, निदान माझी जनरेशन सेल्फी काढताना कुठल्या भ्रमात नसते यार! आम्ही जवळ उभे राहिलो तरी आम्ही जवळचे नाही आहोत, नसणार आहोत हे आम्हाला क्लीअर असतं. तेजसदा, तुझ्याच पिढीचा याबाबत गोंधळ वाटतो मला. तिसरं, आम्ही रोज नवे सेल्फी अपलोड करतो, म्हणजे काय करतो? तर.. जुने मागे सारतो, भूतकाळ मागे टाकतो. रोज नव्यानं स्वत:ला भेटतो, कंटाळत नाही स्वत:ला. अनलाइक यू ऑर यू ऑल!’’

अरिन इतका काही प्रगाढ आणि महत्त्वाचं बोलेल अशी बहुधा माझीच नाही, उरलेल्यांचीही अपेक्षा नव्हती. त्यामुळे सगळे शांत झाले. माही म्हणाली, ‘‘परफेक्ट. पटतंय. अजून एक भर घालते. सेल्फी काढताना स्वत:चा अभ्यास होतो. मी पूर्वी हसल्यावर, बसल्यावर, खट्ट झाल्यावर लोकांना कशी दिसते, हे मला कळायचं नाही. पण आता अनेक मूड्सचे सेल्फी घेतल्यावर कळतं.’’ तेजस म्हणाला, ‘‘मला अजूनही काही एकटय़ाचं सेल्फी प्रकरण फार खास वाटत नाही. पण हा, आपल्या जवळच्या माणसांसोबत सेल्फी काढताना छान वाटतं. जसं आत्ता वाटलं मगाशी. मला कारण माहीत नाही आणि खरं कारण कळायलाच पाहिजे असंही वाटत नाही. आय लव्ह यू गाइज!’’ आणि मग माझ्याकडे बघत तो पुढे म्हणाला, ‘‘आणि यात तुम्हीही आलात काका!’’ माही म्हणाली, ‘‘ओये! क्या बात है! ये तो सेंटी हो गया यार!’’ अरिन हसत हातातला फोन उंचावत म्हणाला, ‘‘या मोमेंटची सेल्फी हवी!’’ सगळ्यांनी बोटांचं काहीसं वेगळंच चिन्ह केलं. डेव्हिल नावाचं. ते काही मला जमेना, पण मी आनंदात सामील झालो आणि बोटाचा ‘व्ही’ केला!

घरी परत आलो तेव्हा ज्ञानदेवांची ओवी एकदम आठवली. पाण्यापाशी वाकून पाण्यात प्रतिबिंब बघणाऱ्या माणसालाही जाणवतं, की ते माझं पाण्यातील प्रतिबिंब आणि मी हे अखेर वेगळे आहोत- ‘तरी तो निभ्रांत। ओळखे आपण..’ आणि मग तितक्यात व्हॉट्सअ‍ॅपवर मगाचचे तेजसनं पाठवलेले सगळे सेल्फी पोचले. आणि एकदम प्रतीत झालं की, माऊलींनी सेल्फीचीच व्याख्या केली आहे की या ओवीत! निभ्रांत ओळख दाखवणारा सेल्फी मीही काढायला हवा! मग मी हात फोनसह उंचावला. थरथरला थोडा. फोन तिरका झाला, हलला. पण हसलो स्वत:च्या प्रतिबिंबाकडे बघत आणि नेट लावून बटण दाबलं.. आणि मग तो सेल्फी तेजसला पाठवून दिला!

ashudentist@gmail.com