जपानच्या दक्षिणेला असलेला ओकिनावा प्रांत एका वैशिष्टय़ामुळे जगभर ओळखला जातो. हे वैशिष्टय़ म्हणजे तिथे राहणाऱ्या लोकांचं दीर्घ आणि निरोगी आयुष्य. जगातील इतर भागांच्या तुलनेत ओकिनावामध्ये वयाची शंभरी पार केलेल्या लोकांची (तरुणांची) संख्या जास्त आहे. तेथील केवळ सरासरी वयोमानच जास्त आहे असं नाही, तर वयाच्या नव्वदीतही समर्थपणे राहू शकणाऱ्या आणि काम करू शकणाऱ्या लोकांची संख्याही लक्षणीय आहे. असं खरंच काय आहे ओकिनावाच्या मातीत- ज्यामुळे त्याला जगातील सर्वात आनंदी, आरोग्यदायी जागा असं म्हणणं वावगं ठरू नये? तिथलं खानपान, तिकडचं हवामान अशी काही कारणं निश्चितच देता येतील; पण ओकिनावाच्या या वैशिष्टय़ामागचं अजून एक महत्त्वाचं कारण मानलं जातं ते म्हणजे- त्यांच्या संस्कृतीत असलेली एक जीवनविषयक संकल्पना- ‘इकीगाय’ (ikigai)!
जपानी भाषेत ‘इकी’ (Iki) म्हणजे जीवन, आयुष्य आणि ‘गाय’ (gai) म्हणजे मूल्य, किंमत. ‘इकीगाय’ म्हणजे आपल्या आयुष्याचं मूल्य! आपण कोणत्या गोष्टींसाठी जगतो, आपल्या जगण्याचं कारण, आयुष्याचा उद्देश आणि आपल्या रोजच्या जगण्यामागची प्रेरणा म्हणजेच ‘इकीगाय’! या विचारसरणीनुसार, प्रत्येक माणसाची स्वत:ची एक ‘इकीगाय’ असते- ज्याद्वारे तो सुख, समाधान आणि आनंद मिळवून परिपूर्ण आयुष्य जगू शकतो. थोडक्यात, ‘इकीगाय’ ही आपल्याला आनंदी आयुष्याकडे घेऊन जाणारी एक वाट आहे. पण मग ही ‘इकीगाय’ शोधायची व ओळखायची कशी?
आयुष्याचा अर्थ काय? जगायचं कशासाठी? जन्मापासून ते मृत्यू येईपर्यंत आपल्या आयुष्यात आपण नेमकं काय करणं अपेक्षित आहे? असे प्रश्न आपल्याला केव्हा ना केव्हा पडतातच. आयुष्याचा अर्थ समजावून घेण्याचा आणि सुख म्हणजे काय हे समजावून घेण्याचा आपला प्रयत्न नेहमीच चालू असतो. ‘इकीगाय’ आपल्याला या कामी मदत करू शकते. ‘इकीगाय’मध्ये चार गोष्टींचा अंतर्भाव होतो: एक- तुम्हाला काय आवडतं? यात आपल्याला ज्या गोष्टींमध्ये रस आहे त्या गोष्टी येतात.
दोन- तुम्ही कोणतं काम चांगल्या प्रकारे करू शकता? तुमचं कौशल्य कशात आहे? आवड व कौशल्य हे खूप महत्त्वाचे आणि वेगळे मुद्दे आहेत. आपल्याला एखाद्या गोष्टीची नुसतीच आवड असू शकते; पण कौशल्य असेलच असं नाही. गाण्याची आवड आहे असं म्हणणं आणि प्रत्यक्षात गाणं गाता येणं, हे या फरकाचं एक सोपं उदाहरण.
तीन- तुम्ही काय काम करून पसे मिळवू शकता? तुमच्या कोणत्या कौशल्यावर तुम्ही तुमचा उदरनिर्वाह करू शकता? आपण जो नोकरी/ व्यवसाय करत असतो आणि ज्याद्वारे आपण पसे कमावतो किंवा कमावू शकतो, त्या गोष्टी यात येतात.
चार- जगाला कशाची आवश्यकता आहे? जगात/ समाजात कोणत्या गोष्टीची कमतरता आहे- जी तुम्ही भरून काढू शकता?
या चारही गोष्टींमध्ये ज्याचा समावेश होतो असं काम म्हणजेच आपला इकीगाय. आपल्याला ज्या गोष्टीची आवड आहे, त्यात लागणारं कौशल्य आहे, ज्यातून आपण पसे मिळवू शकतो आणि ज्याची समाजालाही गरज आहे- असं काम आपण केलं तर आपल्याला इकीगायमध्ये अपेक्षित असणारं सुख, समाधान आणि आनंद आयुष्यभरासाठी मिळू शकतं.
पण हे कसं असतं? आपण काळजीपूर्वक पाहिलं तर इकीगायमध्ये बऱ्याच गोष्टींचा समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येईल. जसं की- स्वत:च्या आनंदासाठी काही करणं आणि त्याचा फायदा दुसऱ्यांना, समाजालाही होऊ शकेल हे बघणं. नुसती अमुक गोष्टीची आवड आहे असा भावनिक विचार न करता व्यावहारिकदृष्टय़ा त्यावर आपण जगू शकू का, हा पण विचार करणं. हा समतोल नसेल तर जे काम आपण करतो त्यातून मिळणारा आनंद हा शाश्वत (sustainable) नसेल. उदाहरणार्थ- तुम्हाला तुमच्या व्यवसायातून पसे मिळत असतील, पण त्या कामाबद्दल प्रेम वाटत नसेल तर काही काळानंतर त्या कामात तुम्हाला भावनिक रितेपणा जाणवू लागेल आणि त्याचा परिणाम तुमच्या कामावर दिसून येईल.
इकीगाय हा एक नकाशा आहे.. खजिन्याचा नकाशा म्हणू या हवं तर! हा खजिना आहे- आत्मशोधाचा. या नकाशामुळे आपण कुठे आहोत हे तर समजतंच; त्याचबरोबर आपल्याला कुठे जायचंय आणि तिथपर्यंत कसं पोहोचावं लागेल हेदेखील त्यातून कळून येतं. ‘Follow your dreams’ हा आजच्या युगाचा मंत्र आपण नेहमी ऐकतो. पण आवड, छंद किंवा स्वप्न ही फक्त सुरुवात असते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला कोणते गुण, कोणते कौशल्य लागेल, कोणते अनुभव घ्यावे लागतील, त्याचा स्वत:साठी आणि समाजासाठी कसा उपयोग होऊ शकतो- असे प्रश्न इकिगायमुळे आपल्याला पडतात. ज्यांच्या उत्तरातून आपल्याला पुढची दिशा कळते. नुसता विचार न करता कृती करणं याला इकीगायमध्ये महत्त्व आहे. त्यामुळेच व्यवहाराचा समतोल साधला जातो.
आजच्या स्पध्रेच्या युगात आपण दिवस-रात्र यशाच्या आणि सुखाच्या मागे पळतो आहोत. पण ‘आपलं’ यश आणि ‘आपलं’ सुख नेमकं कशात आहे- आपल्या आवडीच्या कामातून जीवनाला अर्थ देण्यात की दुसऱ्यांनी ठरवलेल्या यशाच्या आणि सुखाच्या व्याख्येत स्वत:ला बसवण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात? म्हणूनच योग्य दिशा दाखवणारा आणि स्वत:ला स्वत:पर्यंत घेऊन जाणारा हा जपानी नकाशा एकदा वापरून पाहायला काय हरकत आहे!
parag2211@gmail.com