|| देवकी पंडित

ऐन श्रावण महिन्यात मुसळधार पडणारा पाऊस घरी खिडकीतून पाहताना ‘मेघमल्हार’चे सूर कानावर पडावेत आणि तो कधी संपूच नये असे वाटावे, यासारखा सुखद अनुभव तो कोणता? पावसाच्या सरींच्या लयीशी सुसंवाद साधणारा सूर म्हणजे मल्हार असावा. श्रावणसंगीत याच संवादामुळे श्रवणीय होत असावे.

अभिजात संगीत या श्रावणानुभवाला.. या ‘भावा’ला मल्हारच्या अनेक रंगांतून सजवीत असते. माझ्यावर झालेल्या सांगीतिक संस्कारांमुळे हे नाते मला अधिकच जाणवते. मुसळधार पावसाचे रुद्रावतारात रूपांतर होते तेव्हा काय कोण जाणे- ‘मियाँ मल्हार’चा खर्ज धीर देणारा वाटतो. त्याच्या आंदोलित गंधाराचा विळखा मनाला झुलवतो. प्रत्येक मल्हार पावसाच्या रूपाचे मनोहारी दर्शन घडवतो. रिमझिम पडणारा पाऊस जेव्हा हलके तुषार अंगावर शिंपडतो तेव्हा तो ‘सूर मल्हार’ वाटतो. शुष्क धरेवर सरी जेव्हा मातीचा सुगंध उधळतात तेव्हा तो ‘देस’ भासतो. ‘घनघोर घटा’ बनून जेव्हा तो विजेसह बरसतो तेव्हा तो ‘मियाँ मल्हार’ वाटतो. धुक्यात मिसळणारा, ढगांच्या आडून अचानक कोसळणारा पाऊस ‘मेघ मल्हार’ वाटतो. ‘गौड मल्हार’, ‘मीरा मल्हार’, ‘रामदासी मल्हार’, ‘तिलक मल्हार’, ‘आनंद मल्हार’ हे जणू श्रावण शृंगारात चिंब भिजलेल्या सृष्टीला कविमनाने मुक्तकंठाने दिलेली साद वाटते जणू.

मनाच्या नानाविध अवस्था आणि त्यांचे सृष्टीशी असलेले नाते याच्या सखोल अभ्यासातून रागनिर्मिती झाली, हे जगन्मान्यच आहे. रागसंगीतात काळ आणि ऋ तूंनी प्रेरित होऊन रागरचना झाल्या. रागसंगीत गाणाऱ्या गवय्याने हे बंधन पाळावे अशी अपेक्षा असते. संस्कारांनी बिंबवलेले हे बंधन खरे तर हवेहवेसेच वाटते. ऋ तुचक्र, कालचक्र हे रागसंगीताचे आधारस्तंभ आहेत. राग भैरवचे स्वर आळवताना असे जाणवते की त्यातील कोमल रिषभचे स्थान (ग म रे) संधीकालीन मारव्याच्या आर्त रिषभाहून (ध नी रे) खूप भिन्न आहे. स्वरांचे दर्जे आणि स्वरांच्या छटा त्या- त्या प्रहरातील वातावरणास आणि आपल्या मनाच्या अवस्थेशी जुळणाऱ्या आहेत. दिवसातील बदलत्या प्रहारांतल्या वातावरणाचा जसा मनावर आणि शरीरावर परिणाम होतो, तसाच बदलत्या ऋ तूंचाही होत असतो. म्हणूनच ऋ तूंशी विशिष्ट रागांची सांगड घातली गेली आहे. जसे वसंत ऋ तूत ‘राग बसंत’ गायला जातो, वर्षां ऋ तूत ‘मल्हार’चे विविध प्रकार गायले जातात.

एक संगीत साधक म्हणून जेव्हा मी ‘मल्हार’चे विविध प्रकार अनेक दिग्गज कलाकारांकडून प्रत्यक्ष ऐकले त्या प्रत्येक वेळेस संगीताच्या वातावरणनिर्मितीचा परिणाम माझ्या मनावर होत असल्याची प्रचीती मला आली. पं. भीमसेनजींचा ‘सूर मल्हार’, पं. जसराजजींचा ‘मेघ मल्हार’, पं. किशोरीताईंचा ‘गौड मल्हार’, पं. अभिषेकीबुवांचा ‘मियाँ मल्हार’ची ध्वनिफीत ऐकतानाही वर्षां ऋ तूतील माहोल माझ्या डोळ्यांसमोर उभा राहतो. विविध रागरचनाकारांनी आणि गायकांनी पावसाच्या निरनिराळ्या छटा ‘मल्हार’च्या विविध प्रकारांमधून व्यक्त केल्या आहेत. पं. कुमार गंधर्वाच्या ‘ऋ तुवर्षां’ या स्वरचित बंदिशींच्या कार्यक्रमात वर्षां ऋ तूवर रचलेल्या अनेक बंदिशी ऐकताना मला श्रावणातील इंद्रधनूचे दर्शन घडले.

शास्त्रीय संगीताप्रमाणेच इतर गानप्रकारांतही वर्षां ऋ तूवर अनेक रचना केल्या गेल्या आहेत. या रचना विविध रागांमध्ये- जसे की.. पिलू, तिलंग, खमाज, पहाडीमध्ये असूनही त्यातून वर्षां ऋ तूचे वातावरण उभे राहते. ‘बैरन रतियाँ कैसे आऊँ, तुम्हरे ढींगवा, गरजे बादर मेहरवा’ ही शोभा गुर्टूची खमाज रागातील ठुमरी मी ऐकली तेव्हा त्यांच्या विलक्षण सुंदर स्वरांमधून वर्षां ऋ तूतील विरह- शृंगाराचा अनुभव आला. त्याचप्रमाणे ‘सावन की ऋ तु’ ही कजरी, ‘बरसन लागी सावन बुंदीयाँ’ हा दादरा.. हे सर्व प्रकार पावसाचे निरनिराळे रंग दाखवून जातात.

श्रावणसरींनी सर्वच संगीतप्रकारांना मोहित केले आहे. अत्यंत लोकप्रिय भावगीत ‘श्रावणात घननिळा बरसला’ तसेच ‘बोले रे पपिहरा’, ‘रिमझिम गिरे सावन’ यांसारख्या चित्रपटगीतांच्या संगीतरचनाही पाऊस पडताना ऐकाव्याशा वाटतात. शेतकरी, गावकरी लोकसंगीतातून वर्षां ऋतूला आवाहन करतात. निसर्गाप्रति कृतज्ञता व्यक्त करत त्याचं गीत गातात. ‘ये रे ये रे पावसा’ म्हणत चिमुकलीसुद्धा पावसाला साद घालतात. श्रावणातील पावसाच्या सरींत चिंब भिजून मातीच्या सुगंधाने मन प्रफुल्लित होते, सृष्टीसौंदर्याने प्रेरित होते, शुचिर्भूत होते. सुरांचा श्रावणही असाच मनपरिवर्तन करणारा व्हावा.