प्रतिभावान कथाकार जी. ए. कुलकर्णी (घरगुती नाव बाबुआण्णा) यांच्या नंदा पठणकर या मावसबहीण. बहिणींचा अतिशय मायेने सांभाळ करणाऱ्या जी. एं.चं कुटुंबवत्सल रूप वाचकांना तसं अनोळखीच! गूढ, अलिप्त वाटणारे जी. ए. प्रत्यक्षात किती मिस्कील, प्रेमळ तरीही कडक शिस्तीचे होते याचा प्रत्यक्ष अनुभव नंदाताईंनी घेतला आहे. त्याविषयी त्यांनी लिहिलेलं, ‘प्रिय बाबुआण्णा’ हे पुस्तक जी. एं.च्या २५व्या स्मृतिदिनी ( १० डिसेंबर रोजी ) पॉप्युलर प्रकाशनाच्या वतीने प्रसिद्ध होत आहे. त्यातील हा संपादित भाग..
पु रस्कार घेण्याकरिता किंवा एखाद्या समारंभाला हजर राहण्याकरिता म्हणून कधी, कोठे बाबुआण्णा जात नव्हता तरी अधूनमधून दोन चार दिवसांकरिता म्हणून मात्र तो पुण्या-मुंबईला एकटा जाई. त्याचं मुख्य कारण असायचं पुस्तक खरेदी, दळवींना, श्री. पुं.ना, अंतरकरांना भेटणं. (आम्ही बरोबर असताना विद्याधर पुंडलिकांच्या घरी गेलेलं आठवतं.) पुण्यात, विशेषत: लकडी पुलावर बरीचशी जुनी पुस्तकं विकत मिळत. त्यांत काही दुर्मीळ पुस्तकं मिळून जात. त्यामुळे तेथे जाऊन पुस्तकांचा शोध घेणं, हा त्याचा आवडता छंद होता. बाकी स्वत:साठी काही न घेता, आमच्या दोघींसाठी बऱ्याच गोष्टी तो आणायचा. एका खेपेला त्याने काश्मिरी सिल्कच्या साडय़ा, खडे बसवलेल्या चपला आणि बरीचशी वेगवेगळी कानांतली आणली होती. मी कॉलेजमध्ये जाताना साडीच्या रंगाप्रमाणे कानांतले घालते, हे त्याला माहीत होतं. आणखी एका खेपेला, त्याने मला विचारलं की, तुला मुंबईहून काय हवंय? मी पण पटकन त्याला सांगूनही टाकलं की, लव्ह-बर्ड्स. माझ्या मागणीचं त्याला आश्चर्य वाटलं. पण त्याबद्दल तो काही बोलला नाही. येताना त्याने खरोखरच लव्ह-बर्ड्स आणि इतर काही पक्षी क्रॉफर्ड मार्केटमधून आणले. लव्ह-बर्ड्समध्ये एक निळ्या रंगाचा, तर एक हिरव्या पिवळ्या रंगाचा होता. इतर पक्षांपकी दोन िलबू रंगाचे, अगदी छोटे छोटे, नाजूक आवाज करत, सारखी हालचाल करणारे मरून रंगाचे चार पक्षी होते. त्या सगळ्यांना तो अगदी जपून, काळजीपूर्वक िपजऱ्यातून घेऊन आला होता. त्याच्यासाठी त्याने स्वतंत्र कंपार्टमेंट रिझव्‍‌र्ह केलं होतं. त्यांना थंडी वाजू नये म्हणून िपजऱ्यावर स्वत:चा कोट झाकला होता.
तो घरी आला तेव्हा, सगळे पक्षी आपापल्या भाषेत सारखे बोलत होते. िपजऱ्यात दाणे ठेवण्यासाठी व पाण्यासाठी छोटय़ा छोटय़ा वाटय़ा होत्या. ते पक्षी, त्यांचं घर, ते सारं पाहून, माझा आनंद पोटात मावत नव्हता. पक्ष्यांना खायला राळे लागतात म्हणून, तेही त्याने येताना आणले होते. त्यांच्या खाण्याच्या, पाणी पिण्याच्या क्रिया आम्ही तिघेही कितीतरी वेळ, कौतुकाने पाहत बसलो होतो. त्यांचं एक वैशिष्टय़ होतं. ते सगळे मिळून, कधीच खायला दांडय़ावरून खाली उतरत नव्हते, तर पाळीपाळीने आणि स्वतच्या गरजेप्रमाणे एकेक पक्षी येत असे.
नंतर बाबुआण्णाने त्यांच्यावरचं पुस्तक मागवलं. मग आम्हांला कळलं की, त्यांना खाणं पचण्यासाठी बारीक वाळूही लागते. मग आम्ही वाळू आणली. पहिल्यांदा जेव्हा वाळू ताटलीत ठेवली, तेव्हा मात्र सगळ्या पक्ष्यांनी ताटलीभोवती गर्दी केली. जणू काही पक्वान्नच मिळालं, असा आनंद त्यांना झाला होता. बाबुआण्णाने एकदा िपजऱ्यात हात घालून, पंजावर दाणे ठेवले होते. क्षणात तो निळा पक्षी अलगद त्याच्या हातावर बसून दाणे टिपायला लागला. त्यावेळी बाबुआण्णा म्हणाला की, ‘त्याच्या पायांचा स्पर्श आणि दाणे टिपताना होणारा त्याच्या चोचीचा स्पर्श इतका हळुवार आणि आल्हाददायक वाटतो की, वाटतं, तासन् तास तसंच बसून राहावं!’ हे त्याचं म्हणणं, आपणही अनुभवावं असं मी ठरवलं. वरच्या खोलीमधला कचरा काढण्याच्या निमित्ताने मीही बराच वेळ िपजऱ्यात हात घालून, पक्ष्यांना हातावर घेऊन, त्या हळुवार स्पर्शाची अनुभूती घेई. मला कॉलेजला उशीर होईल, म्हणून बिचारी पबाक्का मला हाक मारत असायची.
बाबुआण्णाने निळ्या नर पक्ष्याचं नाव नाद व हिरव्यापिवळ्या मादीचं नाव वीणा ठेवलं. उरलेल्या पक्ष्यांपकी, दोन पिवळे पक्षी इतके नाजूक होते की, त्यांना बहुधा धारवाडची हवा सहन झाली नसावी. त्यामुळे एकामागोमाग एक, महिनाभरात, ते दोन्ही पक्षी गेले. एकदा आम्ही तिघेही बाहेर, अंगणात िपजरा ठेवून गप्पा मारत बसलो होतो. एकदम अचानक, मांजराने िपजऱ्यावर झडप मारली. त्यावेळी िपजऱ्याचं दार उघडलं गेलं. छोटे चारही पक्षी, पापणी लवण्याच्या आत भराभर उडून गेले. आम्ही एकदम हादरूनच गेलो. बाबुआण्णा एकदम गंभीर झाला. म्हणाला, ‘आपली हौस, आज किती महागात पडली असती, मनाला किती यातना झाल्या असत्या, जर त्या मांजराच्या तावडीत ते पक्षी सापडले असते तर! एका अर्थी ते पक्षी उडाले ते बरंच झालं म्हणायचं. यापुढे मात्र ते सुरक्षित राहावेत.’
बाबुआण्णाने क्षणार्धात िपजऱ्याचं दार बंद केलं, आत नाद-वीणा होते. लगेच त्याने िपजरा आत आणला. नाद-वीणा घाबरून एकमेकाला चिकटून, गुपचूप दांडीवर बसले होते. बाबुआण्णाने आपल्या उबदार, प्रेमळ हाताने, त्यांच्या अंगावरून हात फिरवला, त्यांना दाणे दिले. पुढे आम्ही मांजराच्या अनुभवाने जागरूक झालो आणि जेवताना, खाताना, िपजरा अगदी आमच्याजवळच ठेवायला लागलो. आम्ही कधी कधी चांदण्याच्या दिवसांत, वरच्या गच्चीत, बसून भरपूर दडपे पोहे, चहा (या पोहे-चहाबाबत बाबुआण्णाने त्याची एक लहानपणाची आठवण सांगितली होती की, त्यावेळी खूप ओलं खोबरं, कोिथबीर घातलेले पोहे नसायचे. त्यामुळे ते पोहे मऊसर नसायचे, मग अशा वेळी त्यांवर थोडा चहा घालून ते तो खायचा आणि त्याची चव अप्रतिम लागायची. तसे मी एकदा खाऊन पाहिले होते आणि मला ते आवडले होते. मी माझ्या मुलींना ते सांगितल्यावर विशेषत माझी धाकटी मुलगी – जिला बाबुआण्णा लिट्ल म्हणायचा –  अजूनही दडपे पोह्यांवर चहा घालून आवडीने खाते.) घेत, गप्पा मारत बसतानासुद्धा िपजरा अगदी आमच्या जवळ ठेवत असू. नाद-वीणाला ओल्या हरभऱ्याचे दाणे, मटारचे दाणे, कोिथबीर खायला खूपच आवडायचं. खाण्याच्या या गोष्टी दिसल्या की, लगेच त्यांचं उडय़ा मारणं, िपजऱ्याच्या तारावर बसणं सुरू व्हायचं; आणि ते मिळाल्यावर अगदी मन लावून खायला सुरुवात व्हायची. ताक करताना, त्याचे थेंब तारेवर पडले की, ते टिपण्यासाठी त्यांची गडबड सुरू व्हायची.
बाबुआण्णाने त्यांच्यासाठी ब्रीिडग केजही आणली होती. ती िपजऱ्याला जोडता यायची. केजला खाली- वर असे दोन कप्पे होते. वरच्या कप्प्यातून खाली जाण्यासाठी, अर्ध-वर्तुळाकार भाग मोकळा होता. मागच्या बाजूला उघडणारा दरवाजा होता. खालच्या कप्प्यात पबाक्काने एक छोटीशी मऊ गादी ठेवली होती.
गंमत म्हणजे काही दिवसांतच वीणाने अगदी छोटी छोटी तीन-चार अंडीही घातली. त्यावेळचं त्या दोघांमधलं सहकार्य अगदी वाखाणण्याजोगंच होतं. ती एक निसर्गाची किमयाच म्हणायला पाहिजे. वीणा खाली अंडय़ावर बसल्यावर, नाद भराभर दाणे तोंडात घेऊन वीणाला भरवून येत असे. अशा तो कितीतरी चकरा मारायचा. मधूनच केव्हातरी वीणा खाली येऊन पाणी व वाळू घेत असे. नादला एकदा काय वाटलं कोणाला ठाऊक, खालच्या कप्प्यात जाऊन पाहण्याची उत्सुकता, त्याला वाटली असावी. म्हणून तो त्या कप्प्यात जाण्याचा प्रयत्न करत होता आणि वीणा त्याला खाली येऊ देत नव्हती; तरीही त्याने खाली जाण्याचा जोरदार प्रयत्न केला. वीणाला बहुधा ते आवडलं नव्हतं. तिने रागाने नादच्या डोक्यावरची पिसं ओरबाडली. त्या आकस्मिक हल्ल्यामुळे नाद गडबडून गेला आणि भरकन िपजऱ्यातल्या दांडय़ावर मान फिरवून बसला.
बाबुआण्णाला त्याची कीव आली. त्याने नादला हातावर घेऊन, डोक्याला थोडंसं तेल लावून, प्रेमाने त्याच्या अंगावरून हात फिरवला. त्याला खाऊ घातलं आणि जागेवर ठेवलं. त्यानंतर मात्र तो बराच वेळ वीणासाठी दाणे घेऊन गेला नाही. वीणाने नक्कीच त्याची वाट पाहिली असणार. नाद आला नाही म्हणून ती बाहेर आली आणि बहुधा तिची चूक तिच्या लक्षात आली असावी म्हणून ती नादच्या जवळ जवळ जायला लागली, त्याला गोंजारत होती, पण नाद मात्र दूर दूर सरकत होता. महत्त्वाचं म्हणजे तो जो आपला चेहरा फिरवून बसला होता, तो वीणाकडे बघायलाही तयार नव्हता, नादचा जो अपमान झाला होता, तो त्याला सहन झालेला नव्हता. हे त्या सगळ्या घटनेतून जाणवत होतं.  इतक्या छोटय़ा, न बोलता येणाऱ्या पक्ष्यांच्या भावना किती बोलक्या असू शकतात याचा प्रत्यय आला.
ब्रीिडग केजमध्ये काही दिवसांतच अगदी बारीक आवाज, हालचाल जाणवू लागली. एकदा दरवाजाला आतल्या बाजूला काच लावून आम्ही पाहिलं तर चार छोटी छोटी, अंगावर, डोक्यावर एकही पीस नसलेली, गुलाबी रंगाची छोटीशीच चोच आणि बंद डोळे अशी पिल्लं दिसली. वीणा जास्त वेळ खालीच बसायची. आम्ही अधूनमधून त्यांना पाहण्याचा आनंद घ्यायचो.
थोडय़ाच दिवसांत धडपड करत, एकामेकांच्या अंगावर चढत, पिल्लं वरच्या कप्प्यात आली. केजच्या आतल्या बाजूस असलेल्या गोलांतून किलकिल्या डोळ्यांनी सगळीकडे पाहायला लागली. वीणा मग दांडीवर बसून एकेकाला खायला द्यायची. नाद मात्र दुरून सगळं न्याहाळत बसायचा. पिल्लांना बळ आल्यावर ती िपजऱ्यातल्या िपजऱ्यात हळूहळू उडायला लागली, दांडीवर बसायला लागली, खाली उतरून दाणे, पाणी घ्यायलाही लागली. एका पसरट बशीत, आंघोळीसाठी पाणी ठेवलेलं असे. बशीत उतरून अंगावर पाणी उडवून, सगळे सुरेख आंघोळ करायचे. त्यामुळे खालची अ‍ॅल्युमिनीयमची ताटली सगळी घाण झालेली असे. ती काढून परत स्वच्छ करून ठेवण्याचं, त्यांच्या वाटय़ा साफ करण्याचं काम माझं असे.
रात्री झोपताना, आमच्या दोघींच्या खोलीतील टेबलावर त्यांचा िपजरा ठेवून वरती पातळ सुती कापड झाकून ठेवत होतो. अंधार झाला, िपजऱ्यावर कापड आलं की सगळेजण एकदम शांत, गप्प बसत. एरवी दिवसभर त्यांचा नुसता चिवचिवाट चाले. आम्ही तिघे बाहेर गेलो, तर अगदी गप्प बसत, पण एकदा का दरवाजा उघडण्याचा आवाज झाला की, त्यांच्या आवाजाला जोर येई. चारी पिल्लं, नाद, वीणा यांच्या सहवासात आमचे दिवस छान मजेत गेले. नंतर पिल्लांसाठी दुसरा िपजरा आला. दुसऱ्या खेपेला वीणाला आणखी दोन पिल्लं झाली. ती वाढल्यावर, बाबुआण्णाने मग ब्रीिडग केज काढून टाकली. ती दोन पिल्लं मात्र फारच नाजूक होती, ती फार दिवस टिकली नाहीत.
‘लव्ह-बर्ड्स’चं आयुष्य अगदी त्यांच्यासारखं छोटंच असतं. त्यामुळे आधी वीणा गेली. तिच्याकडे पाहिलं की वाटायचं, की ती एखाद्या घरंदाज, कुलवंत, सौंदर्यवतीसारखी आहे. नाद-वीणा, आपल्या छोटय़ाशा जागेत आनंदाने राहिले आणि आम्हांलाही भरपूर आनंद दिला. त्यामुळे वीणाचं जाणं मनाला चटका लावून गेलं. वीणाच्या मागोमाग, एकेक पक्षी गेले. (आम्हाला त्यावेळी असं जाणवलं की, एखादा जरी पक्षी गेला तर त्याच्या मागोमाग इतरही पक्षी लगेच जायला लागतात.) शेवटी नाद एकटाच राहिला होता. (त्यावेळी मी पुण्याला होते.) तोही थकल्यासारखा झाला होता. बाबुआण्णा त्याला सगळं जागेवर देत होता. पण त्याचं खाणं, पिणं कमी झालेलं होतं. त्याचं अंगही गार वाटायला लागल्यावर िपजऱ्यावर जाड पांघरूण पबाक्काने घातलं होतं आणि वरून उष्णता मिळण्यासाठी लाइटही लावला. एरवी आनंदाने, उत्साहाने उडय़ा मारणारा नाद असा एकदम शांत, गप्प बसलेला बघून, त्या दोघांना चन पडेना. धारवाडला पक्ष्यांचा डॉक्टर नसल्यामुळे, त्याच्यासाठी काय इलाज करावा, हे त्यांना कळेना. शेवटी जे होऊ नये, असं वाटत होतं, तेच झालं. नाद गेला. कायमची हुरहूर लावून गेला. त्याच्या जाण्याने बाबुआण्णा, पबाक्का फार उदास झाले. नाद गेल्यानंतर बाबुआण्णाने मला जे पत्र लिहिलं, त्यातून नादच्या जाण्यामुळे तो किती व्याकूळ झाला होता, हे प्रकर्षांने जाणवतं.
पक्ष्यांचा गोतावळा आमच्याकडे असतानाच, ‘अ‍ॅक्वेरियम’ रंगीत, सोनेरी मासे असलेला, घरी आलेला होता. अ‍ॅक्वेरियम कसा स्वच्छ करायचा, त्यांना खायला कोणती पावडर आणि किती घालायची, हे आधी बाबुआण्णाने स्वत: माहीत करून घेतलं आणि मग मला शिकवलं. तेही काम माझ्या आवडीचंच होतं.
एकंदरीने पक्षी आणि मासे यांना जवळून पाहण्याचा, त्यांच्याशी रममाण होण्याचा आनंद, निव्वळ बाबुआण्णामुळेच मिळाला होता. नंतर मी पुण्याला आल्यामुळे त्या आनंदाला मुकले.