|| कुलवंतसिंग कोहली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘सरदारजी, एक नवी मुलगी गीताने सुचवलीय. एकदम फटाका आहे! जबरदस्त मुलगी आहे. देखणी तर आहेच, पण अभिनयही छान करते..’’ ‘प्रीतम’मध्ये शिरताना केदार शर्मा पापाजींना म्हणाले.

ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक केदार शर्मा नेहमी आमच्याकडे येत असत. अनेक महान अभिनेत्यांना आधी केदार शर्मानी हिंदी चित्रपटात संधी दिली होती. १९४०, ५० आणि ६० च्या दशकांत केदार शर्मा यांचा चित्रपटसृष्टीत दबदबा होता. त्यांनी संधी दिली म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीनेच संधी दिली अशी त्यांची ख्याती होती. गीता बाली ही त्यांच्या अतिशय जवळची अभिनेत्री. गीतानं माला सिन्हाला एका बंगाली चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी पाहिलं आणि तिनं केदार शर्माना माला सिन्हाचं नाव सुचवलं. मुंबईत हिंदी चित्रपटात एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री आली, की त्यानं किंवा तिनं ‘प्रीतम’च्या परिवाराचा भाग व्हायचं, हा तसा शिरस्ताच झाला होता. माला सिन्हा आमच्याकडे जेवायला वगैरे येऊ  लागली. मालाची व माझी पटकन् दोस्ती झाली. ती बोलकी होती. तिच्या व माझ्या वयात फारसं अंतर नव्हतं. तिच्यापेक्षा मी फार तर दोन वर्षांनी मोठा असेन.

ती पहिल्यांदा मला भेटली तेव्हा तिच्या सौंदर्यानं मी स्तिमितच झालो होतो. स्वर्गातून पृथ्वीवर उतरलेली अप्सराच वाटली होती ती मला. एक विधान मी केलं तर काहीजण माझ्यावर रागावतील; परंतु माला सिन्हा ही मधुबालाइतकीच सुंदर होती.. किंबहुना, कांकणभर सरसच आहे असं माझं मत आहे. मालाजी अत्यंत नम्र आहेत. ‘आप’शिवाय बात नाही. सर्वाशी त्या सारख्याच पद्धतीनं वागणार. ज्याचा मान त्याला देण्यात त्या कधीही कसूर करणार नाहीत. मालाजी माझ्याबरोबर बोलताना ‘सरदारजी’ किंवा ‘कुलवंतजी’ असंच मला संबोधतात. त्यांचा आवाज अतिशय मधुर आहे. त्या बोलतात तेव्हा जणू काही फुलंच बरसतात असं वाटावं. आजकालच्या पिढीला माहिती नसेल.. माझ्याही पिढीला माहिती असेल की नाही याविषयीही मला शंका आहे. मालाजी ऑल इंडिया रेडियोच्या मान्यताप्राप्त गायिका आहेत. त्यांना एखाद्या कार्यक्रमात गुणगुणताना मी ऐकलंय. छान गातात त्या. मला काही वेळा प्रश्न पडतो, की त्यांनी- निदान स्वत:साठी- पाश्र्वगायन का केलं नाही? भारतीय चित्रपटांना कदाचित दुसऱ्या नूरजहाँ मिळाल्या असत्या! हे विधान धारिष्टय़ाचं वाटेल, पण (या ‘पणबिण’ला काही अर्थ नसतो!) नियतीच्या मनात जे असेल तेच खरं.

मालाजींचे पिताजीही माझे चांगले स्नेही झाले होते. ते जेव्हा आमच्यासमोरच्या पंजाब नॅशनल बँकेत येत असत तेव्हा तिथं टोकन घेऊन चहा-नाश्त्यासाठी ते ‘प्रीतम’मध्ये येत. तेही चांगले गप्पिष्ट होते. त्यांच्या गप्पांतूनच मला कळलं की, ते मूळचे नेपाळचे आहेत. त्यांचं नाव होतं- अल्बर्ट सिन्हा! ते नेपाळी ख्रिश्चन. (मला आठवतं त्याप्रमाणे, मालाजींना मुंबईत ‘गोरखा’ असंही टोपणनाव होतं!) परंतु त्यांचं वास्तव्य कोलकात्यात असल्यामुळं आणि ‘सिन्हा’ हे आडनाव बंगाली बाबूंमध्येही असल्यामुळे मालाची आई नेपाळी व वडील बंगाली आहेत असा सगळीकडे समज होता. तो समज पुसण्याचा त्यांनी काही प्रयत्न केला नाही. ते म्हणत, ‘‘आता मी भारतीय आहे ना, मग कुठल्या का प्रदेशाचा असेना, त्याने काय फरक पडणार आहे?’’

त्यांनी मला सांगितलं की, मालाजींचं खरं नाव ‘अल्डा’ आहे. आणि शाळेपासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. शाळेत अगदी पहिल्या इयत्तेतच त्यांनी स्टेजवर पदार्पण केलं आणि त्या छोटय़ा वयातच विलक्षण अभिनयाच्या त्यांना असणाऱ्या समजेनं त्यांच्याकडे चित्रपटजगताचं लक्ष वेधलं गेलं. सारे जण छोटय़ा मालावर खूश असत. मालाजींनी एकदा गप्पांत मला सांगितलं, की शाळेत त्यांच्या ‘अल्डा’ या नावावरून खूप मजा व्हायची. ‘‘त्या काळात डालडा तूप खूप प्रसिद्ध होतं. शाळेतल्या मैत्रिणी मला ‘अल्डा डाल्डा’ असं चिडवायच्या. मला खूप राग यायचा. मग चित्रपटांत भूमिका करायच्या निमित्तानं मी माझं नावच बदलून टाकलं. सुरुवातीला मी ‘बेबी लता’ व ‘बेबी नज्म्मा’ या दोन नावांनी बंगाली चित्रपटांत भूमिका केल्या. सगळीकडे माझं कौतुक झालं. परंतु मला बरं वाटलं ते ‘अल्डा’ या नावातून सुटका झाल्यानं!’’

मालाजी ‘प्रीतम’मध्ये एकदा आल्या होत्या. त्याचवेळी माझी दोन-अडीच वर्षांची मुलगी तिथं आली होती. इकडे तिकडे ती बागडत होती. मी कॅश काऊंटरवर बसलो होतो. मधेच ती माझ्या मांडीवर येऊन बसून जायची. तिला पाहिल्यावर मालाजींनी विचारलं, ‘‘हे फुलपाखरू कोणाचं?’’ मी सांगितलं, ‘‘हे फुलपाखरू आमचं आहे.’’ त्यांनी तिला उचलून घेतलं. तिचे लाड केले. त्या म्हणाल्या, ‘‘कित्ती गोड बाळ आहे हे! मला दत्तक द्या. मी हिचं सगळं करीन.’’ त्यावेळी त्यांचं लग्न झालेलं नव्हतं. अतिशय मृदू स्वभावाच्या आहेत त्या!

मालाजींना नातेसंबंध टिकवून ठेवायला आवडतं. मला आठवतं, माझी मुलं लहान होती आणि आम्ही सारे काश्मीरला फिरायला गेलो होतो. काश्मीर म्हणजे त्या काळात चित्रपटसृष्टीचा स्वर्गच! प्रत्येक चित्रपटात काश्मीरमध्ये चित्रित केलेला एखादा तरी प्रसंग असायचाच. भटकता भटकता आम्ही पहेलगामवरून चंदनवाडीला चाललो होतो. छान प्रवास सुरू होता. हवाही मस्त होती. तेवढय़ात माझ्या मुलाला- टोनीला कुठेतरी शूटिंग चालू आहे असं दिसलं. आम्ही जरी चित्रपटातल्या लोकांशी वेगवेगळ्या पद्धतीनं संबंधित असलो तरी शूटिंग बघण्यातली गंमत वेगळीच असते. मुलांच्या आग्रहापोटी आम्हीही थांबलो. जरा पुढे जाऊन चौकशी केली तर विश्वजित आणि मालाजींचं शूटिंग असल्याचं कळलं. शूटिंग जोरात चाललं होतं. मी थोडा पुढे गेलो. मालाजींनी आम्हाला बघितलं आणि पटकन् त्या आमच्याजवळ आल्या. मुलीला जवळ घेतलं. माझ्या पत्नीशी बोलल्या. मग विश्वजितही आमच्याकडे आला. त्या साऱ्यांनी शूटिंग थांबवलं. पॅक-अप केलं. आम्ही भरपूर गप्पा मारल्या. सर्वानी धमाल केली. परगावात मित्र-मैत्रिणींच्या अचानक भेटीची गंमत काही वेगळीच असते.

मालाजींचा आपल्या अभिनयावर नितांत विश्वास होता. आत्मविश्वास त्यांच्यात ठासून भरलेला होता. सुरुवातीच्या काळात एकदा त्या म्हणाल्याचं आठवतंय, ‘‘मला लोकांनी ‘छोटी नर्गिस’ म्हणून ओळखावं असं मला वाटतं.’’ त्यांच्या चेहऱ्याची उभी ठेवण नर्गिसजींच्या जवळ जाणारी होती. असे असले तरी नंतर त्यांना ‘छोटी नर्गिस’ऐवजी ‘माला सिन्हा’ म्हणूनच ओळखलं जाऊ लागलं!

एकदा गप्पांमध्ये अल्बर्ट सिन्हांनी सांगितलं की, ‘‘माला शाळेत असतानाच एका नाटकात बंगाली दिग्दर्शक अर्धेदू बोस यांनी तिला अभिनय करताना पाहिलं आणि थेट एका बंगाली चित्रपटाची नायिका केलं. त्या चित्रपटाचं नाव होतं- ‘रोशन आरा’! दोन बंगाली चित्रपटांत काम केल्यानंतर माला मुंबईत एका बंगाली चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्तानं आली होती. तिथं तिला गीता बाली यांनी पाहिलं.. आणि मग मालाचं आयुष्यच बदलून गेलं!’’

मालाजींचे सुरुवातीचे चित्रपट फारसे चालले नाहीत. किंबहुना, फ्लॉपच झाले. त्यांच्या पहिल्या हिंदी चित्रपटाचा नायक होता- गुरुदत्त! तीन र्वष त्यांना यश मिळण्यासाठी वाट पाहावी लागली. परंतु ‘सब्र का फल मिठा होता है’ हे केवळ चित्रपटीय संवादांतलं वाक्य न ठरता ते प्रत्यक्ष जीवनातही घडतं, हे मालाजींच्या कारकीर्दीकडे पाहिलं की कळतं. ओळीने दहा चित्रपट फ्लॉप झाल्यावर गुरुदत्तच्याच ‘प्यासा’नं त्यांना पहिला ‘हिट्’ चित्रपट दिला. थोडीशी ग्रे शेड होती त्यांच्या भूमिकेला. परंतु त्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं. आणि त्यानंतर सुरू झाली ती पुढील तीन दशकं राज्य गाजवणाऱ्या एका अभिनयसम्राज्ञीची घोडदौड!

मी प्रारंभापासून मालाजींना ओळखतोय. त्यांनी १९५०, ६० आणि ७० च्या दशकांतील बहुतेक सर्व छोटय़ा-मोठय़ा अभिनेत्यांबरोबर काम केलंय. त्यांना सीनिअर-ज्युनिअर असा गंड कधीच नव्हता. ‘मी बरी, माझं काम बरं!’ असा त्यांचा स्वभाव होता. ‘कोणाबरोबर काम करते आहे?’ यापेक्षा ‘मी एका सर्जनशील कलेत माझी भर घालते आहे..’ अशीच त्यांची नम्र भूमिका असे. त्यामुळे गुरुदत्त, महिपाल, अशोककुमार, राज कपूर, देव आनंद, शम्मी कपूर, राजेंद्रकुमार, प्रदीपकुमार, किशोरकुमार, भारतभूषण, विश्वजित, राजकुमार, बलराज सहानी अशा एकापेक्षा एक सरस कलाकारांसोबत त्यांनी रूपेरी पडदा गाजवला. परंतु त्याचबरोबर त्यांच्या दृष्टीने नवीन असणाऱ्या धर्मेद्र, संजीवकुमार, मनोजकुमार, जॉय मुखर्जी, जितेंद्र, अमिताभ बच्चन यांच्याबरोबरही नायिका म्हणून त्यांनी काम केलं. सामान्यत: हिंदी चित्रपटाच्या नायिकांची नायिका म्हणून कारकीर्द ही फार अल्प काळापुरती असते. परंतु मालाजींनी दोन दशकांहून अधिक काळ आणि नायकांच्या तीन पिढय़ांवर राज्य केलं. खूप अवघड अशी गोष्ट त्यांना साध्य झाली. याचं कारण- त्यांची लहानखुरी चण आणि अभिनय!

आमची मीनाकुमारीजींबरोबर खूप चांगली मैत्री होती. एका संध्याकाळी त्या ‘प्रीतम’मध्ये आल्या होत्या. मीनाजी आम्हाला सांगत होत्या, ‘‘माला काय जबरदस्त काम करते! आज मला एका सुंदर चित्रपटाची ऑफर आली होती. चित्रपट खरंच छान होता. पण मला असं वाटलं की माझ्यापेक्षा माला त्या भूमिकेला चांगला न्याय देईल. ‘जहांआरा’ हा तो चित्रपट. मी त्याच्या निर्मात्यांना माला सिन्हाचं नाव सुचवलं.’’ पुढे हा चित्रपट बनला व खूप गाजलाही. त्यातल्या भूमिकेसाठी मालाजींना ‘फिल्मफेअर’ पारितोषिकासाठी नामांकनही मिळालं होतं. कशी गंमत आहे पाहा. या मायानगरीला स्वार्थी म्हणतात. परंतु मीनाकुमारीजींसारखी थोर कलाकार त्यांना ऑफर झालेली उत्तम भूमिका आणि मोठा चित्रपट त्यांच्यापेक्षा माला सिन्हा अधिक चांगला करेल असं सांगतात. त्यावरून तो चित्रपट मालाजींकडे जातो. मालाजीही भूमिकेला असा काही न्याय देतात, की सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी त्यांचं नामांकन होतं. मीनाजींचा स्वत:वर असलेला विश्वास, कलेवरचं प्रेम आणि मालाजींनी त्या विश्वासाला जागून केलेलं काम! महान माणसं महानच असतात. त्यांना अपयशाची किंवा दुसऱ्याच्या अंगी असलेल्या कर्तृत्वाची भीती वाटत नाही. मीनाजी आणि मालाजींनी हे सिद्ध केलं.

मालाजी ज्या काळात काम करत होत्या, तो काळ महत्तम गुणवत्तेचा होता. नर्गिस, मधुबाला, मीनाकुमारी, गीता बाली, वैजयंतीमाला, नूतन, साधना अशा प्रतिभावंत सौंदर्यसम्राज्ञींचं रूपेरी पडद्यावर राज्य होतं. तरीही मालाजींना मोठमोठय़ा बॅनरचे चित्रपट मिळत होते. दुर्दैव एवढंच, की त्यांना ‘फिल्मफेअर’चं नामांकन मिळालं तरी प्रत्यक्ष पुरस्कार कधी मिळाला नाही. मात्र, त्याने त्यांचं काही बिघडलं नाही. त्यांना ‘डेअरिंग दिवा’ हा किताब रसिकांकडून मिळाला होता. ज्या भूमिका करायला बाकीच्या तारका घाबरत असत, त्या मालाजी आनंदानं स्वीकारीत व यशस्वीही करून दाखवीत. त्यांना हॉलीवूडमधूनही ऑफर्स आल्या होत्या, असं मला अल्बर्ट म्हणाले होते. परंतु हॉलीवूडमधील एकूण वातावरण पाहता अल्बर्टसाहेबांनी मालाजींना त्या भूमिका स्वीकारू दिल्या नाहीत.

मालाजींनी नवोदित दिग्दर्शकांबरोबरही काम केलं. यश चोप्रांचा स्वतंत्र दिग्दर्शन असलेला पहिला चित्रपट म्हणजे ‘धूल का फूल’! बी. आर. चोप्रा त्याचे निर्माते होते. अर्थात या चित्रपटाची सक्सेस पार्टी ‘प्रीतम’मध्ये साजरी होणं स्वाभाविकच होतं. सगळेजण जमले होते. मीही होतो. त्यावेळी बी. आर. चोप्रांनी पार्टीत मालाजींना एक अत्यंत महागडा हिऱ्यांचा नेकलेस भेट दिला. तो नेकलेस बघून मालाजींचे डोळे चमकले. (कदाचित तो नेकलेस त्यांना चित्रपटासाठी मिळालेल्या मानधनापेक्षा अधिक किमतीचा असावा!) परंतु मालाजींनी नम्रपणे तो नाकारला. पण बी. आर. चोप्रांसमोर ‘नाही’ म्हणण्याची कोणाची प्राज्ञा नसे. मालाजींना तो घ्यावाच लागला. आपल्या अभिनयसंपन्न अभिनेत्रीचा गुणग्राहकतेनं सन्मान करणारे बी. आर. तर मोठे आहेतच, परंतु त्यांच्या सन्मानाला पात्र ठरणाऱ्या मालाजीही तेवढय़ाच मोठय़ा आहेत.

मालाजींनी बंगाली, नेपाळीसह अनेक भाषांतील चित्रपटांत काम केलं. एका नेपाळी चित्रपटात काम करताना मालाजींची गाठ चिदंबर प्रसाद लोहानी या नेपाळी अभिनेत्याशी पडली. आणि तोवर कोणाच्याही प्रेमात न पडलेली ही अभिनेत्री थेट लोहानींशी विवाह करून मोकळी झाली. त्यांचा विवाह यशस्वी ठरला. त्या काळात भारतीय नटय़ांनी लग्न केलं की त्यांची कारकीर्द संपत असे. परंतु मालाजींचं तसं झालं नाही. त्यांची कारकीर्द तशीच सुरू राहिली.

मध्यंतरी फिल्मफेअर पारितोषिक वितरण समारंभ झाला आणि त्यात मालाजींना जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला गेला. तो त्यांचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार होता. त्यावेळी आयुष्य पचवलेल्या या अभिनेत्रीनं शांतपणे प्रतिक्रिया दिली.. ‘‘मी अद्याप जिवंत आहे याची ही पावती आहे. धन्यवाद!’’

चला, त्यामुळे एक बरं झालं. हिंदी चित्रपटातलं एक अजरामर वाक्य पुन्हा सत्य ठरलं- ‘भगवान के घर देर है, मगर अंधेर नहीं!’

ksk@pritamhotels.com

शब्दांकन : नीतिन आरेकर

मराठीतील सर्व ये है मुंबई मेरी जान! बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta lokrang marathi articles
First published on: 15-07-2018 at 04:26 IST