मराठी अभिनेता व लेखक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिन्मय मांडलेकरने मोठा निर्णय घेतला आहे. मुलाच्या नावावरून झालेल्या ट्रोलिंगमुळे त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेची रजा घेत असल्याचं जाहीर केलं. मुलाचं नाव जहांगीर ठेवलं म्हणून चिन्मय मांडलेकरला गेले काही दिवस सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. यामुळे अभिनेत्याच्या कुटुंबाला मोठ्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं. याच पार्श्वभूमीवर व्हिडीओ शेअर करत चिन्मयने त्याच्या चाहत्यांजवळ आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
“छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागत या भूमिकेची मी रजा घेतो” असं चिन्मयने व्हिडीओ शेअर करत सांगितलं आहे. परंतु, त्याने घेतलेल्या या निर्णयावर त्याच्या चाहत्यांसह कलाकार मंडळींनी नाराजी दर्शवली आहे. “दादा हा निर्णय तू मागे घे” अशी विनंती अभिनेत्याचे चाहते त्याच्याकडे करत आहेत. अशातच काही मराठी कलाकारांनी देखील घडल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे. मृण्मयी व गौतमी देशपांडे, अदिती सारंगधर, सुरुद गोडबोले यांच्या पाठोपाठ आता चिन्मयसाठी सिद्धार्थ चांदेकरने पोस्ट शेअर केली आहे.
हेही वाचा : अयोध्येला पोहोचला रितेश देशमुख! पत्नी जिनिलीया व मुलांसह घेतलं रामलल्लाचं दर्शन, फोटो शेअर करत म्हणाला…
“जहांगीरच्या नावावरून घाणेरड्या भाषेत ट्रोल करणाऱ्या लोकांना महाराजांशी किंवा त्यांच्या विचारांशी काहीही देणं घेणं नाहीये. आपल्या मनातली घाण बाहेर काढणं हाच त्यांचा धर्म आणि हाच त्यांचा उद्योग.” असं सिद्धार्थने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
पुढे, चिन्मयला विनंती करत सिद्धार्थ म्हणतो, “तू महाराजांची भूमिका खूप निष्ठेने आणि प्रामाणिकपणे केली आहेस आणि कलाकार म्हणून आम्ही सगळेच त्यासाठी तुझा आदर करतो. ही भूमिका करणं थांबवू नकोस. प्लीज! आम्ही सगळे तू, नेहा आणि जहांगीरच्या बरोबर आहोत.”
हेही वाचा : “महाराजांची भूमिका तुम्ही केली नाहीतर…”, चिन्मय मांडलेकरच्या निर्णयानंतर चाहते नाराज; म्हणाले, “दादा प्लीज…”
सिद्धार्थप्रमाणे अनेकांनी अशाप्रकारच्या पोस्ट शेअर करत अभिनेत्यासह त्याच्या कुटुंबाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, आजवर प्रदर्शित झालेल्या शिवराज अष्टक मालिकेतील पाचही चित्रपटांमध्ये चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यामुळे उर्वरित तीन चित्रपटांचं काय होणार, महाराजांच्या भूमिकेत कोण झळकणार? अशा असंख्य कमेंट्स चिन्मयच्या व्हिडीओवर चाहत्यांनी केल्या आहेत. तसेच हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंतीही त्याला चाहत्यांकडून करण्यात येत आहे.