अभिजीत ताम्हणे

‘मा झा पासपोर्ट आजही भारतीय आहे’ असं ‘बर्लिन बिएनाले’च्या उद्घाटनपर पत्रकार परिषदेत झाशा कोला म्हणाली, हे तिथं उपस्थित असलेले पावणेदोनशे पत्रकार आणि पन्नासहून अधिक चित्रकार/ दृश्यकलावंत यांच्यापैकी फार कमी जणांच्या लक्षात राहिलं असेल. बर्लिन शहरात १९९८ पासून- म्हणजे जर्मनीच्या एकीकरणाला नऊ वर्षं झाल्यानंतर दृश्यकलेचं हे द्वैवार्षिक (बायअॅन्युअल किंवा ‘बिएनाले’) प्रदर्शन भरू लागलं, त्याची यंदाची १३ वी खेप १४ जूनपासून सुरू झाली. हे महाप्रदर्शन बर्लिनमधल्या चार ठिकाणी, १४ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. झाशा कोला ही यंदाच्या ‘बर्लिन बिएनाले’ची प्रमुख गुंफणकार- क्युरेटर. म्हणजे, लोकांना या द्वैवार्षिक प्रदर्शनातून यंदा काय मिळावं, हे तिनं ठरवलं आहे.

दृश्यकलेचं- म्हणजे चित्रं, शिल्पं, मांडणशिल्पं, दृश्यकलाकृती म्हणूनच तयार झालेले व्हिडीओ किंवा परफॉर्मन्स यांचं- क्षेत्र जगभर इथूनतिथून सारखंच वाटत असलं तरी जर्मनीत आजही कला आणि समाज यांच्या संबंधाविषयीच्या चिंतनाला किंवा ‘थिअरी’ला दृश्यकला क्षेत्रात महत्त्वाचं स्थान आहे. एरवीही, जगात अनेक ठिकाणी भरणारी ‘बिएनाले’- महाप्रदर्शनं निव्वळ चित्रांचीच नव्हे तर विचारांचीही गुंफण लोकांसमोर मांडत असतात. हे काम करण्याची जबाबदारी जर्मनीच्या राजधानीत झाशा कोला हिच्यावर यंदा होती. या बिएनालेच्या पत्रकार परिषदेत ती काय बोलणार आहे, हे ऐकण्यासाठीच जगभरचे पावणेदोनशे पत्रकार हजर होते.

झाशा बोलत होती म्यानमारबद्दल. जिथल्या मानवी वाताहतीकडे जगाचं अजिबात लक्ष नाही, अशा देशाबद्दल. म्यानमारमध्ये लोकशाही टिकावी, लष्करशाहीची मनमानी सुरू राहू नये, यासाठी ज्या अनेकांनी सक्रिय संघर्ष केला त्यात तिथले दृश्यकलावंतही होते. त्यापैकी एक तेन लिन. त्यानं तुरुंगात असतानाही एक ‘परफॉर्मन्स’ केला. त्याबद्दल त्याच्यावर खटला भरण्यात आला, ‘देशाबद्दल अप्रीती निर्माण करणे’ , ‘राजद्रोह’ वगैरे कलमांखाली त्याला दोषी ठरवण्यात आलं. हा निकाल कसा अगदी ‘ठरलेला’च आहे, हे लोकांच्याही लक्षात यावं म्हणून तेन लिन हसत सुटला… त्याचं ते हसणं पाहून न्यायालयात जमलेले अनेकजण हसू लागले… न्यायालयानं या हसण्याचीही गंभीर दखल घेऊन शिक्षा वाढवली.

हा केवळ ‘किस्सा’ म्हणून सांगत नव्हती झाशा. ‘मला यातून जे सुचवायचंय ते तुम्हाला उमजणार आहे, माहितेय मला…’ अशा विश्वासानंच बोलायची ती, इथे भारतात असतानाही. त्यामुळे ती जे सांगत होती त्याचा ‘उमजणारा’ अर्थ असा होता की, निर्बंध असणारच आहेत आणि राज्यसत्तेकडे असलेली दंडशक्ती जर लोकांचा विचार करणारी नसेल, तर निर्बंधही वाढणारच आहेत. पण निर्बंध आहेत, शिक्षा होते आहे म्हणून व्यक्तच व्हायचं नाही- हसायचंही नाही- असा हिशेब न करणाऱ्या कलावंतांकडे आपण आज लक्ष दिलं पाहिजे! यावर, ‘‘का दिलं पाहिजे लक्ष? सरकार कितीही जाचक असेल, त्याच्याशी भांडणं हे काय कलावंतांचं काम आहे का?

त्यासाठी आहेत की मोर्चेकरी… चित्रकारांनी छान चित्रं काढावीत, जग सुंदर करावं वगैरे…’’ इतके भुक्कड प्रतिवाद गेल्या कैक वर्षांत जर्मनीत किंवा युरोपात होत नसतील; पण जिथे कुठे चित्रकारांवर फक्त ‘सुंदर- सुंदर काहीतरी करण्या’ची जबाबदारी लादली जाते, त्यांपैकी एका देशाच्या आपण नागरिक आहोत, ही जाणीव झाशाला होती आणि आजही असेल. निषेध करणं, मोर्चे काढणं याचं महत्त्वच आज जगभर हरवत चाललंय, याची जाणीव तर तिला नक्कीच आहे. ही जाणीव तिनं ‘बर्लिन बिएनाले’च्या सहपुस्तकात (कॅटलॉगमध्ये) भेदक शब्दांत व्यक्त केली आहे.

तिचं म्हणणं असं की, निदर्शनं/ आंदोलन/ निषेध हे जणू भीक मागणं चाललंय अशा थाटात राज्ययंत्रणा आणि सत्ताधाऱ्यांचा प्रतिसाद असतो, असं आज दिसतं आहे आणि अशाच वातावरणात, हे भीक मागणं नसल्याची खात्री पटलेल्या साऱ्याच माणसांनी व्यक्त झालं पाहिजे… ज्यांना व्यक्त होण्यासाठी कलेचा मार्ग माहीत आहे, अशांवर तर ही जबाबदारी आहेच. कला ही राजकीय कृतीच आहे.

हे झाशाला कधी पटलं? ती एकेकाळी मुंबईच्या ‘राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालया’त (एनजीएमए) असिस्टंट क्युरेटरसारखं काम करत होती. नंतर मुंबईच्याच छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात (पूर्वीचं प्रिन्स ऑफ वेल्स म्यूझियम) ‘जहांगीर निकल्सन कलादालन’ साकारण्याकामी तिची नियुक्ती झाली होती. इथवरचा तिचा अनुभव प्रस्थापित संस्थांमधला, त्या संस्थांतल्या नोकरशाहीला तोंड देण्याचा होता. दिल्लीत सप्टेंबर २०१० मध्ये झालेल्या ‘फिगरिंग द क्युरेटर’ या परिसंवादात, हा अनुभव अस्वस्थ करणारा का आहे याबद्दल झाशा बोलली होती असं आठवतंय. तेव्हाची तिची हताश देहबोली आणि त्यानंतर १५ वर्षांनी, ‘बर्लिन बिएनाले’ची क्युरेटर म्हणून पत्रकारांना संबोधित करतानाचा तिचा आत्मविश्वास, यांच्यात जमीनआस्मानाचा फरक दिसला!

हा फरक पडण्यासाठी ज्या बऱ्याच बाबी कारणीभूत झाल्या असतील, त्यापैकी सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे ‘क्लार्क हाउस’ ही कलासंस्था! कुलाब्यात, आज जिथं ‘स्ट्रेन्जर्स हाउस’ हे प्रयोगशील कलादालन आहे तिथंच ‘क्लार्क हाउस’ होतं. इथं तरुण चित्रकार यायचे, काहीजण राहायचेसुद्धा. सुमेश शर्मा आणि झाशा कोला हे या ‘क्लार्क हाउस’ कलसंस्थेचे संकल्पक-संस्थापक.

दोघेही मुळात उच्चभ्रू कुटुंबांतले; पण लोकशाहीबद्दल, मुंबईबद्दल, इथल्या सर्व आर्थिक/ सामाजिक स्तरांतल्या जगण्याबद्दल आस्था असलेले. कामगारवर्गातूनही ‘आर्ट स्कूल’मध्ये आलेल्या आणि काहीतरी करू पाहाणाऱ्या तरुणांना हे ‘क्लार्क हाउस’ आपलं वाटायचं, ते झाशाच्याही बोलण्यामुळे. असें १७ तरुण दृश्यकलावंत एकत्र होऊन ‘क्लार्क हाउस’ला आकार मिळाला होता.

स्वत:कडे अजिबात मोठेपणा किंवा ‘मार्गदर्शक’पणा न घेता, सौम्य आवाजात ‘तू हे करून का पाहात नाहीस?’ यासारखं काहीतरी बोलण्याची झाशाची पद्धत अनेकांना उभं करणारी ठरली. तिचे डोळे आपण मांडलेल्या कल्पनेमुळे चमकलेले आहेत हे या मुलामुलींना दिसायचं आणि त्यातला खरेपणाही ओळखू यायचा. थोडक्यात सांगायचं तर, या मुलामुलींनी आपापली अभिव्यक्ती करावी, यासाठी झाशा त्यांच्याशी संवाद साधत होती. हेच काम तिनं ईशान्य भारतातल्या मणिपूर, नागालँड या राज्यांतही केलं आणि पुढे तर म्यानमारमध्येही केलं. तिथं मुंबईइतका वेळ नसेल झाशाकडे, पण ती वारंवार तिथं जायची. ‘इथल्या संदर्भात, दृश्यातून होणारी अभिव्यक्ती कशाला म्हणता येईल?’ असा प्रश्न तिनं महत्त्वाचा मानला होता.

पुढे झाशानं मिलानमध्ये राहाणारे क्युरेटर ल्युका सेरीझा यांच्याशी विवाह केला, ती अर्धाअधिक वेळ इटलीतच राहू लागली, मिलानच्या कला महाविद्यालयात शिकवू लागली, तेव्हा बोलान्झो या छोट्या शहरात ‘आर/जे कुन्स्ट’ ही संस्था तिनं फ्रान्चेस्का व्हेरा यांच्यासह स्थापली. या संस्थेनं युरोपमधल्या आणि जगात अन्यत्र राहाणाऱ्या दृश्यकलावंतांनी राजकीय/ सामाजिक संशोधन करून दृश्य अभिव्यक्ती करावी, यासाठी प्रोत्साहन दिलं. या साऱ्याची फळं बर्लिन बिएनालेमध्ये दिसत होती.

झाशानं ज्यांना घडत्या काळातही साथ दिली, अशांपैकी मुंबईचा अमोल पाटील हा चित्रकार बर्लिन बिएनालेत होता. मणिपूरच्या उखरूल जिल्ह्यातल्या झामथिंगला रुइवा शिमराय यांनाही झाशानं साथ दिली होती. या झामथिंगला रूढार्थानं ‘चित्रकार’ नाहीत. पण दृश्य अभिव्यक्तीची ताकद त्यांनी दाखवून दिलेली आहे. लष्करी विशेष अधिकार कायदा (अफ्स्पा) लागू असताना १९८६ मध्ये एका नागा तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न लष्कराच्या कर्मचाऱ्यानं केला, त्यात त्या तरुणीचा जीव गेला. त्या मुलीची- लुइंगाम्ला हिची- आठवण लोकांना राहावी म्हणून, पारंपरिक तंग्खुल नागा शालीतून म्हणजेच ‘कशान’वरच्या डिझाइनमधून लुइंगाम्लाची गोष्ट झामथिंगला यांनी साकारली. मग आसपासच्या २३२ गावांमधल्या सहा हजार महिलांनी या डिझाइनचं अनुकरण केलं, आज लुइंगाम्लाची गोष्ट सांगणारे १५ हजार कशान आहेत! हे कशान वापरून या जमातीच्या महिलांनी वेळोवेळी निदर्शनांमध्ये भाग घेतलेला आहे.

म्हणजे एकप्रकारे, ज्याला ‘एजिट प्रॉप’ किंवा आंदोलनाचं अवजार म्हणता येईल असं काम या शालींनी केलेलं आहे. पण झाशाची राजकीय कलेची समज या एजिट प्रॉपपुरती मर्यादित नाही. बर्लिन बिएनालेमध्ये १८७८ सलच्या ‘बर्लिन कॉन्फरन्स’ची- अर्थात, युरोपातल्या देशांनी आपसांत लढायचं नाही, हे ठरवून पुढल्या काळातल्या वसाहतवादी कारवायांना मुक्तद्वार देणाऱ्या परिषदेची- आठवण ठेवणारं भलंमोठं तैलचित्र बर्लिनच्या टाउन हॉलमध्ये १८८१ पासून विराजमान आहे, यावर बोट ठेवणाऱ्या कलाकृतीला झाशानं स्थान दिलं. ही कलाकृती आर्मिन लिन्के यांची.

त्यांनी मूळ तैलचित्राचा तेवढ्याच मोठ्या आकाराचा फोटो काढून, त्याचे उभे तुकडे (आज बडे युरोपीय देश एकमेकांपासून विलग आहेत याची आठवण देण्यासाठी) करून ते मांडलेच, पण मुळात या तैलचित्रामध्ये कोणाशेजारी कोण उभं असावं, कोण बसलेलं असावं, याची आखणी मूळ चित्रकार अँटोन व्हॉन वेर्नर हे कशी करत होते, याची साक्ष देणारी काही स्केचबुकंही मांडली. ‘जेरुसलेम आणि बेथलहेम हे भाग युद्धमुक्तच ठेवावेत, असं या परिषदेत ठरलं होतं’ याचीही आठवण बर्लिन बिएनालेनं दिली.

अनेक ठिकाणच्या बिएनालेंमध्ये ‘दुर्लक्षित’, ‘जनजातीय’ दृश्यकलावंतांचा समावेश असतो. ‘आम्ही त्यांनासुद्धा स्थान देतोय’ अशा मिजाशीत हे समावेशन (इन्क्लूजन) केलं जातं की काय, अशी शंका येते. पण थोर आफ्रिकी गुंफणकार ओक्वी एन्वेझर जेव्हा इब्राहीम महामा या तरुण चित्रकाराला २०१५ च्या व्हेनिस बिएनालेत स्थान देतात, तेव्हा त्यांच्या सच्चेपणाची खात्री प्रेक्षकांनाही पटत असते. याचं कारण, एन्वेझर यांनी बाकीच्या सर्व कलाकृतींच्या निवडीमध्येही काहीएक सुसंगती ठेवलेली असते. उगाच, ‘जरा मजा म्हणून हे हवं’ असा प्रकार नसतो.

झाशा कोलानं बर्लिन बिएनालेच्या केलेल्या गुंफणीत हा सच्चेपणा दिसतो. ती कलेला राजकीय कृती समजते आहे, हे दृश्यकलावंतांच्या साथीनं तिनं २०११ मध्ये ‘अफ्स्पा’ला विरोध करणं, पुढे ‘सीएए’ला विरोध करणं, यातूनही दिसत राहिलं होतं. हे ज्यांनी पाहिलंच नव्हतं, त्यांना झाशाची बर्लिन बिएनाले ‘फारच संयत’ किंवा ‘बर्लिनमधल्या जळत्या मुद्द्यांना कमी स्थान देणारी’ वाटते आहे- तसे लेख प्रकाशित झालेले आहेत- हा विरोधाभास म्हणावा का?

नाही. एकतर झाशाकडून अधिकच अपेक्षा असल्यामुळे ही बिएनाले ‘फारच संयत’ वाटू शकते. किंवा, आजवर त्या-त्या वेळच्या परिस्थितीला प्रतिसाद देणारी झाशा बिएनालेच्या निमित्तानं व्यापक विचार मांडू पाहाते आहे, हे त्यांना उमगलं नसावं. झाशानं असं काहीच म्हटलं नव्हतं- व्यापक विचार वगैरे. तिनं लिहिलंय की सत्ताधारी ‘कल्पनां’ना घाबरू शकतात. बिएनालेंची शीर्षकं एरवीही मोघम असतात पण यंदाच्या बर्लिन बिएनालेचं शीर्षक – ‘पासिंग द फ्यूजिटिव्ह ऑन’ हे फक्त ‘परागंदा लोकांची जबाबदारी टाळणं’ असं आहे की काय असं काहींना वाटल्यामुळे ‘जळते विषय टाळले’ वगैरे म्हटलं जात असावं. ‘फ्यूजिटिव्ह’ म्हणजे ‘पलायन केलेला/ली/ले’ हा अर्थ शब्दकोशात चोख असला तरी ‘द फ्यूजिटिव्ह’ काय असू शकतं?

विंदा करंदीकर ज्याला (‘दातापासून दाताकडे’ या शोषणाचा इतिहास मांडणाऱ्या कवितेत) ‘सुवर्णाच्या रथात बसून, सत्य इथून पळले आहे’ ते सत्य आणि झाशाला अभिप्रेत असलेलं ‘द फ्यूजिटिव्ह’ एकच आहे का? बर्लिनला जाऊन, बिएनाले पाहून तशी खात्री पटते… पण झाशानं कुठे विंदा वाचलेत! मग झाशानं हेच शीर्षक कशाला दिलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ती सरळ उत्तर देणार नाही. ती तिला त्या वेळी जे वाटत असतं ते बोलत राहाते. समोरच्याला उमगलं तर ठीक. ‘कला ही राजकीय कृतीच’ मानणं, राष्ट्रवादोत्तर मानवतावादाचा आग्रह धरणं, ही लक्षणं तिला हट्टी ठरवण्यासाठी पुरेशी आहेत. ही काटकुळी, हट्टी मुलगी जे सांगू पाहाते आहे, ते आज स्पष्ट नसेल… पण म्हणून ते बिनमहत्त्वाचं मानता येणार नाही.