भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यासारखेच वागत असल्याची काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलेली टीका मोदी यांनी सकारात्मक पद्धतीने स्वीकारली आहे. आपला विजय झाल्याचे भाकीत सोनिया गांधी यांनी वर्तविले असल्याचे सूचित करून मोदी यांनी सोनियांना उद्देशून, ‘आप के मुँह मे घी-शक्कर’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
‘ये दिल मांगे मोअर’ या मोदी यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने जोरदार टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना मोदी म्हणाले की, एका गरीब मातेचा मुलगा मागणार नाही तर काय करणार, आपण ‘कमळा’साठी जास्त मते मागितली, मात्र सोनिया गांधी यांना ते रुचलेले दिसत नाही, असेही मोदी म्हणाले. आता काँग्रेसला मते मागताना लाज वाटत असेल, मात्र आपल्याला मते मागताना लाज वाटत नाही, असेही ते म्हणाले.
सोनिया गांधी आणि राहुल यापूर्वी आपला नामोल्लेख टाळत होते, मात्र आता संपूर्ण देशच आपले नाव घेत असल्याने सोनिया आणि राहुल यांना आपला नामोल्लेख करणे भाग पडले आहे, असेही मोदी म्हणाले.
राजकारणाचे गुन्हेगारीकरण नष्ट  करण्याचे आश्वासन या वेळी मोदी यांनी दिले. बंदूक संस्कृती घालवून देशाचे राजकारण गुन्हेगारमुक्त करण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी नमूद केले.