भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडणे साहजिक होते. कारण शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विरोध असतानाही भाजपचे नेते राज यांना सारखे भेटत असतात किंवा महायुतीत मनसे हवी अशी अधून-मधून आरोळी ठोकत असतात.
महायुतीत मनसे हवी, अशी घोषणा सर्वांच्या आधी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली. त्यावर पुढे उद्धव व राज यांच्यात टाळ्या बाई टाळ्या असा खेळही झाला. समेटाचे काही दिसेना. मग दोघांनी एकमेकांविरुद्ध इशारे द्यायला सुरुवात केली. उद्धव यांनी राजना मनसेत घेण्याची चर्चा बंद करून टाकली. तरीही भाजपचे नेते विशेष करून गडकरी यांचे काही केल्या राजप्रेम कमी होत नव्हते. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या उद्धव यांनी एक दिवस कुणाला काही पत्ता लागू न देता, नागपुरला जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय गाठले. असे कळते की उद्धव यांचे नागपुरात संघभूमीवर पाऊल पडले तो, दिवस होता २८ जानेवारीचा. इकडे मुंबईत रामदास आठवले यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजपच्या कार्यालयांत अक्षरशहा लगीनघाई सुरू होती. गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, विनोद तावडे, अशिष शेलार असे भाजपचे सर्वच लहानथोर नेते आठवले यांना राज्यसभेत पाठविण्यासाठी त्या घाईत दंग होते. आणि तिकडे उद्धव ठाकरे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या कानाशी लागले होते. राज यांच्या मागे लागणाऱ्या तुमच्या नेत्यांना आवरा, अशी तक्रारवजा किंवा नाराजीवजा विनंती त्यांनी सरसंघचालकांना केली.
.. दिल्लीतून परतून आलेला प्रत्येक काँग्रेसजन सोनिया गांधींची भेट झाली असे सांगतो परंतु सोनिया गांधी काय बोलल्या हे तो कधीच सांगत नाही. अगदी तसेच. उद्धव यांच्या तक्रारीवर सरसंघचालक काय म्हणाले हे फक्त त्या दोघांनाच माहीत. अर्थात नागपूरचा हेलपाटा करुनही सोमवारी गडकरी राज यांना भेटलेच. त्यामुळे उद्धव अस्वस्थ आहेत. त्यांची समजूत काढायला लगेच देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर गेले. उद्धव यांनी थेट फोन उचलून राजनाथ सिंह यांनाच इशारा दिला. त्यावर राजनाथ काय म्हणाले हे समजू शकले नाही, पण भाजपच्या नेत्यांनी राजभेटीच्या वादावर पडदा टाकला यात सारे आले, अशा समाधानाने सेना नेत्यांनी सुस्कारे टाकल्याचे समजते..