राजकीय नेत्यांना सामान्यांच्या तुलनेत खूपच धावपळ करावी लागते. त्यांनी अजीर्ण होईपर्यंत खाऊ नये, अशी जनतेचीही अपेक्षा असते. आता निवडणुकीच्या काळात तर ही धावपळ अधिकच वाढणार. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनाही आता त्याची चिंता वाटू लागली आहे. भाजपच्या श्रेष्ठींना तर राज्यातील नेत्यांना थेट ‘कमी खा’ आणि ‘तब्येत सांभाळा’ असे बौद्धिकच घेतले आहे.
प्रचारकाळात मांसाहार वज्र्य करा. तेलकट व पचनास अतिजड पदार्थाचे सेवन टाळावे, वेळेवर आणि पचनास हलका असाच आहार घ्यावा, योग्य वेळी जमेल तशी विश्रांतीही घ्यावी, अशा सूचना पक्षाने आपल्या नेतेमंडळींना दिल्या आहेत. निवडणुकांच्या काळात नेतेमंडळीचे दौरे, प्रचारसभा, कार्यकर्त्यांशी बैठका सुरू असतात. पदयात्रांना सकाळी लवकर सुरुवात करावी लागते, तर रात्री सभा आटोपून घरी किंवा मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन जेवण घेईपर्यंत उशीर होतो. त्यामुळे सकाळी भरपेट न्याहारी करावी. उपमा, पोहे, इडली अशा पदार्थाचा समावेश त्यात असावा. उन्हाळ्याचे दिवस असले तरी शीतपेयांचा मोह टाळून ताक, फळांचे रस, फळे यांचे सेवन करावे. दुपारी हलके जेवण करून रात्री पोटभर आहार घ्यावा. मधुमेह, रक्तदाबासारखे आजार असलेल्या नेत्यांनी आहारातील पदार्थ व वेळांबाबत काटेकोर काळजी घ्यावी, अशा सूचना पक्षाने आपल्या नेत्यांना दिल्या आहेत.
निवडणूक आचारसंहितेचा धसका राजकीय नेत्यांना आणि उमेदवारांना असतो व त्याचे पालन करावेच लागते, मात्र भाजपचे उमेदवार आणि नेते ‘आहार आचारसंहिता’ किती पाळतात, याचे मात्र काही सांगता येत नाही.