गुजरातच्या विकासासाठी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी जे प्रारूप राबविले त्यावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी सातत्याने कडाडून टीका केल्यानंतर आता भाजपने सोनियांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. वढेरा यांच्या विकासाच्या प्रारूप बेकायदेशीर गोष्टींच्या पायावर उभे असल्याची खरमरीत टीका करणारी  ‘दामाद श्री’ ही सहा पानांची लघू पुस्तिका आणि ८ मिनिटांची ध्वनिचित्रफीतही आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ प्रसिद्ध करण्यात आली.
‘रॉबर्ट वढेरा हे काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आहेत. त्यांनी जमिनींच्या अनेक खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये गांधी घराण्याच्या नामप्रभावाचा गैरवापर केला आहे. त्यांचे अनेक प्रकल्प जमीनविषयक आणि पर्यावरणविषयक कायद्यांचे उल्लंघन करून उभे राहिले आहेत. हेच यांचे विकासाचे प्रारूप’, अशा तिखट शब्दांत भाजप नेते रवि शंकर प्रसाद यांनी काँग्रेसच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. तसेच अशा विविध व्यवहारांमधूनच वढेरा यांनी बक्कळ पैसा कमावल्याचाही आरोप केला.
‘भाजप व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप करीत असल्याची टीका काही जण करीत आहेत. पण ही व्यक्तिगत टीका नसून देशातील भ्रष्टाचाराचा हा प्रश्न आहे’, असेही प्रसाद यांनी स्पष्ट केले.  गांधी घराण्याने आपल्या ओळखींचा, पदाचा आणि प्रभावाचा वापर करून वढरा यांना कशी आणि किती मदत केली, याचा तपशील या ध्वनिचित्रफितीत आहे. अवघे एक लाखाचे भांडवल घेऊन रॉबर्ट यांनी आपला व्यवसाय सुरू केला आणि आता त्यांचा आर्थिक स्तर एवढा उंचावला, ‘हेच विकासाचे वढेरा मॉडेल’, असा टोला भाजपने लगावला आहे.