वरिष्ठ नेतेमंडळी मुलांच्या प्रचारात गुंतलेली, पक्ष संघटनेची हवी तेवढी साथ नाही अशा परिस्थितीत लोकसभा निवडणूक प्रचारापासून सारेच व्यवस्थापन करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पडली असून, दौऱ्यांपासून उमेदवारांकडून आढावा घेण्याचे काम त्यांनाच पार पाडावे लागत आहे.
गेले वर्षभर मुख्यमंत्री चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. त्यातच पक्षाचे राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांची साथ ठाकरे यांना असल्याने मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली. यवतमाळ मतदारसंघातून स्वत: प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी निवडणूक लढवावी, पण त्यांच्या मुलाला उमेदवारी देण्यास मुख्यमंत्र्यांनी विरोध दर्शविला होता. मुलाला उमेदवारी नाकारल्याने प्रदेशाध्यक्ष ठाकरे काहीसे नाराज झाले. नारायण राणे आणि डॉ. पतंगराव कदम मुलांच्या प्रचारात गुंतून पडले. त्यातच सर्वच नेत्यांना जरा दूरच ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस नेतेही तेवढी साथ देत नाहीत. मुख्यमंत्र्यांबद्दल पक्षात तेवढे ममत्व नाही. अशोक चव्हाण यांच्या नांदेड मतदारसंघात झालेल्या जाहीर सभेत बोलताना अशोकरावांनी आता राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची कामगिरी बजवावी, असा सल्ला देऊन अप्रत्यक्षपणे राज्यात नाक खुपसू नका, असेच बजावले.
काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत गटबाजी निवडणुकीत अनेकदा महागात पडते. हे लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला प्रत्येक मतदारसंघातील नाराजांना गोंजारले. बॅ. ए. आर. अंतुले यांच्यापासून गल्लीतील नेत्यांपर्यंत अनेकांची समजूत काढावी लागली. विदर्भात पहिल्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीपूर्वी त्यांनी सर्व मतदारसंघांचा दौरा करून प्रचार सभा घेतल्या. दुसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ावर लक्ष केंद्रीत केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर समन्वय ठेवून काही ठिकाणी दुरुस्त्याही केल्या.
उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक खासदार निवडून येणाऱ्या महाराष्ट्राबद्दल सर्वच पक्षांच्या अपेक्षा आहे. नरेंद्र मोदी यांनी ठिकठिकाणी प्रचारसभा घेऊन खासदारांचे चांगले संख्याबळ मिळेल या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसच्याही राज्यातून चांगले उमेदवार निवडून येण्याची अपेक्षा आहे. ही सारी जबाबदारी मुख्यमंत्री चव्हाण यांची असल्याने त्यांनी बारीकसारीक बाबींमध्ये लक्ष घालीत खासदारांचे चांगले संख्याबळ देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.