राज्यातील धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश न करता त्यांचा घटनेच्या तिसऱ्या सूचित समावेश करुन आरक्षण देण्याची शिफारस केंद्र सरकारला करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय धनगर आरक्षण संघर्ष कृती समितीने आणि राष्ट्रीय समाज पक्षान फेटाळून लावला आहे. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीतच (एसटी) समावेश झाला पाहिजे, ही मागणी धसास लावण्यासाठी संघर्ष समितीच्या वतीने उद्या गुरुवारी राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन पुकारण्यात आले आहे.
घटनेच्या तिसऱ्या सूचित धनगर समाजाचा समावेश करण्याची शिफारस करण्याची राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय हा या समाजाच्या डोळ्यात धूळफेक करणारा आहे, अशी टीका या संघटनांनी केली आहे. राज्य घटनेतच धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण दिले आहे. त्याची राज्य सराकराने अंमलबजावणी करावी, अशी त्यांची मागणी आहे. या मागणीसाठी आरक्षण संघर्ष समितीने उद्या राज्यभर चक्का जाम आंदोलन पुकारले आहे. उद्या जिल्हा व तालुका स्तरावर रास्ता रोको व ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे, मुंबईतही रेल रोको आंदोलन करण्यात येईल अशी माहिती समितीचे समन्वयक नवनाथ पडळकर यांनी दिली. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने होईल, अशी ग्वाही देतानाच , मात्र त्याचे जे काही परिणाम होतील त्याला सरकारच जबाबदार राहील, असा इशारा समितीने दिला आहे.

हर्षवर्धन पाटील यांच्यावरील हल्ल्याचा निषेध
राज्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर पुणे येथे झालेल्या हल्ल्याचा बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निषेध करण्यात आला. हा हल्ला पूर्वनियोजित होता का, याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांना दिली.

‘धनगर समाजाचा तिसऱ्या सू्चित समावेश करुन आरक्षण देण्याची केंद्राला शिफारस करण्याच्या राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय आम्ही फेटाळून लावतो. अनुसूचित जमातीतच या समाजाचा समावेश करुन आरक्षण मिळाले पाहिजे.
-महादेव जानकर
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष