शिवसेनेने गेली अनेक वर्षे पाकिस्तानशी कोणत्याही पातळीवर संबंध प्रस्थापित करण्यास कडाडून विरोध केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही ही भूमिका अधिक कडक केली आहे. भारतीय जवानांचे शिर कापणाऱ्या पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवू नयेत, असे त्यांनी ठामपणे सांगितले होते. पण शपथविधीसाठी मोदी यांनी पाकिस्तानला निमंत्रण दिल्याने सेनेची कोंडी झाली आहे. मोदी लाटेत तरलेल्या आणि प्रचंड यश मिळविलेल्या शिवसेनेसमोर आता सत्तेच्या सारीपटावर विराजमान होण्याच्या वेळी अवघड प्रसंग निर्माण झाला असून नेमकी कोणती भूमिका घ्यायची, असा ‘रोखठोक’ सवाल निर्माण झाला आहे.
पाकिस्तानशी साहित्यिक वा सांस्कृतिक पातळीवर संवाद साधण्यास सेनेचा पूर्वापार विरोध आहे. देशातील घातपाती कारवाया आणि अतिरेक्यांना फूस देणाऱ्या पाकिस्तानबरोबर क्रिकेट किंवा अन्य खेळ तरी कशाला खेळायचे, अशी भूमिका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही होती. त्यामुळे पाकिस्तानशी सामना ठरल्यावर वानखेडे स्टेडियममधील खेळपट्टी शिवसेनेने उखडली होती. शिवसेनेच्या तीव्र विरोधामुळे मुंबईत पाकिस्तानबरोबर क्रिकेटचे सामने अनेक वर्षे होऊ शकले नव्हते. पाकिस्तानी कलावंतांना मुंबईत पाऊल ठेऊ देणार नाही, अशीही गर्जना करीत शिवसेनेने अनेकदा आंदोलने केली. बाळासाहेब ठाकरे यांची तीच भूमिका उद्धव ठाकरे यांनी अधिक कठोर केली असतानाच आता मोदी यांच्या ‘समझोत्या’ने ते पेचात सापडले आहेत.
आपले तत्त्व आणि निष्ठा जपायची की सत्तेचा लाभ पदरात पाडून घेण्यासाठी पाकिस्तानी पंतप्रधान किंवा त्यांच्या प्रतिनिधींपुढे मंत्रीपदाची निमूट शपथ घ्यायची, हे शिवसेनेला ठरवावे लागणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शपथविधीला न आल्यास ते शिवसेनेच्या पथ्यावर पडणार आहे. पण ते किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्यास शिवसेनेला ठोस भूमिका घ्यावी
लागणार आहे.
मोदी यांना विरोध करणे आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता शिवसेनेला परवडणारे नाही. त्यामुळे तोंड दाबून बुक्क्य़ांचा मार सहन करण्याशिवाय शिवसेना नेत्यांना पर्यायच नाही, अशी चर्चा भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात आहे.