पूर्ती पॉवर व शुगर लि.च्या विरुद्ध खोटी व दिशाभूल करणारी पत्रकार परिषद घेतल्याप्रकरणी पूर्तीचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर दिवे यांनी दिवाणी दावा दाखल केला आहे. द्वितीय सह दिवाणी न्यायाधीश एस.वाय. आबाजी यांनी हा दावा दाखल करून आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल, अंजली दमानिया, गिरीश नांदगावकर, राहुल पुगलिया, देवेंद्र वानखेडे, प्राजक्ता अतुल उपाध्याय, प्रद्युम्न सहस्त्रभोजनी या आठजणांना कारणे दाखवा नोटीस बाजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ मार्चला होणार आहे.
यावेळी अ‍ॅड. सुधीर माळोदे व अ‍ॅड. विनोद तिवारी यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिले की, लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवून पूर्तीचे संचालक नितीन गडकरी यांना बदनाम करण्यासाठी २००२ चे पूर्णत: खोटे व असत्य प्रकरण काढले. ती माहिती पत्रकार परिषदेत देऊन पूर्ती कंपनी व गडकरी यांची बदनामी केली. त्यामुळे पूर्ती कंपनीविषयी नागरिकांमध्ये गैरसमज व भ्रम निर्माण केला आहे. या कारवाया लोकशाही व कायदेशीर व्यवस्थेला मारक ठरत आहे. त्यामुळे न्यायालयाने आरोपीविरुद्ध कारवाई करून हा प्रकार थांबवावा, अशी विनंतीही न्यायालयाला करण्यात आली. यावेळी पूर्ती कंपनीने भक्कम पुरावे न्यायालयात उपलब्ध करून दिले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली प्रतिवादींनी अत्यंत बेजबाबदार, बेकायदेशीर व गैरवर्तणूकपूर्ण व्यवहार केला असल्याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. न्यायालयाने या विनंतीची दखल घेऊन आठ प्रतिवादींना कारणे दाखवा नोटीस बजावली.