12 July 2020

News Flash

संक्षिप्त : मागितलेला नसताना पाठिंबा कशाला देता?

भारतीय जनता पक्षाने मागितलेला नसतानाही काही पक्ष भाजपला पाठिंबा देत आहेत. त्यांना पाठिंबाच द्यायचा असेल, तर त्यांनी भाजप आघाडीला पाठिंबा द्यावा नाहीतर भाजपमध्ये विलीन व्हावे,

| April 9, 2014 12:01 pm

राजनाथ सिंह यांचा मनसेला सवाल
पुणे : भारतीय जनता पक्षाने मागितलेला नसतानाही काही पक्ष भाजपला पाठिंबा देत आहेत. त्यांना पाठिंबाच द्यायचा असेल, तर त्यांनी भाजप आघाडीला पाठिंबा द्यावा नाहीतर भाजपमध्ये विलीन व्हावे, असे आवाहन करत भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी मंगळवारी नाव न घेता राज ठाकरे यांच्या भूमिकेवर हल्ला चढवला. लोकांची दिशाभूल करून राजकारण यशस्वी होत नाही, असेही ते म्हणाले.
महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा मंगळवारी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित करण्यात आला होता. आठवले महायुतीमध्ये आल्यामुळे आम्हाला चांगली ताकद मिळाली आहे. शिवसेनेबरोबरही आमची अनेक वर्षांपासून युती आहे. ही युती आणि आमचे संबंध अतूटच राहतील, असे प्रतिपादन करत राजनाथ सिंह यांनी नंतर कोणत्याही पक्षाचे नाव घेतले नाही. मात्र, त्यांचा स्पष्ट रोख मनसेवर होता.

ईशान्य भारतात आज निवडणुकीचा दुसरा टप्पा
मिझोराममधील मतदान पुढे ढकलले
नवी दिल्ली :  नऊ टप्प्यात होणाऱ्या १६ व्या लोकसभेच्या निवडणुकांपैकी दुसऱ्या टप्प्यातील मतदान बुधवारी होणार आहे. भारताच्या ईशान्येकडे असलेल्या चार राज्यांमधील सहा मतदारसंघांमध्ये हे मतदान होईल. मिझोराममधील एकमेव जागेसाठी होणारे मतदान ११ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. सध्या त्रिपुरातील छावण्यांमध्ये राहत असलेल्या ‘ब्रू’ मतदारांना पोस्टाद्वारे मतदान करण्याचा अधिकार दिल्यामुळे, राज्यभरात बंद पुकारला गेला होता. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. मिझोरामव्यतिरिक्त नागालॅण्ड आणि मणिपूर येथील एकेका जागेसाठी तसेच अरुणाचल प्रदेश व मेघालयातील दोन जागांसाठी बुधवारी मतदान होणार आहे. अरुणाचल प्रदेशात तर ६० पैकी ४९ विधानसभा जागांसाठीही ९ तारखेलाच मतदान होणार आहे.  मेघालयात लोकसभेचे माजी सभापती पी.ए.संगमा आपले नशीब आजमावत आहेत.

काँग्रेसच्या आमदाराकडून माजी महापौरांना मारहाण
पुणे:काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांची औंध भागात प्रचारफेरी आयोजित करण्यात आलेली असताना एका माजी महापौरांना पक्षाच्याच आमदाराने मारहाण करण्याचा प्रकार घडला. उमेदवार विश्वजित कदम यांच्यासमोरच हा प्रकार घडल्यानंतरही मंगळवारी दिवसभरात पक्षाकडून या प्रकाराची कोणतीही दखल घेण्यात आली नाही.औंध परिसरात विश्वजित कदम यांची प्रचारफेरी आयोजित करण्यात आली होती. या फेरीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि माजी महापौर हेही या फेरीत त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत सहभागी झाले होते. तसेच काँग्रेसचे आमदारही त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत फेरीत सहभागी झाले होते. विश्वजित कदम यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच हे माजी महापौर कदम यांच्यासाठी जोरदार प्रचार करत असून त्यांची ही सक्रियता पक्षातील काही जणांना रुचलेली नाही. माजी महापौरांना त्यामुळेच मारहाण झाल्याची चर्चा आहे.

भाजपला पूर्ण बहुमत मिळणे अवघड!
अडवाणी यांची स्पष्टोक्ती
थिरुवनंतपूरम : १६ व्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला एकहाती सत्ता मिळेल का, याविषयी आपल्या मनात संभ्रम असल्याचे मत ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी नोंदविले. भाजपला संपूर्ण बहुमत मिळेल का, याविषयी शंका असली तरीही राष्ट्रीय लोकशाही आघाडी (भाजपप्रणीत आघाडी) मात्र आवश्यक ते संख्याबळ निश्चित मिळवू शकेल, असा आपल्याला विश्वास असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. भाजप उमेदवार ओ. राजागोपाल यांच्या प्रचारार्थ ते येथे आले होते.

‘वडे आणि सूप’ जेवढे काढतील, तेवढय़ा जागा कमी होतील- राणे
पुणे:‘मनसे आणि शिवसेना जेवढे वडे आणि सूप काढतील, तेवढय़ा त्यांच्या जागा कमी होतील. मनसेने सोयीस्कर उमेदवार उभे केले आहेत. त्याचा फायदाही आघाडीलाच होईल,’ असे वक्तव्य उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केले.राणे म्हणाले, ‘शिवसेनेची परिस्थिती बिकट झाली असून त्यांना फारतर ३ ते ४ जागा मिळतील. त्यांचे उमेदवारही कमकुवत आहेत. मनसेनेही सोयीच्या ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. त्याचा फायदाही आघाडीलाच होईल.लोकसभेच्या माध्यमातून देश चालवायचा आहे. मात्र, या दोन्ही भावांचे वडा आणि सूप सुरू  असल्याची टीका त्यांनी केली.

प्रचाराच्या जीपच्या धडकेत चिमुरडी ठार
उस्मानाबाद : उन्हाळ्याच्या सुटीत मामाच्या गावाला आलेल्या शिवानी भोसले (वय ५) या चिमुरडीला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या प्रचार ताफ्यातील गाडीने धडक दिली, यात तिचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक गंभीर जखमी झाला. सोलापूर जिल्ह्य़ातील पानगाव (तालुका बार्शी) येथे मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला. गाडीतील कार्यकत्रे मद्यधुंद अवस्थेत होते आणि त्यांना ग्रामस्थांनी चोप दिला.

भाजप नेत्यांवर कारवाईसाठी  काँग्रेस आक्रमक
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांचे निकटवर्ती अमित शाह तसेच राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोग आणि उत्तर प्रदेश सरकारवर तोफ डागत असून शाह यांच्याविरोधात कारवाई करण्यात तुम्ही का कचरत आहात, अशी विचारणा काँग्रेसने केली. शाह यांना अटक करून  कायदा आणि सुव्यवस्था स्थिती संभाळण्यात उत्तर प्रदेशचे समाजवादी सरकार टाळाटाळ का करीत आहे, असी विचारणा काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2014 12:01 pm

Web Title: election news in short 2
Next Stories
1 वडोदरामधून मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल
2 यावेळी करू नका घाई.. आता फक्त पूनम ताई..
3 मोदी, राहुल देशासाठी घातक- मायावती
Just Now!
X