येत्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता आल्यास कोकणच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळावारी येथे जणू निवडणूक प्रचाराचे शिंग फुंकले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे अनेक पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी येथील जिमखाना मदानावर उद्धव यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, गेल्या लोकसभा निवडणुकीत कोकणच्या जनतेने चमत्कार घडविला असून राजकीय नरकासुराचा वध केला आहे. आता त्या विषयावर बोलण्याची गरज उरलेली नाही. आता कोकणच्या जनतेला हवा असलेला विकास करण्याची आपल्या सर्वाची जबाबदारी आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीचे सरकार सत्तेवर आणल्यास हा विकास आम्ही निश्चितपणे घडवून दाखवू.
राज्याचे उद्योगमंत्री नारायणे राणे यांचा भाषणात नामोल्लेख न करता ठाकरे म्हणाले, कोकणचा माणूस शांतताप्रिय आहे, पण डरपोक नाही. कोकणात गुंडगिरीची हिंमत यापुढे कोणी करू नये. आयुष्यात संधी एकदाच मिळते. त्याचे सोने करायचे की माती, हे ज्याने त्याने ठरवायचे असते. बाळासाहेबांनी दिलेल्या मुख्यमंत्रिपदाच्या संधीची तुम्ही माती केली आणि फक्त स्वतचे सोने केले. गरिबाच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, अशी छत्रपती शिवाजीमहाराजांची ताकीद असे. पण गरिबालाच उखडून टाकणारी तुमची अवलाद आहे. इथल्या माणसाला तुम्ही नेस्तनाबूत केले. त्याची परतफेड कोकणी जनतेने केली.

कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित करा
उद्धव ठाकरे यांचे येथे आगमन झाल्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. कर्नाटकातील येळ्ळूर येथे गेल्या आठवडय़ात मारहाण झालेल्या कार्यकर्त्यांचाही त्यामध्ये समावेश होता. या प्रकाराचा उल्लेख करून ठाकरे म्हणाले की, केंद्र आणि राज्यामध्ये काँग्रेस पक्ष दीर्घकाळ सत्ता भोगत असूनही सीमाप्रश्न सोडवला नाही. कारण यांची अवलाद लाचारी, हुजरेगिरी करणारी आहे. संसदेत शिवसेनेच्या खासदारांनी या प्रश्नावर बुलंदपणे आवाज उठवला. हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित करा, अशी आमची मागणी आहे. तेथील मराठी माणसांना केंद्रीय राखीव पोलीस दलाचे संरक्षणही दिले पाहिजे. केंद्रामध्ये आता भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आहे. राज्यात महायुतीचे शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख वैभव नाईक, माजी आमदार शंकर कांबळी, उपनेत्या मीनाताई कांबळी, शिवाजीराव कुबल, खासदार विनायक राऊत, सुभाष मयेकर, सुरेश दळवी इत्यादींचीही या प्रसंगी भाषणे झाली. दिवसभर अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत असूनही जिल्’ाातील शिवसेना आणि आमदार केसरकर यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने हजेरी लावली.