भकपेबाजपणा नको, तर साधेपणाने वागा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी पक्षाच्या नेत्यांना दिल्या. विधानसभेसाठी नवे चेहरे, युवक, महिला आणि व्यापारी या वर्गांची नाराजी दूर करणे, मराठा आणि मुस्लिम आरक्षणाबरोबर धनगर आणि लिंगायत समाजाला सवलती आणि दलित समाजाला आपलेसे करून लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका दुरुस्त करण्यावर राष्ट्रवादीने भर दिला.
लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या अपयशास जबाबदार ठरलेल्या चुका दुरुस्त करून विविध समाजघटकांना चुचकारण्याचा प्रयत्न पवार यांनी पक्षाच्या बैठकीत केला. पराभवाच्या पाश्र्वभूमीवर मंत्री, आमदार, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सत्तेची मस्ती आलेल्या नेते आणि कार्यकर्त्यांना पवार यांनी खडे बोल सुनावले. सर्वसामान्य जनता आणि नेत्यांमध्ये योग्य समन्वय राहिलेला दिसत नाही. लोकांपासून आपण दूर जात आहोत हे जाणवले. परिणामी साधेपणाने राहा आणि वागा, असा सल्लाही पवार यांनी दिला.
मराठा आणि मुस्लिम आरक्षणाच्या आश्वासनांची पूर्तता करावी, अशी सूचना करतानाच लोकसभेच्या वेळी दूर गेलेल्या समाज घटकांना कसे जवळ करता येईल यावर भर दिला. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचे मताधिक्य कमी होण्यास धनगर समाजाची एकगठ्ठा मते विरोधात जाणे हे महत्त्वाचे कारण होते. यामुळेच धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या जुन्या मागणीला पवार यांनी पुन्हा हात घातला. लिंगायत समाजाला शेजारच्या राज्यात सवलती मिळतात, मग राज्यात का नाही, असा सवाल पवार यांनी केला. लोकसभा निवडणुकीत बहुसंख्य लिंगायत समाज असलेल्या मतदारसंघांत आघाडीचे उमेदवार मागे पडल्यानेच पवार यांनी या समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न केला. दलित समाजाचे मतदान तेवढय़ा मोठय़ा प्रमाणात न झाल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५वी जयंती पक्षाच्या वतीने साजरी करण्याची सूचना करतानाच कोल्हापूर जिल्ह्यात डॉ. आंबेडकर यांच्या उपस्थितीत झालेल्या माणगाव परिषदेच्या निमित्ताने तेथे स्मारक उभारण्याची सूचना पक्षाच्या मंत्र्यांना केली. स्थानिक संस्था कराच्या मुद्दय़ावर (एल.बी.टी.) काही दुरुस्त्या करून व्यापारी वर्गाला दिलासा देण्याची सूचना पवार यांनी मंत्र्यांना केली. विधानसभा निवडणुकीसाठी आपण दिवसातील १८ तास काम करणार आहोत, असेही पवार यांनी सांगितले. सध्या बदलांचे दिवस आहेत. लोक बदल लगेचच स्वीकारतात. यातूनच आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार ठरविताना काही नवे चेहरे दिले जातील हे सांगतानाच जिल्हा पातळीवर वर्षांनुवर्षे ठाण मांडून बसलेल्यांना बदलण्याची सूचना त्यांनी केली. ‘अच्छे दिन आनेवाले है’ या भाजपच्या घोषवाक्याचा आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी उल्लेख करताच सारे सभागृह आश्चर्यचकित झाले.
आर. आर., सुप्रिया सुळे प्रवक्ते
सोशल मिडिया तसेच एकूण माध्यमांमध्ये पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडली जात नसल्याने या आघाडीवर भरभक्कम नेत्यांची फळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी उभी केली आहे. आर. आर. पाटील, सुप्रिया सुळे या नेत्यांवर पक्षाची भूमिका माध्यमांमध्ये मांडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाने ३० प्रवक्ते नेमले होते. या सर्वांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या. पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी आमदार नवाब मलिक यांना कायम ठेवण्यात आले. त्यांच्या जोडीला १७ प्रवक्ते नेमण्यात आले आहेत. यात पवारांची कन्या सुप्रिया सुळे, आर. आर. पाटील, जयंत पाटील, सचिन अहिर, नरेंद्र वर्मा, वंदना चव्हाण, अंकुश काकडे, राहुल नार्वेकर, क्लाईड कॅस्ट्रो, धनंजय मुंडे आदींचा समावेश आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th May 2014 रोजी प्रकाशित
भपकेबाजपणा नको, साधेपणाने वागा!
भकपेबाजपणा नको, तर साधेपणाने वागा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी पक्षाच्या नेत्यांना दिल्या.

First published on: 24-05-2014 at 03:11 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Give up page three life be simple sharad pawar