भंडारा गोंदिया
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेते, शरद पवार यांचे निकटस्थ व केंद्रातील ‘वजनदार’ मंत्री अशी ओळख असलेल्या प्रफुल्ल पटेल यांच्यामुळे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाकडे विदर्भातील साऱ्यांचेच लक्ष लागलेले असते. पटेलांना या वेळी पूर्वी काँग्रेस आणि आता भाजपच्या तिकिटावर लोकसभेचे उमेदवार असलेले नाना पटोलेंशी दोन हात करावे लागणार आहेत. या मतदारसंघात मुख्य लढत या दोघांतच होणार असली तरी इतर उमेदवारांच्या मतांच्या धुव्रीकरणावर येथील निकाल अवलंबून राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कुणबी, पोवार, दलित व तेली समाजातील मते या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत. या वेळेस नव्याने उदयास आलेल्या ‘आप’नेही येथून प्रशांत मिश्रा या अनिवासी भारतीयांना उमेदवारी दिली आहे, तसेच गेल्या दोन निवडणुकांपासून येथे जाणवलेल्या बसपच्या प्रभावामुळे व त्यातच बसपमध्ये झालेली बंडखोरी हे येथील निवडणुकीवर परिणाम करणार असल्याने या वेळेस निवडणूक रंगतदार होणार असल्याचे दिसते. या निवडणुकीच्या दृष्टीने जवळपास सर्वच प्रमुख पक्षांनी उमेदवार जाहीर केले आहेत. कांॅग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार म्हणून पुन्हा प्रफुल्ल पटेल, भाजप-सेना महायुतीतर्फे आमदार नाना पटोले, ‘आप’ने अनिवासी भारतीय प्रशांत मिश्रा, बसपच्या वतीने संजय नासरे, तर प्रथमच समाजवादी पक्षातर्फे डॉ. रामेश्वर ठाकरे, भारिप-बमसंकडून प्रा. अंजली पटले, तृणमूल काँग्रेस पक्षातर्फे प्रमोद गजभिये यांची नावे घोषित झालेली आहेत. या व्यतिरिक्त अपक्ष बसपचे बंडखोर म्हणून मोरेश्वर मेश्राम, किसान गर्जना संघटनेकडून राजेंद्र पटले व रिपाइंचे जोगेंद्र कवाडे यांनीही या मतदारसंघातून लढण्याची घोषणा केलेली आहे. या दोन जिल्ह्य़ांतील सात विधानसभा मतदारसंघ मिळून तयार झालेला हा लोकसभा मतदारसंघ नक्षलवादग्रस्त व निसर्गसंपन्न आहे. गेल्या निवडणुकीत भाजपच्या ताब्यात असलेल्या हा मतदारसंघ राष्ट्रवादीने खेचून आणला.
यंदा मात्र चित्र वेगळे आहे. आमदार नाना पटोले यांची उमेदवारी भाजपकडून असल्याने पटेल यांना विजयासाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे. गेल्या पाच वर्षांतील प्रफुल्ल पटेल यांचा कार्यकाळ, मतदारसंघातील विविध समाजासाठी, सामान्यांसाठी केलेली कामे त्यांच्यासाठी जमेची बाजू असली तरी हा परिसर बारामतीसारखा व्हावा, अशी त्यांच्यासारख्या मोठय़ा नेतृत्वाकडून येथील जनतेची अपेक्षा असल्याने व तसे फारसे चित्र नसल्यामुळे, तसेच मोदी लाटेमुळे येथील भाजपत आलेल्या नवचतन्यामुळे दोघांमधील लढत चुरशीची ठरेल, हे नक्की. दिल्लीत ‘आप’ने प्रस्थापितांना धक्का दिल्याने स्थानिक पातळीवरही बदलत्या परिस्थितीचे सूर शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. येथील दलित मतांचा कल कुणाकडे राहणार, यावर बरीच मदार राहणार आहे. त्यात बसपच्या उमेदवारांसह, रिपाइंचे जोगेंद्र कवाडे, बसपचे बंडखोर मोरेश्वर मेश्राम, तृणमूल काँग्रेसचे प्रमोद गजभिये यांच्या मतांच्या ध्रुवीकरणावर कोण किती आघाडी घेणार यावर पटेल वा पटोले यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
या मतदारसंघात शेतकरी व कामगारांच्या समस्या या आíथक स्वरूपाच्या आहेत. तरुणांना रोजगाराची प्रतीक्षा आहे. स्थानिक प्रश्नांसोबतच प्रकल्पग्रस्त, सुशिक्षित बेरोजगार, बिडी कामगार, मत्स्य व्यावसायिकांच्याही अनेक समस्या आहेत. घोषणा झाल्या, पण यंदा शेतकऱ्यांना पुरेशी शासकीय मदत मिळाली नाही. त्यातच अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा प्रश्न, प्रकल्पग्रस्तांना विशेष पॅकेजचा लाभ व पुनर्वसनाची प्रतीक्षा आहे. या पाश्र्वभूमीवर आगामी निवडणुकीच्या निमित्ताने पदरात काहीतरी पडण्याची मतदारांची अपेक्षा आहे.

प्रफुल्ल पटेल – विकासाच्या मुद्दय़ांवर ही निवडणूक लढवीत असून गेल्या पाच वर्षांत दोन्ही जिल्ह्य़ांत केलेल्या विकासकामांवर मत मागणार आहे. जिल्ह्य़ाच्या सर्वागीण विकासाकडे नेहमी भर राहिला असून पुढेही राहणार आहे. समाजकारणातून विकासाचे राजकारण, हाच आपला उद्देश आहे.

नाना पटोले – विद्यमान खासदारांनी गेल्या पाच वर्षांत भ्रष्टाचारात नाव कमावले आहे. जिल्ह्य़ातील पायाभूत सुविधा पुरविण्यात केलेल्या दुर्लक्षामुळे जनतेची घरकुल, पिण्याच्या पाण्याची समस्या, शेतकऱ्यांचे सिंचनाचे प्रश्न रखडलेले आहेत. त्यांचा विकासकामांचा संपूर्ण आढावा केवळ बोंबा असून पोकळ व कागदोपत्री असून वास्तवात अशी कोणतीही विकासाची कामे झालेली नाहीत.

प्रशांत मिश्रा – आमचा लढा व्यवस्था परिवर्तनाचा असून देशातील १४ भ्रष्ट मंत्र्यांविरोधात लढण्याचा निर्धार ‘आप’ने केला होता. यातील एक मंत्री प्रफुल्ल पटेल असून यांना लोकसभेत पोहोचण्यापासून रोखणे हा आमचा प्रमुख मुद्दा राहणार आहे. यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळेच देशातील सर्वसामान्य जनतेला महागाईचा मार सोसावा लागत आहे.