देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तानशी ‘समझोता एक्सप्रेस’ मुळे कोंडीत सापडलेल्या शिवसेनेवर भाजप नेत्यांनी कोणाचेही नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडले आहे. मोदी यांनी पंतप्रधानपदाच्या शपथविधीला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना आमंत्रण दिल्याने आक्षेप असलेल्यांना पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद आपल्या घरी आलेला कसा चालतो, असा कडवट सवाल भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी उपस्थित केला आहे. देशाचे परराष्ट्र धोरण वेगळ्या पध्दतीने आखले जाते, ते देशांतर्गत राजकीय समीकरणांवर ठरत नसते, असाही टोला त्यांनी लगावला आहे.
शरीफ यांच्या उपस्थितीला शिवसेनेचा आक्षेप आहे. त्यावर भाजपमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. जावेद मियाँदादने ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती आणि भोजनही घेतले होते. सर्वाबरोबर छायाचित्रे काढून घेतली होती. जावेद मियाँदाद हा तर मुंबईतील बाँबस्फोटांसह अनेक गंभीर गुन्ह्य़ांचा मुख्य सूत्रधार असलेल्या कुख्यात दाऊद इब्राहिम यांचा व्याही आहे. शरीफ यांच्या निमित्ताने भाजपने मियाँदादच्या भेटीच्या प्रसंगाची आठवण करून दिली आहे.
मोदी यांनी ‘सार्क’ मधील सर्व देशांना निमंत्रण दिले आहे. मोदी हे चाणाक्ष व धूर्त नेते आहेत. त्यांना देशातील जनतेने प्रचंड बहुमताने निवडून दिले आहे. आक्षेप घेणाऱ्यांनी मोदींच्या विद्वत्ता व नीतीवर विश्वास ठेवला पाहिजे. जाहीर वक्तव्ये करण्यापेक्षा त्यांनी थेट मोदींशी संपर्क साधून आक्षेपांचे निराकरण करून घ्यावे, असे भांडारी यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसनेही शरीफ यांच्या निमंत्रणाला आक्षेप घेतला आहे. त्यावर इशरत जहाँच्या घरी धनादेश घेऊन जाणारे हेच नेते होते. सानिया मिर्झा हिने पाकिस्तानी क्रिकेटपटूशी निकाह केला, तेव्हा ‘दिल के टुकडे हजार हो गये, ’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती, असे भांडारी यांनी नमूद केले.