लोकप्रतिनिधींच्या परदेश दौऱ्यांवरून जनक्षोभ उसळला असतानाच आता कर्नाटकने मात्र अशा दौऱ्यांसाठी नवी योजना आखली आहे. काही विशिष्ट विषयांशी निगडित असलेल्या प्रश्नांसाठी कर्नाटकने आमदारांची पथके तयार केली असून, एखाद्या समितीला परदेश दौऱ्यावर पाठविण्याऐवजी या पथकाला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
अशा प्रकारची ३०-४० पथके तयार करण्यात आली असून, त्यांना विषयाशी निगडित प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी परदेश दौऱ्यावर पाठविण्यात येणार आहे, असे कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष के. थिमप्पा यांनी सांगितले. प्रत्येकी २० सदस्य असलेल्या विधिमंडळाच्या पाच समित्यांच्या सदस्यांनी आणि १५ अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत रशिया, दक्षिण अमेरिका देशांचा दौरा केला होता. यासाठी राज्याच्या तिजोरीवर आठ कोटी रुपयांचा बोजा पडला.