07 July 2020

News Flash

शेवटची निवडणूक ‘गोड’ होण्यासाठी..!

न्यायालयातील पट्टेवाला, फौजदार ते मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल ते देशाचा गृहमंत्री तथा लोकसभा नेता असा प्रवास करणारे सुशीलकुमार शिंदे यांची ही शेवटची

| April 15, 2014 03:57 am

न्यायालयातील पट्टेवाला, फौजदार ते मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल ते देशाचा गृहमंत्री तथा लोकसभा नेता असा प्रवास करणारे सुशीलकुमार शिंदे यांची ही शेवटची निवडणूक ‘गोड’ होणार का, त्यांनी निवृत्ती घेतली तर ते सोलापूरकरांना कितपत मानवणार, अशा प्रश्नांचे तुफान सोलापूरकरांच्या मनाभोवती घोंघावत आहे..
सोलापुरातील ‘मलबार हिल’ समजल्या जाणाऱ्या सात रस्ता परिसरात ‘जनवात्सल्य’समोर सकाळी सातपासूनच तळागाळातील कार्यकर्ते व नागरिकांची गर्दी सुरू होते. दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर बंगल्यातील प्रवेश खुला होतो. बंगल्यातील हॉलमध्ये साहेब सर्वाना भेटतात. काही महिला व वयोवृद्ध मंडळी आपल्या खासगी अडचणी मांडतात. नंतर कार्यकर्त्यांशी चर्चा, दिवसभराच्या कामाची माहिती व आढावा. त्याच गडबडीत, काही चाहत्यांसोबत छायाचित्रे काढण्याचाही कार्यक्रम.. तेवढय़ात वीरशैव लिंगायत समाजाच्या जिडगा मठाचे मठाधिपती बसवलिंग महास्वामीजी हेही साहेबांच्या भेटीसाठी येतात व आशीर्वाद देऊन जातात. ही गजबज बराच वेळ सुरू असते. गर्दी ओसरते आणि साहेब जातात..
..सोलापूर लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे बलाढय़ उमेदवार, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या बंगल्यातील सकाळचे हे दृश्य!
बंगल्यात जमलेले अभ्यागत व कार्यकर्त्यांची गर्दी ओसरते आणि काँग्रेस भवनाकडे जाण्यासाठी शिंदे बाहेर पडतात. टोयोटा फाच्र्युनर गाडीत बसल्यानंतरही पुन्हा आजूबाजूला घोळका जमतोच. त्यातल्याच कुणाशी बोलत, कुणाला नमस्कार करत गाडी पुढे सरकते. ताफा काँग्रेस भवनाकडे पोहोचतो. फटाक्यांची आतषबाजी व घोषणाबाजी होते आणि कार्यकत्यांमध्ये उत्साह संचारतो. आजी-माजी नगरसेवकांसोबत बैठक आटोपून साहेब काहीसे मोकळे होऊन शिंदे दालनात विसावतात तोच पत्रकारांचा गराडा पडतो. साहेबांचा मूडही चांगला असतो. मग गप्पा सुरू होतात. चार दिवसांपूर्वी झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या सभेचा संदर्भ निघतो आणि त्यांच्यावर तुटून पडत शिंदे मोदींचा समाचार घेतात. निवडणुकीच्या राजकारणापासून निवृत्त व्हायचंय, असंही बोलून जातात आणि ही आपली शेवटचीच निवडणूक आहे, असं आवर्जून नमूद करतात. मग, पहिल्या निवडणुकीपासून आजवरच्या प्रवासाचा काळ त्यांच्या डोळ्यांत तरळू लागतो.
करमाळा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत १९७४ साली शिंदे हे सर्वप्रथम उभे राहिले होते. पहिल्या निवडणुकीसाठी अवघ्या १६ हजारांचा खर्च आला होता. त्यानंतर पुढे १९७८ साली उत्तर सोलापूर तालुका विधानसभा संघ आरक्षित झाल्यानंतर तेथून निवडणूक लढविताना जेमतेम २५ हजारांचा खर्च झाला होता; परंतु नंतर पक्ष वाढत गेले, वाढत्या आशा-आकांक्षांबरोबर निवडणुकांचा खर्चही वाढतच चालला.. ‘‘आता कंटाळा आला. नको ही निवडणूक..’’ असं ते बोलून जातात.. ‘‘सोलापूरकरांनी भरभरून प्रेम दिले व इथपर्यंत पोहोचविले, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. म्हणूनच, १७ तारखेला मतदान होईपर्यंत मी सोलापूर सोडून अन्य कोठे जाणार नाही. ही शेवटची निवडणूक ‘गोड’ व्हावी अशी माझी इच्छा आहे!’’.. काहीसे भावुक होऊन शिंदे सर्वाना नमस्कार करतात. या गप्पांचा फड रंगत असतानाच कुणी कार्यकर्ता खुणावतो आणि तातडीने शिंदे निघतात. दुपार रणरणत असते. निवडणुकीतील व्याप, धावपळीत शिंदे यांच्या प्रकृतीची काळजी घेण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवरच असते. सकाळी नाष्टा न करताच बाहेर पडलेले शिंदे काँग्रेस भवनात पोहोचताच हा कार्यकर्ता समोर सफरचंदाच्या फोडी ठेवतो आणि नाश्ता उरकला जातो. दुपारी बंगल्यातही ज्वारीची भाकरी व दही-शेंगदाण्याची चटणी आणि ताक असाच बेत असतो. वाढत्या तापमानामुळे बाहेर पडणे टाळून बंगल्यात दीड तास विश्रांती सुरू होते आणि कार्यकर्तेही बंगल्यातच विसावतात..  
विश्रांतीनंतर मोहोळ, मंगळवेढा व पंढरपूरकडे प्रचारासाठी गाडय़ांचा ताफाही सज्ज होतो. सायंकाळी मोहोळमध्ये पोहोचल्यानंतर गाडय़ांचा ताफा शिवसेनेचे मोहोळ तालुकाप्रमुख काकासाहेब देशमुख यांच्या निवासस्थानासमोरच थडकतो आणि कुजबुज सुरू होते.. देशमुख यांचे वडील कमलाकर देशमुख यांचे निधन झाल्याने ही सांत्वनाची भेट असते. शंभरेक शिवसैनिकही हजर असतात. शिंदे आणि शिवसेना यांचे नाते जवळचे आहे, असं सोलापुरातील सारे जण मानतात. गेल्या विधानसभा निवडणुकीतही शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांच्या विरोधात शिवसेनेच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा ठरली होती, परंतु शेवटच्या क्षणी ते आले नाहीत. त्याच नात्यातून मोहोळला देशमुखांच्या घरी सांत्वनासाठी शिंदे पोहोचलेले असतात, हे त्या शिवसैनिकांनाही माहीत असते. तेथून ताफा मंगळवेढय़ाकडे रवाना होतो. वाटेत पोखरापूर येथे पाण्यासाठी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिल्यामुळे शिंदे यांच्या गाडय़ांचा ताफा थांबतो. गावकऱ्यांशी रस्त्यावरच उभ्या उभ्या बातचीत होते आणि गावकरी भूमिका बदलतात. शिंदे यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलते आणि गावकऱ्यांचा निरोप घेऊन ते पुढे निघतात. सायंकाळी सहाच्या सुमारास शिंदे यांचे सभास्थानी आगमन होते, तेव्हा सभेला हजर असलेल्या हजारोंचा जनसमुदाय पाहून शिंदे यांची कळी खुलते; परंतु शेवटी जेव्हा शिंदे हे भाषणाला सुरुवात करतात, तोच सभेतील लोक काही मिनिटांतच उठून निघून जातात. त्यामुळे अवघ्या पाच मिनिटांत शिंदे यांना भाषण आटोपते घेऊन पुढे पंढरपूरकडे जावे लागते. मंगळवेढय़ात पाण्याचा प्रश्न कळीचा मुद्दा आहे. यातच मोदींच्या नावाची हवा आहे. सभेबाहेर एका चहा टपरीवाल्याकडे चहा घेणाऱ्या खेडुतांना भाषणात फारसा रस नसतो. तेच-तेच काय ऐकायचे, असा थेट प्रश्नच एक जण करतो आणि सारे खळखळून हसतात.
रात्री पंढरपुरातील शिवाजी चौकात सभा होती. या सभेची गर्दी पाहून पुन्हा शिंदेंच्या चेहऱ्यावर उत्साह .. स्थानिक नेत्यांची भाषणे झाल्यानंतर सरतेशेवटी शिंदे भाषणासाठी उठतात, मग पंढरपूरच्या विठ्ठलाच्या भक्ती परंपरेपासून ते नरेंद्र मोदींपर्यंत अनेक मुद्दय़ांना स्पर्श करीत शिंदे संवाद साधू लागतात. सभेनंतर काँग्रेसचे स्थानिक नेते कल्याणराव काळे यांच्या घरी रात्रीच्या भोजनाची व्यवस्था असते. भोजन उरकल्यानंतर शिंदे यांनी सर्वाशी संवाद साधत प्रचाराच्या स्थितीची माहिती घेत गाडय़ांचा ताफा सोलापूरच्या परतीच्या वाटेला लागतो आणि रात्री उशिरा ‘जनवात्सल्य’वर दाखल होतो. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हेदेखील सोलापुरातच असल्याचे समजताच भ्रमणध्वनीवर पवार यांच्याशी संपर्क साधून चर्चा होते. स्थानिक नेते बंगल्यावर येऊन दिवसभराच्या कामाचा अहवाल देतात. रात्री उशिरापर्यंत खलबते सुरूच असतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2014 3:57 am

Web Title: loksatta reporter spend one day with sushil kumar shinde campaign
Next Stories
1 मोदींच्या नावे मते मागणाऱ्या अन्य पक्षांवर कारवाई अशक्य
2 ‘गुजरातच्या विकासाचे प्रारूप हे टॉफी मॉडेल’!
3 पवार आणि मुख्यमंत्र्यांचे निवडणुकीत तरी सूर जुळले..
Just Now!
X