गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेला भरभरून मतदान करणाऱ्या मतदारांनी यावेळी मनसेला के वळ नाकारलेच नाही तर आपली मते शिवसेना-भाजपच्या उमेदवारांना दिल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून स्पष्टपणे दिसत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेला सुमारे पंधरा लाख मते मिळाली होती तर यावेळी अवघी सात लाख मते मिळाली असून मनसेचे निम्म्याहून अधिक मतदार हे शिवसेना-भाजपकडे परत वळल्याचे दिसून येते.
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला १८.२ टक्के मते मिळाली होती तर यावेळी त्यामध्ये पन्नास टक्के वाढ होऊन ती २७.५७ टक्के एवढी वाढ झाली आहेत. त्यातुलनेत शिवसेनेच्या मतांच्या टक्केवारीत चार टक्केच वाढ झाली आहे. सेनेला यावेळी २०.८२ टक्के मते मिळाली. अर्थात सेनेच्या मतांच्या टक्केवारीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली नसली तरी जागा मोठय़ा संख्येने जिंकल्या आहेत. त्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसच्या जागा १७ वरून दोन एवढय़ा कमी झाल्या असल्या तरी मतांच्या टक्केवारीत १.४ टक्के एवढाच फरक झालेला आहे. काँग्रेसला गेल्या लोकसभेत १९.६ टक्के मते मिलाली होती तर यावेळी १८.२९ टक्के एवढी मते मिळाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची घसरण चार टक्के झाली आहे. त्याचवेळी मनसेच्या सर्वच्या सर्व उमेदवारांची अनामत रकम जप्त होण्याची नामुष्की ओढावली असून लाखभर मतेही मिळवणे मनसेच्या उमेदवारांना शक्य झालेले नाही.
गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेला सुमारे चार टक्के म्हणजे पंधरा लाख मते मिळाली होती. यावेळी मनसेला अवघी १.४७ टक्के मते मिळाली आहेत.  ज्या नाशिकवर मनसेची भिस्त होती तेथे तर मनसेचे पुरते पानिपत झाले. ठाणे लोकसभेतही गेल्यावेळी राजन राजे यांना सुमारे दीड लाख मते मिळाली होती तर यावेळी अवघ्या ४८ हजार मतांवर समाधान मानावे लागले. लोकसभा निवडणुकीतील निकालांवरून मनसेची मते पुन्हा शिवसेना-भाजपाकडे वळल्यामुळे विधानसभा निवडणुकीत मनसेपुढे मोठे आव्हान निर्माण झाल्याचे मनसेच्या आमदारांचेही म्हणणे आहे.
मतांमध्ये घट
दादरमध्ये गेल्यावेळी लाखापेक्षा जास्त मते श्वेता परूळकर यांना मिळाली होती. यावेळी दक्षिण मध्य मुंबईतील मनसेचे उमेदवार आदित्य शिरोडकर यांना अवघी ७३ हजार मते मिळाली आहेत. दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकर यांना गेल्यावेळी एक लाख ५९ हजार मते मिळाली होती तर यावेळी त्यांना अवघी ८० हजार मते मिळाली. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात गेल्यावेळी शालिनी ठाकरे यांना एक  लाख ४७ हजार मते मिळाली होती तर यावेळी मनसेचे उमेदवार महेश मांजरेकर यांना अवघी ६६ हजार मते मिळाली.