देवभूमी वाराणसीत मोदी लाटेपेक्षा जातीय समीकरणे प्रभावी ठरली आहेत. सोशल मिडीया, कॉपरेरेट प्रचारतंत्राच्या प्रभावी वापर करून ‘लाट’ आणणारे  भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनादेखील वाराणसीत जातीय समीकरणे सांभाळावी लागत आहेत.   मतदानाच्या पहिल्या सात टप्प्यात रामनामाला टाळून प्रचार करणाऱ्या मोदींना अखेरच्या दोन टप्प्यात धार्मिक प्रतिकांचा आसरा घ्यावा लागला. त्यामुळे फैजाबादमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांच्या पोस्टरसमोर उभे राहून भाषण करणाऱ्या मोदींनी आता वाराणसीत गंगा आरतीचा घाट घातला आहे. मात्र सुरक्षेचे कारण पुढे करून स्थानिक प्रशासनाने मोदींची सभा व गंगा आरतीला परवानगी नाकारली. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजप नेत्यांनी परवानगी नाकारणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यास हटवण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.  
 येत्या १२ मे रोजी अखेरच्या टप्प्यात वाराणसीत मतदान होणार आहे. तत्पूर्वी वाराणसीत मोदींची मोठी सभा तसेच गंगा आरती आयोजित करण्याची योजना भारतीय जनता पक्षाने आखली होती. गंगा आरती हा उत्तर भारतीयांसाठी अत्यंत श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे गंगा आरतीचा मोठा परिणाम मतदारांवर होईल, असा भाजपला विश्वास वाटतो. हिंदूंसाठी वाराणसीचे धार्मिक महत्त्व अबाधित आहे. गंगेच्या विस्तीर्ण तटावर पसरलेल्या वाराणसीकरांचा गंगेशी आत्मीय संबंध आहे. पुराणांमध्ये महत्त्वाचे मानल्या गेलेल्या दशाश्वमेध घाटावर गंगा आरती केल्यास हिंदू मतांचे ध्रुवीकरण होण्याचा भाजपला विश्वास आहे. उत्तर भारतात पराकोटीचा वर्णसंघर्ष असल्याने उमेदवाराची जात प्रभावी ठरते. त्यामुळे मोदींचा विजय निश्चित असल्याचा दावा भाजप नेते करीत असले तरी मताधिक्यासाठी धार्मिक प्रतीकांचा वापर करण्याची वेळ मोदींवर आली. त्यातूनच गंगा आरतीचा घाट घालण्यात आला.
 भाजपने वाराणसीच्या बेनियाबाग मैदानावर मोदींच्या सभेची परवानगी मागितली होती. अल्पसंख्याकबहुल परिसरात असलेले या मैदानावर मोदींच्या सभेमुळे सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा दावा करीत प्रशासनाने परवानगी नाकारली.  प्रचारात अहमदाबादनंतर पहिल्यांदाच मोदी गुरूवारपासून वाराणसीत सलग तीन दिवस आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त सभा, कार्यकर्त्यांच्या भेटींचे नियोजन आहे.
बेनियाबाग मैदान अल्पसंख्याकबहुल भागात आहे. १९९१ साली या मैदानावर झालेल्या भाजपच्या सभेत नेत्यांनी वादग्रस्त विधाने केली होती. पोलीसांनी मध्यस्थी करून ही सभा विसर्जित करण्यास भाग पाडले होते. भाजप नेत्यांना पोलीस संरक्षणात सभास्थानावरून न्यावे लागले होते. तशी परिस्थिती पुन्हा होवू नये यासाठी परवानगी नाकारण्यात आल्यचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या मैदानावर शक्तीप्रदर्शन केल्यास त्याचा चांगला परिणाम होईल, अशी भाजपला आशा आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने गंगा आरती व वाराणसीत सभेची परवानगी नाकारली आहे. त्याविरोधात  राज्यसभेतील विरोधी पक्षनेते व ज्येष्ठ भाजप नेते अरूण जेटली यांनी मोदींची सभा व गंगा आरतीला परवानगी नाकारणाऱ्या अधिकाऱ्यास हटविण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली. नरेंद्र मोदींच्या प्रचाराची धूरा सांभाळणारे अमीत शाह यांच्या नेतृत्वात बनारस हिंदू विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर सभा नाकारण्याच्या निषेधार्थ प्रशासनाविरुद्ध निदर्शने करण्यात येणार आहेत.

गंगातीरी लक्ष्मीदर्शन
वाराणसी म्हणजे घाट. पायऱ्या-पायऱ्यांचे. प्रत्येक घाटावर तुम्हाला मोक्षप्राप्तीसाठी ‘मार्गदर्शक’ वगैरे भेटतात. वाराणसी साक्षात शंकराची भूमी. स्वत: शिवशंभू वाराणसीत विराजमान आहेत. काशी विश्वनाथाचे मंदिर पूजेचे साहित्य, कपडे, खेळणी यांसारख्या वस्तूंनी वेढलेले. गौदलिया चौकापर्यंत सायकल-रिक्षाने जाता येते. तेथून पुढे पाचेक मिनिटे पायी चालत गेलात, की घाटच-घाट. प्रत्येक घाटाची एक स्वतंत्र आख्यायिका. प्रत्येक घाटावर ‘घाटाधीश’! एरव्ही वाराणसीची सकाळ व लखनौची संध्याकाळ उत्तर भारताचे वैशिष्टय़, पण निवडणुकीच्या काळात वाराणसीची मध्यरात्रदेखील महत्त्वाची ठरली आहे, कारण साडेतीनशे घाटांपैकी किमान शंभरेक घाटांवर मध्यरात्रीनंतर ‘लक्ष्मी’ प्रकट होते! गंगेच्या तीरावर निवास करणारे, छोटय़ा-मोठय़ा वस्तू, हार-फूल-दिवे विकून गुजराण करणाऱ्यांना लक्ष्मी प्रसन्न होतेय, मतदान करा, असे सांगते! गंगामाईची कृपा म्हणून निवडणुकीच्या काळात आमच्यावर लक्ष्मी प्रसन्न झाली, असंही बिनदिक्कतपणे बनारसी माणूस ठोकून देतो. बरं लक्ष्मी कुण्या एका रूपात येत नाही. कधी ‘कमळात’ विराजमान होऊन, कधी हत्तीवर, तर कधी सायकलवर स्वार होऊन. प्रत्येक  रात्री लक्ष्मीदर्शनाचे ‘पुण्य’ लाभल्याने सामान्य मतदारराजा मात्र खूश झाला आहे.
दाल बाटी चूरमो-मारवाडी सूरमो
मारवाड प्रदेशाचे रहिवासी म्हणजे मारवाडी..पोटापाण्याच्या सोयीसाठी मारवाडी बांधव भारताच्या कानाकोपऱ्यात गेले. लहान-मोठे उद्योगधंदे उभारले. पिढीजात व्यवसाय स्वीकारला. अशांचे संमेलन वाराणसीत आयोजित केले आहे. कधी ते विचारू नका, कारण वाराणसीच्या रस्त्यारस्त्यांवरील विजेच्या खांबांवर छोटेखानी पोस्टर्स लागले आहेत. आंतरराष्ट्रीय मारवाडी संमेलनाचे. त्यावर तारीख, वेळ, दिनांक काहीही नाही. केवळ आवाहन आहे. पहले करे मतदान- फिर करे जलपान! मारवाडी अस्सल खवय्ये. त्याचा खुबीने वापर करून मतदानासाठी आवाहन केलेले आहे. पोस्टरवर कुणाचाही फोटो नाही. हे संमेलन कुणी आयोजित केले याची फारशी कुणाला माहिती नाही; परंतुपोस्टरवरील भगव्या व हिरव्या रंगांच्या छटा खूप काही सांगून जातात.
पोलिसांच्या कुटुंबीयांची पुण्य-सफर
नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडणूक लढवणार असल्याने निम्म्या उत्तर प्रदेशची पोलीस फौज इथे दाखल झाली आहे. हरयाणा, पंजाब पोलिसांची अतिरिक्त कुमक मागविण्यात आली आहे. बरं पोलीस म्हणजे सणासुदीच्या दिवसांत सर्वाधिक व्यस्त. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसाठी सण-उत्सव कुटुंबप्रमुखाविनाच. त्यात निवडणूक म्हटली की, पोलिसांना कामावर हजर राहावेच लागणार, पण वाराणसीत यायला अनेक पोलीस उत्सुक होते. हरयाणाचा एक पोलीस कर्मचारी  तर आई-वडील, सासू-सासऱ्यांसह वाराणसीत दाखल झाला आहे. त्याच्या नातेवाईकांची कित्येक दिवसांपासून वाराणसीला येऊन गंगामाईत डुबकी मारण्याची इच्छा होती. त्यामुळे वाराणसीला काही दिवस बंदोबस्तासाठी जावे लागणार असल्याने हा पोलीस कर्मचारी नातेवाईकांनादेखील घेऊन आला. या कर्मचाऱ्याची रात्रपाळी असल्याने त्याला दिवसा आपल्या नातेवाईकांसोबत वाराणसी दर्शन करता येते. तोही खूश नि नातेवाईकदेखील. कुणी म्हणे काशी विश्वनाथाने बोलावल्याशिवाय वाराणसीला जाता येत नाही. तेव्हा असंच कानावर पडलं.. काशी विश्वनाथाने नाही मोदींमुळे वाराणसीला यावे लागले. अरेरे.. हे काय.. हर – हर मोदी!
– बनारसी बाबू