तिसऱ्या टप्प्यात मुंबई, ठाणे, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात गुरुवारी मतदान होणाऱ्या १९ मतदारासंघांवर वर्चस्व राखण्यासाठी काँग्रेस आघाडी आणि भाजप-शिवसेना युतीत चढाओढ आहे. गेल्या निवडणुकीत १९ पैकी काँग्रेस-राष्ट्रवादीचे १० तर भाजप-शिवसेना युतीचे आठ खासदार निवडून आले होते. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचा उमेदवार पालघरमधून निवडून आला होता. २००४ आणि २००९च्या निवडणुकांमध्ये मुंबईतील लढविलेल्या पाचही जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. १९९९ मध्ये युतीचे पाच खासदार मुंबईतून निवडून आले होते. १९९८ मध्ये काँग्रेसचे वर्चस्व राहिले होते. १९९६च्या निवडणुकीत सहाही जागा युतीने जिंकल्या होत्या. मुंबईकर एकाच पक्षाच्या बाजूने सामूहिक कल देतात, असे गेल्या पाच निवडणुकांच्या निकालांवरून स्पष्ट झाले आहे. यामुळेच यंदा मुंबईकरांचा कल कोणत्या दिशेने असेल याबाबत उत्सुकता आहे. नरेंद्र मोदी यांचा प्रभाव असल्यास मुंबईत युतीचे खासदार जास्त निवडून येतील, असा युतीच्या नेत्यांना विश्वास आहे, तर मुंबईवरील काँग्रेसचे वर्चस्व कायम राहील यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे ठाम आहेत.
खान्देशमधील सहापैकी सध्या चार जागा भाजपकडे आहेत. हे संख्याबळ कायम राहावे, असा भाजपचा प्रयत्न आहे. नंदुरबारमध्ये आतापर्यंत काँग्रेसचा कधीही पराभव झालेला नाही. यंदा मात्र काँग्रेसचे माणिकराव गावित यांना भाजपच्या हीना गावित यांनी कडवे आव्हान दिले आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांच्यासमोर विरोधकांनी आव्हान उभे केले आहे. खान्देशमध्ये चित्र बदलण्याची शक्यता नाही. उलट झालाच तर युतीचा फायदाच होऊ शकतो.
ठाणे जिल्ह्यातील चार जागांपैकी तीन जागा जिंकण्यावर युतीने भर दिला आहे. भिवंडीत मुस्लिम आणि कुणबी मतांचे ध्रुवीकरण करीत जागा कायम राखण्याचा काँग्रेसचे विश्वनाथ पाटील यांचा प्रयत्न आहे. ठाण्याची जागा कायम राखण्यासाठी राष्ट्रवादीचे संजीव नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये शेवटपर्यंत एकवाक्यता दिसली नाही. पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांच्यासमोर भाजपचे अ‍ॅड. चिंतामण वनगा यांनी कडवे आव्हान उभे केले असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ते जाधव यांना साथ देत नाहीत, असे चित्र आहे.