07 August 2020

News Flash

कलगीतुरा: मोदींच्या जातीवरुन अन् उच्च-नीच शब्दांवरून

नरेंद्र मोदी हे इतर मागासवर्गीय असल्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये वाद पेटला आहे. आपण मागासवर्गीय असल्याच्या मोदी यांनी केलेल्या दाव्याची वैधता काय,

| May 10, 2014 01:05 am

नरेंद्र मोदी हे इतर मागासवर्गीय असल्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये  वाद पेटला आहे. आपण मागासवर्गीय असल्याच्या मोदी यांनी केलेल्या दाव्याची वैधता काय, असा सवाल काँग्रेसने केला असून तो भाजप आणि गुजरात सरकारने फेटाळला आहे. तर काँग्रेसने राजकीय अस्पृश्यता आणि तिरस्काराचे राजकारण सुरू केले असा आरोप मोदींनी मोतिहारी येथील प्रचारसभेत केला.
नरेंद्र मोदी यांची जात हाच काँग्रेससाठी मोठा काळजीचा प्रश्न झाला आहे, असे भाजपने म्हटले आहे. गुजरात सरकारने दोन दशकांपूर्वीच्या अधिसूचनेचा आधार घेतला आहे. त्यामध्ये मोध-घांची जातीचा उल्लेख असून मुख्यमंत्री त्या जातीचे आहेत आणि त्या जातीचा समावेश अन्य मागासवर्गीयांत करण्यात आला आहे, असे राज्य सरकारने म्हटले आहे.
मोदी यांनी आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी जातीचा आधार कधीही घेतलेला नाही, त्यांचे आवाहन जातीपातीच्या राजकारणांच्या पलीकडील आहे. एका सर्वसामान्य व्यक्तीकडून पराभव स्वीकारावा लागणार असल्याची बाब काँग्रेसला पचविणे जड जात आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी म्हटले आहे.
मोदींची सोनियांवर टीका
काँग्रेसने राजकीय अस्पृश्यता आणि तिरस्काराचे राजकारण सुरू केले आहे. या निवडणुकीत पराभव होणार हे सपशेल समोर दिसत असल्यानेच काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उच्च आणि नीच राजकारण करण्यास सुरुवात केली आहे, असा आरोप भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील मोतिहारी येथील सभेत केला आहे.
देशात राजकीय अस्पृश्यतेच्या राजकारणाला कोणी सुरुवात केली, असा सवाल मोदी यांनी जाहीर सभेत उपस्थितांना केला. ज्यांनी मतांचे राजकारण केले त्यांनीच राजकीय अस्पृश्यतेचीही सुरुवात केली आहे, असेही मोदी यांनी काँग्रेसचा संदर्भ देऊन सांगितले.  निवडणूक प्रक्रियेत आम्ही विकासावर आधारित राजकारणाच्या मुद्दय़ापासून फारकत घेतली नाही. सोनिया गांधी यांनीच उच्च आणि नीच राजकारण सुरू केले. सोनिया गांधी एका पक्षाच्या अध्यक्षा आहेत, त्यांना उच्च आणि नीच, अशी भाषा वापरणे शोभत नाही, असेही मोदी म्हणाले. काँग्रेसला पराभव समोर दिसत असल्यानेच आता त्यांनी हा मार्ग स्वीकारला आहे, असेही मोदी म्हणाले. केरळचा एक मंत्री आपल्याला भेटला म्हणून त्याच्याकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले. इतकेच नव्हे तर गानकोकिळा लता मंगेशकर यांनी आपली स्तुती केल्याने त्यांना देण्यात आलेला ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब परत घ्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या एका नेत्याने केली, हे कोणत्या प्रकारचे राजकारण आहे, असा सवालही मोदी यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2014 1:05 am

Web Title: narendra modi plays victim says his personal life caste under attack
Next Stories
1 पाठिंब्यासाठी सर्व पर्याय खुले ; अमित शहा यांचे स्पष्टीकरण
2 मुंबई, ठाणे, पुण्यासाठी नव्या मतदार याद्यांची भाजपची मागणी
3 भ्रष्टाचाराविरुद्ध पावले न उचलल्याने सरकारला अपयश-बारू
Just Now!
X