लोकसभेत महागाईच्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सभागृहात डुलकी घेत असतानाचे फुटेज बुधवारी सोशल मीडियावरून प्रसारित झाले आणि त्यांच्या डुलकीचीच चर्चा रंगली.
मिटलेले डोळे आणि डुलकी घेताना उजव्या बाजूला झुकलेली मान, अशा अवस्थेतील राहुल गांधी बुधवारी संपूर्ण देशाने पाहिले. लोकसभा दूरदर्शनवरील हे चित्रीकरण सोशल मीडियावरून सर्वत्र प्रसारित झाले आणि त्यापाठोपाठ या डुलकीचे वर्णन करणारी शेरेबाजीही सर्वाना ऐकावयास मिळाली.राहुल गांधी झोपेत होते, या वृत्ताचे काँग्रेसने जोरदार खंडन केले तर महागाईच्या प्रश्नावर काँग्रेस पक्ष गेली १० वर्षे याच अवस्थेत होता, अशी खोचक टिप्पणी भाजपच्या सदस्यांनी केली.काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी या प्रकरणाचे जोरदार खंडन केले. हा प्रश्न अधिक संवेदनक्षम करण्यात आला, असेही ते म्हणाले. गेल्या जवळपास दीड महिन्यापासून सरकार क्षुल्लक आणि सुडाचे राजकारण करीत आहे, असेही सिंघवी म्हणाले.
महागाईच्या प्रश्नावर काँग्रेस गेल्या १० वर्षांपासून झोपलीच आहे आणि सभागृहात महागाईवर चर्चा सुरू असतानाच काँग्रेसचे युवराज झोपेतच आहेत, असे भाजपचे प्रवक्ते शहानवाझ हुसेन म्हणाले.